Friday, 28 February 2020

विभाग २ - आत्मविचार आणि शरणागती - प्रकरण ७ - भक्ती आणि समर्पण

भक्ती आणि समर्पणभावविषयक भगवान श्री रमण महर्षींचा उपदेशाचा आपण या प्रकरणात गोषवारा घेणार आहोत.
डेव्हिड गॉडमन यांचा प्रस्तावनेतील सारांश असा आहे:
जगभरच्या धार्मिक परंपरांमधे व्यक्तिगत 'मी' च्या पलीकडे जाण्यासाठीचा एक उपाय या दृष्टीने परमेश्वराला अनन्य भावाने शरण जाण्याविषयीचे प्रतिपादन केलेले दिसते. श्री रमण महर्षींना या मार्गाची वैधता पूर्णपणे मान्य होती आणि ते नेहेमी असे म्हणत असत की शरणागती ही साधनाप्रणाली देखील आत्मविचाराइतकीच परिणामकारक आहे. परंपरेने समर्पणाच्या मार्गाची सांगड नेहेमी उपास्य आणि उपासक अशा द्वैतभावावर आधारलेल्या भक्तीभाव आणि उपासनापद्धतींशी घातलेली दिसते. श्री रमण महर्षींंच्या दृष्टीने पाहताना मात्र अशा उपासनापद्धतींना नेहेमीच दुय्यम स्थान दिलेले दिसते. खरी शरणागती ईश्वराची उपासना करताना अंगीकारलेल्या उपास्य आणि उपासक या नात्यापलीकडे जाते हे दाखवण्यावर महर्षींचा भर असल्याचे दिसते, कारण आपण उपास्यापेक्षा वेगळे आहोत अशी कल्पना करून घेतलेल्या उपासकाचे स्वायत्त अस्तित्वच जेव्हा विलीन होऊन जाते तेव्हाच शरणागती सुफळ संपूर्ण होते.
शरणागती हे ईप्सित साध्य होण्यासाठी श्री रमण महर्षी दोन वेगवेगळ्या साधनापद्धतींची शिफारस करत असत:
१. 'मी आहे' या अहंस्फुरणेशी आपण ईश्वरापेक्षा पृथकतेने नांदतो आहोत अशा भ्रमात असलेला तथाकथित 'मी' नाहीसा होईपर्यंत सतत अनुसंधान राखणे
२. आपल्या आयुष्याविषयीचे सारे उत्तरदायित्व ईश्वरचरणी किंवा निजस्वरूपाच्या ठायी पूर्णपणे समर्पित करणे. आत्मसमर्पण परिणामकारक ठरावे या साठी साधकाला स्वत:चे संकल्प विकल्प आणि वासना नसणे तसेच ईश्वरी सत्तेपासून वेगळे असलेले संकल्प पूर्तीस नेण्याची क्षमता बाळगणारे स्वतंत्र व्यक्तिमत्व अस्तित्वात असल्याचा भ्रम पूर्णपणे नाहीसा होणे अनिवार्य असते.
वरील पैकी पहिली पद्धत भक्तीचा मुखवटा धारण केलेला 'आत्मविचार'च आहे हे स्पष्टपणे दिसून येते. रमण महर्षी नेहेमी आत्मविचार आणि समर्पणभाव यांची तुलना करताना एक तर असे सांगत की एकाच प्रक्रियेला दिलेली ही दोन वेगवेगळी नावे आहेत, किंवा आत्मसाक्षात्कारी स्थिती प्राप्त करण्याचे फक्त हे दोनच परिणामकारक मार्ग आहेत. रमण महर्षींनी त्यांच्या भक्तांना भक्तीमार्गी उपासना करण्यापासून कधीच परावृत्त केले नाही, मात्र ते सातत्याने असे निदर्शनास आणून देत असत की ईश्वराबरोबरचे कुठलेही नाते (अंश, भक्त, उपासक, दास, सखी इत्यादि) हे काल्पनिक आहे कारण वास्तवात फक्त ईश्वरच अस्तित्वात आहे. महर्षी सांगत असत की आपल्या खरोखरच्या स्वरूपात स्थित राहणे, आपण आणि ईश्वर यातले द्वैतात्मक नाते संपुष्टात येईल इतके त्या चैतन्याशी तदाकार होऊन किंवा समरस होऊन जाणे हीच खरी भक्ती आहे.
रमण महर्षी स्वतः प्रांजळपणे हे मान्य करत असत की या दोन्ही पद्धतींनी अहंतेचे पूर्णपणे आणि तत्क्षणी विसर्जन करणे हे ध्येय बहुतेक सगळ्याच साधकांसाठी अशक्य कोटीतली बाब आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेत महर्षी अशा अनुयायांना ज्याने भक्तीभाव दृढ होईल आणि मनावर ताबा मिळवता येईल अशा काही प्राथमिक इयत्तेतल्या साधनपद्धतींचा अवलंब करण्याचा सल्ला देत असत. या पैकी बहुतांशी साधनपद्धतींमधे ईश्वर (इष्टदैवत) किंवा सद्गुरूंशी सतत नामस्मरण करत अनुसंधान राखणे किंवा त्यांचे सगुण रूप आठवून मानसपूजेच्या स्वरूपात त्यांचे ध्यान करण्याचा अंतर्भाव असे. महर्षी भक्तांना असा निर्वाळा देत असत की नियमीतपणे प्रेम आणि भक्तीने ओतप्रोत होऊन कुठलेही साधन केले तरी त्या योगे टिपकागदाने एखादे द्रव्य टिपून घ्यावे तसे साधकाचे मन विनासायास उपास्यदेवतेत विलीन व्हायला लागेल. हे एकदा साध्य झाले की अनन्य भावाने शरणागत होण्यापर्यंतचा प्रवास सुकर होऊन जाईल.
पुरवणी: स्वामी स्वरूपानंद (पावस) कृत अमृतधारेतील एक वेचा -
मी-माझे भ्रांतीचे ओझे उतर खालती आधी, तरिच तत्वता क्षणात हाता येते सहज-समाधि |
सहज-समाधी संतत साधी न लगे साधन अन्य, सुटुनी आधि-व्याधि-उपाधि होते जीवन धन्य |
'मी' 'मी' म्हणसी परी जाणसी काय खरा 'मी' कोण? असे 'काय' मी 'मन', 'बुद्धी' वा 'प्राण' पहा निरखोन
प्रश्नः अनन्य शरणागती कशी असते?
रमण महर्षी: एखादी व्यक्ती अनन्य भावाने शरणागत झाली तर मग ज्याने शंका उपस्थित कराव्या किंवा ज्याच्या बाबतीत काळजी करावी असे मागे कुणीच उरत नाही. एक तर 'मी आहे' या सगळ्या विचारांच्या मूळ उगमस्थानाला पकडून ठेवणे किंवा कुठलीशी अट न ठेवता ईश्वरी शक्तीला सर्वभावे शरण जाण्याने विचारांचा पगडा नष्ट होत जातो. आत्मसाक्षात्कार घडावा हे फक्त या दोन मार्गांनीच घडू शकते.
प्रश्नः अनन्य किंवा संपूर्ण शरणागती मधे साधकाला मुक्तीची किंवा ईश्वरप्राप्तीची देखील वासना शिल्लक न राहणे अनिवार्य आहे का?
रमण महर्षी: अनन्य शरणागतीमधे तुमची स्वत:ची अशी कुठली वासना असू नये हे अनिवार्यच आहे. परमेश्वर तुम्हाला जे काही देतो त्यातच संतुष्ट असणे क्रमप्राप्त आहे. या संतुष्ट असण्याचा किंवा समाधानी वृत्तीचा दुसरा पैलू हा आहे की साधकावरचा व्यक्तिगत वासनांचा पगडा पूर्णपणे नाहीसा झालेला असतो.
प्रश्नः मला शरणागती सोपी वाटते. मला त्या मार्गाचा स्वीकार करायचा आहे.
रमणं महर्षी: तुम्ही कुठल्याही मार्गाने जा, तुम्हाला त्या 'एकात' स्वतःला विसर्जित करावे लागेल. तुम्ही जेव्हा 'तूच (ईश्वर) सर्व काही आहेस' आणि 'फक्त तुझाच (ईश्वराचा) आदेश पाळला जाईल' ('दाय विल बी डन') अशी स्थिती प्राप्त कराल तेव्हाच शरणागती पूर्णत्वाला जाते. ही स्थिती ज्ञानापेक्षा वेगळी नसते.
'सोहम' ची सुरूवात द्वैतातून होते तर शरणागती अद्वैतावर आधारलेली आहे. पण सत्य हेच आहे की अंततः जो 'तत्वमसि' बोध उरतो त्यात द्वैत आणि अद्वैत दोन्ही अस्ताला गेलेले असतात. शरणागती वरपांगी सोपी वाटते, कारण लोक तिचा असा अर्थ लावतात की फक्त एकदा 'मी शरणागत आहे' असे शब्द उच्चारले आणि आपला सारा भार देवावर टाकून मोकळे झाले की मग आपल्याला हवी तशी मनमानी करता येईल. वस्तुस्थिती मात्र या पेक्षा वेगळीच आहे, ती अशी की तुम्ही शरणागती पत्करली की मग तुम्हाला व्यक्तिगत आवड नावड असू शकत नाही. तुमचे संकल्प विकल्प पूर्णपणे लयाला जागात आणि त्यांची जागा ईश्वरेच्छा (ईश्वरी आदेश) घेते. या मार्गाने अहंतेचा अंत घडवता आला तर त्या योगे साधकला जी आंतरिक स्थिती प्राप्त होते तीअध्यात्मिक ज्ञानप्राप्तीपेक्षा कणमात्रही वेगळी नसते. याचाच मतितार्थ असा, की तुम्ही कुठल्याही मार्गाने गेलात तरी शेवटी तुम्हाला ज्ञानाकडे किंवा या एकात्मभावाकडेच येणे भाग पडते.
प्रश्नः कृपाप्रसादाने साधकाला अशी क्षमता लवकर प्राप्त करण्यात मदत मिळते का?
रमण महर्षी: तुम्ही ते देवावर (सद्गुरूंवर किंवा ईष्टदेवतेवर) सोडा. तुम्ही सर्वभावे कुठल्याही अटी न घालता शरण जा. पुढील दोनपैकी एक गोष्ट करावीच लागेल - एक तर आपली क्षमता मर्यादित आहे आणि आपल्याला ईश्वरी कृपेची गरज आहे हे मनोमन मान्य करून शरणागत व्हा, किंवा सगळ्या पाप, ताप आणि दैन्यामागच्या मूळ कारणाचा छ्डा लावत त्याच्या उगमस्थानाकडे जा आणि आपल्या सच्चिदानंद निजस्वरूपात लीन होऊन जा. या पैकी कुठल्याही मार्गाने गेलात तर तुमची दुर्दशा कायमची संपून जाईल. खात्री बाळगा की शरणागत झालेल्या भक्ताचा भार वाहणे ईश्वराने सोडून द्यावे असे कधीच घडू शकत नाही.
प्रश्नः आम्ही प्रापंचिक बुद्धी असलेली सामान्य माणसे असल्याने या ना त्या कारणाने आम्ही व्यथित होत राहतो, आणि या दु:खद परिस्थितीवर कशी मात करावी हे आमच्या लक्षात येत नाही. आम्ही देवाची कितीही करूणा भाकली तरी त्या योगे आमच्या समस्यांचे समाधान प्राप्त होत नाही. अशा वेळी आम्ही काय करावे?
रमण महर्षी: ईश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवा.
प्रश्नः आम्ही शरण जातो, तरीही आम्हाला कुठलीच मदत मिळत नाही.
रमण महर्षी: मी समजू शकतो. पण तुम्ही जर खरोखर शरणागत झालेले असाल तर 'ईश्वरेच्छा बलियसी' अशा दृढभावनेने तुम्हाला जगता आले पाहिजे आणि तुम्हाला आनंददायी किंवा सोयीच्या वाटत नाहीत अशा गोष्टींबद्दलचा तुमचा तक्रारीचा सूर निवळला पाहिजे. तुम्ही वरवर पाहता त्या पेक्षा सगळ्या गोष्टी आणि घटना वेगळेच वळण घेत आहेत असे देखील कित्येक वेळा कालांतराने का होईना तुमच्या ध्यानात येईल. दु:खार्त भावनाच कित्येक वेळा इष्टापत्ती ठरते कारण तीच ईश्वरभक्ती दृढ होण्यात परिणत होते.
प्रश्नः शरणागती ही अशक्यप्राय गोष्ट आहे.
रमण महर्षी: मान्य आहे. सुरूवातीलाच संपूर्ण शरणागत होणे अशक्य आहे, मात्र अंशतः का होईना शरणागत होणे हे खचितच आपल्या आवाक्यातले आहे. कालांतराने भक्तीभावच संपूर्ण शरणागतीकडे घेऊन जातो. असे पहा की शरणागती अशक्यप्राय आहे असे हेकेखोरपणे गृहीत धरून चालले, तर मग आपल्याकडे उपाय तरी काय उरतो? अशाने मनःशांतीदेखील कायमची दुरावते. फक्त समर्पणानेच ती प्राप्त करता येते. लक्षात घ्या की तुम्ही आपल्याच सामर्थ्याने मनःशांती प्राप्त करण्यात नेहेमीच असहाय्य ठरत आलेले आहात.
प्रश्नः सर्वव्यापी असलेल्या ईश्वराचे दर्शन कसे घेता येईल?
रमंण महर्षी: ईश्वराचे दर्शन घेणे आणि ईश्वर होऊन जाणे एकच आहे. ईश्वर एकांशाने अस्तित्वात आहे. ईश्वरापेक्षा वेगळे असे इथे काहीच नाही जे त्याने व्यापून टाकावे.
प्रश्नः माझा ओढा भक्तीमार्गाकडे आहे. हा ओढा आणखी वाढत रहावा असे मला वाटते. त्या पुढे साक्षात्कार किंवा मुक्ती माझ्या खिजगणतीतही नाहीत. माझा भक्तीभाव दृढ व्हावा असा आशिर्वाद द्या.
रमण महर्षी: अत्यंत उत्कट असा भक्तीभाव असेल, तर तुमची ईच्छा असो वा नसो, साक्षात्कार म्हणा किंवा मुक्ती म्हणा, ती तुमच्यावर अक्षरशः लादली जाते. तुमचा भाव इतका दृढ आणि उत्कट करा, की त्या भक्तीसागरात तुमचे मन विरघळून जावे. मन कापरासारखे असते. एकदा कापूर जळून गेला, की मागे कुठलेच अवशेष उरत नाहीत. मनाचा दृढनिश्चय झाला आणि ते मागे कणमात्रही अवशेष न ठेवता निजानंदी विलीन झाले, तर त्यालाच तर आत्मसाक्षात्कार असे म्हणतात.
प्रश्नः अध्यात्मिक साधकाने सतत ईश्वराच्या स्तुतीपर गीत गायन करण्यात तल्लीन होत जगात वावरण्याने याच जन्मात त्याला आपले ईप्सित साध्य करता येईल का? साधकाने स्थैर्य लाभण्यासाठी एकाच ठिकाणी वास्तव्य करणे आवश्यक आहे का?
रमण महर्षी: जेव्हाजेव्हा मन विचलीत व्हायला लागेल, तेव्हा नित्याचे व्यवहार पार पाडत असतानाच अंतर्यामी मात्र मनाला एकाच गोष्टीवर केंद्रित ठेवण्याचा अभ्यास करणे खचितच चांगले आहे. मनाला इतस्ततः भटकायला मोकळे सोडून निव्वळ जडदेहाला हट्टाग्रहाने एकाच ठिकाणी स्थिर आसनात बसायला भाग पाडण्याने काय साध्य होणार आहे?
प्रश्नः अहेतुक भक्ती करणे सामान्य जनांना शक्य आहे का?
रमण महर्षी: होय, ते शक्य आहे. अमुक एक गोष्ट मिळावी या हेतूने केलेली भक्ती ही ईश्वर भक्ती नसून ती प्राप्य वस्तूचीच भक्ती ठरते. शिवस्वरूप होण्याची अभिप्सा ज्याच्या मनी आहे अशा साधकासाठी ईश्वरी उपासना करताना त्या योगे आपल्याला अमुक एक गोष्ट हवी आहे अशा प्रकारच्या वासनेला पूरक असा एकही विचार तरंग मनात उमटू नये यासाठी पूर्वाभ्यास करणे अनिवार्य आहे.
[एका आगंतुकाने त्याचा प्रश्न लिहून आणलेली चिठ्ठी रमण महर्षींना दिली]
प्रश्नः असे म्हणतात की एखाद्या व्यक्तीने पूर्णपणे आणि अनन्यभावाने आपल्याला ईश्वराचाच काय तो आश्रय आहे असा निश्चय केला आणि ईश्वराव्यतिरिक्त अन्य कुठलाही विचार देखील मनात उमटू दिला नाही, तर अशा व्यक्तीचे सारे मनोरथ (ईश्वरकृपेने) पूर्ण होतात. याचा अर्थ असा होतो का, की एकाच ठिकाणी स्थिर आसनात बसून रहावे, सदासर्वकाळ फक्त ईश्वरी चिंतन करावे, अन्य विचारांचा त्याग करावा - ज्यात देहधारणेसाठी आवश्यक असलेल्या अन्न, जल इत्यादिंच्या विचारांचा देखील त्याग करायला हवा का? याचाच अर्थ असा देखील होतो का, की साधक आजारी पडला तर त्याने औषध किंवा उपचार यांचा विचार न करता आपले निरामय असणे किंवा रोगग्रस्त असणे हे देखील पूर्णपणे प्रारब्धावर किंवा ईश्वरावर सोडून द्यावे? मी भगवद्गीता अध्याय २ श्लोक ७१ च्या अनुषंगाने हा प्रश्न विचारतो आहे. थोडक्यात बोलायचे झाले तर सारे काही ईश्वरावर सोडून द्यावे, की आपण देखील थोडेफार प्रयत्न करावे? भगवानांनी कृपा करून शरणागतीविषयीच्या या शंकेचे निरसन करावे.
संदर्भः भगवद्गीत २.७१ - निष्कामत्वे जगी वावरे जो नि:स्पृह निरूपाधी, निरहंकारी निर्मम नर तो परम शांती संपादी (स्वामी स्वरूपानंद कृत भावार्थ गीता)
रमण महर्षी: [चिठ्ठी वाचून झाल्यावर महर्षींनी तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच संबोधित केले]
अनन्य शरणागतीचा अर्थ कुठल्याही विचाराने लिप्त न होणे असा होतो या बद्दल शंकाच नाही. पण याचा अर्थ देहधारणेसाठी आवश्यक असलेल्या अन्न किंवा जल याबद्दलच्या विचारांचा देखील अव्हेर करावा असा होतो का? खचितच नाही. तुम्ही असे विचारता आहात, "ईश्वरी कृपेने न मागताच मला जर काही मिळाले, तर तेच अन्न मी ग्रहण करावे का? की त्या साठी थोडे प्रयत्न देखील करणे आवश्यक आहे?" ठीक आहे. आता क्षणभर असे गृहीत धरू या की आपल्यासाठी आवश्यक ते अन्न आपोआप पुढ्यात येते आहे. पण तसे घडले, तरी त्याचा घास कुणी घ्यायचा? आता त्या पुढे एक पाऊल जात असे समजा की अगदी कुणीतरी तुम्हाला घास भरवला, तो गिळण्यासाठीचे सायास तरी तुम्हीच करणार आहात ना? तो प्रयत्नच ठरत नाही का? तुम्ही पुढे असे विचारता, "मी आजारी पडतो तर औषध घ्यावे की आपल्या प्रकृतीची सारी काळजी देवावर सोडून तसेच निमूटपणे बसून रहावे?" शंकराचार्यांनी साधना पंचकम मधे लिहीले आहे, की क्षुधा नामक आजार झाला तर भिक्षेत मिळालेल्या अन्नाचे औषधवत ग्रहण करावे. पण यातही संन्यासाने भिक्षापात्र घेऊन भिक्षेसाठी बाहेर पडण्याचे तरी किमान प्रयत्न करणे गृहीतच धरलेले आहे. जर सगळ्यानीच असे ठरवले की आम्ही डोळे मिटून ध्यानस्थ बसून राहू आणि पुढ्यात येईल तेच अन्न ग्रहण करू, तर जगाचे रहाटगाडगे सुरू राहील तरी कसे? त्यामुळे आपल्या उदरनिर्वाहासाठी आवश्यक ते विहित कर्म जसे आपले (मानव समाजाचे) पूर्वज पार पाडत आलेले आहेत तसेच काळानुसार बदलत्या स्वरूपात जे आपल्या पुढे कर्तब्य या स्वरूपात आले आहे, ते प्रत्येकाने जबाबदारीने पार पाडायलाच हवे. फक्त ते पार पाडताना 'मी कर्म करतो आहे' या विचारापासून मात्र साधकाने मुक्त असायला हवे. 'मी अमुक एक गोष्ट आपल्या सामर्थ्याने करतो आहे' अशी भावना मनात येणे हेच बंधन आहे. त्यामुळेच कर्तेपणाच्या भावनेच्या आधीन होऊ नये अशी एखादी साधनपद्धती शोधणे आणि तिचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे.
आजारी पडल्यावर औषध घ्यावे का किंवा भूक लागली असता अन्नग्रहण करावे का या सारख्या शंका उपस्थित करण्यापेक्षा कर्ताभाव लोपावा या साठी साधना करणेच श्रेयस्कर आहे. अशा शंका उपस्थित कराल तर त्यांना अंत नसतो. कारण उच्छवासानंतर श्वास घ्यावा का, वेदना झाल्यावर कण्हावे का या सारख्या शंका देखील तुम्हाला पडू शकतात. तुम्ही ईश्वर म्हणा किंवा कर्मगती म्हणा किंवा प्रारब्ध म्हणा, कुणी एक अनामिक शक्ती प्रत्येक व्यक्तीची जडणघडण लक्षात घेत या जगातल्या सगळ्या कार्यकलापांचे सूत्रसंचालन करत राहील. या दिव्य शक्तीवर सारी जबाबदारी सोपवली, तर सगळ्या गोष्टी स्वयंचलित यंत्राप्रमाणे सुरळित सुरू राहतील.
आपण रोज जमीनीवरून चालतो. तसे करत असताना प्रत्येक पावलावर आपण आता कुठला पाय आधी उचलावा, तो खाली कधी टेकवावा असा विचार करत बसतो का? चालणे आपोआप होते, नाही का? तीच गोष्ट श्वास घेण्याबद्दलही खरी आहे. आपल्याला श्वासोच्छवास करण्यासाठी काही खास प्रयत्न करावे लागत नाहीत. या जीवनाचीही तीच कथा आहे. आपली मर्जी आहे म्हणून आपण एखादी गोष्ट सोडू शकतो का, किंवा मन मानेल तसे वागू शकतो का? निसर्गतःच अशा कित्येक गोष्टी अव्याहतपणे सुरू असतात ज्यांच्याविषयी आपल्याला सजग असे भानही नसते. ईश्वराला पूर्णपणे शरण जाणे याचा अर्थ असा आहे नानाविध मन:कल्पनांनी विचलीत न होता मन ईश्वराच्या स्मरणात स्थिर करणे. हा निदीध्यास दृढ होत गेला की विचारांचा पगडा आपोआप कमी होत जातो. मन, वाचा आणि देहाद्वारे केले गेलेले प्रत्येक कर्म जर ईश्वरी अनुसंधानात मिसळून गेले, तर आपल्या जीवनाचा सारा भार ईश्वरावर आपोआप पडतो. अशा भक्तांच्या योगक्षेमाची चिंताही ईश्वरच वाहतो.

Friday, 21 February 2020

विभाग २ - आत्मविचार आणि शरणागती - प्रकरण ६ - आत्मविचार (काही गैरसमज आणि त्यांचे निराकरण)

या प्रकरणात आत्मविचारासंबंधीचे काही गैरसमज तसेच त्यांचे निराकरण यांचा समावेश आहे.
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांशः
'अद्वैत वेदांत' या भारतीय दर्शनशास्त्रातील सैद्धांतिक प्रणालीचा आजमितीला अंदाजे एका सहस्त्रकापेक्षा अधिक कालावधी लोटला असला तरी सातत्याने उत्कर्षच होत आलेला आहे. रमण महर्षींनी वेळोवेळी ज्या तात्विक सिद्धांतांचे प्रतिपादन केले, त्यांचे अद्वैत वेदांताच्या अनुयायांनी अंगीकारलेल्या भूमिकेशी कमालीचे साधर्म्य असल्याचे दिसते. रमण महर्षी आणि अद्वैत वेदांताचे उपासक यांच्या वैचारिक भूमिकेत बहुतांशी सर्वच बाबतीत एकवाक्यता असल्याचे दिसत असले, तरी तदनुषंगिक बाबी आचरणात आणण्याविषयीच्या त्यांच्या भूमिका मात्र पूर्णपणे वेगळ्या असल्याचे दिसून येते. अद्वैत मताचे गुरूजन बहुधा 'स्वरूप' ही एकमेव वस्तुस्थिती आहे असे मनावर वारंवार ठसवण्यावर आधारित असलेल्या ध्यानपद्धतींचा पुरस्कार करत असले, तरी रमण महर्षींनी मात्र आत्मविचाराचेच ठामपणे प्रतिपादन केलेले दिसते. 'मी ब्रह्म आहे' किंवा 'तो (ईश्वर) मीच आहे' अशी ठाम खात्री देत असलेल्या विधानांचा मंत्रासारखा वापर करणे किंवा क्वचितप्रसंगी अशा महावाक्यांविषयी चिंतन मनन करणे आणि त्यातला गर्भितार्थ अनुभवण्याचा प्रयत्न करणे या पेक्षा आत्मविचार ही वेगळी साधनाप्रणाली आहे.
आत्मविचाराची सुरूवात 'मी कोण आहे?' या प्रश्नाने होत असल्याने अद्वैतमताचे पारंपारिक अनुयायी असे गृहीत धरताना दिसतात की 'अहं ब्रह्मास्मि' हे या प्रश्नाचे उत्तर आहे. काही अद्वैत मताचे साधक आपल्या मनाला या वैचारिक उत्तराची सतत घोकंपट्टी करण्यात गुंतवून टाकत असल्याचेही दिसते. महर्षी मात्र या खटाटोपाबद्दल स्पष्टपणे असहमती दाखवताना असे स्पष्टीकरण देत असत की 'मी कोण आहे' या प्रश्नाचे तार्किक उत्तर शोधण्यात किंवा एखाद्या तर्कनिष्पत्तीच्या स्वरूपात गवसलेल्या उत्तराची यांत्रिक घोकंपट्टी करण्यात सतत गुंतलेले मन त्याच्या उगमस्थानी बुडून जाण्याची आणि त्याचा लय होण्याची अशा खटाटोपात शक्यताच उरत नाही. याच कारणामुळे 'मी कोण आहे?" या प्रश्नाचा मंत्रवत उपयोग करण्याबद्दलही ते ठामपणे असहमती दाखवत असत. त्यांचे असे ठाम मत होते की या दोन्ही चुकीच्या दृष्टीकोनांमुळे आत्मविचारामागचा मूळ हेतूच साधकाच्या हातून निसटून जातो. महर्षी असे सांगत असत की 'मी कोण आहे' हा प्रश्न मनाचे विश्लेषण करून त्याच्या स्वरूपाविषयी बौद्धिक निष्कर्ष काढण्यासाठी दिलेले आमंत्रण नाही, तसेच तो एखादा सूत्रस्वरूपात गोवलेला मंत्रही नाही. साधकाच्या हाती असलेले ते एक सहज सुलभ साधन आहे, जे बाह्य वस्तुंविषयीचे विचार, वासना आणि आकलन यात गुंतलेल्या चित्ताच्या अवधानाला तेथून परावृत्त करून विचारक किंवा अनुभोक्त्याकडे परत वळवण्यात मोलाची मदत करते. 'मी कोण आहे' या प्रश्नाचे खरे उत्तर मनाच्या अंतरंगात किंवा मनाद्वारे शोधता येत नाही, कारण त्याचे एकमेव खरे उत्तर हे उन्मनी स्थितीची अनुभूतीच आहे असे रमण महर्षींचे ठाम मत होते.
आत्मविचाराविषयीचा आणखी एक सर्वदूर पसरलेला गैरसमज हिंदूंच्या एका धारणेवर आधारलेला आहे, तो असा की आपल्याला अनुभवता येत असलेल्या सगळ्या विचारांचा आणि अनुभवांचा जाणीवपूर्वक बुद्धीने अव्हेर करत गेल्यास त्याची परिणती आत्मसाक्षात्कारात होते. वेदांत परंपरेत या साधनेला 'नेति नेति' असे म्हणतात. नेति नेति करणारा साधक 'मी मन नाही', 'मी देह नाही' अशा प्रकारे एक एक गोष्टीचा बौद्धिक पातळीवर अव्हेर करत जातो, या ओघातच आत्मस्वरूप आपोआप आपल्याला प्रकट करेल अशी त्याची/ तिची अपेक्षा असते. काही हिंदू ग्रंथांमधे नेति नेतिलाच 'आत्मविचार' असे नाव दिलेले आहे, त्यामुळे रमण महर्षींनी प्रतिपादन केलेला आत्मविचार आणि नेति नेति यात कित्येकांची गल्लत होताना दिसते. रमण महर्षींचे नेति नेति सारख्या काही पारंपारिक पद्धतींबद्दलचे मत पूर्णपणे प्रतिकूल होते. ते त्यांच्या अनुयायांना अशा पद्धतींचा अवलंब करण्यापासून परावृत्त करत असत. महर्षी वेळोवेळी हे बजावून सांगत असत की साधकाने हव्या तितक्या बौद्धिक कसरती केल्या तरी मनापलीकडचा प्रांत अवगत करून घेण्यासाठी त्यांचा तिळमात्रही उपयोग होण्याची सुतराम शक्यता नाही.
प्रश्नः ध्यान आत्मविचारापेक्षा श्रेष्ठ आहे असे म्हणावे का?
रमण महर्षी: ध्यानात मनोनिर्मित प्रतिमांचा अंतर्भाव असतो, तर आत्मविचार हा (सगळ्या आभासांमागे दडलेल्या) वास्तविकतेचा शोध असतो. ध्यान ही वस्तुनिष्ठ तर आत्मविचार ही व्यक्तिनिष्ठ बाब आहे.
प्रश्नः या (ध्यान, अध्यात्म वगैरे) विषयाच्या बाबतीत आपला वैज्ञानिक दृष्टीकोण असायला हवा.
रमण महर्षी: वास्तविक नसलेल्या (मिथ्या, अशाश्वत) गोष्टींचा त्याग करणे आणि वास्तविकतेचा (सत्य, शाश्वत) शोध घेणे पूर्णपणे वैज्ञानिकच आहे.
प्रश्नः मला असे सुचवायचे होते की सर्वप्रथम मन, मग बुद्धी, त्यानंतर अहंकार असे क्रमश:च नष्ट होत जात असतील.
रमण महर्षी: निजस्वरूप ही एकच गोष्ट वास्तविक सत्य आहे. त्या व्यतिरिक्त सारे आभासी आहे. तुमचे मन किंवा बुद्धी तुमच्यापेक्षा पृथकत्वाने नांदू शकत नाहीत. बायबल सांगते, "निश्चळ व्हा, आणि मी देव आहे अशी प्रचिती अनुभवा". ("बी स्टिल अँड नो दॅट आय अ‍ॅम गॉड"). आत्मा हाच परमात्मा आहे हे अनुभवण्यासाठी एकच गोष्ट आवश्यक आहे - निश्चळ असणे.
प्रश्नः मला 'मी' विषयीचे भान (आत्मभान) असते. असे असूनही माझ्या मागची पीडा काही संपत नाही.
रमण महर्षी: तुमचे 'मी' विषयीचे भान शुद्ध आत्मभान नाही. शरीर आणि ज्ञानेद्रियांशी स्वरूपाचे तादात्म्य आहे या भूमिकेतून घेतलेल्या अनुभवांची त्यात भेसळ आहे. आपण अनुभवत असलेली सारी पीडा कुणाला आहे याचा शोध घ्या. 'मी आहे' या जाणीवेभोवती सारा खेळ चाललेला आहे. या जाणीवेतच चित्त स्थिर करा. तसे केल्याने इतर विचारांचा फापटपसारा क्षीण होत जाईल.
प्रश्नः (जग मिथ्या आहे असे ठामपणे मानून आत्मविचाराने अंतर्यामी शोध घेत असताना) या गोष्टीची खात्री काय की आजवर अज्ञात असलेली कुठलीशी अनिर्वचनिय गोष्ट अंतर्यामी माझ्या स्वागतासाठी तयार असेल?
रमण महर्षी: एखादा साधक पुरेशा पक्व अवस्थेला पोचला की त्याची तशी आपोआपच खात्री होते.
प्रश्नः असा अध्यात्मिक विकास मला कसा साध्य होईल?.
रमण महर्षी: शास्त्रात याची अनेकविध उत्तरे दिलेली आहेत. मी इतकेच म्हणेन की अन्य कुठल्याही मार्गाने आधी जर काही प्रगती झालेली असेल, तर आत्मविचाराने अधिक वेगाने परिपक्वता प्राप्त होत जाते.
प्रश्नः हा विचारांचा एक वर्तुळाकार भोवरा झाला. मी जर पक्व असेन तर मी आत्मविचारासाठी पात्र असेन आणि अशी पात्रता प्राप्त करण्यासाठी मला आत्मविचारच करावा लागेल.
रमण महर्षी: मनाचा स्वभावच असा आहे की त्याच्यापुढे सतत अशा अनेक शंका आणि अडचणी उभ्या ठाकतील. मनाला स्वत:चे समाधान करून घेण्यासाठी कुठल्या ना कुठल्या सैद्धांतिक प्रणालीची नेहेमीच गरज असते. वस्तुस्थिती मात्र अशी आहे की ज्याला गांभिर्याने आणि तळमळीने ईश्वराचा शोध घ्यायचा आहे किंवा आपल्या निजस्वरूपाचा साक्षात्कार करून घ्यायचा आहे अशा साधकाची आंतरिक तळमळच त्या दृष्टीने पुरेशी असते. अशा पक्व साधकाला कुठल्याही सैंद्धांतिक मीमांसेची अजिबात आवश्यकता नसते.

Friday, 14 February 2020

विभाग २ - आत्मविचार आणि शरणागती - प्रकरण 5 - आत्मविचार (साधना संहिता)

या प्रकरणात आपण आत्मविचाराची साधना संहिता पाहणार आहोत.
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:
भगवान रमण महर्षी आत्मविचार साधनापद्धतीच्या पहिल्या इयत्तेतल्या विद्यार्थ्यांना आपले सारे अवधान अंतर्यामी असलेल्या 'मी' या जाणीवेवर केंद्रित करण्याचा आणि शक्य तितका वेळ त्या जाणीवेला पकडून ठेवण्याचा सल्ला देत असत. ते पुढे असे सांगत असत की आत्मविचार करत असताना अन्य विचारांमुळे चित्त विचलीत होणे साहजिक असले, तरी आपले चित्त विचलीत झाले आहे हे लक्षात आल्यावर अवधान पुन्हा एकदा 'मी' या जाणीवेवर केंद्रित करणे आवश्यक आहे. या साधनापद्धतीला सहाय्यभूत ठरतील अशा काही गोष्टी ते सुचवत असत - आपण स्वतःलाच 'मी कोण आहे' हा प्रश्न विचारणे किंवा आपण कळत नकळत सगळ्या कार्यकलापांच्या केंद्रस्थानी मानलेला 'मी' नेमका कुठून जन्माला आलेला आहे याचा शोध घेणे इत्यादि. या सगळ्या प्रयत्नांमागचा अंतिम हेतू मात्र एकच आहे - शरीर आणि मनाद्वारे केल्या जात असलेल्या कार्यकलापांची जबाबदारी आपल्यावर आहे असे समजून चाललेल्या तथाकथित 'मी' विषयी निरंतर सजग असणे.
या साधनेच्या प्राथमिक टप्प्यामधे अहंस्फुरणेविषयीचे अवधान ठेवणे ही एक मानसिक क्रिया असली, तरी तीच हळूहळू स्थिर विचार किंवा अनुभूतीचे रूप घेत जाते. साधना परिपक्व होत जाईल तसा 'मी' विषयीचा बौद्धिक विचार हळूहळू व्यक्तिनिष्ठ स्वरूपात प्रत्यक्षात अनुभवता येणार्‍या सच्चिदानंद स्वरूपासाठी मार्ग प्रशस्त करत जातो आणि पुढे नानाविध विचारांचे आवर्त तसेच बाह्य वस्तुंच्या संपर्कात येणे किंवा त्यांच्याशी तादात्म्य पावणे थांबायला लागले की व्यक्तित्वदर्शक 'मी' पूर्णपणे अंतर्धान पावतो. मागे उरते ती फक्त शुद्ध अस्तित्वाची प्रचिती, जी अनुभवताना स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे चलनवलन तात्पुरत्या स्वरूपात का होईना पूर्णपणे थांबते. सच्चिदानंद स्वरूपाची प्रचिती सुरूवातीच्या काळात अधूनमधून झलक दाखवल्यासारखी येत असली, तरी सातत्याने साधना करत राहिल्यास तिचा अनुभव घेणे आणि त्या प्रचितीत स्थिर होणे चढत्या भाजणीने सहजसाध्य होत जाते.
आत्मविचार पुढे अशा एका उन्नत अवस्थेत परिणत होतो जिथे विनासायास सच्चिदानंद स्वरूपाची प्रगाढ अनुभूती येते. अनूभूती प्रगाढ होत असताना प्रयत्नाने काही साध्य करू पाहणार्‍या 'मी' चा तात्पुरता लय झाल्याने त्या कालावधीत व्यक्तिगत प्रयत्न करणे अशक्यप्राय होऊन जाते. असे असूनही व्यक्तिगत 'मी' ची जाणीव वारंवार प्रबळ होऊन डोके वर काढत असल्याने प्रयत्नपूर्वक केलेल्या साधनेची ही सर्वोच्च अवस्था असली तरी ती आत्मसाक्षात्कारी स्थिती नसते. स्वरूप स्थितीची प्रचिती वारंवार आणि अधिकाधिक सातत्याने आली की ज्या वासनांच्या माध्यमातून व्यक्तिगत 'मी' ची जाणीव जन्माला येते, त्या वासनांना ती हळूहळू क्षीण आणि नष्ट करत जाते. वासनांचा चित्तावर असलेला पगडा अत्यंत क्षीण झाला की स्वरूपात असलेली आंतरिक शक्ती (गुरूकृपा) उरल्यासुरल्या वासनांचा असा काही समूळ नि:पात करते की व्यक्तिगत अहंतेचा फणा पुन्हा कधीच डोके वर काढत नाही. हीच अंतिम आणि अपरिवर्तनीय अशी आत्मसाक्षात्कारी स्थिती आहे.
एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आत्मविचार हा मनाला एकाग्र करण्याचा व्यायाम नाही, तसेच विचारांचे दमन करण्याच्या हेतूने आत्मविचार साध्य करता येत नाही.आत्मविचारात फक्त मन जेथून उसळी घेते त्या उगमस्थानाविषयी सजग होण्याची आंतरिक तळमळ असते. आत्मविचार ही एक अत्यंत ह़ळुवार आणि सौम्य साधना आहे. मनावर ताबा मिळवण्यासाठीच्या दमनकारी पठडीतल्या ती पद्धतींना पूर्णपणे बाजूला ठेवते. या पद्धतीत साधकाने केलेल्या प्रयत्नांची परिणती अशा प्रकारे स्वरूपाचा बोध होत नाही, उलट स्वरूपबोधात साधकच कळत नकळत विलीन होऊन जातो.
रमण महर्षींनी स्वतः एका उच्च कोटीच्या साधकाला असा अभिप्राय दिलेला आहे -
ध्यान करू नका - फक्त आपले अस्तित्व अनुभवा. '
मी अमुक आहे' असा विचार करू नका - फक्त आपले अस्तित्व अनुभवा.
हे अस्तित्व कसे अनुभवायचे हा विचार देखील करू नका - तुम्ही तेच आहात! (तत्वमसि)
आत्मविचाराकडे ठराविक वेळी ठराविक ठिकाणी एखादे आसन सिद्ध करून साधण्याची ध्यानपद्धती अशा प्रकारे बघणे बरोबर ठरणार नाही. साधक कुठलेही काम करत असला तरी तो जागृत असताना क्षणोक्षणी एकीकडे सतत आत्मविचार सुरू राहणे अत्यंत मोलाचे आहे. रमण महर्षींना सतत कार्यरत राहण्यात आत्मविचाराने व्यत्यय येतो हा आक्षेप मुळीच मान्य नव्हता आणि ते ठामपणे असे प्रतिपादन करत असत की थोडाफार सराव केला तर कुठल्याही परिस्थितीत आत्मविचार सुरू ठेवता येतो. कधीकधी ते असे म्हणत असत की नित्यनेमाने ठराविक पद्धतीने केलेली साधना (परिपक्वतेच्या दृष्टीने) अगदीच बाल्यावस्थेत असलेल्या साधकांसाठी सुरूवातीच्या काळात उपयुक्त ठरू शकते, मात्र ठराविक आसनात बसून बळजबरीने दीर्घ काळ साधना करण्यासाठी ते कधीच परवानगी देत नसत. त्यांच्या शिष्यांपैकी एखाद्याने सांसारिक जीवनाचा त्याग करून ध्यानधारणेसाठी वाहून घेण्याची ईच्छा व्यक्त केली, तर एखादाच विरळा अपवाद वगळता महर्षी तशी परवानगी द्यायला ठामपणे नकार देत असत.
प्रश्नः काही योगीजन असे म्हणतात की एखाद्याला सत्याचा शोध घ्यायचा असेल तर त्याला/ तिला प्रापंचिक जीवनाचा त्याग करून जंगलासारख्या निर्जन ठिकाणी घोर तपश्चर्या करावी लागते.
रमण महर्षी: (अध्यात्मिक साधकाने) कर्तव्यपरायण जीवनाचा त्याग करण्याची मुळीच गरज नसते. नित्यनेमाने एखाद दुसरा तास आत्मविचाराची साधना केली तर नंतर तुम्ही आपली सारी नित्य, नैमित्तिक कर्मे करू शकता तसेच आपल्या सगळ्या व्यावहारिक जबाबदार्या पार पाडू शकता. तुम्हाला योग्य पद्धतीने ध्यान करणे साध्य झाले तर तुमच्या चित्तात उगम पावलेला विशुद्ध चैतन्याचा प्रवाह तुम्ही कार्यरत असतानाही सतत वाहताच राहील. एकच संकल्पना दोन वेगवेगळ्या पद्धतीने अभिव्यक्त व्हावी असे काहीसे तुमच्या बाबतीत घडेल; तुम्ही ध्यानधारणा करताना जे सूत्र पकडले आहे तेच तुमच्या हातून घडलेल्या प्रत्येक कृतीतून अभिव्यक्त होईल.
प्रश्नः असे केल्याने त्याचा (व्यावहारिक जीवनात) नेमका काय परिणाम होईल?
रमण महर्षी: तुम्ही ही साधना करत जाल, तसे तुमच्या ध्यानात येईल की तेच लोक, त्याच घटना आणि त्याच वस्तु सभोवती असल्या, तरी त्यांच्याकडे बघण्याच्या तुमच्या दृष्टीकोणात हळुहळू बदल होतो आहे. तुमच्या हातून घडलेल्या प्रत्येक कृतीतून तुमच्या ध्यानमग्नतेची साक्ष आपोआप दिसून येईल.
प्रश्नः याचा अर्थ असा होतो का की आपण मी आधी विचारलेल्या प्रश्नात उल्लेख केलेल्या योगीजनांशी असहमत आहात?
रमण महर्षी: व्यक्तिगत स्वार्थ, जो माणसाला प्रापंचिक बंधनात गुंतवतो त्याचा साधकाने त्याग करायला हवा. भ्रामक अहंता, खोटी अस्मिता आणि तथाकथित स्वतंत्र व्यक्तित्वापासून मुक्त होणे याच खरा त्याग आहे.
प्रश्नः प्रापंचिक जीवन जगत असताना असे निस्वार्थ होणे कसे शक्य आहे?
रमण महर्षी: विहित कर्मे करणे आणि अध्यात्मिक ज्ञानप्राप्ती कधीच परस्परविरोधी नसतात.
प्रश्नः याचा अर्थ असा घ्यावा का, की आपल्या आजवर चालत आलेल्या आपल्या व्यावसायिक तसेच व्यक्तिगत जीवनातल्या सगळ्या उपक्रमांना तसेच पुढे सुरू ठेवले तरी त्याच वेळी एखाद्याला आत्मसाक्षात्कारही घडू शकतो?
रमण महर्षी: का नाही? पण या बाबतीत साधकाला असा अनुभव येणार नाही की त्याच्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी त्याच त्या जुन्या व्यक्तिमत्वाकडून घडत आहेत. साधकाच्या जाणीवेत जोवर ती कोत्या मनोवृत्तीच्या खुज्या व्यक्तिमत्वाच्या पलीकडे जाऊन शाश्वत निजस्वरूपात स्थिरावत नाही तोवर क्रमशः परिवर्तन होतच राहील.
प्रश्नः आजच्या धकाधकीच्या जीवनात एखाद्याच्या जीवनात कार्यबाहुल्य असेल, तर त्याच्याकडे ध्यानधारणा करण्यासाठी अत्यल्प वेळच शिल्लक राहील.
रमण महर्षी: आत्मविचाराच्या साधनेत ध्यानधारणेसाठी वेगळा वेळ राखून ठेवण्याची गरज फक्त नवजात शिशुसारख्या अत्यंत बाल्यावस्थेत असलेल्या साधकांनाच पडते. या मार्गावर प्रगती करायला लागलेल्या साधकाला अंतर्यामी कृतार्थतेची भावना तसेच विलक्षण आनंदाची अनुभूती मिळायला लागते. असा साधक कार्यरत असण्याने किंवा विश्रांत अवस्थेत असण्याने त्याला आलेल्या अनुभूतीत फरक पडत नाही. असा साधक आपल्या कर्मेंद्रियांचा आणि ज्ञानेंद्रियांचा यथायोग्य वापर करत समाजात वावरताना दिसला, तरी तो अंतर्यामी मात्र एकांतात आणि स्थिरचित्त राहण्यासाठी सक्षम होत जातो.
प्रश्नः याचा अर्थ असा होतो ना, की आपण योगमार्गाची शिकवण देत नाही?
रमण महर्षी: एखाद्या गुराख्याने दंडुक्याच्या सहाय्याने बैलाला पिटाळावे, तसे योगी आपल्या मनाला ध्येयाप्रत बळजबरीने नेण्याचा प्रयत्न करतात. या मार्गावर मात्र साधक आपल्या हाताने लुसलुशीत चारा भरवत लाडीगोडी लावत बैलाला त्याच्या गोठ्यापर्यंत घेऊन जातो.
प्रश्नः हे कसे साध्य व्हावे?
रमण महर्षी: तुम्हाला स्वतःलाच प्रश्न विचारावा लागेल - 'मी कोण आहे?' हा आत्मविचारच शेवटी तुमच्या अंतर्यामी अशा एका विलक्षण गोष्टीचा शोध लागण्यात परिणत होईल, जी मनाच्या आवरणामागे दडलेली आहे. या एका महाप्रश्नाची उकल करा, मी खात्रीने सांगतो की तुमच्या अन्य सगळ्या समस्यांचे आपोआप निराकरण होईल.
पुरवणी- महर्षींच्या शिकवणीशी विलक्षण साधर्म्य असलेले काव्यः
मनाचे की, पार्था | असे एक भले | तया आवडले| जे जे काही ||
तेथे चि ते पाहे | सोकावोनि राहे | अनायासे लाहे | तद्रूपता ||
म्हणोनि तयाते | कौतुके साचार | दावी वारंवार | आत्मसुख ||
स्त्रोत - स्वामी स्वरूपानंद (पावस) कृत अभंग ज्ञानेश्वरी नित्यपाठ

विभाग २ - आत्मविचार आणि शरणागती - प्रकरण ४ - आत्मविचार (सैद्धांतिक)

आत्मविचार आणि शरणागती - प्रकरण ४ - आत्मविचार (सैद्धांतिक)

या प्रकरणात आत्मविचार या रमण महर्षींनी पुनरूज्जीवीत केलेल्या आणि पाश्चात्य देशातील साधकांना भुरळ पाडलेल्या साधनपद्धतीचा सैद्धांतिक अंगाने विचार केलेला आहे.

डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:

रमण महर्षी ठामपणे असे प्रतिपादन करत असत, की देह आणि मन या द्वारे कार्य करणारा व्यक्तिगत 'मी' अस्तित्वात आहे या धारणेचा त्याग करता आला तर आत्मसाक्षात्कार घडून येण्यासाठी तेवढेच पुरेसे आहे. त्यांच्या काही उच्च कोटीच्या भक्तांना हे पटकन उमजत असे आणि सहजगत्या अवगत होत असे.  मात्र काही ना काही पद्धतीची अध्यात्मिक साधना केल्याशिवाय जन्मोजन्मीच्या आणि खोलवर रूजलेल्या व्यक्तिगत 'मी' या धारणेपासून मुक्ती मिळवणे बहुसंख्य भक्तांना जवळजवळ अशक्यप्राय वाटत असे. काहींना ते भयप्रदही वाटत असे. महर्षींना अशा भक्तांच्या समस्यांविषयी सखोल जाण असल्याने तसेच त्यांच्याविषयी करूणा वाटत असल्याने आत्मभान वाढवता येईल अशी एखादी अध्यात्मिक साधनापद्धती सुचवा असा प्रश्न जेव्हा जेव्हा विचारला जात असे, तेव्हा 'आत्मविचार' या तंत्राचा अवलंब करण्याची शिफारस ते करत असत.आत्मविचार ही अध्यात्मिक साधना त्यांच्या अत्यंत व्यवहारसुसंगत असलेल्या तत्वज्ञानाची जणू कोनशिलाच होती. या पुढे आपण आत्मविचाराविषयीचे नानाविध सैद्धांतिक पैलू थोडक्यात समजून घेणार आहोत.

सर्वप्रथम मनाच्या स्वरूपाविषयी महर्षींचा दृष्टीकोन लक्षात घेणे आवश्यक आहे, कारण मनाचे असे स्वायत्त अस्तित्व नाही या सत्याचा प्रत्यक्ष अनुभूतीतून शोध लावणे हेच आत्मविचारामागचे एकमेव ध्येय असते. रमण महर्षींच्या मते देह किंवा मनाद्वारे सजगपणे केल्या गेलेल्या प्रत्येक कृतीमधून 'मी' असा कुणीतरी त्या कृतीचा कर्ता आहे हे गृहीतकच ध्वनित होत असते. मी विचार करतो, माझ्या लक्षात आले किंवा मी अमूक एक कृत्य करेन या सगळ्या कार्यकलापात 'मी' हा एकमेव घटक समान आहे. हा 'मी' असे समजून चालतो की आपल्या हातून घडलेल्या सगळ्या कृत्यांसाठी तो जबाबदार आहे. सगळ्या कार्यकलापांमधे समान असलेल्या याच  घटकाला महर्षी 'अहंवृत्ती' असे म्हणतात. वस्तुतः पहायचे तर अहंवृत्ती म्हणजे  निजस्वरूपाचेच मनाने प्रक्षेपित केलेले आणि फेरफार केलेले एक रूप असते. खरोखरच्या निजस्वरूपामधे आपण एखादी कृती किंवा विचार करतो आहोत अशी कल्पनाच संभवत नाही, त्यामुळे तशी भावना करून घेणारा 'मी' हा काल्पनिक असतो आणि त्यामुळे त्याला सच्चिदानंद निजस्वरूपात झालेला कपोलकल्पित बदलच मानावे लागते. अहंवृत्तीची ही व्याख्या किचकट वाटली तर बोलीभाषेत आपण अहंवृत्तीलाच 'मी पणा' असे म्हणतो तसेच थोडा 'मी पणा' कमी कर असेही म्हणतो हे लक्षात घ्यायला हरकत नाही.

मनाच्या अहंकार, स्मृती, बुद्धीमत्ता अशा वेगवेगळ्या क्रियाकलापांना वेगवेगळी स्वायत्त कार्ये न समजता अहंवृत्तीचीच ती वेगवेगळी रूपे आहेत असा दृष्टीकोण ठेवण्याला महर्षी प्राधान्य देत असत. तथाकथित स्वतंत्र व्यक्तिमत्व हे नानाविध रूपात होणारे अहंवृत्तीचेच प्राकट्य आहे या मताचे महर्षी समर्थक होते. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर कर्म घडत राहिले तरी कर्ताभाव नष्ट होतो, विचारप्रवाह सुरू राहिले तरी त्या मागचा विश्लेषक नाहीसा होतो आणि स्वतंत्र व्यक्तिमत्वाची जाणीवच उरत नाही या आशयाची विधाने महर्षी वारंवार करत असत. अहंवृत्तीचा निरास होणे हाच आत्मसाक्षात्कार होय या सिद्धांताची पुष्टी करणारीच ही विधाने आहेत.

प्रश्नः अहंकाराकडूनच ज्याची सुरूवात झाली असा कुठलाही शोध (आत्मशोध) अहंतेचा स्वतःचाच खोटेपणा कसा प्रकट करू शकेल?
रमण महर्षी: जेथून 'मी आहे' या अहंस्फुरणाचा उगम होतो त्या उगमस्थानी तुम्ही खोलवर उतरणे अहंकाराच्या इंद्रियगोचर अस्तित्वापलीकडे आपोआप घेऊन जाते.

प्रश्नः पण अहंकार ज्या तीन रूपात प्रकट होतो त्यापैकी अहंवृत्ती ही फक्त एकच रूप नाही का? योगवसिष्ठ आणि इतर प्राचीन ग्रंथात अहंकाराच्या तिहेरी स्वरूपाचेच वर्णन केलेले आहे.
रमण महर्षी: तसे आहे खरे. अहंकारात स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह असे तीन देह समाविष्ट आहेत असे वर्णन काही प्राचीन ग्रंथांमधे केलेले आहे; मात्र आपण लक्षात घ्यायला हवे की ते वर्णन विश्लेषण करून दाखवण्याच्या एकमेव हेतूने केलेले आहे. आत्मविचाराच्या संदर्भात हे विश्लेषण गैरलागू आहे.  आत्मविचार ही पद्धती जर अहंकाराच्या स्वरूपावर अवलंबून असती, तर असे पक्के धरून चाला की या साधनापद्धतीचा अवलंब करणे पूर्णपणे अशक्य कोटीतले गणले गेले असते. अहंवृत्त्तीचे विश्लेषण करणे टाळण्यामागचे महत्वाचे  कारण असे आहे, की अहंकारात अगणित रूपे धारण करण्याचे सामर्थ्य असते. त्यामुळे आत्मविचार साध्य व्हावा या हेतूने पुढे जायचे असेल तर अहंवृत्ती हेच अहंकाराचे एकमेव रूप आहे असे प्रमाणभूत मानावे लागते.

प्रश्नः पण ज्ञानाची प्रचिती यावी या दृष्टीने हे (अति सुलभ केलेले) गृहीतक तोकडे पडणार नाही का?
रमण महर्षी: एखाद्या कुत्र्याने आपल्या मालकाचा त्याच्या शरीराच्या गंधावरून शोध घ्यावा, तद्वतच आत्मविचारात अहंवृत्तीवरून सुगावा लावत लावत आपल्या निजस्वरूपाचा शोध घ्यायचा असतो. कुत्र्याचा मालक त्याच्या नजरेच्या टप्प्यात नसला तरी या कारणामुळे कुत्र्याला त्याचा शोध घेण्यापासून रोखता येत नाही. मालकाच्या शरीराचा गंधच त्या मुक्या प्राण्याला इतकी बिनचूक सूचना देतो, की मालकाने परिधान केलेले कपडे, त्याची उंची, त्याची शरीरयष्टी या सारख्या अवांतर गोष्टी कुत्र्याच्या खिजगणतीतही नसतात. मालकाचा शोध घेताना कुठल्याही अवांतर गोष्टींमुळे विचलीत न होता सारे लक्ष फक्त मालकाच्या शरीराच्या गंधाकडेच केंद्रित केल्याने कमी अधिक वेळ लागला तरी कुत्रा शेवटी मालकापर्यंत पोहोचण्यात यशस्वी होतोच.

प्रश्नः ज्ञानप्राप्ती होण्यासाठी आत्मविचार हाच एकमेव थेट मार्ग  ('डायरेक्ट पाथ') आहे असे प्रतिपादन आपण का करता?
रमण महर्षी: त्याचे कारण असे आहे की अध्यात्मिक साधनेचे आत्मविचार वगळता अन्य सारे प्रकार साधन घडून येण्यासाठी मनाचे अस्तित्व शाबूत ठेवावे लागते हे मुळातच गृहीत धरून चालतात, आणि मनाचे सहकार्य नसेल तर त्यांचा सराव करता येणे शक्य होत नाही. साधनेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अहंकार वेगवेगळी आणि सूक्ष्मतर रुपे घेतो, मात्र त्याचा मुळापासून विनाश होत नाही.

महान ज्ञानी अशी ओळख असलेल्या जनक राजाने बोध होंण्याआधी आश्चर्यचकित होत केलेले एक विधान प्रसिद्ध आहे,  "आजवर सातत्याने माझे (पारमार्थिक) नुकसानच करत आलेला चोर आज माझ्या तावडीत सापडलेला आहे. आता त्याचा समूळ नि:पात केला जाईल." जनक राजाचे  हे विधान मन किंवा अहंकाराच्या संदर्भातलेच होते.

आत्मविचार साधनेलाही तंतोतंत लागू पडेल अशा स्वामी स्वरूपानंदांच्या आशिर्वचनाने लेखाची सांगता करतो.

साधनी असावें तत्पर ।
संकटी न सांडावा धीर ।
सोहं -स्मरणे वारंवार
निजांतर चोखाळावें ।।१।।

नाना वृतींचे स्फुरण ।
अंतरी होतसे कोठून ।
साक्षित्वे पहावें आपुलें आपण ।
अति अलिप्तपण ठेवोनिया ।।२।।

सर्वेन्द्रियांसह वर्तमान ।
मन बुद्धि आणि अहंपण ।
आत्मारामीं समर्पून ।
निज-निवांतपण उपभोगावे ।।३।।

चालता बोलतां हिंडतां फिरतां ।
लिहितां वाचितां खातां जेवितां ।
नाना सुखदु:ख-भोग भोगितां ।
निजात्मसत्ता आठवावी ।।४।।

होतां सोहं-भजनीं तन्मय ।
एकवटोनि ज्ञाता ज्ञेय ।
घेई आत्मसुखाचा प्रत्यय ।
अतींद्रिय स्वभावे जे ।।५।।

नाद-श्रवण प्रकाश-दर्शन ।
तेथें श्रोता द्रष्टा कोण ।
तो आत्मा चि मी हें ओळखून ।
तदनुसंधान राखावें ।।६।।

सदा स्व-रूपानुसंधान ।
हेचि भक्ति हेंचि ज्ञान ।
तेणें तुटोनी कर्म-बंधन ।
परम समाधान प्राप्त होय ।।७।।

क्लेश-रहित संतोषी जीवन ।
प्रयाणकाली सोहं-स्मरण ।
घडो आवडी परमार्थ-चिंतन ।
आशीर्वचन तुम्हांसी हें ।।८।।   

--प.पू  स्वामी स्वरूपानंद

Sunday, 9 February 2020

विभाग १ - स्वरूपबोध - प्रकरण ३ - ज्ञानी


स्वरूपबोधविषयक या प्रकरणात आपण 'ज्ञानी' या संकल्पनेविषयीचे रमण महर्षींचा उपदेश जाणून घेणार आहोत.

तत्पूर्वी भगवद्गीतेच्या अध्यात २ मधे स्थितप्रज्ञ कसा ओळखावा? त्याचे/ तिचे व्यावहारिक जगातले वर्तन कसे असते? या अनुषंगाने अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाचे (भगवद्गीता श्लोक २.५४) सविस्तर उत्तर (भगवद्गीता २.५५ ते २.७२) तसेच भगवद्गीतेच्या अध्याय १२ मधे आलेले ज्ञानी भक्ताचे वर्णन (भगवद्गीता श्लोक १२.१३ ते १२.२०) वाचणे खचितच उपयुक्त ठरेल. हा संदर्भ सहज उपलब्ध असल्याने तसेच विस्तारभयास्तव तो इथे समाविष्ट केलेला नाही.

डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश थोडक्यात असा आहे:

रमण महर्षींची भेट घेणार्‍या कित्येक लोकांना आत्मसाक्षात्कारी स्थितीबद्दल कधीही न शमणारे कुतुहल असल्याचे दिसून येत असे. प्रामुख्याने ज्ञानी व्यक्तीला स्वतःविषयी आणि सभोवतालच्या जागतिक घडामोडींविषयी येणारा अनुभव कसा असेल या विषयी जाणून घेण्याची उत्सुकता त्यांनी विचारलेल्या प्रश्नांमधून अधोरेखित होत असे. आत्मसाक्षात्कारी स्थितीविषयीच्या असलेल्या बहुसंख्य लोकांच्या चित्रविचित्र धारणा त्यांनी विचारलेल्या प्रश्नांमधून स्पष्टपणे दिसून येत असत. या प्रश्नांचा ढोबळमानाने पुढील चार प्रश्नात समावेश होऊ शकेल -

१ - चैतन्याच्या व्यापक जाणीवेत व्यक्तिगत 'मी' चा लय झालेला असला तरी ज्ञानी (अन्य सामान्य व्यक्तींप्रमाणे) आपले कार्य कसे करू शकतो?

२ - या जगात वावरताना इतरांना सतत कार्यरत असलेला दिसत असला तरी 'मी काहीच करत नाही' (नैष्कर्म्य स्थिती) असे ज्ञानी कसे म्हणू शकतो? (रमण महर्षी नेहेमी ज्ञानी अकर्ता असल्याचे विधान करत असत).

३. सभोवतालच्या जगाविषयी ज्ञान्याला काय प्रचिती येते? ज्ञानी व्यक्तीला जगाविषयी भान उरते का?

४. शरीर आणि मन अनुभवत असलेल्या जागृती, निद्रा आणि सुषुप्तीसारख्या सातत्याने बदल होत असलेल्या चैतन्याच्या अवस्थांशी ज्ञानी व्यक्तीच्या विशुद्ध् चैतन्यावस्थेशी नेमका कसा संबंध असतो?

हे सारे प्रश्न उपस्थित होण्यामागे एक गृहीतक दडलेले आहे, ते असे की ज्या प्रचितीला आपण स्वरूपबोध किंवा आत्मस्थिती असे म्हणतो ती स्थिती अनुभवणारी एक व्यक्ती (ज्ञानी) ज्ञानापासून पृथकत्वाने अस्तित्वात असते. हे गृहीतक मुळातच चुकीचे आहे. हे गृहीतक म्हणजे निव्वळ मनोनिर्मीत असलेली एक निराधार संकल्पना आहे. या संकल्पनेच्या आधारे ज्याला आत्मबोध झालेला नाही अशी व्यक्ती ज्ञानी व्यक्तीच्या प्रचितीबद्दल ठोकताळे बांधत राहते. 'ज्ञानी' हा शब्द देखील या चुकीच्या धारणेला बळ देणाराच ठरतो, कारण शब्दश: पाहता ज्ञानाचा अनुभव घेणारी किंवा ज्ञानाला जाणणारी व्यक्ती असाच त्याचा अर्थ निघतो. तरीही ही संज्ञा अज्ञान्यांकडून नित्यनेमाने वापरली जाते. अज्ञानी जन अशी कल्पना करून बसतात की मानवी जग सत्याला जाणून घेण्याची अभिप्सा असलेले (किंवा सत्याला जाणून न घेतलेले)  साधक आणि सत्याचा बोध झालेले ज्ञानी अशा उभयतांनी बनलेले आहे; मात्र स्वरूपबोधामागचे सत्य असे आहे की तिथे ना ज्ञानी अस्तित्वात असते ना अज्ञानी, असते ते केवळ विशुद्ध ज्ञान!

रमण महर्षी ही गोष्ट कित्येक वेळा कधी थेटपणे तर कधी आडवळणाने निदर्शनास आणून देत असत, मात्र त्यांच्या विधांनामधे दडलेला गर्भितार्थ निव्वळ सैद्धांतिक पातळीवर देखील फार विरळ्या साधकांच्या लक्षात येत असे. साधकांच्या या मर्यादा लक्षात घेत महर्षी नेहेमी आपल्या संकल्पना श्रोत्यांच्या धारणा किंवा पूर्वग्रहांशी विसंगत होणार नाहीत अशा पद्धतीने रुपांतरित करून मांडत असत. ज्ञानी आणि अज्ञानी हा काल्पनिक भेद लक्षात घेत, त्या मागच्या चुकीच्या गृहीतकाला सतत आव्हान देत राहणे टाळून आपण ज्ञान्याची भूमिका घेत स्वरूपबोधाविषयीचा गर्भितार्थ महर्षी कसा उलगडून सांगत हे आपण पुढील भागात पाहणार आहोत.

प्रश्नः बद्ध आणि मुक्त (व्यक्ती) यात काय फरक असतो?
रमण महर्षी: सर्वसामान्य मानव तार्किक, बौद्धिक पातळीवर (मेंदू केंद्रित) जीवन व्यतित करतो, आपल्या वास्तविक स्वरूपात अंतःप्रेरणा, सहजस्थिती (हृदय किंवा अंत:करण) समाविष्ट आहे या विषयी तो बहुतांशी अनभिज्ञ असतो. ज्ञानसिद्ध व्यक्ती मात्र हृदयात चित्त स्थिर करत (अंतःप्रेरणेने, सहज स्थितीत) जीवन व्यतित करते. अशी व्यक्ती जेव्हा जगात वावरते, तसेच बाह्य सजीव आणि निर्जीव सृष्टीबरोबर व्यावहारिक संबंध ठेवते तेव्हा तिचा हा बोध सतत जागा असतो, की आपण जे काही पाहतो त्यातली एकही गोष्ट एकाच सर्वोच्च वास्तविकतेपेक्षा पृथकत्वाने नांदत नाही (सर्वं खल्विदं ब्रह्मम्). या सर्वोच्च सत्याचा किंवा ब्रह्माचा साक्षात्कार तिला हृदयचक्रात आपल्याच निजस्वरूपात होतो.

प्रश्नः असे असेल तर मग ज्ञानी व्यक्तीत अहंवृत्ती ('मी' पणाची जाणीव, किंवा स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा बोध) कसे कार्य करते?
रमण महर्षी: ज्ञानी व्यक्तीत ती (अहंवृत्ती) अजिबात कार्यरत नसते. ज्या आदिम, शुद्ध चैतन्याचा उपनिषदांमधे 'प्रज्ञान' असा उल्लेख केलेला आहे, त्या चैतन्याशी एकरूप झाल्याने आणि तदाकार झाल्याने ज्ञान्याचे निजस्वरूप हे हृदयच असते. प्रज्ञान हेच खरोखर ब्रह्म असते (प्रज्ञानं ब्रह्म), आणि ते इतके परिपूर्ण असते की त्या पलीकडे अस्तित्वात काहीही असणे संभवत नाही.

प्रश्नः स्वरूपात जगाचे प्रतिबिंब पडत नाही?
रमण महर्षी : प्रतिबिंब पडण्यासाठी एखादी वस्तु आणि तिची प्रतिमा असे द्वैत असावेच लागते. स्वरूप अशा द्वैतभावाचा स्वीकार करत नाही.

प्रश्न: आपण आम्हाला कित्येक गोष्टी करताना दिसता. मग मी कुठलेच कर्म करत नाही असे आपण कसे म्हणू शकता?
रमण महर्षी: (रेडिओकडे अंगुलेनिर्देश करत) हा समोरचा रेडिओ बोलतो आणि गायन करतो असे भासते, मात्र तो उघडून पहाल तर तुम्हाला दिसेल की आत कुणीच अस्तित्वात नाही. तद्वतच, माझे अस्तित्व हे निव्वळ एक अवकाश आहे, त्यातून रेडिओप्रमाणे हे शरीर बोलत असते. अंतर्यामी कर्ता या भूमिकेतून कुणीही कार्यरत नसते.

प्रश्नः मला हे समजायला अवघड वाटते आहे. भगवान, कृपया थोडे विस्तारपूर्वक सांगाल का?
रमण महर्षी: व्यावहारिक जीवन जगण्यासाठी आणि कार्यरत राहण्यासाठी मनाची नितांत आवश्यकता असली, तरी उन्मनी अवस्थेतला ज्ञानी देखील आपले जीवन कसे व्यतित करतो आणि कार्यरत कसा राहू शकतो हे समजवण्यासाठी शास्त्रांमधे कित्येक समर्पक दाखले दिलेले आहेत. असे पहा की विद्युत शक्तीवर चालणारा पंखा आपण विद्युतप्रवाह बंद केला तरी थोडा वेळ फिरत राहतो. तद्वतच, हे शरीर ज्या प्रारब्धामुळे अस्तिस्त्वात आले, ते प्रारब्धच शरीराला ते ज्या ज्या क्रियाकलापांतून जाण्यासाठी घडले आहे, तसे कर्तृत्व करण्यासाठी बाध्य करत असते. ज्ञानी देखील या सगळ्या कार्यकलापांमधे 'मी कर्ता आहे' अशी यत्किंचितही भावना न ठेवता आपली भूमिका पार पाडत असतो. हे कसे शक्य होते याचे बौद्धिक आकलन करून घेणे अवघड आहे. त्यामुळे शास्त्रांमधे असे उदाहरण दिले जाते की गाढ झोपेतून चार घास खाण्यापुरते जागे झालेल्या बालकाप्रमाणे ज्ञानी आपले कर्म करत असतो. सकाळी जाग येते तेव्हा आपण काय खाल्ले याची कुठलीही नोंद त्या बालकाच्या स्मृतीत नसते.

इथे हे अवश्य लक्षात घ्यायला हवे की ज्ञान्याकरता अशा कुठल्याच उदाहरणांची किंवा स्पष्टीकरणांची तिळमात्र आवश्यकता नसते. त्याचा बोध परिपूर्ण असतो आणि तो पूर्णपणे नि:शंक झालेला असतो. हा देह हे आपले स्वरूप नाही अशी सघन जाणीव त्याला असते, आणि शरीराकडून जरी एखादे कृत्य होत असेल तरी त्याचे कर्तेपण आपल्याकडे नाही असा निरंतर बोधही त्याच्या अंतर्यामी विनासायास जागृत असतो. सगळ्या स्पष्टीकरणांची गरज फक्त बघ्या लोकांना असते, ज्यांना ज्ञानी देखील देहतादात्म्य राखूनच कार्य करतो असे गृहीत धरणे भाग पडते आणि ज्ञानी विदेही स्थितीत वावरत असल्याचे काही केल्या लक्षात येत नाही.

प्रश्नः अध्यात्मिक दृष्ट्या उन्नत अवस्थेत असलेल्या व्यक्तींना ओळखण्यासाठी काही मूलभूत स्वरूपाचे निकष किंवा चाचण्या आहेत का? हा प्रश्न पडण्याचे एक कारण असे आहे की अशा व्यक्ती बाल, उन्मत्त किंवा पिशाच्चवत व्यवहार करतात असा एक सार्वत्रिक समज आहे.
रमण महर्षी: ज्ञान्याची आंतरिक स्थिती ही केवळ ज्ञान्यालाच समजू शकते. एखाद्या ज्ञान्याला यथास्थित समजून घ्यायचे असेल तर ते दुसर्या ज्ञान्यालाच शक्य आहे. ('अंतरस्थितीचिया खुणा अंतर्निष्ठ जाणती'). असे असले तरी एखाद्या सत्पुरूषाच्या सान्निध्यात जी विलक्षण मनःशांती नकळत अनुभवता येते, तीच एकमेव अशी खूणगाठ आहे जिच्या आधारे त्या सत्पुरूषाची महती साधकांच्या अनायास लक्षात येते. ज्ञान्याने बोललेले शब्द, त्याने केलेल्या कृती किंवा त्याचे बाह्यरूप या त्याच्या महत्तेच्या निशाण्या नसतात. ज्ञानी व्यक्तीच्या आंतरिक गोष्टी बहुतांशी सर्वसामान्य माणसाच्या आकलनक्षमतेच्या आवाक्याबाहेर असतात.

विभाग १ - स्वरूपबोध - प्रकरण २ - स्वरूपाचे भान, स्वरूपाविषयीचे अज्ञान आणि साधकांच्या श्रेणी

मागच्या प्रकरणात 'स्व' च्या मूळ स्वरूपाविषयीचे रमण महर्षींचा उपदेश थोडक्यात समजावून घेतल्यावर आता तोच धागा पकडून साधकांचे प्रकार किंवा त्यांच्या श्रेणींबद्दल महर्षींचा दृष्टीकोन या प्रकरणात बघायचा आहे.

तत्पूर्वी मराठी संत साहित्यातला एक संदर्भ आवर्जुन देतो. पावसच्या परमहंस स्वामी स्वरूपानंदांच्या वर-प्रार्थनेची सुरूवात 'उदारा जगदाधारा देई मज असा वर, स्व-स्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर' अशी होते. त्यांनी रचलेल्या अभंग ज्ञानेश्वरीच्या नित्यपाठाची सुरूवात 'आत्मरूपा तुज, करी नमस्कार, तुझा जयजयकार, असो देवा' अशी होते. संजीवनी गाथेत स्वामीजी असे म्हणतात -

सद्गुरू गणनाथ उदार समर्थ, घाली नयनांत ज्ञानांजन |
सहज समाधि सापडले धन, लाचावले मन तया ठायी |
चालता बोलता न ढळे आसन, न भंगे ते मौन कदा काळी |
स्वामी म्हणे लाभे अवीट आनंद, लागलासे छंद स्व-रूपाचा ||

नाथपंथी 'सोहम' साधना हा ज्ञानमार्ग असल्याने ही शिकवण रमण महर्षींच्या उपदेशाशी किती साधर्म्य राखणारी आहे हे सहज लक्षात येईल.

डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:

भगवान रमण महर्षी क्वचित प्रसंगी असे सूचित करत की अध्यात्मिक साधकांच्या ढोबळमानाने तीन श्रेणी असतात. आपल्या मूळ स्वरूपाविषयीची फक्त जाणीव करून देताच पहिल्या आणि सगळ्यात उच्च कोटीच्या साधकांना तत्क्षणी आत्मसाक्षात्कार होतो. ही 'सद्योमुक्ती' असते. ही श्रेणी वगळून इतर साधकांना 'क्रममुक्ती' साधावी लागते. दुसर्‍या श्रेणीतल्या काही पूर्वाभ्यास असलेल्या साधकांना अल्प काळ का होईना आत्मस्वरूपाचे चिंतन, मनन, निदीध्यास साधल्याने त्यांच्या आत्मस्थितीची बैठक एकदम पक्की होते. या श्रेणीतल्या साधकांनाही फारसे सायास घ्यावे लागत नाहीत. तिसर्‍या श्रेणीतल्या अध्यात्मिक साधकांना तुलनेने काहीसे दुर्दैवी म्हणावे लागेल, कारण कित्येक तपांच्या महत्प्रयासाने केलेल्या साधनेनंतरच अशांना आत्मलाभ प्राप्त होऊ शकतो.

या तीन श्रेणी सहज लक्षात येण्यासाठी रमण महर्षी अग्नि प्रदिप्त होण्याच्या क्रियेचा एक दाखला देत असत - दारूगोळ्याचे एखादे कोठार तुमच्या ताब्यात आले, तर एक ठिणगीदेखील त्याला पेटवण्यासाठी पुरेशी ठरते. कोळशासारखा ज्वलनशील पदार्थ असेल तर आगीच्या संपर्कात आल्यावर तो अल्पावधीतच पेट घेताना दिसेल. मात्र भिजलेले लाकूड तुमच्या हाती पडले तर ते वाळवण्यासाठी आणि मग पुढे ते पेटवण्यासाठी तुम्हाला बराच वेळ आणि इंधन खर्ची घालावे लागेल.

याच अनुषंगाने एका महत्वाच्या विषयाचाही परामर्ष घेता येईल. महर्षींच्या उपदेशात कित्येक वेळा तार्किक विसंगती दिसते. बरीच परस्पर विरोधी विधाने दिसतात. काही वेळा तर महर्षींनी एकाच प्रश्नाची दोन तीन वेगवेगळी उत्तरे वेगवेगळ्या साधकांना दिल्याचेही दिसून येते. साधकांच्या श्रेणी, त्यांची अध्यात्मिक परिपक्वता, त्यांचे पूर्वग्रह आणि पूर्वसंस्कार या गोष्टी लक्षात घेता त्यांचा रूचेल, पचेल आणि आत्मसात करता येईल असा उपदेश करणे हा सद्गुरूंचा हेतू असतो. तर्कसुसंगती राखत एखाद्याच ठराविक विचारसरणीचे, साधनपद्धतीचे किंवा साम्यवाद, समाजवाद या सारख्या एखाद्या 'वादाचे' आग्रही प्रतिपादन आणि तदनुषंगिक खंडन मंडन करणे हा शुष्क तत्वज्ञान्यांचा प्रांत आहे. गुरूत्वाचा अधिकार असलेल्या साक्षात्कारी संतांना देखील क्वचित प्रसंगी असे तात्विक प्रतिपादन करावे लागत असले, तरी शिष्यांच्या पारमार्थिक प्रगतीविषयी तळमळ असलेले आणि सहजस्वभावाने करूणामय असलेले रमण महर्षींसारखे सद्गुरू वेगवेगळ्या पूर्वपीठिका बरोबर घेऊन आलेल्या शिष्यांशी संवाद साधताना वरवरच्या तर्कसंगतीला अवास्तव महत्व देत नसतील तर त्यात आश्चर्य कसले?

रमणाश्रमात भगवान रमण महर्षींचा शिष्यांशी संवाद सुरू व्हायचा होता. आश्रमात आलेल्या यात्रेकरूंमधे पाश्चिमात्य देशातून आलेल्या कृश शरीरयष्टीच्या उतारवयाच्या एका व्यक्तीचाही समावेश होता. या व्यक्तीच्या वागण्याबोलण्यामधे कमालीचे मार्दव होते, शालिनता होती. आल्यापासून ही व्यक्ती अत्यंत मोजकेच आणि मृदु भाषेत बोलत होती. आहार देखील अत्यंत संयत आणि सात्विक होता. महर्षींचा शिष्यांशी संवाद सुरू झाला. अत्यंत अदबशीरपणे ही व्यक्ती मात्र आदरपूर्वक शांतपणे कोपर्‍यातल्या एका जागी बसून होती. आश्रमात प्रवेश केल्यापासूनच या व्यक्तीच्या प्रत्येक हालचालीतून आंतरिक शांतता आणि सत्वगुणाचा उत्कर्ष दिसून येत होते. पुढे पुढे करणे, आपले महत्व अधोरेखित करणे किंवा आपला प्रश्न विचारण्यासाठी धडपड करणे तर सोडाच, महर्षींचा एक दोन तास संवाद सुरू असताना ही व्यक्ती जणू काही समाधी अवस्थेत असावी तशी निश्चलपणे बसून होती. प्रश्नोत्तरे संपली आणि तेथून प्रस्थान करण्यासाठी महर्षी आपल्या जागेवरून उठले. श्रोत्यांची पांगापांग होत होती. एका कोपर्‍यात निश्चलपणे बसलेल्या त्या वृद्ध व्यक्तीची दखलही कुणी घेतली नाही. दोन चार पावले पुढे आल्यावर महर्षींची नजर या व्यक्तीवर पडली. क्षणभर त्या व्यक्तीशी महर्षींची नजरानजर झाली. काही मोजकेच क्षण महर्षींची कृपादृष्टी त्या व्यक्तीकडे रोखलेली होती. महर्षीच्या चेहर्‍यावर त्यांचे अत्यंत विलोभनीय असे स्मितहास्य तरळले. त्या व्यक्तीच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते. शाब्दिक संवाद असा काही झालाच नाही. रात्रीच्या भोजनानंतर त्या व्यक्तीने तिरूवन्नमलै सोडले. पुन्हा ही व्यक्ती कुणालाच दिसली नाही. 'गुरोस्तु मौन व्याख्यानं, शिष्यास्तु छिन्नसंशयः' अशा प्रकारची ती 'मौनी दीक्षा' होती. अध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत परिपक्व असलेल्या उच्च कोटीच्या साधकांसाठी भगवान रमण महर्षींकडून कुठल्याही औपचारिक विधीचा किंवा आलंबनाचा अंतर्भाव नसलेली मौनी दीक्षा प्रदान होत असे.
साधकांच्या परिपक्वतेनुसार रमण महर्षींनी दिलेल्या उत्तरांची उदाहरणे पुढील भागात पाहू या.

प्रश्नः इहवाद केंद्रित (ऐहिक) दृष्टीचा लोप झाल्यावरच सहजस्थितीची अनुभूती संभवते. पण (व्यावहारिक जीवन जगत असताना) हे साध्य कसे होईल?

रमण महर्षी: मनाचा लय झाला की सारे जग लयाला जाते. मन हेच जगाचे उगमस्थान आहे. त्याचा लोप झाला की सहजस्थिती आपोआप दृगोचर होते. स्वरूप सातत्याने 'मी' 'मी' अशा अहंस्फुरणेने स्वत:ची जाणीव करून देत असते. ते स्वयंप्रकाशी आणि स्वसंवेद्य असते. ते नेहेमी 'आत्ता आणि इथेच' अस्तित्वात असते. त्या सर्वव्यापी चैतन्यातच आपला देखील समावेश असतो. पाण्यात पोहणार्‍या मासोळीने पाण्याचा शोध घ्यावा, तद्वत आपण या स्वरूपाचा शोध का बरे घ्यावा? आपल्या पूर्वासुरींनी सांगूनच ठेवले आहे - 'आपल्या दृष्टीला ज्ञानात विलीन करेल, त्याला सारे जग ब्रह्मस्वरूपच दिसेल' (सर्वं खलु इदं ब्रह्म).

प्रश्नः मान्य आहे, कालांतराने योग्य वेळ आली की हे मला पण उमजेल.
रमण महर्षी: तुम्ही या क्षणी तेच आहात (तत्वमसि). स्थळ, काळ आणि परिस्थितीने स्वरूप कधीच प्रभावित होत नाही. उलटपक्षी या सगळ्या गोष्टींचा स्वरूपातच समावेश असतो. तुम्ही सभोवताली जे काही पाहता ते सगळे तुमच्या आतच सामावलेले असते (पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी). एक किस्सा सांगून हे स्पष्ट करता येईल.

एका धनाढ्य स्त्रीच्या गळ्यात एक महागडा मणिहार होता. एकदा घाईगडबडीत तिला त्याचा विसर पडला आणि तिची अशी समजूत झाली की आपला मणिहार हरवलेला आहे. ती चिंताग्रस्त झाली आणि तिने घरभर त्या मणिहाराचा शोध घेतला पण तो काही सापडला नाही. तिने परिचितांना आणि कुटुंबातल्या सदस्यांना त्या मणिहाराविषयी काही माहिती आहे का असे विचारले, तसेच तो शोधायला मदत करा अशी विनंती केली. सगळ्यांनी नन्नाचा पाढा वाचला. शेवटी एका मैत्रिणीच्या लक्षात सगळा प्रकार आला. आपल्या मैत्रिणीची चिंता दूर व्हावी यासाठी तिने आश्वासक स्वरात मणिहार गळ्यातच आहे हे त्या धनाढ्य स्त्रीच्या लक्षात आणून दिले. हा सगळा गोंधळ सुरू असताना मणिहार आपल्या गळ्यातच होता हे लक्षात आल्याने ती धनाढ्य स्त्री हरखून गेली. इतरांनी मणिहार सापडला का असे विचारले असता ती म्हणाली, "हो, तो  मणिहार नुकताच सापडला आहे." आपला हरवलेला दागिना सापडला आहे अशीच तिची भावना झालेली होती.

आता हे लक्षात घ्या की तिचा हार खरोखर हरवलेला होता का? तो तर सतत तिच्या गळ्यातच तर होता! पण तिच्या भावना देखील समजून घ्या. हरवलेली मौल्यवान वस्तू मिळावी तशी ती हरखून गेलेली होती. आपल्या सगळ्यांची हीच तर कथा आहे. कधी काळी स्वरूप साक्षात्कार घडेल अशा समजूतीने आपण जगत असतो, मात्र आपण कुठल्याही क्षणी इतर कुठलीही गोष्ट नसून स्वरूपच तर असतो!

प्रश्नकर्ता: वेल्लोरला असताना मी सतत अस्वस्थ आणि नाराज असतो. आपल्या सहवासात मात्र मला स्थैर्य आणि आनंदाची अनुभूती येते.
रमण महर्षी: या ठिकाणी मिळणारा आनंद हा खराखुरा आत्मिक आनंद आहे का? आपण असे म्हणता की इथून दूर जाताच तुम्ही परत दु:खीकष्टी होता. याचाच अर्थ असा, की इथे अनुभवता आलेला आनंद हा परिपूर्ण आणि शाश्वत असा आनंद नाही. त्यात दु:ख लपलेले आहे, जे इतरत्र जाताच जाणवायला लागते. तुमचा हा तथाकथित आनंद स्थळ, काळ आणि परिस्थिती सापेक्ष आहे. (अध्यात्मिक दृष्ट्या) उपयुक्त ठरण्यासाठी तुमचा आनंद शाश्वत असायला हवा. स्वरूपी लीन व्हा आणि अनुभवा की तो खरा निर्भेळ आनंद आहे. तुम्ही निरंतर स्वरूपच आहात.

तुम्हाला तुमचे 'असणे' नाकारता येत नाही. हे 'असणे'च सच्चिदानंद स्वरूप आहे. स्वरूपाचा साक्षात्कार ही सततची स्थिती आहे. नित्यसिद्ध अशा स्वरूपाची आस धरावी आणि महत्प्रयासाने साक्षात्कार करून घ्यावा अशी वास्तविक पाहता गरजच नाही.

अस्तित्वात असल्याशिवाय तुम्हाला हा प्रश्न पडणार नाही. आपले असणे तुम्हाला मान्य करावेच लागेल. हे उपाधीरहित निव्वळ 'असणे'च तुमचे स्वरूप आहे, ज्याची प्रचिती तुम्हाला क्षणोक्षणी येतेच आहे. त्यामुळे तुम्ही घेतलेले सगळे कष्ट फक्त आपल्याला स्वरूप साक्षात्कार झालेला नाही अशी चुकीची समजूत आपण करून घेतलेली आहे हा बोध होण्यातच खर्ची पडणार आहे. साक्षात्कारात नित्यनूतन असे काहीच नसते. ती एक सनातन स्थिती आहे. भ्रमाचे आवरण दूर सारले की ती आपोआप प्रकट होते.

विभाग १ - स्वरूपबोध - प्रकरण १ - 'स्व' चे मूळ स्वरूप

विभाग १ - स्वरूपबोध - प्रकरण १ - 'स्व' चे मूळ स्वरूप

'द सेल्फ' किंवा स्व-स्वरूप ही संकल्पना भगवान रमण महर्षींच्या बोलण्यात वारंवार येत असे. पावसच्या स्वामी स्वरूपानंदांच्या लेखनातही 'स्वामी म्हणे लागे अवीट आनंद, लागलासे छंद स्वरूपाचा' या सारखे उल्लेख ठिकठिकाणी आहेत. रमण महर्षींनी उल्लेख केलेल्या स्वरूपाच्या बाबतीत पुढील गोष्टी लक्षात घेण्याजोग्या आहेतः

'स्वरूपाचा' अर्थ आपले व्यक्तिमत्व असा नसून ती संकल्पना एका निर्वैयक्तिक आणि सर्वसमावेशक अशा विशुद्ध चैतन्याच्या अखंड अनुभूतीकडे इशारा करते. अहंकार, अस्मिता इत्यादिंच्या परिघात इंद्रियांच्या संयोगाने आलेल्या अनुभवांमुळे जन्माला आलेला, तसेच संस्कारांनी आणि वासनांनी बद्ध असलेला व्यक्तिमत्वदर्शक 'मी' आणि स्व-स्वरूप यात गल्लत होता कामा नये. खरे स्व-स्वरूप निरंतर अस्तित्वात असल्याने ते अनुभवता येणे सहज शक्य आहे. मात्र तसे घडताना दिसत नाही. या बाबतीत महर्षी असे प्रतिपादन करत असत की मुळात अमर्याद असलेल्या चैतन्याभोवती काल्पनिक मर्यादा निर्माण करून बंधनात जखडलेली स्थिती अनुभवण्याची मनाची जन्मोजन्मी जोपासली गेलेली प्रवृत्ती नष्ट झाल्याखेरीज  खर्‍या 'स्व' विषयीची सजग जाणीव होणे संभवत नाही. एकसंध आणि निरंतर अशा स्वरूपाच्या सजग जाणीवेसच आत्मसाक्षात्कार म्हणता येईल.

सच्चिदानंद, देव, ज्ञान, ह्रदय, तुरिय/  तुर्यातीत,  'आत्मन' तसेच 'सहज स्थिती' अशा अनेकविध संकल्पनांचा उल्लेख रमण महर्षी स्व-स्वरूपाचे किंवा आत्मसाक्षात्कारी स्थितीचे समानार्थी किंवा पर्यायवाचक शब्द या स्वरूपात करत असत. रमण महर्षींचा देव सगुण साकार स्वरूपात नसून या जगाचे रहाटगाडगे चालवणारी एक निराकार शक्ती असे त्याचे स्वरूप आहे. हा देव विश्वाची उत्पत्ती करणारा नसून दृश्य जगाशी त्या शक्तीचा स्वरूप संबंध आहे. ईश्वराच्या अमर्याद चैतन्याच्या एका यःकिंचीत अंशाचे मूळ शक्तीपासून कधीच विभक्त न होणारे प्रकट स्वरूपच आपल्याला ब्रह्मांडाच्या स्वरूपात अनुभवता येते असा या स्वरूप संबंधाचा अर्थ होतो.  ब्रह्मांडाच्या अस्तित्वाचा किंवा नास्तित्वाचा मूळ ईश्वरी शक्तीवर काहीच परिणाम होत नाही, तसेच व्यक्त स्वरूपातल्या ब्रह्मांडातल्या कार्यकलापांच्या कर्तृत्वाचा आरोपही ईश्वरावर करता येत नाही.

प्रश्नः (या जगातली) वास्तविकता (सत्य) नेमकी काय आहे?
रमण महर्षी: सत्य (किंवा वास्तविकता) हे निरंतर सत्यच असले पाहिजे. नाम आणि रूपाने बनलेल्या जगताबद्दल तसे म्हणता येत नाही. ज्या आधारशक्तीच्या बळावर नामरूपात्मक जगत अस्तित्वात येते ती खरी चिरंतन वास्तविकता आहे.  ती स्वभावानेच बंधनरहित आणि अनंत आहे. स्वतः सत्यस्वरूप असूनही ही वास्तविकताच आभासी मृगजळासारख्या वस्तुमात्रांचा आधारवड बनून राहते. शाश्वत सत्यस्वरूप जे काही आहे आणि जसे काही आहे ते नेहेमी तसेच राहते. त्याचे वर्णन करू पाहता वाचा खुंटते. अस्तित्व किंवा नास्तित्व या सारख्या संकल्पनांच्या पलीकडची ती चिरंतन आणि स्वयंसिद्ध स्थिती आहे. जेव्हा भौतिक वस्तुंविषयीच्या भ्रामक ज्ञानाचा अज्ञानासमवेत पूर्णपणे निरास होतो, तेव्हा विशुद्ध चैतन्यस्वरूप असलेली वास्तविकता आपोआप प्रकट होते. हेच खरे स्व-स्वरूप आहे किंवा आत्मज्ञान आहे. या ब्रह्मस्वरूपात स्वसंवेद्य अशी शुद्ध जाणीव प्रकर्षाने असते, तसेच अज्ञानाचा लेशमात्रही तिथे शिल्लक नसतो.

बाह्य जगताची जाणीव असलेली स्थिती (उदा. जागृती) तसेच जाणीव नसलेली स्थिती (उदा. निद्रा) या दोन्हींना व्यापून उरणारी, तसेच पाप, ताप आणि दैन्यापासून मुक्त असलेली स्वयंप्रकाशी अशी विदेही स्थिती हे तुमचे खरे निजस्वरूप आहे. ही स्थिती अंतर्बाह्य मौनानेच अभिव्यक्त होते. सगळे ज्ञानीजन असा निर्वाळा देतात की  कुठल्याही स्थळ, काळ आणि परिस्थितीत अबाधित राहणारी अशी ही अंतिम ज्ञानावस्था आहे.  विशुद्ध ज्ञान हेच वैराग्य आहे, तेच खरेखुरे सोवळे आहे आणि तेच ईश्वरी साक्षात्कारही आहे. ज्यात क्षणभराचेही आत्मविस्मरण संभवत नाही असे ज्ञान हेच अमरत्व आहे, त्यातच सर्वज्ञता आहे.  कैवल्य ज्ञान हेच खरे तर साधकासाठी सारसर्वस्व आहे.

प्रश्नः आत्मस्वरूप  जर स्वयंप्रकाशी, नित्य, स्वयंसिद्ध आणि स्वसंवेद्य असेल तर आत्ता या क्षणी मला त्याची जाणीव का होत नाही?
रमण महर्षी: द्वैत वास्तविक पाहता अस्तित्वातच नाही, मात्र तुम्ही आत्ता ज्याला ज्ञान समजता आहात ते अहंभावातून निपजलेले आहे. असे ज्ञान हे साहजिकच स्थळ काळ आणि परिस्थिती सापेक्ष  असते. सापेक्ष ज्ञानासाठी दृष्य वस्तु आणि द्रष्टा दोन्ही अनिवार्य आहेत, मात्र स्वसंवेद्यता ही परिपूर्ण स्थिती असल्याने तिला दृष्य वस्तु आणि द्रष्टा अशा द्वैताची गरज नसते.

स्मरण ही अशीच एक सापेक्ष गोष्ट आहे, जिथे स्मरणात ठेवायची वस्तु आणि स्मरण करणारा दोहोंची अनिवार्यता आहे. जिथे द्वैतच अस्तित्वात नाही, तिथे कोण कोणाचे स्मरण करेल? तुमचे खरे स्वरूप हे शाश्वत आणि चिरंतन आहे. प्रत्येकालाच आपल्या मूळ स्वरूपाची ओळख करून घ्यायची आहे. मात्र मला हे व्यवस्थित समजावून सांगा, की 'पहावे आपणासी आपण' अशी प्रचिती मिळवण्यासाठी तुम्हाला नेमकी कुठल्या स्वरूपात मदत अपेक्षीत आहे?

लोकांना एखादी नाविन्यपूर्ण घटना घडावी अशा प्रकारे आत्मसाक्षात्कार अपेक्षित असतो. असा भ्रामक समज करून घेण्यात मुळातच आंतरिक विसंगती आहे, कारण आत्मस्वरूप चिरंतन आणि अखंड असल्याने त्यात कुठलेच परिवर्तन संभवत नाही. साधकांना दिव्य प्रकाश, नाद वगैरे अनुभवांची लालसा असते. आत्मस्वरूप तसे कसे असू शकेल? ते प्रकाश आणि अंधार या सारख्या द्वैताच्या पल्याड असते. (प्रचिती घेता आली तरी)  आत्मस्वरूपाची व्याख्या करता येणे शक्य होत नाही. ते जसे असते तसेच सत्य सनातन असते.

'मी आहे',  अहंस्फुरणाची ही उपाधीरहित विशुद्ध जाणीवच आत्मस्वरूपाची त्यातल्या त्यात चांगली व्याख्या आहे असे म्हणावे लागेल. श्रुतिवचनांमधे आत्म्याचे वर्णन अंगुष्ठमात्रा एवढा, केशाग्रासारखा, विजेच्या ठिणगीसारखा, अमर्याद, सूक्ष्माहूनही सूक्ष्म असे नानाविध प्रकारे केलेले दिसते. वास्तविक पाहता हा सगळा पूर्णपणे निराधार असा कल्पनाविलास आहे. (व्यावहारिक दृष्ट्या) आपण ज्याला ज्ञान आणि अज्ञान असे म्हणतो, त्या पेक्षा वेगळे असे हे आत्मस्वरूपाचे ज्ञान आहे. (व्यावहारिक दृष्ट्या) आपण ज्याला तथ्यपूर्ण आणि तथ्यहीन म्हणतो, त्या दोन्हीपेक्षा वेगळे असे हे शाश्वत सत्य आहे. त्याची व्याख्या करायची तरी कशी? हे सत्य जाणता येत नाही, ते जाणण्यासाठी स्वतःच सत्यस्वरूप होउन जावे लागते!

Saturday, 8 February 2020

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: प्रस्तावना

|| श्री गणेशाय नमः ||

भगवान दक्षिणामूर्ती आणि भगवद्पाद पूज्य श्री आदि शंकराचार्य प्रणित अद्वैत वेदांताची परंपरा अखंड ठेवणार्‍या, तसेच आधुनिक काळाशी सुसंगत पद्धतीने 'आत्मविचार' या साधनापद्धतीचे पुनरुज्जीवन करणार्‍या भगवान श्री रमण महर्षीं या लोकोत्तर ज्ञानी सत्पुरुषाविषयी मराठी भाषेत फारसे साहित्य उपलब्ध नाही.  हे लक्षात घेता आंतरजालावरच्या मराठी साहित्यसागरात भगवान श्री.रमण महर्षींविषयी थोडीफार भर  घालावी असा मानस आहे.

महर्षींची शिकवण आणि त्यांचा उपदेश या विषयीचा 'प्रमाण ग्रंथ' अशी मान्यता डेव्हिड गॉडमन यांनी महत्प्रयासाने संकलित केलेल्या 'बी अ‍ॅज यू आर' या ग्रंथालाच जगभर विखुरलेल्या रमणभक्तांकडून मिळालेली दिसते. महर्षींनी कधीच औपचारिक स्वरूपाची व्याख्याने किंवा प्रवचने दिली नाहीत. महर्षींना वेळोवेळी भेटलेल्या साधकांशी घडलेल्या त्यांच्या व्यक्तिगत स्वरूपाच्या संवादांचे अध्यात्मिक मोल देशोविदेशीच्या साधकांना उमगत गेले, आणि प्रश्नोत्तर स्वरूपात या संवादांचे संकलन आणि अनुवाद करण्याचा परिपाठ सुरू झाला. श्री. गॉडमन यांनी वेगवेगळ्या कालखंडातल्या या संवादांचे संकलन तर केलेलेच आहे, त्या जोडीला चर्चिल्या गेलेल्या विषयांच्या अनुषंगाने वर्गवारी करून सुरेख मांडणीही केलेली आहे. प्रत्येक विषयाला अनुसरून अत्यंत समर्पक अशी प्रस्तावनादेखील श्री. गॉडमन यांनी लिहीलेली आहे. हा सगळा भाग मुळातूनच वाचण्यासारखा आहे. ग्रंथाचे पुढील प्रमाणे सहा विभाग आहेतः १. स्वरूपबोध २. आत्मविचार आणि शरणागती ३. सद्गुरू ४. ध्यान आणि योग ५. प्रचिती आणि ६. अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोह.

गॉडमन यांच्या क्रमवारीशी सुसंगती ठेवत त्यातील निवडक भागाचा अनुवाद करून तसेच पावसच्या परमहंस स्वामी स्वरूपानंद या सत्पुरूषाच्या लेखनातले काही संदर्भ घेत  या पुस्तकाचे सिंहावलोकन करण्याचा प्रयत्न करणार आहे. महर्षींविषयी मराठी भाषेत फारशी पुस्तके उपलब्ध नाहीत, हे लक्षात घेता आंतरजालावर मराठीत उपलब्ध असलेल्या विशाल ज्ञानसागरात महर्षींविषयक माहिती उपलब्ध करून देण्यात खारीचा वाटा उचलणे इतकाच या लेखनामागचा उद्देश आहे. संदर्भासाठीचे साहित्य (रेफरन्स मटेरियल) स्वरूपाचे हे लेखन आहे हे पुन्हा एकदा नमूद करत लेखनाचा श्रीगणेशा करतो.