Friday 14 February 2020

विभाग २ - आत्मविचार आणि शरणागती - प्रकरण ४ - आत्मविचार (सैद्धांतिक)

आत्मविचार आणि शरणागती - प्रकरण ४ - आत्मविचार (सैद्धांतिक)

या प्रकरणात आत्मविचार या रमण महर्षींनी पुनरूज्जीवीत केलेल्या आणि पाश्चात्य देशातील साधकांना भुरळ पाडलेल्या साधनपद्धतीचा सैद्धांतिक अंगाने विचार केलेला आहे.

डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:

रमण महर्षी ठामपणे असे प्रतिपादन करत असत, की देह आणि मन या द्वारे कार्य करणारा व्यक्तिगत 'मी' अस्तित्वात आहे या धारणेचा त्याग करता आला तर आत्मसाक्षात्कार घडून येण्यासाठी तेवढेच पुरेसे आहे. त्यांच्या काही उच्च कोटीच्या भक्तांना हे पटकन उमजत असे आणि सहजगत्या अवगत होत असे.  मात्र काही ना काही पद्धतीची अध्यात्मिक साधना केल्याशिवाय जन्मोजन्मीच्या आणि खोलवर रूजलेल्या व्यक्तिगत 'मी' या धारणेपासून मुक्ती मिळवणे बहुसंख्य भक्तांना जवळजवळ अशक्यप्राय वाटत असे. काहींना ते भयप्रदही वाटत असे. महर्षींना अशा भक्तांच्या समस्यांविषयी सखोल जाण असल्याने तसेच त्यांच्याविषयी करूणा वाटत असल्याने आत्मभान वाढवता येईल अशी एखादी अध्यात्मिक साधनापद्धती सुचवा असा प्रश्न जेव्हा जेव्हा विचारला जात असे, तेव्हा 'आत्मविचार' या तंत्राचा अवलंब करण्याची शिफारस ते करत असत.आत्मविचार ही अध्यात्मिक साधना त्यांच्या अत्यंत व्यवहारसुसंगत असलेल्या तत्वज्ञानाची जणू कोनशिलाच होती. या पुढे आपण आत्मविचाराविषयीचे नानाविध सैद्धांतिक पैलू थोडक्यात समजून घेणार आहोत.

सर्वप्रथम मनाच्या स्वरूपाविषयी महर्षींचा दृष्टीकोन लक्षात घेणे आवश्यक आहे, कारण मनाचे असे स्वायत्त अस्तित्व नाही या सत्याचा प्रत्यक्ष अनुभूतीतून शोध लावणे हेच आत्मविचारामागचे एकमेव ध्येय असते. रमण महर्षींच्या मते देह किंवा मनाद्वारे सजगपणे केल्या गेलेल्या प्रत्येक कृतीमधून 'मी' असा कुणीतरी त्या कृतीचा कर्ता आहे हे गृहीतकच ध्वनित होत असते. मी विचार करतो, माझ्या लक्षात आले किंवा मी अमूक एक कृत्य करेन या सगळ्या कार्यकलापात 'मी' हा एकमेव घटक समान आहे. हा 'मी' असे समजून चालतो की आपल्या हातून घडलेल्या सगळ्या कृत्यांसाठी तो जबाबदार आहे. सगळ्या कार्यकलापांमधे समान असलेल्या याच  घटकाला महर्षी 'अहंवृत्ती' असे म्हणतात. वस्तुतः पहायचे तर अहंवृत्ती म्हणजे  निजस्वरूपाचेच मनाने प्रक्षेपित केलेले आणि फेरफार केलेले एक रूप असते. खरोखरच्या निजस्वरूपामधे आपण एखादी कृती किंवा विचार करतो आहोत अशी कल्पनाच संभवत नाही, त्यामुळे तशी भावना करून घेणारा 'मी' हा काल्पनिक असतो आणि त्यामुळे त्याला सच्चिदानंद निजस्वरूपात झालेला कपोलकल्पित बदलच मानावे लागते. अहंवृत्तीची ही व्याख्या किचकट वाटली तर बोलीभाषेत आपण अहंवृत्तीलाच 'मी पणा' असे म्हणतो तसेच थोडा 'मी पणा' कमी कर असेही म्हणतो हे लक्षात घ्यायला हरकत नाही.

मनाच्या अहंकार, स्मृती, बुद्धीमत्ता अशा वेगवेगळ्या क्रियाकलापांना वेगवेगळी स्वायत्त कार्ये न समजता अहंवृत्तीचीच ती वेगवेगळी रूपे आहेत असा दृष्टीकोण ठेवण्याला महर्षी प्राधान्य देत असत. तथाकथित स्वतंत्र व्यक्तिमत्व हे नानाविध रूपात होणारे अहंवृत्तीचेच प्राकट्य आहे या मताचे महर्षी समर्थक होते. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर कर्म घडत राहिले तरी कर्ताभाव नष्ट होतो, विचारप्रवाह सुरू राहिले तरी त्या मागचा विश्लेषक नाहीसा होतो आणि स्वतंत्र व्यक्तिमत्वाची जाणीवच उरत नाही या आशयाची विधाने महर्षी वारंवार करत असत. अहंवृत्तीचा निरास होणे हाच आत्मसाक्षात्कार होय या सिद्धांताची पुष्टी करणारीच ही विधाने आहेत.

प्रश्नः अहंकाराकडूनच ज्याची सुरूवात झाली असा कुठलाही शोध (आत्मशोध) अहंतेचा स्वतःचाच खोटेपणा कसा प्रकट करू शकेल?
रमण महर्षी: जेथून 'मी आहे' या अहंस्फुरणाचा उगम होतो त्या उगमस्थानी तुम्ही खोलवर उतरणे अहंकाराच्या इंद्रियगोचर अस्तित्वापलीकडे आपोआप घेऊन जाते.

प्रश्नः पण अहंकार ज्या तीन रूपात प्रकट होतो त्यापैकी अहंवृत्ती ही फक्त एकच रूप नाही का? योगवसिष्ठ आणि इतर प्राचीन ग्रंथात अहंकाराच्या तिहेरी स्वरूपाचेच वर्णन केलेले आहे.
रमण महर्षी: तसे आहे खरे. अहंकारात स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह असे तीन देह समाविष्ट आहेत असे वर्णन काही प्राचीन ग्रंथांमधे केलेले आहे; मात्र आपण लक्षात घ्यायला हवे की ते वर्णन विश्लेषण करून दाखवण्याच्या एकमेव हेतूने केलेले आहे. आत्मविचाराच्या संदर्भात हे विश्लेषण गैरलागू आहे.  आत्मविचार ही पद्धती जर अहंकाराच्या स्वरूपावर अवलंबून असती, तर असे पक्के धरून चाला की या साधनापद्धतीचा अवलंब करणे पूर्णपणे अशक्य कोटीतले गणले गेले असते. अहंवृत्त्तीचे विश्लेषण करणे टाळण्यामागचे महत्वाचे  कारण असे आहे, की अहंकारात अगणित रूपे धारण करण्याचे सामर्थ्य असते. त्यामुळे आत्मविचार साध्य व्हावा या हेतूने पुढे जायचे असेल तर अहंवृत्ती हेच अहंकाराचे एकमेव रूप आहे असे प्रमाणभूत मानावे लागते.

प्रश्नः पण ज्ञानाची प्रचिती यावी या दृष्टीने हे (अति सुलभ केलेले) गृहीतक तोकडे पडणार नाही का?
रमण महर्षी: एखाद्या कुत्र्याने आपल्या मालकाचा त्याच्या शरीराच्या गंधावरून शोध घ्यावा, तद्वतच आत्मविचारात अहंवृत्तीवरून सुगावा लावत लावत आपल्या निजस्वरूपाचा शोध घ्यायचा असतो. कुत्र्याचा मालक त्याच्या नजरेच्या टप्प्यात नसला तरी या कारणामुळे कुत्र्याला त्याचा शोध घेण्यापासून रोखता येत नाही. मालकाच्या शरीराचा गंधच त्या मुक्या प्राण्याला इतकी बिनचूक सूचना देतो, की मालकाने परिधान केलेले कपडे, त्याची उंची, त्याची शरीरयष्टी या सारख्या अवांतर गोष्टी कुत्र्याच्या खिजगणतीतही नसतात. मालकाचा शोध घेताना कुठल्याही अवांतर गोष्टींमुळे विचलीत न होता सारे लक्ष फक्त मालकाच्या शरीराच्या गंधाकडेच केंद्रित केल्याने कमी अधिक वेळ लागला तरी कुत्रा शेवटी मालकापर्यंत पोहोचण्यात यशस्वी होतोच.

प्रश्नः ज्ञानप्राप्ती होण्यासाठी आत्मविचार हाच एकमेव थेट मार्ग  ('डायरेक्ट पाथ') आहे असे प्रतिपादन आपण का करता?
रमण महर्षी: त्याचे कारण असे आहे की अध्यात्मिक साधनेचे आत्मविचार वगळता अन्य सारे प्रकार साधन घडून येण्यासाठी मनाचे अस्तित्व शाबूत ठेवावे लागते हे मुळातच गृहीत धरून चालतात, आणि मनाचे सहकार्य नसेल तर त्यांचा सराव करता येणे शक्य होत नाही. साधनेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अहंकार वेगवेगळी आणि सूक्ष्मतर रुपे घेतो, मात्र त्याचा मुळापासून विनाश होत नाही.

महान ज्ञानी अशी ओळख असलेल्या जनक राजाने बोध होंण्याआधी आश्चर्यचकित होत केलेले एक विधान प्रसिद्ध आहे,  "आजवर सातत्याने माझे (पारमार्थिक) नुकसानच करत आलेला चोर आज माझ्या तावडीत सापडलेला आहे. आता त्याचा समूळ नि:पात केला जाईल." जनक राजाचे  हे विधान मन किंवा अहंकाराच्या संदर्भातलेच होते.

आत्मविचार साधनेलाही तंतोतंत लागू पडेल अशा स्वामी स्वरूपानंदांच्या आशिर्वचनाने लेखाची सांगता करतो.

साधनी असावें तत्पर ।
संकटी न सांडावा धीर ।
सोहं -स्मरणे वारंवार
निजांतर चोखाळावें ।।१।।

नाना वृतींचे स्फुरण ।
अंतरी होतसे कोठून ।
साक्षित्वे पहावें आपुलें आपण ।
अति अलिप्तपण ठेवोनिया ।।२।।

सर्वेन्द्रियांसह वर्तमान ।
मन बुद्धि आणि अहंपण ।
आत्मारामीं समर्पून ।
निज-निवांतपण उपभोगावे ।।३।।

चालता बोलतां हिंडतां फिरतां ।
लिहितां वाचितां खातां जेवितां ।
नाना सुखदु:ख-भोग भोगितां ।
निजात्मसत्ता आठवावी ।।४।।

होतां सोहं-भजनीं तन्मय ।
एकवटोनि ज्ञाता ज्ञेय ।
घेई आत्मसुखाचा प्रत्यय ।
अतींद्रिय स्वभावे जे ।।५।।

नाद-श्रवण प्रकाश-दर्शन ।
तेथें श्रोता द्रष्टा कोण ।
तो आत्मा चि मी हें ओळखून ।
तदनुसंधान राखावें ।।६।।

सदा स्व-रूपानुसंधान ।
हेचि भक्ति हेंचि ज्ञान ।
तेणें तुटोनी कर्म-बंधन ।
परम समाधान प्राप्त होय ।।७।।

क्लेश-रहित संतोषी जीवन ।
प्रयाणकाली सोहं-स्मरण ।
घडो आवडी परमार्थ-चिंतन ।
आशीर्वचन तुम्हांसी हें ।।८।।   

--प.पू  स्वामी स्वरूपानंद

No comments:

Post a Comment