Saturday 3 August 2013

तबला (4) - तबला आणि शास्त्रीय वाद्यसंगीत

या भागात तबल्याचा शास्त्रीय वाद्यसंगीतात साथीचे वाद्य या दृष्टीने आस्वाद घेऊ या. शास्त्रीय संगीतात कलाकारांच्या काही जोड्या/ संच प्रसिद्ध आहेत. जगदविख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यानी आजच्या आघाडीच्या सार्याच तबलावादकांच्या बरोबर बहारदार वादन केलेले आहे. पण उ. झाकिर हुसेन साथीला असल्यावर जी मजा येते तिला मात्र तोड नाही. किर्वाणी, लतांगी यासारख्या कर्नाटक शैलीतल्या रागाना हिंदुस्तानी संगीतात रुजवणे, रूळवणे हे श्रेय प्रामुख्याने महान सतार वादक उ. अब्दुल हलीम जाफर खान यांचे. प्रस्तुत फितीत शिवजी किर्वाणी रागातली द्रुत लयीतली बंदिश आणि मग अतिद्रुत लयीत रोमांचकारक 'झाला' वाजवत आहेत. यात ते आणि उ. झाकिर हुसेन यांचा विलक्षण 'तालमेल' अनुभवता येईल. तबला हे तसे 'एकसुरी' वाद्य. पण संतूर च्या तारा दाबून त्यावर पंजाने आघात करून एक वैचित्र्यपूर्ण नादनिर्मिती शिवजी करतात, तिला सहीसही संगत करताना उस्तादजी डग्ग्यामधून जी स्वरनिर्मिती करतात ती अफलातूनच आहे.



आता याच कलाकारद्वयीची 'मिश्र पहाडी' मधील एक नजाकतीने भरलेली धून ऐकू या. धून वाजवताना रागदारीचे नियम बरेच शिथील असतात. त्याचा सदुपयोग कसा करावा याचा हा वस्तुपाठच आहे. झाकिर हुसेन यानी पकडलेला दादरा तालाचा ठेका त्यातील वैविध्य आणि दंगदारपणा दोन्ही द्रुष्टीने ऐकत राहावा असा आहे. किर्वाणीच्या फितीत केलेली सही सही साथ, आणि इथे घेतलेली काहीशी दुय्यम, सहाय्यक भूमिका हा फरकही सहज लक्षात येईल. तबलावादकाकडे तयारीबरोबरच सांगितिक जाण आणि प्रगल्भता असावी लागते हे ही स्पष्ट होईल.



उस्ताद शाहिद परवेज यांचे हे सतारवादन. झिंजोटी या रागातली ते वाजवत असलेली ही गत दहा मात्रांच्या झपतालात निबद्ध आहे. तिची खासियत अशी की समेला येतानाच्या तीन मात्रा दीड दीड मात्रा असे 'वजन' ठेऊन सातत्याने वाजवल्याने एक वेगळाच डौलदारपणा आलेला आहे. नेमक्या समेवर न येत किंचित अलीकडे अथवा नंतर (अतीत, अनागत) असे समेचा आभास निर्माण करणे असा तालाशी लपंडाव, हुलकावणीचा खेळ खेळता येतो. या फितीत हे ऐकायला मिळेल. गायकी अंग आणि तंत अंग असे बेमालूम मिश्रण असलेल्या या कसदार आणि गाढ्या लयीतल्या वादनाला त्याचा 'आब' राखत समर्पक साथ कशी करावी हेच पंडित कुमार बोस दाखवून देत आहेत.



तबलावादनाच्या क्षेत्रात झाकिर हुसेन यांच्या शिष्या अनुराधा पाल यांचे महत्त्वाचे योगदान आहे. या क्षेत्रातही स्त्रिया मागे नाहीत. पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीवादनाला साथ करताना सवाल - जबाब पद्धतीने केलेल्या वादनाची ही फित. (सवाल - जबाब या प्रकाराबद्दल नामवंत समीक्षकानमध्ये उलटसुलट मतप्रवाह आहेत. याने रंजकता वाढते हा एक मतप्रवाह तर रसहानी होते, अभिजात संगीताची पातळी खालावते असा एक मतप्रवाह. माझी याविषयक मतप्रदर्शन करण्याची पात्रता नाही, त्यामुळे फक्त उल्लेख करतो. )



उ. झाकिर हुसेन यांच्यावरील सहा भागातला हा माहितीपट. या भागात वाद्यसंगीताच्या साथीवर भर आहे, सुरेख भाष्य आहे. त्यामुळे अधिक काही लिहीत नाही. हा माहितीपट अथ ते इति बघायलाच हवा.



या काहीशा संक्षिप्त अशा लेखमालेचा समारोप सांगितिक संकेतानुसार एका अप्रतिम भैरवीने करतो. एका खाजगी (घरगुती) मैफिलीत इमदादखानी घराण्याचे दिग्गज सतारवादक पंडित बुधादित्य मुख्रर्जी यानी गायकी अंगाने केलेले हे अप्रतिम वादन आणि त्याला सुभेन चटर्जी यांची संतुलित, पोषक अशी साथ! 'रसो वै सः' असा अपार्थिव अनुभव येण्यासाठी आणखी काय हवे?


 

तबला (3) - नृत्याची साथ

तबल्याविषयक लेखमालेच्या या भागापासून तबल्याचा साथीचे वाद्य या दृष्टीने विचार करायचा आहे. भारतात हिंदुस्तानी आणि कर्नाटक संगीत हे दोन मुख्य प्रवाह आहेत. या पैकी ही लेखमाला हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत या प्रवाहाशी प्रामुख्याने निगडीत आहे. हिंदुस्तानी संगीतात लोकमान्यतेच्या दृष्टीने (प्रचार आणि प्रसार हे मापदंड लावता) मुख्य प्रवाह असलेल्या ध्रुपद गायकीची जागा ख्याल ने घेतली ( तशीच पखवाजाची जागा तबल्याने घेतली). हे स्थित्यंतर काळाच्या ओघात झाले, तसेच परकीय आक्रमक इथे स्थिरावल्यावर झालेली सांगितीक देवाणघेवाणही बर्याच प्रमाणात कारणीभूत ठरली. हे बदल दूरगामी परिणाम करणारे ठरले. हा एक स्वतंत्र अभ्यासाचा, चिंतनाचा आणि व्यासंगाचा विषय आहे. असो. आज हिंदुस्तानी संगीताच्या नृत्य, गायन आणि वादन या तिन्ही प्रकाराना तसेच उपशास्त्रीय संगीताला तबल्याची साथ असावी हा नियमच झालेला आहे.



आता कथ्थक नृत्याची साथ करणार्या तबलजीची काय खासियत असावी हे थोडक्यात पाहू. नृत्याची साथ करणार्या तबलजीची तयारी विलक्षणच असावी लागते. कथ्थक शिकलेल्या नर्तकांचा तबल्याचा व्यासंग अफाट असतो. त्याना बरोबरीने, सहीसही साथ करायची तर त्या तोडीचाच व्यासंग असणे क्रमप्राप्त असते. हे नर्तक लय आणि तालाच्या बाबतीत भलतेच जहांबाज असतात. उपज अंगाने (ऐनवेळी सुचेल तसे) अवघड 'हिसाब' असणारे 'गिनती' चे बोल रचून ते तत्क्षणी सादर करत असताना त्याना प्रत्युत्तर द्यायचे तर निव्वळ पाठांतर असून चालत नाही, त्या जोडीला प्रसंगावधान आणि हजरजबाबीपणा पण असावा लागतो. आणि यात तबलजी कुठल्याही बाजूने कमी पडला, तर ते जाणकारांच्या लगेच लक्षात येऊन तो चक्क उघडा पडतो. बिरजू महाराजांची साथ करायची, तर तबलजीचा कस तर लागतोच नव्हे ती त्याची सत्त्वपरीक्षाच असते असे म्हणावे तर अतिशयोक्ती ठरू नये. या फितीवरून त्यांचा व्यासंग आणि तालावरचे प्रभुत्व यांचा सहज अंदाज येईल.

चक्रदार म्हणजे एक ठराविक बोलमाला तीन वेळा वाजवून समेवर येणे असे सोपे करून सांगता येइल. यात मध्ये विराम नसेल, ती बोलमाला सलग तीन वेळा वाजत असेल तर त्या प्रकाराला 'बेदम' असे म्हणतात. फिरकीची डायल असणार्या जुन्या फोनचा डायल करताना जो 'टरटर' आवाज येतो, तो तसा 'बेहिसाब' असतो. या बेहिसाब प्रकारावर बिरजू महाराजानी रचलेला असाच एक चक्रदार पद्धतीचा बोल, आणि त्याला तत्क्षणी उ. झाकिर हुसेन यानी दिलेले अत्यंत समर्पक प्रत्युत्तर हा अक्षरशः अंगावर काटा आणणारा प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर जिवंतपणे उभा राहतो. या फितीत महाराजजी गिनती चे चक्रदार सादर करत आहेत.



पंडित आनिंदो चटर्जी यानी कथ्थक ची साथ करतानाची आमद (सुरूवातीला केलेले एकल वादन) आणि रेला दोन्ही अफलातून आहेत.



नृत्य, गायन आणि वादन तिन्हीचा बेजोड मिलाफ असणारी एक ध्वनिचित्रफीत देउन या भागाची सांगता करतो. यात पंडित राजन - साजन मिश्रा जी 'पढंत' करतात त्यातून तबल्याची जी भाषा आहे, ती निव्वळ हिसाब - किताबाची चोपडी नसून या भाषेतही काव्य आहे, ती अर्थवाही आहे. शिवाय संताप, कंटाळा, शृंगार इत्यादी भावछटा व्यक्त करायलाही ती समर्थ आहे याचा अंदाज येईल. शेवट एका अप्रतिम तराण्याने केलेला आहे. (पुढील भागात वादनाच्या साथीचा विचार करू)


 

तबला (2) - तबला एकल वादन - वैविध्य

तबला म्हणजे उ. झाकिर हुसेन असे एक समीकरणच झाल्यात जमा आहे इतकी या कलाकाराची चतुरस्त्र प्रतिभा आणि तपश्चर्या मोठी आहे. असे असूनही आपण आणि श्रोते असा एक भावबंध जुळून यावा, आपले वादन फारशी जाणकारी नसलेल्यासाठीही रंजक ठरावे यासाठी ते आवर्जून प्रयत्न करतात आणि ते हुकूमीपणे जमवूनही आणतात. मूळ पंजाब घराण्याचे असूनही त्यानी इतर घराण्यांचा सखोल अभ्यास, आणि गाढा व्यासंग केलेला आहे. उ. झाकिर हुसेन हा स्वतंत्र लेखच काय लेखमालेचा विषय होईल. विस्तारभयास्तव थोडक्यात आटपते घेतो. तबला वादनातील रेला हा प्रकार इथे उस्तादजी उलगडून सांगत आहेत. ते कुठलाही बोल द्रुत वाजवत असताना जो नाद कानावर पडतो त्यात एकप्रकारची 'रव' (पदरव, गुंजारव या शब्दातील रव) जाणवते. उ. थिरकवा खानसाहेबांच्या वादनातली ही खासियत. तिचा प्रत्यय ऐकताना येईल. पतियाळा घराण्याचे ज्येष्ठ गायक अजय चक्रवर्ती (उ. बडे गुलाम अलींचे पट्टशिष्य) येथे वेगळ्या भूमिकेत आहेत. त्यानी वाजवलेल्या नगम्यामुळे वादन अधिकच रंगतदार झाले आहे.



पंडित स्वपन चौधरी हे आणखी एक बुजूर्ग तबलावादक. उ. अली अकबर खानसाहेबांबरोबर सर्वाधिक काळ संगत त्यानीच केलेली आहे. हे अमेरिकेत वास्तव्यास असल्याने त्यांच्या एकल तबलावादनाचे (सोलो) कार्यक्रम भारतात तुलनेने कमीच होतात. 'धिर धिर' हा बोल ते विलक्षणच वाजवतात. तयारी आणि नादमाधुर्य दोन्हीत ते कसे बेजोड आहेत याचा प्रत्यय या छोटेखानी फितीमध्ये येईल. त्यानीच वाजवलेला 'तक धीन तक' चा लखनौ घराण्याचा (पूरब बाज) अवघड कायदा किती डौलदार आहे हे ऐकायलाच हवे. बनारस घराण्याचा जोरकस, खुला बाज आणि हा नरम, बंद बाज यातील नादाच्या गुणवत्तेचा (टोनल क्वालिटी) फरक सहज लक्षात येईल. या वादनाला पण्डित रमेश मिश्रा यांची सारंगीची साथ हा दुग्धशर्करा योगच आहे.





पंडित आनिंदो चटर्जी हे बूजुर्ग तबला वादक 'घेघे तीट' या बोलावर आधारित उ. हबीबुद्दिन खानसाहेबांच्या खानदानी बंदिशी पेश करताना. यांच्या वादनात इतकी सहजता आहे, की विलक्षण मुष्कील काम करत असतानाही ते आरामखुर्चीत बसून वर्तमानपत्र चाळत आहेत असे वाटावे. हा बोल ऐकत असताना कबुतरांची जोडी 'गुटुरघू' करते आहे असा भास होईल अशा रंजक पद्धतीने उ. झाकिर हुसेन पेश करतात. इथे तो पारंपारिक पद्धतीने वाजवलेला आहे.



पाकिस्तानात वास्तव्य असलेले अब्दुल सत्तार तारी खान हे एक हरहुन्नरी तबला वादक. उपशास्त्रीय संगीताला साथ करण्यात यांचा हातखंडा आहे. मेहदी हसन, गुलाम अली यांच्या गझल गायकीच्या कित्येक मैफिली त्यानी गाजवल्या आहेत. हे स्वतः उत्तम गझल गायकही आहेत. त्यांच्या 'लाईट' वादनाने या लेखाची सांगता करतो.