Saturday, 18 July 2015

उस्ताद विलायत खाँ - 'सनातनी बंडखोर' सतार नवाझ - १

तिन्हीसांजेची वेळ होती. एका अभिजात संगीतप्रेमी मित्राला भेटायला त्याच्या सोलापुरातल्या एका चाळीतल्या घरी गेलो होतो. त्याचे वडील पट्टीचे व्हायोलिन वादक आणि निष्णात संगीत शिक्षक होते. घराचे दार सताड उघडेच होते. दारात पाऊल ठेवताच सतारीचे 'मारव्याचे' सूर कानी पडले. संथ आलापी सुरू होती. त्या सतारवादकाने धैवतापासून मींड घेत कोमल रिषभ असा काही नेमका लावला, की त्या स्वरात ओतप्रोत भरलेली आर्तता, व्यथा थेट काळजाला भिडली.
एकही अवाक्षर न उच्चारता मी नादब्रह्मात बुडून गेलेल्या गुरुजींजवळ मांडी घालून बसलो. त्यांच्याशी फक्त नजरेनेच संवाद सुरू होता. समजून उमजून शास्त्रीय संगीताचा एकत्र आस्वाद घेणार्‍या श्रोत्यांचे भावबंध कळत नकळत जुळतात आणि त्यातून पुढे रक्ताच्या नात्यांपेक्षाही जवळची नातीगोती तयार होतात. जवळजवळ अर्धा तास चाललेली ती विलक्षण आलापी संपली. त्यानंतर थोडा वेळ टाचणी पडली तरी आवाज व्हावा अशी शांतता होती. श्रोत्यांना टाळ्या वाजवण्याचेही भान नव्हते. अशी शांतता ही कलावंताला मिळणारी फार मोठी दाद असते. श्रोते भानावर आले आणि टाळ्यांचा एकच कडकडाट सुरू झाला. तो बराच वेळ चालू होता.
टाळ्यांचा कडकडाट थांबल्यावर ते सतारवादक अदबीने हिंदीत बोलायला लागले. "या वाद्यावर मारवा वाजवण्याचा एक प्रयत्न मी आपल्यासमोर केला आहे. या रागाला षड्ज-पंचमाचा आधार नाही. पंचम वर्ज्य, तर षड्ज अत्यंत कमी प्रमाणात लावायचा. त्यामुळे सतारीच्या तारा जुळवतानाच कोमल रिषभ सतत कानी पडेल अशा रीतीने त्या जुळवण्याची पद्धत मी वापरून पाहिली आहे." असा काहीसा त्या बोलण्याचा मथितार्थ होता. गुरुजी अगदी मन लावून ते ऐकत होते. गुरुजींनी टेपरेकॉर्डर बंद केला आणि नंतर बराच वेळ मारवा आणि उस्ताद विलायत खाँ या विषयावर ते भरभरून बोलत होते. खाँसाहेबांच्या जादूभर्‍या सतारीशी माझा परिचय झाला तो असा.
त्या दिवशी उस्ताद विलायत खाँसाहेबांच्या जाहीर कार्यक्रमांच्या (लाईव्ह कॉन्सर्टस) चार पाच कॅसेट्स घेऊनच घरी गेलो.गुरुजींकडून आणि इतर माध्यमांमधून पुढे त्यांच्या सतारवादनातल्या अनोख्या तंत्राबद्दल आणि त्यांच्या लोकविलक्षण चरित्राबद्दल माहिती मिळत गेली. ध्वनिमुद्रिकांचा संग्रह जमत गेला. या 'सनातनी बंडखोर' स्वरयात्रीचा सांगीतिक प्रवासही उलगडत गेला.
विलायत खाँसाहेबांचा जन्म आता बांगलादेशात असलेल्या गौरीपूर संस्थानात १९२८ मध्ये झाला असावा. त्यांच्या जन्मतिथीबद्दलच्या माहितीत एकवाक्यता नाही. त्यांचे घराणे मूळचे रजपूत, पण पुढे मुस्लिम धर्म स्वीकारलेले. घराण्यात सूरबहार आणि सतारवादनाची पिढ्यानपिढ्यांची परंपराच होती. त्यांचे वडील उस्ताद इनायत खाँ हे त्या काळचे इटावा किंवा इमदादखानी घराण्याचे आघाडीचे सूरबहार आणि सतारवादक होते. विलायत खाँ जेमतेम ९ वर्षांचे असतानाच त्यांच्या कुटुंबावर वज्राघात झाला. इनायत खाँसाहेबांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे काका वाहिद खाँ यांच्याकडे त्यांचे सूरबहार आणि सतारीचे शिक्षण सुरू झाले. आई बशीरन बेगम यांचे माहेरचे घराणे गायकांचे, त्यामुळे आजोबा उस्ताद बंदे हसन आणि आई बशीरन बेगम कडून विलायत खॉंसाहेबांना गायकीची तालीम मिळायला लागली. एक वेळ अशी आली की सतारवादनाकडचे त्यांचे लक्ष कमी होत गेले आणि गायकीकडचा ओढा विलक्षण वाढला.
आपल्या मुलाचे सतारवादनाकडे दुर्लक्ष होत आहे हे लक्षात आल्यावर बशीरन बेगमना आपल्या मुलाला स्पष्टपणे सांगावे लागले, "माझे माहेरचे घराणे गायकांचे तर सासरचे सतार वादकांचे आहे. लग्नानंतर मी सासरच्या घराण्याशीच एकनिष्ठ राहणे सयुक्तिक आहे, नव्हे तोच माझा धर्म आहे. त्यामुळे तुला संगीतक्षेत्रात जर नाव करायचे असेल, तर ते सतारवादक होऊनच करावे लागेल. अन्यथा या क्षेत्रातून बाहेर पड." हा निर्वाणीचा इशारा ऐकून विलायत खाँसाहेब हादरून गेले. सतारवादनाची तालीम मिळणे अवघड, आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आणि त्यात आईने सुनवलेला हा निर्णायक फैसला!
बशीरन बेगमच्या त्या निर्णयामागे काही दैवी योजना असावी. एकतर संगीतक्षेत्रातून बाहेर पडणे किंवा येनकेनप्रकारेण सतार वादनाच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत सतार आणि सूरबहार वादकांच्या आपल्या घराण्याचे नाव उज्ज्वल करणे हे दोनच पर्याय छोट्या विलायतसमोर होते. अत्यंत जिद्दी, मनस्वी आणि उपजतच प्रतिभावंत असलेल्या विलायतने साहजिकच दुसरा पर्याय निवडला. मग वडिलांच्या शिष्यवर्गापैकी काही ज्येष्ठ शिष्यांकडून सतारवादनातले इटावा घरण्याचे खास तंत्र आणि बारकावे शिकायला त्याने सुरुवात केली. प्रसंगी मान अपमान सहन करत, काबाडकष्ट करत घेतला वसा टाकायचा नाही अशा निर्धारानेच तो सतारवादनाचे इमदादखानी घराण्याचे तंत्र आत्मसात करायला लागला.
एकीकडे पोटाची खळगी भरण्यासाठी गॅरेजमध्ये काम करायचे, मिळेल तशी तालीम घ्यायची आणि चार पैसे जास्तीचे मिळावे यासाठी त्याच गॅरेजच्या रखवालदाराचे काम पत्करून तिथेच रात्री अपरात्री रियाज करायचा असा अत्यंत कष्टप्रद दिनक्रम सुरू झाला. त्यातच सतारवादनावर चिंतन, मनन सुरू झाले. अत्यंत जिद्दी आणि मनस्वी स्वभाव आणि त्या जोडीला सर्वश्रेष्ठ सतारवादक होणे या निदीध्यास इतका प्रबळ होता की अन्नान्न दशा असलेल्या त्या विपरीत परिस्थितीतही या लोकविलक्षण कलाकाराचा व्यक्तिगत आणि सांगीतिक पिंड मात्र वेगाने आकाराला येत होता.
विलायत खाँसाहेबांची रियाजाची पद्धतही अफलातून होती. एक मेणबत्ती पेटवायची, ती विझेपर्यंत एक पलटा घोटून काढायचा. मेणबत्ती विझली की छोटीशी विश्रांती, थोडेसे धूम्रपान आणि मग पुढची मेणबत्ती पेटवायची आणि दुसरा पलटा सुरू! सिगारेटचा माझ्याइतका विधायक उपयोग कुणीच केला नसेल असे पुढे खाँसाहेब गमतीने म्हणायचे ते यामुळेच. आधी सतारवादक विलायतवर कुरघोडी करू पाहणारा आपल्यातला गायक आता सतारवादकात मिसळून जातो आहे, एकरूप होऊ पाहतो आहे हे खॉंसाहेबांच्या एव्हाना लक्षात आले होते.
सतार वाजवताना उजव्या हाताने मिजराफीचा तारांवर आघात करत डाव्या हाताने स्वरावली वाजवतात. त्या काळी तंत अंगाने होणारे वादन प्रचारात असल्याने आणि मींड, गमक सारखे प्रकार वाजवताना येत असलेल्या वाद्याच्या अंगभूत मर्यादांमुळे उजव्या हाताने केल्या सतारीच्या तारांवर केल्या जाणार्‍या आघातांचे तालबद्ध, लयबद्ध वादनप्रकार प्रगत झालेले असले तरी डाव्या हाताने केल्या जाणार्‍या 'खिंचकामावर' मात्र फारसा विचार झालेला नव्हता.
सतार वादनातल्या या मर्यादा खाँसाहेबांमधल्या सतत अतृप्त असणार्‍या कलावंताला, पट्टीच्या गायकाला अस्वस्थ करत होत्या. त्यांच्यावर मात करण्यासाठी खाँसाहेबांनी सतारीच्या रचनेत मूलभूत बदल करायला सुरुवात केली. 'तब्ली, 'जवारी' या सारख्या भागांची रचना बदलत आणि पडदे मिळवण्याच्या पद्धतीचा तसेच चिकारीच्या तारेवर सातत्याने आघात करण्याच्या पद्धतीचा नव्या रचनेशी ताळमेळ साधत खाँसाहेबांनी सतारीतल्या मींड, गमक वाजवताना येणार्‍या मर्यादांवर मात केली. डाव्या हाताने तारा खेचण्याचे नवे तंत्र विकसीत करत ख्याल गायकीतली आलापचारी, तानक्रिया तिच्या सगळ्या बारकाव्यांसकट सतारीवर उतरवायला सुरुवात केली. गायकीतल्या निरनिराळ्या घराण्यांचा अभ्यास करत, त्यातली सौंदर्यस्थळे सतारीवर सही सही वाजवून काढत सतारीला चक्क 'गाता गळा' दिला. सतारीवर वाजवल्या जाणार्‍या 'गायकी अंग' या नव्या बाजाचे विलायत खाँसाहेबच जनक आहेत, 'आर्किटेक्ट' आहेत असे म्हणावे तर अतिशयोक्ती होणार नाही.

Friday, 25 July 2014

माझे कुणा म्हणावे ...

वैराण वाळवंटी, त्या पानही हलेना
माझे कुणा म्हणावे, काहीच आकळेना

जावे पळून कोठे, हा खेळ प्राक्तनाचा
चिरदाह वेदनेचा, मज दंश साहवेना

ज्याने 'हलाल' केले, कित्येक काफिल्यांना
तो भास मृगजळाचा, नजरेस साहवेना

जी रोज दाविली मी, घनतृषार्त यात्रिकांना
ती वाट मरूस्थळाची, मग मलाच चालवेना

सारेच मानभावी, वस्तीत दांभिकांच्या
जो तो 'मुक्या'च येथे, सच्चा कुणी मिळेना

(मुक्या - मूकवाचक, आंतरजालावरचे टोपणनाव)

मूळ प्रेरणा:

Saturday, 21 June 2014

शोधयात्रा (भावानुवाद)

आम्ही ही अनोखी शोधयात्रा अधुरी कदापी सोडणार नाही
मात्र जिथून श्रीगणेशा केला त्या आरंभस्थानी डेरेदाखल होणे
अन त्या गंगोत्रीची पहिल्याप्रथम खरी ओळख करून घेणे
हीच आमच्या सार्‍या वाटचालीची अंतिम फलश्रुती असेल
मूळ काव्यः
We shall not cease from exploration
And the end of all our exploring
Will be to arrive where we started
And know the place for the first time.
-T.S. Eliot

Sunday, 20 April 2014

संतूर आणि पं. शिवकुमार शर्मा - एक अनोखी स्वरयात्रा

संतूर - जम्मू काश्मिरमधले तिथल्या 'सुफीयाना मौसिकी' या लोकसंगीतात वापरले जाणारे एक साधेसुधे वाद्य. स्वरमंडलसारखी रचना असलेले आणि जेमतेम दीड सप्तकांचा आवाका असलेले हे तंतुवाद्य काश्मिरी लोकगीते गाताना साथीला घ्यायची खरे तर परंपरा होती, पण काश्मिर नरेशांच्या पदरी असलेल्या राजपुरोहितांच्या घराण्यात जन्म घेण्याचे भाग्य लाभलेल्या पं. उमादत्त शर्मांच्या मनात मात्र या वाद्याच्या भविष्याबद्दल काही वेगळेच मनसुबे आकार घेत होते. वास्तविक पाहता त्या काळात तरी राजपुरोहितांच्या घराण्यात गाणे बजावणे या प्रकाराला फारशी प्रतिष्ठा नव्हती. राजपुरोहिताने गाणे बजावणे करणे शिष्टसंमतही नव्हते. पण अभिजात संगीताविषयीची आंतरिक ओढ पं. उमादत्त शर्मांना स्वस्थ बसून देत नव्हती. त्यांनी चोरून मारून का होईना, बनारस घराण्यातल्या थोर गायक पं. बडे रामदासजींकडून तालीम घ्यायला सुरूवात केली आणि नेटाने रियाझ करत बनारस घराण्याच्या गायकीत चांगलेच नैपुण्य मिळवले. जोडीला तबल्याचा अभ्यासही सुरू होताच.

चाकोरीबद्ध विचार करणारी सामान्य पोटभरू व्यक्ती आणि सृजनशील कलावंत यात जात्याच मोठा फरक असतो. ईश्वरी वरदान लाभलेल्या कलावंताकडे नवनिर्मितीसाठी आवश्यक असलेली दिव्यदृष्टी तर असतेच, आपले स्वप्न वास्तवात आणण्यासाठी वाटेत कितीही काटेकुटे आले, ठेचा लागल्या, अपमान झाले तरी अथक प्रयत्न करत राहण्याची आंतरिक ओढही असते. ज्योतिष्य, आयुर्वेद वगैरेंचा गाढा अभ्यास असलेल्या आणि उर्दु, पर्शियन, संस्कृत, डोगरीसह अनेक भाषांवर प्रभुत्व असलेल्या प्रकांडपंडित उमादत्त शर्मांच्या दिव्यदृष्टीला संतूरमधे दडलेल्या कित्येक शक्यता स्पष्टपणे दिसत होत्या. त्यामुळे संतूरचे स्वरूप बदलून हे वाद्य अभिजात (शास्त्रीय) संगीतासाठी परिपूर्ण कसे करता येईल यावर त्यांचा सतत विचार सुरू होता, त्या दृष्टीने संशोधनही सुरू होते. शर्माजींच्या प्रयत्नांना म्हणावे तसे यश मात्र मिळत नव्हते.

१३ जानेवारी १९३८ ला शर्माजींना पुत्ररत्नाचा लाभ झाला. काश्मिरी पंडितांच्या परंपरेप्रमाणे लहान बाळाच्या जिभेवर केशराने ओमकार रेखाटण्याचा विधी झाला. धार्मिक वळणाच्या आणि अध्यात्मिक पिंड असलेल्या उमादत्त शर्मांनी सुचवल्याप्रमाणे मुलाचे 'शिवकुमार' असे नामकरणही झाले. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात. या उक्तीप्रमाणेच उमादत्त शर्मांना संतूरविषयीचे त्यांचे स्वप्न पूर्णत्वाला नेण्याची क्षमता त्यांच्या मुलात लहानपणीच दिसली. बनारसची गायकी आणि तबला शिकणार्‍या शिवकुमारांमधे असलेली विलक्षण प्रतिभा उमादत्तजींनी हेरली. एके दिवशी छोट्या शिवकुमारांच्या हातात संतूर देत दे म्हणाले, "शिव, आजपासून तुला या वाद्याची आराधना करायची आहे." हिंदुस्थानी अभिजात वाद्यसंगीताच्या इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवण्याजोगाच म्हणावा लागेल. शिवकुमारांनी केलेला अथक रियाझ, त्यांची तपश्चर्या कुठवर पोचली आहे ही पाहण्याची वेळ आलेली होती. १९५५ मधे पोरसवदा वयाचे शिवकुमार मोठ्या उत्साहाने आणि आशेने संतूरवादनाचे कार्यक्रम करण्यासाठी मुंबापुरीच्या मायानगरीत येउन पोचले.

मुंबापुरीची पहिली सफर या युवक संतूरवादकासाठी एक पूर्णपणे निराश करणारा अनुभव मात्र ठरली. शिवकुमार शर्मा नामक काश्मिरी युवक आणि त्याचे संतूरवादन हा सांगितिक वर्तुळात बहुतांशी थट्टामस्करीचा विषय ठरला. कसले अजब वाद्य आहे, या वरून उंदीर पळाला तरी कानाला गोड लागेल, पण यावर अभिजात रागदारी संगीत वाजवणे हे जरा अतिच होते आहे अशी हेटाळणी कित्येक नामवंत संगीत समीक्षकांनी, कलाकारांनी उघडपणे केली. मोजक्याच लोकांनी शिवकुमारांमधल्या असामान्य प्रतिभेचे कौतुक केले. त्यातल्या हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या लोकांनी संतूरवर शास्त्रीय रागदारी संगीत वाजवता येईल या संकल्पनेशी सहमती दर्शवली. बहुतांशी संगीत तज्ञांनी आपली असामान्य प्रतिभा संतूरसारख्या वाद्यामागे वाया न घालवता सतार किंवा सरोद शिकणे बरे पडेल, अजूनही वेळ गेलेली नाही असा मोलाचा सल्ला शिवकुमारांना दिला.

मोठ्या उत्साहाने जम्मूची जन्मभूमी सोडून, घरातली छत्रछाया सोडून मुंबईला आपली कर्मभूमी करण्याच्या इराद्याने इतक्या दूरवर आलेले शिवकुमार हताश होउन जम्मूकडे परत फिरले. हा मोठ्याच कसोटीचा कालखंड होता. त्यांच्या खंतावलेल्या मनाला द्विधा मनस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नव्हता. बेभरवशाच्या संगीत क्षेत्राच्या आपण खरोखरच मागे लागावे का? संतूरचा नाद सोडून देत सतार किंवा सरोदवादन शिकावे का? असे सगळे प्रश्न पडल्याने मन सतत दोलायमान होत होते. शेवटी शिवजींनी एकदाच पक्का निर्धार केला - ज्या अर्थी आपले सद्गुरू संतूर या वाद्याला शास्त्रीय संगीताच्या व्यासपीठावर प्रतिष्ठेचे स्थान मिळवून देणे हेच तुझे जीवितकार्य आहे असे आत्मविश्वासाने सांगत आलेले आहेत, त्याचाच अर्थ असा की प्रत्यक्षात तसे घडण्याची पुरेपूर शक्यता आहे. जर कुठे उणीव असेलच, तर ती आपल्या प्रयत्नात आहे. त्यामुळे आता जे काही भले बुरे होईल ते होउ द्यावे, पण आपले आयुष्य आपण संतूरसाठीच खर्ची घालावे. शिवकुमार पुन्हा एकदा नव्या हुरूपाने रियाझ करायला लागले. एखाद्या योगी पुरूषासारखे संतूरविषयक चिंतन, मनन आणि निदीध्यासाच्या मागे लागले. निव्वळ इच्छाशक्तीच्या जोरावर अशा कचाट्यातून बाहेर पडून यशस्वी होणार्‍या व्यक्ती मुर्दाड,दुराग्रही, हटवादी होतात. मात्र श्रद्धा आणि गुरूभक्तीच्या जोरावर हा काट्याकुट्यांनी भरलेला हा खडतर प्रवास पार पाडत आपले ध्येय साध्य करणारे शिवजींसारखे कलावंत शांत, संयत आणि अनाग्रहीच राहतात.

संतूरच्या या शोधयात्रेतच सभोवतालच्या नितांत सुंदर निसर्गाशी शिवकुमारांची नाळ जोडली गेली. त्यामुळे सतत रियाझ करत असतानाही त्यांना कधी थकवा जाणवला नाही. सृजनाची प्रेरणा कलाकाराला निसर्गातून मिळते, पुस्तकातून नाही असे शिवजी आवर्जुन सांगतात. हळूहळू शिवजींच्या चिंतन मननाला आकार येत गेला. संतूरच्या रचनेत त्यांनी काही महत्वाचे बदल केले. तीन सप्तकांमधे सपाट तानेसह सगळ्या प्रकारच्या तानक्रियेचा प्रयोग करत रागदारीचा लीलया विस्तार करणे त्यामुळे शक्य व्हायला लागले. संतूर अक्रोडच्या लाकडापासून बनलेल्या स्ट्रायकरने (कलाम) वाजवतात. हे पियानोच्या जातकुळीतले 'आघाती' स्वरूपाचे वाद्य असल्याने एखाद्या स्वरावर सलग थांबणे (ठहराव) शक्य होत नाही. मींड, गमक या सारखे वाद्यवादनातले आवश्यक मानले जाणारे प्रकार वाजवणे शक्य होत नाही. थोडक्यात सांगायचे तर सारंगी वादनात गज वापरून, सतार वादनात उजव्या हाताने आघात करत डाव्या हाताने तारा खेचून, किंवा व्हायोलिनवर 'बो' च्या करामती खेचून सहजगत्या जे अलंकार वाजवता येतात, ते संतूरवर उतरवताना मात्र अत्यंत कष्टसाध्य होतात.

शिवजींनी कलामच्या सहाय्याने संतूरच्या तारांवर आघात केल्यानंतर जो किणकिणता नाद निर्माण होतो, त्याचाच कलात्मक उपयोग करत ठहराव असल्याचा आभास निर्माण केला. त्याचा वापर करत ध्रुपद अंगाने जाणारी आलापचारी वाजवण्याची पद्धत विकसीत केली. वाद्यातल्या मूळ ध्वनिमाधुर्यात, ध्वनिच्या गुणवत्तेत फारसे फेरफार होणार नाहीत आणि वादनातले सातत्य, प्रवाहित्व टिकून राहिल अशा पद्धतीने मर्यादित प्रमाणात का होईना गमक आणि मींडचा आभास व्हावा अशा प्रकारे कलामचा वापर करण्याची पद्धती विकसीत केली. प्रत्येक वाद्याचा एक 'स्वभाव' असतो, आणि त्याच्याशी विसंगत असे इतर वाद्यांचा आभास निर्माण करणारे वादन केल्याने रसभंग होतो. शिवाय तसे वादन करताना खूप मर्यादा येतात आणि ते सलगपणे करता येत नाही. उलट असे प्रकार केल्याने वाद्याचा आब कमी होतो आणि निकृष्ट दर्जाची नक्कल केल्यासारखा परिणाम हाती येतो. त्यामुळे संतूर वादन शंभर टक्के संतूर वादनच राहिल, मधेच सतार किंवा सरोदची छटा दिसता कामा नये अशी एक प्रकारची सांगितिक प्रतिज्ञाच शिवजींनी निभावली असे म्हणावे तर अतिशयोक्ती होणार नाही.

शिवजींच्या संतूर वादनाची सुरूवात संथ आलापचारीने होते. ती ध्रुपद अंगाची असल्याने मुर्की, खटका वगैरे प्रकार वर्ज्य असतात. नंतर जोड अंगाचे वादन ते करतात. यात पूर्णपणे तालबद्ध नसले तरी लयीच्या अंगाने रागस्वरूप उलगडत जाणारे वादन असते. सांगता अत्यंत वेगवान लयीतल्या झाल्याने होते. त्यानंतर तबल्याच्या साथीने विलंबीत किंवा मध्य लयीतली गत आणि शेवटी द्रुतगतीतली गत असा वादनाचा क्रम असतो. कारकीर्दीच्या सुरूवातीला मसीतखानी आणि रजाखानी अंगाने त्रितालातल्या गती वाजवणार्‍या शिवकुमार शर्मांनी पुढे रूपक, झपताल, एकताल यासारखे प्रचलित ताल तसेच मत्त ताल (९ मात्रा), रूद्र ताल (११ मात्रा), जय ताल (१३ मात्रा) आणि पंचम सवारी (१५ मात्रा) अशा तालांमधेही तितक्याच सहजतेने वादन केलेले दिसते. पिलू, पहाडीसारख्या रागांवर आधारलेल्या धुन तसेच लोकसंगीतावर आधारलेल्या धुन वाजवण्यात कौशल्य मिळवलेले शिवकुमार शर्मांच्या तोडीचे वादक कलाकार मोजकेच असतील.

शिवकुमारांचे संतूर वादन सर्वार्थाने समृद्ध असते. ज्यांना संगीतातल्या तांत्रिक बाबी समजत नाहीत, अशांना संतूरमधून प्रकटणार्‍या नादमाधुर्याचा, भाव आणि नवरसांच्या उत्कट अभिव्यक्तीचा आस्वाद घेता येतो. एखादे तरल भावचित्र मनात साकार व्हावे, किंवा खळाळता झरा, समुद्रात उसळाणार्‍या लाटा किंवा स्तब्ध उभ्या असलेल्या हिमशिखराचे चित्र डोळ्यापुढे उभे रहावे इतके परिणामकारक रागस्वरूप शिवजी सहज उभे करतात. त्यांचा ललत ऐकताना भल्या पहाटे शुचिर्भूत होउन मंदिरात ध्यानस्थ बसल्याची जाणिव होते, रागेश्री ऐकताना मिलनासाठी अतुर झालेली सुंदर अभिसारिका डोळ्यापुढे येते, मारवा अनाम हुरहुर लावून जातो तर श्री ऐकताना हृद्यस्थ जनार्दनाला शरण गेल्याची भावस्थिती प्रत्ययाला येते.

ठहराव, मींड, गमक या बाबतीत आपल्या वाद्यात असलेल्या अंगभूत उणीवांवर मात करत तबलावादनातल्या खंड, जाति आणि छंद या लयकारीच्या तंत्राचा उपयोग करून बनारस घराण्याच्या गायकीच्या अंगाने रागविस्तार करण्याची जी आगळी वेगळी पद्धत शिवजींनी विकसीत केली आहे, ती स्वतंत्र संशोधनाचा किंवा डॉक्टरेटच्या कित्येक प्रबंधांचा विषय व्हावा इतकी समृद्ध आहे. खंड, जाति आणि छंद या प्रकारच्या तसेच तालाच्या सव्वापट, दीड पट, पावणेदोन पट (आड, कुआड, बिआड) लयीत शिवजींइतक्या सहजतेने वादन करणारे कलाकार मोजकेच आहेत. सव्वापटीपेक्षा कमी, मात्र मूळ लयीपेक्षा किंचीत जास्त लयीत सलग वादन करत त्याच लयीत तिहाई किंवा नौहक्का वाजवत तडफेने समेवर येण्याचे काम शिवजी लीलया करतात. त्यांची साथ करणे ही तबलजीसाठी सत्वपरीक्षाच असते. मैफिलीच्या सुरूवातीला शंभरावर तारा असलेली आपली 'शततंत्री वीणा' हाती घेउन स्वरमेळ साधत असतानाच शिवजी आपण किती सुरेल आहोत याची चुणूक दाखवतात. महान वादकाचे एक लक्षण असे सांगतात, की तिन्ही सप्तकांपैकी एखाद्या स्वरात थोडा जरी फेरफार वाटला, तर त्या क्षणी हे कलाकार तो दुरूस्त करून घेतात. बरेच वेळा असे किरकोळ फेरफार वादनाच्या प्रवाहित्वात बाधा पडणार नाही अशा प्रकारे नकळतच करून घेतले जातात. स्वरमेळा श्रुतीबद्ध असेल तर जाणकार श्रोत्याला एखादी स्वरसंगती वाजवली, नुसते वाद्य छेडले तरी रागस्वरूपाचा उलगडा होतो. शिवजींच्या वादनात या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात.

संतूरबरोबर संगत करणार्‍या तबलजीला निव्वळ ठेका धरून बसण्याची सक्ती नसते. उलट लयतालावरचे आपले प्रभुत्व दाखवून द्यायची पूर्ण संधी असते. शिवकुमारांच्या सुरूवातीच्या कालखंडात उ. शफात अहमद आणि त्यांची अशीच जोडी जमलेली होती. दुर्दैवाने शफात अहमदना अकालीच देवाज्ञा झाली आणि नियतीने हा रंगलेला डाव अर्ध्यावरच मोडला. शिवजींनी तीन पिढ्यांमधल्या आघाडीच्या जवळजवळ सगळ्याच तबलजींबरोबर अप्रतिम वादन केलेले आहे. त्यातल्या त्यात पं. रविशंकर - उ. अल्लारखाँ, उ. अली अकबर - पं. स्वपन चौधरी किंवा उ. विलायत खाँ - पं. किशन महाराज यांच्याप्रमाणेच पं. शिवकुमार शर्मा - उ. झाकिर हुसेन ही जोडी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात नावाजली जाते. लयतालावर असामान्य प्रभुत्व असलेल्या शिवजी आणि झाकिर हुसेन यांचे साद प्रतिसाद, लयकारीचे प्रकार वाजवताना त्यांनी काढलेल्या एकमेकांच्या खोड्या अत्यंत विलोभनीय असतात.

श्रद्धा, गुरूभक्ती आणि त्या जोडीलाच अथक प्रयत्न, चिंतन, मनन आणि निदीध्यासातून साकारलेली पं. शिवकुमार शर्मांची तपश्चर्या फळाला आलेली दिसते.आजमितीला संतूर आणि शिवकुमार शर्मा हे जणू समानार्थी शब्द झालेले आहेत. संतूरला अभिजात संगीताच्या व्यासपीठावर सतार, सारंगी किंवा सरोदच्या तोलामोलाचे स्थान मिळालेले आहे. पं. शिवकुमार शर्मांना पद्मविभूषणसह देशोदेशींचे सन्मान, पुरस्कार मिळालेले आहेत. या बाबतीत स्वतः शिवजींना कृतार्थ करणारा एक प्रसंग सांगून या लेखाची सांगता करतो. उ. विलायत खाँ साहेबांच्या शेवटच्या कालखंडात त्यांच्या एका मैफिलीला कित्येक दिग्गज कलाकार आवर्जुन उपस्थित होते. मैफिलीनंतर अनौपचारिक गप्पाची मैफल सुरू झाली. संगीताचाच विषय होता. बोलता बोलता विलायत खाँसाहेब आपल्याच तंद्रीत बोलायला लागले - "आपल्या सगळ्या कलाकारांच्या मांदियाळीमधे दोन कलाकार बेजोड आहेत, एक बिस्मिल्लाभाई आणि दुसरी शिवभाई. या दोघांमागे व्यक्तिशः संगीतातल्या घराण्याची प्रतिष्ठा नाही, ते वाजवत असलेल्या वाद्याशी लोकांचा परिचय नाही, आणि तरीही या दोघांनी आपल्या वाद्याला सतार आणि सरोदच्या उंचीवर नेउन ठेवले आहे. हे काम इतर कुणीही केलेले दिसत नाही." शिवजी म्हणतात - आजवरच्या माझ्या आयुष्यात मला मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार विलायत खाँसाहेबांचे ते शब्द आहेत. आपल्या आयुष्यातला कृतार्थ करणारा तो क्षण शिवजींनी आपल्या स्मृतीत कायमचा जपून ठेवला असेल यात शंकाच नाही.

पुरवणी -
पं. शिवकुमार शर्मा - कौशी कानडा (तबला - उ. झाकिर हुसेन)
पं. शिवकुमार शर्मा - पहाडी धुन (तबला - उ. शफात अहमद)

Thursday, 27 March 2014

क्रोमबुक्स - एक झलक...

लॅपटॉपची खरेदी करताना त्यासाठीची संगणक प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टीम) म्हणजे विंडोज असे समीकरणच आपल्या मनात पक्के झालेले असते. मात्र मायक्रोसॉफ्टच्या स्पर्धकांचे या क्षेत्रातली मायक्रोसॉफ्टची अनिर्बंध मक्तेदारी मोडून काढण्याचे प्रयत्नही सुरू असतात. आजवरचे असे प्रयत्न एकतर अयशस्वी ठरलेले आहेत किंवा त्यांना माफक प्रमाणात यश मिळालेले आहे. असाच एक प्रयत्न क्रोमबुक्स बाजारात आणून गुगलनेही केलेला आहे.
क्रोमबुकमागची मूळ संकल्पना:
सर्वसाधारणपणे मनोरंजन, संपर्काचे एक माध्यम आणि थोडेफार काम अशा वापरासाठी लॅपटॉप विकत घेणारे ग्राहक त्याचा उपयोग आंतरजालावर किती वेळ करतात आणि ऑफलाईन असताना किती वेळ करतात? या प्रश्नाचे उत्तर बहुतांशी आंतरजालावरचा वापर आणि अत्यंत नगण्य असा ऑफलाईन वापर असे कित्येक ग्राहक देतील. क्रोमबुकची संकल्पना याच गृहीतकावर आधारलेली आहे. गुगलने पूर्णपणे आंतरजाल केंद्रित क्रोम संगणक प्रणाली तयार केलेली आहे. ही प्रणाली लिनक्सवर (क्रोमियम या लिनक्सच्या एका प्रकारावर) आधारीत आहे. क्रोम प्रणालीत गुगलने संगणकाचा ऑफलाईन वापर करण्यासाठी लागतात त्या सगळ्या घटकांना जवळजवळ पूर्णपणे वगळलेले आहे. त्यामुळे ही प्रणाली अत्यंत हलकीफुलकी (लाईटवेट), वापरायला सोपी (युजर फ्रेंडली) आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने मजबूत (रोबस्ट) झालेली आहे.
क्रोमबुकचे काही फायदे:
क्रोमबुक सुरू केल्यानंतर वापरण्यासाठी तयार व्हायला जेमतेम पाच दे दहा सेकंद लागतात ('बूट' होण्यासाठी फार वेळ लागत नाही). क्रोमबुकवर आपले 'गुगल' खाते वापरूनच प्रवेश करता येतो. माहितीचा साठा करण्यासाठी क्रोमबुकबरोबर गुगल ड्राईव्हवर १०० जीबी इतकी जागा दोन वर्षांसाठी मोफत मिळते. ही जागा आपल्यासाठी क्लाउडवर राखीव ठेवलेली असते. गुगल खाते ही आपली एकमात्र ओळख ठरत असल्याने आपल्या इ-मेल्स, फोटो, गुगल ड्राईव्हवर अपलोड केलेल्या फाईल्स अशा सगळ्या गोष्टींचा एकत्रित संच आपल्याला सहज उपलब्ध होतो. गुगल खाते वापरून आपली ओळख पटवून प्रवेश केला (सिंगल साईन ऑन) तर हाच संच इतर संगणक प्रणाली आणि स्मार्टफोन, टॅबलेटवरूनही उपलब्ध होतो.
क्रोमबुक्सच्या बांधणीचा दर्जा (बिल्ड क्वालिटी) तितक्याच किंमतीच्या अन्य लॅपटॉपशी तुलना केली असता बराच उजवा असतो. क्रोमबुक दिसायलाही सर्वसाधारण लॅपटॉपच्या श्रेणीतले न दिसता अ‍ॅपलच्या मॅकसारखेच आकर्षक दिसते. क्रोमबुकची अंतर्गत रचना बहुतांशी गणनप्रक्रिया सर्व्हरवर व्हावी अशा प्रकारची असल्याने क्रोमबुकने पुरवलेल्या सगळ्या सुविधा क्रोम वेब ब्राउझरमधूनच उपलब्ध होतात. क्रोमबुकची संगणक प्रणाली स्वतःचेच परीक्षण करून काही संशयास्पद घडलेले दिसले तर पुन्हा स्वतःची नव्याने बांधणी करायला सक्षम असते. असे होत असताना क्लाउडमधल्या आपल्या माहितीच्या साठ्याला धक्का लागत नाही. त्यामुळे क्रोमबुकसाठी अँटिव्हायरसची गरज नसते. अँटिव्हायरसवरचा खर्च वाचतोच, व्हायरसमुळे होणारा मनस्ताप किंवा माहितीचे नुकसानही संभवत नाही.
क्रोमबुक्समधे इंटेलच्या 'हॅजवेल' तंत्रज्ञानावर आधारित सेलेरॉन प्रोसेसरचा वापर होतो. त्यामुळे एकदा चार्ज केलेली बॅटरी सर्वसाधारण वापर चालू असेल तर सातआठ तास आणि मोठ्या प्रमाणावर मल्टिमिडीयाचा वापर करूनही सहा तासावर सहज टिकते. क्रोमबुक्सची किंमत लक्षात घेता हे बॅटरी लाईफ उत्तमच म्हणावे लागेल. क्रोम प्रणालीत अनावश्यक फापटपसारा कमी केलेला असल्याने आंतरजालाचा वापर करताना सामर्थ्य (पॉवर) आणि वेग (डाउनलोड/ अपलोड स्पीड) दोन्ही बाबतीत उत्तम अनुभव मिळतो. क्रोमबुकची मूळ प्रणाली आणि तिला पूरक असलेले सॉफ्टवेअर अज्ञयावत ठेवण्याची जबाबदारी वापरकर्त्याची ('एंड युजर) नसते. आवश्यक ते सगळे 'अपडेट्स' आंजावरून उतरवून घेणे आणि त्यांना परिणामकारक पद्धतीने वापरता येईल अशी त्यांची रचना करणे (कॉनफिगरेशन) हे काम आवश्यकतेनुसार आपोआप होत राहते.
क्रोमबुकच्या मर्यादा:
क्रोमबुकवर सगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर वापरता येत नाही, उदा. 'जावा' प्रणालीवर आधारीत सॉफ्टवेअर वापरता येत नाही. मायक्रोसॉफ्ट ऑफिस, स्काईपसारखे कित्येकांच्या सवयीचे झालेले सॉफ्टवेअर वापरता येत नाही. मात्र त्यासाठी पर्यायी असे गुगलचे सॉफ्टवेअर सहज उपलब्ध असते. पुरेशा वेगाने आंतरजालाचा वापर करता येत नसेल, तर क्रोमबुकचा वापर 'पेपरवेट' सारखा करावा लागतो असा प्रचार गुगलचे विरोधक करतात. हा आक्षेप फारसा खरा नाही. क्रोमबुक्सवर ऑफलाईन वापर करण्यासाठी गुगलने पुरवलेल्या आंजावरच्या संग्रहात (ऑनलाईन स्टोअर) गुगल डॉक्स, जीमेल आणि गुगल ड्राईव्हसारखे बरेच सॉफ्टवेअर तसेच कित्येक 'गेम्स' मोफत उपलब्ध आहेत. मात्र 'हाय एंड गेमिंग' साठी क्रोमबुक्सचा वापर करता येत नाही.
एकंदर सगळ्या बाबी लक्षात घेता मनोरंजन, संपर्काचे माध्यम आणि थोडेफार जुजबी स्वरूपाचे काम इतकाच लॅपटॉपचा वापर असेल, तो बहुतांशी आंतरजालावर होत असेल आणि चांगले वायफाय कनेक्शन उपलब्ध असेल अशांनी क्रोमबुक्स घेण्याचा विचार अवश्य करावा. घरात एखादा संगणक किंवा विंडोज/ लिनक्स लॅपटॉप असेल, आणि 'जेथे जातो तेथे तू माझा सांगाति' अशा पद्धतीने हाताळण्यासाठी आणखी एका लॅपटॉपची गरज असेल तर क्रोमबुक हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. गुगल ड्राईव्हवरच्या आपल्या खजिन्याशी थेटपणे जोडली जाणारी क्रोमबुक आणि अँड्रॉईड टॅबलेट अशी जोडगोळीही खूप उपयुक्त ठरू शकते.
हाय एंड गेमर्स, पॉवर युजर्स आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस किंवा स्काईपला पर्याय नाही अशा पद्धतीने विचार करणारे युजर्स यांनी क्रोमबुकच्या फंदात न पडणेच बरे.
पुरवणी -
अलीकडेच उपलब्ध झालेल्या एचपी आणि तोशिबा क्रोमबुक्सची एक झलकः
क्रोमचा थोडक्यात परिचयः

Saturday, 15 February 2014

सामरस्य सिद्धांत - श्री संत बाबामहाराज आर्वीकर

 ज्ञानेश्वरीतला अंतरंग सोहळा प्रकट करणारा श्री संत बाबामहाराज आर्वीकर यांच्या ग्रंथातला एक अप्रतिम वेचा:

ज्ञानेश्वरीचे लाडके नाव आहे 'भावार्थदीपिका'. या अभिधानात तिचे कार्य व तिच अंतरंगीय सोहळा प्रकट होतो. ज्ञानाची स्मामिनीच भक्ती आहे. ज्ञानेश्वरी ज्ञानविलासिनी असेलहि, पण ती भक्तीची अभिमानी आहे. श्रांतास छाया, दुखि:तास माया व पतितास दया अशी करूणामूर्ति म्हणजे ज्ञानेश्वरी. तत्वज्ञान व काव्य, जीवन व साक्षात्कार, अर्थ व संवेदना, साहित्य व चमत्कृती, दिव्यता व रसोन्मेष ज्या तर्‍हेने ज्ञानेश्वरीत क्रीडले आहेत, त्या तर्‍हेने मराठी साहित्यप्रांगणात अद्याप तरी अविष्कृति झालेली नाही.
ज्ञानदेवीचा मौलिक सिद्धांत अद्वैतवाद नव्हे तर द्वैताद्वैतविलक्षण भक्ती हाच होय. यालाच सामरस्य सिद्धांतही म्हणतात. विश्वात्मदेवाच्या पूजनार्थ ज्ञानदेवांच्या तबकात कर्म, ज्ञान, योग, मंत्र व तंत्र या पंचज्योतींचा भक्तीमयी प्रकाश आहे. ज्ञानेश्वरीचा भक्तीपंथ हा मोक्षाच्या वाटेवरून वैकुंठपीठास जाणारा नव्हे, तर मोक्षाचा अधिपति भगवंत हा वैराण वाळवंटात सवंगड्यांसमवेत नाचण्यास येण्यासाठी आखलेला पंथ आहे. ज्ञानेशांनी संपूर्ण महाराष्ट्रदेश परिशुद्ध जीवनधर्माने सचेत करून ओजस्वी व तेजस्वी धर्मपरंपरा निर्माण केली.
ज्ञान, कर्म वा योग हे भक्तीवाचून शून्य होत. भक्तीतूनच ते उगवतात व भक्तीरूप होऊन अंती भक्तविलासात प्रकट होतात हे मर्म जाणावे. आजच्या काळास योग्य वळण देण्यास भक्तीपंथाचा राजमार्गच संतांना रूचला आणि तोच त्यांनी विशेषे गौरवला. देवतेची कल्पना केवळ जीवदशेसाठीच ते मानतात, नाहीतर त्यांची देवता लागलीच 'विश्वात्मक रूप' धारण करते. ज्ञानेश हे सर्व संप्रदाय आपलेच मानीत आहेत, म्हणूनच की काय आज ज्ञानेशांनी दिग्दर्शित केलेल्या भगवान विठ्ठलाच्या नगरीत, संतांचे माहेरी सर्व संप्रदाय एकत्र होऊन 'वारकरी' म्हणून पंढरीच्या वाळवंटात निर्मळपणे व एकोप्याने वावरताना दिसतात. त्यांचे भक्तीमत ही एका विशाल व करूणामयी भावदशेचीच अखंड भारतवर्षास मिळालेली देणगी आहे.
ज्ञानेशप्रणित भक्ती पूर्ण वेदप्रणित आहे पण याहीपुढे तिच्या उदारतेने जीवनपद्धतीतली मोठीच उणीव भरून निघाली आहे. वर्णरहित आराधना व जीवनरचना ही त्यांच्या भक्तीची महानता व विशेषता होय. गुरूतत्वाचेच ईश्वरसंज्ञक पूजन त्यांच्या भक्तीत आहे. चार वर्णांच्या कर्मकांडी बेबंद धार्मिकशाहीला आलेले ढोंग वा दंभ हे स्वरूप मोडून त्यांनी सर्वांस जीवनकल्याणाची 'राजमार्गी' वाट प्रशस्त केली आहे. तसेच त्यांनी जातीपातीपेक्षा गुरूंच्या स्थितीचा विचार केला आहे. अहो! गुरूंची जात पाहणारे वेडेच नव्हेत का? ब्रह्म कोणत्या जातीचे असे विचारणे म्हणजे ब्रह्मताच सोवळ्यात बांधणे होय. अज्ञानाची परिसीमा आहे, हा गुरूंच्या ज्ञातीवैशिष्ट्यांचा विचार! व्यवहाराच्या कडीकुलुपात ब्रह्मता ओवळी म्हणून बांधू नका. ज्ञानेशांनी सर्वप्रथम हा आवाज उठविला. तुकोबा-रामेश्वर, चोखोबा-गिरधरपंत अशा गुरूशिष्य जोड्या यातूनच उदयाला आल्या. असा कोण मूर्ख शिष्य आहे की जो गिरिकंदरी भ्रमण करणार्‍या सिद्ध पुरूषास प्रथम जात विचारील? त्याची जातपात सारे हरवलेले असते. ज्ञानेश म्हणतात - यातिकुळ माझे गेले हरपून, वेदसंपन्नु होय ठायी, परि कृपणु ऐसा आणु नाही. नाथसंप्रदायाचे ते तत्व आहे. जीव वा हंस हीच जात, ब्रह्म जे त्याचे स्थान, एवढेच जाणले व तसा आदेश प्रसृत केला. उदारता, सामरस्यबोध, व्यापकता व सहजता यामुळे ज्ञानेशप्रणित भक्तीसिद्धांत आपल्या आगळ्या वैशिष्ट्याने आजही भारतवर्षात नांदत आहे.
- श्री संत बाबामहाराज आर्वीकरकृत 'दिव्यामृतधारा' ग्रंथातून

Saturday, 3 August 2013

तबला (4) - तबला आणि शास्त्रीय वाद्यसंगीत

या भागात तबल्याचा शास्त्रीय वाद्यसंगीतात साथीचे वाद्य या दृष्टीने आस्वाद घेऊ या. शास्त्रीय संगीतात कलाकारांच्या काही जोड्या/ संच प्रसिद्ध आहेत. जगदविख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यानी आजच्या आघाडीच्या सार्याच तबलावादकांच्या बरोबर बहारदार वादन केलेले आहे. पण उ. झाकिर हुसेन साथीला असल्यावर जी मजा येते तिला मात्र तोड नाही. किर्वाणी, लतांगी यासारख्या कर्नाटक शैलीतल्या रागाना हिंदुस्तानी संगीतात रुजवणे, रूळवणे हे श्रेय प्रामुख्याने महान सतार वादक उ. अब्दुल हलीम जाफर खान यांचे. प्रस्तुत फितीत शिवजी किर्वाणी रागातली द्रुत लयीतली बंदिश आणि मग अतिद्रुत लयीत रोमांचकारक 'झाला' वाजवत आहेत. यात ते आणि उ. झाकिर हुसेन यांचा विलक्षण 'तालमेल' अनुभवता येईल. तबला हे तसे 'एकसुरी' वाद्य. पण संतूर च्या तारा दाबून त्यावर पंजाने आघात करून एक वैचित्र्यपूर्ण नादनिर्मिती शिवजी करतात, तिला सहीसही संगत करताना उस्तादजी डग्ग्यामधून जी स्वरनिर्मिती करतात ती अफलातूनच आहे.आता याच कलाकारद्वयीची 'मिश्र पहाडी' मधील एक नजाकतीने भरलेली धून ऐकू या. धून वाजवताना रागदारीचे नियम बरेच शिथील असतात. त्याचा सदुपयोग कसा करावा याचा हा वस्तुपाठच आहे. झाकिर हुसेन यानी पकडलेला दादरा तालाचा ठेका त्यातील वैविध्य आणि दंगदारपणा दोन्ही द्रुष्टीने ऐकत राहावा असा आहे. किर्वाणीच्या फितीत केलेली सही सही साथ, आणि इथे घेतलेली काहीशी दुय्यम, सहाय्यक भूमिका हा फरकही सहज लक्षात येईल. तबलावादकाकडे तयारीबरोबरच सांगितिक जाण आणि प्रगल्भता असावी लागते हे ही स्पष्ट होईल.उस्ताद शाहिद परवेज यांचे हे सतारवादन. झिंजोटी या रागातली ते वाजवत असलेली ही गत दहा मात्रांच्या झपतालात निबद्ध आहे. तिची खासियत अशी की समेला येतानाच्या तीन मात्रा दीड दीड मात्रा असे 'वजन' ठेऊन सातत्याने वाजवल्याने एक वेगळाच डौलदारपणा आलेला आहे. नेमक्या समेवर न येत किंचित अलीकडे अथवा नंतर (अतीत, अनागत) असे समेचा आभास निर्माण करणे असा तालाशी लपंडाव, हुलकावणीचा खेळ खेळता येतो. या फितीत हे ऐकायला मिळेल. गायकी अंग आणि तंत अंग असे बेमालूम मिश्रण असलेल्या या कसदार आणि गाढ्या लयीतल्या वादनाला त्याचा 'आब' राखत समर्पक साथ कशी करावी हेच पंडित कुमार बोस दाखवून देत आहेत.तबलावादनाच्या क्षेत्रात झाकिर हुसेन यांच्या शिष्या अनुराधा पाल यांचे महत्त्वाचे योगदान आहे. या क्षेत्रातही स्त्रिया मागे नाहीत. पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीवादनाला साथ करताना सवाल - जबाब पद्धतीने केलेल्या वादनाची ही फित. (सवाल - जबाब या प्रकाराबद्दल नामवंत समीक्षकानमध्ये उलटसुलट मतप्रवाह आहेत. याने रंजकता वाढते हा एक मतप्रवाह तर रसहानी होते, अभिजात संगीताची पातळी खालावते असा एक मतप्रवाह. माझी याविषयक मतप्रदर्शन करण्याची पात्रता नाही, त्यामुळे फक्त उल्लेख करतो. )उ. झाकिर हुसेन यांच्यावरील सहा भागातला हा माहितीपट. या भागात वाद्यसंगीताच्या साथीवर भर आहे, सुरेख भाष्य आहे. त्यामुळे अधिक काही लिहीत नाही. हा माहितीपट अथ ते इति बघायलाच हवा.या काहीशा संक्षिप्त अशा लेखमालेचा समारोप सांगितिक संकेतानुसार एका अप्रतिम भैरवीने करतो. एका खाजगी (घरगुती) मैफिलीत इमदादखानी घराण्याचे दिग्गज सतारवादक पंडित बुधादित्य मुख्रर्जी यानी गायकी अंगाने केलेले हे अप्रतिम वादन आणि त्याला सुभेन चटर्जी यांची संतुलित, पोषक अशी साथ! 'रसो वै सः' असा अपार्थिव अनुभव येण्यासाठी आणखी काय हवे?