Tuesday 29 March 2011

झेन काव्य - 1 (भावानुवाद)

१.

(मी) इतका आळशी (आहे) की कधी महत्वाकांक्षा स्पर्शच करत नाही.
जग आपली काळजी वाहायला समर्थ आहे, मी ती घेत नाही.
दहा दिवस पुरतील इतके तांदूळ पोत्यात आहेत,
चुलीजवळ ढीगभर गवर्या पडलेल्या आहेत,
अध्यात्म आणि मुक्तीच्या व्यर्थ झोलगप्पा का मारायच्या?
भर रात्री छपरावर कोसळणाऱ्या पावसाचा नाद ऐकत
मी मस्त तंगड्या ताणून आरामात पहुडलो आहे.

२.

तारुण्याच्या उंबरठ्यावरच मी शिक्षणाला रामराम ठोकला,
आणि संत होण्याचा ध्यास घेतला.
कठोर वैराग्य पाळत माधुकरी मागत बैराग्यासारखा,
कित्येक वसंत ऋतू उलटले तरी नुसताच इकडे तिकडे भटकलो.
शेवटी घरी परतलो एका अनामिक ओबडधोबड पर्वताखाली स्थिरावण्यासाठी.
आता शांतपणे एका पर्णकुटीत राहतो,
पक्ष्यांच्या चिवचिवाटाचे संगीत ऐकत.
काळे मेघ आहेत माझे सख्खे शेजारी.
खाली एक स्फटिकासारखा झरा वाहतो, जो माझ्या मनाला आणि कायेला ताजेतवाने करतो.
माथ्यावर ताडमाड वाढलेले पाईन आणि ओक आहेत, जे घनदाट छाया आणि आसरा देतात.
दिवसेंदिवस होते वाटचाल मुक्तीकडे, परम मुक्तीकडे....
इथून मुक्काम हलवावा असे मुळीच वाटत नाही.

[भावानुवाद - मूळ काव्य: तायागू र्योकान (१७५८ - १८३१)]

प्रतिबिंब (भावानुवाद)

माझ्या छोट्याश्या कौलारू घराच्या एका कोपर्यात
धुनीवर टांगलेला आरसा तेजाळला आहे.
नितळ आणि रिक्त आरशात
तळ्यातल्या तरंगांचे प्रतिबिंब उमटते आहे.
---
माझ्या पादुका दरवाजाजवळच्या कोनाड्यात
धीरोदात्तपणे प्रतीक्षा करत आहेत.
हे घर जिथे मी सारे जीवन व्यतीत केले.
जिथे काही क्षणांपुर्वीच प्रखर सूर्यप्रकाशात
सचेतन मी भलत्याच खोड्या काढत खळखळून हसायचो.
---
आज इथे संतजन लोटले आहेत.
एकतारी छेडत निर्गुणी भजने गात आहेत.
त्यांचा आनंद... त्यांचे हास्य पहाटेच्या शीतल वार्याच्या झुळूकेवर स्वर होऊन
माझ्या रिकाम्या खोल्यांमधून गुंजते आहे.
---
जिथे काल मी अत्यवस्थ, मरणासन्न पहुडलो होतो ...
कुणीतरी धूपदाणीतला धूप प्रज्वलित केला.
तसे काहीच बदललेले नाही
फक्त यापुढे हे 'माझे घर' नाही.
---
धूप मंदगतीने जळतो आहे.
आणि उजाडणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर
आज न उद्या माझ्या आठवणी पुरत्या विस्मृतीत जातील.
धुनीवर टांगलेला आरसा पुन्हा तेजाने न्हाऊन निघेल
पुन्हा एकदा नितळ आणि रिक्त आरशात
तळ्यातल्या तरंगांचे प्रतिबिंब उमटेल .....
तळ्यातल्या तरंगांचे प्रतिबिंब उमटेल.....

(भावानुवाद - मूळ संकल्पना एका पाश्चात्य कवीची आहे)

Saturday 19 March 2011

माझे साक्षात्कारी बद्धकोष्ठ

तसा मी लहानपणापासूनच वेगळा. ज्ञानमार्गी! तर्कसम्राट, पुरोगामी आणि बुद्धीनिष्ठ. खा खा खाणे आणि बसून राहणे या माझ्या सहज प्रेरणा. धोंडो म्हणतात "सहज प्रेरणांचे दमन विकृतीचे एकमेव कारण आहे". मी कधीच तसले दमन केले नाही. आमचे तात्या "हलका, सुपाच्य आहार घे. नियमित व्यायाम कर. " असे जुनाट रूढीवादी सल्ले देत. मी त्यांच्याकडे कधीच लक्ष दिले नाही. अपचनाच्या एका विलक्षण गर्तेत सापडलो. पोट सतत जड, मन सतत अस्वस्थ. आत्महत्येकडे प्रवृत्त! धोंडो म्हणतात "अनारोग्य महत्वाकांक्षेचे सुप्त कारण आहे. ते टाळण्यासाठी माणूस मोठमोठे झमेले उभे करतो, किंवा आत्मघात करतो ". मी जिवंत राहिलो. चिकाटीने अभ्यास करून अभियंता झालो. स्वामी अद्भूतानंदना गजकर्ण होते आणि सारखा कंड सुटत असे म्हणून त्यांनी वेदांत प्रसाराला वाहून घेतले होते अशी माझी धारणा आहे. असो.

अशा विलक्षण गर्तेत सापडलेला माणूसच 'मोकळे' होण्याचा मार्ग तीव्रतेने शोधतो. यालाच अध्यात्मात मुमुक्षा वगैरे म्हणतात. मुत्तुस्वामी म्हणतात "तुम्ही आणि निरामय जीवन यामध्ये बद्धकोष्ठ हा एकमेव अडथळा आहे. " धोंडो त्यापुढे जाऊन म्हणतात "मला बद्धकोष्ठ आहे, मी बद्धकोष्ठ नाही ही जाणीव होणेच ज्ञात आणि अज्ञात रोगांपासून मुक्ती आहे. मी असे सांगतो तेव्हा मी मोकळाच असतो, आणि तुम्ही मोकळेच आहात याची मला जाणीव असते. त्यामुळे इथे कुणी गुरु नाही आणि कुणी शिष्य नाही. फक्त तुमच्यातल्या मला माझ्यातल्या तुमच्याकडून कायम चूर्ण घेण्याची प्रेरणा मिळते (आणि माझ्याकडे पाचशे रुपयाला चूर्णाची बाटली मिळते) इतकेच! " मंदफार्त तर चक्क म्हणतो "तुम्ही मोकळेच जन्माला येत, उगाच खा खा केल्याने जड वाटते. त्यामुळे कुठलेच ध्येय नाही, दिशा नाही, फक्त एक विलक्षण आवेग असे साधण्याचा प्रयत्न केलात तर त्या क्षणी मोकळे व्हाल. मग उरेल ती फक्त एक दिशाहीन, अथांग शांतता."

झाले! मला मार्ग सापडला. रात्री चांगले दोन डाव भरून कायम चूर्ण घेऊन झोपी गेलो. आणि सकाळी 'घटना' घडली. बुद्धाला पद्मासनात, महावीराला गोदुहा आसनात ज्ञान मिळाले असे म्हणतात. घटना कुठेही कशीही घडू शकते. सकाळी जागच आली ती पोटात विलक्षण कळ येऊन. मी धावतच कमोडपाशी गेलो. मी गेलो असे म्हणण्यापेक्षा कळच मला तिथे घेऊन गेली. बसलो. काही मिनिटात 'प्रक्रिया' पूर्ण झाली. तो क्षण शब्दात पकडणे अवघड आहे. तिथे मी नव्हतो, कमोड नव्हता, आणि आता तर कळ पण नव्हती. मुत्तुस्वामी नव्हते, धोंडो ही नव्हते. एक विलक्षण असा गंध सर्वत्र दरवळत होता. विश्वाच्या निरामयतेला मी स्पर्श केला होता. धन्वंतरीचा आशीर्वाद मला मिळाला होता. सारे ओझे नाहीसे झाले होते. एक विलक्षण रिक्तता अवकाश व्यापून उरली होती. तिचे सघन, चैतन्यमय अस्तित्व प्रकर्षाने जाणवत होते. आरोग्य आणि निरामय जीवन मला कायम चूर्ण मार्गाने प्राप्त झाले होते. प्राप्त झाले होते म्हणण्यापेक्षा जे मुळातच होते त्याची जाणीव मला कायम चुर्णाने करून दिली होती.

आता मी निरामय जीवन जगतो. चित्त अस्वस्थ नसल्याने कमीतकमी, सहज जमेल तितके काम करतो. एरवी सहज प्रेरणेनुसार बसून राहतो. कधी पत्ते खेळतो, बायकोबरोबर भाजी आणायला जातो, कधी सगळ्या व्याधी पासून मुक्ती मिळवण्याच्या कायम चूर्ण मार्गाबद्दल जबरदस्त अधिकारवाणीने लिहितो. प्रवचने देतो.

हा लेख वाचण्यापूर्वी:

१. मी हे लिहित असताना इथे फक्त मी, माझे निरामय अस्तित्व, माझा कीबोर्ड आणि कायम चूर्णाची बाटली आहे. निरामय जीवनासाठी इतरांना उपयोग व्हावा इतक्याच हेतूने मी लिहितो आहे. कुणी आजारी पडावे, किंवा बरे होऊ नये असा माझा हेतू कसा असेल? माझ्या बायकोलाही हे फारसे उमजत नाही. आता बोला! ती चक्क म्हणते, तुमचे फक्त पोट साफ होते. तुम्हाला आरोग्य या विषयात फार ज्ञान नाही. माझ्या सांधेदुखीवर कायम चूर्णाचा काही उपयोग झाला नाही. तात्यानी दिलेल्या नारायण तेल आणि योगराज गुग्गुळाचा मात्र हळूहळू गुण आला. माझ्या निरामय अस्तित्वात मी इतका प्रसन्न आहे, कि मी त्रागा करत नाही.

२. एखादा येईल, हिम्मत करून दोन डाव कायम चूर्ण घेईल. तो हि मोकळा होईल. निरामय जीवन यात्रेत सामील होईल.

३. एखादा निष्णात, नाडीपरीक्षा जाणणाऱ्या वैद्याकडे जाणारा रुग्ण येईल. तो पुरता मोकळा नसेल. कायम चूर्णाची महती वाचून थोडा गोंधळून जाईल. पुन्हा वैद्याकडे जाईल.

४. दोन चमचे कायम चूर्ण घेऊन रक्त ओकावे लागले तर काय, अशी भीती धरणारा एखादा अल्सर रुग्ण येईल. तो रोज एक चमचा सत इसबगोल घेतो, हळूहळू मोकळा होऊ शकेल अशी माझ्या ज्ञानात भर पडेल.

५. एखादा साक्षेपाने अभ्यास केलेला येईल. तो उगाच आधुनिक वैद्यकशास्त्र, आयुर्वेद, युनानी सगळेच उपयुक्त आहेत अशी बडबड करेल. दमेकरी, मधुमेही यांनी काय करायचे असे काल्पनिक प्रश्न विचारेल. याची मुळातच समजून घेण्याची वृत्ती नाही. याला आहे ती सगळी शुष्क माहिती आहे. मला माहितीमध्ये स्वारस्य नाही.

तात्पर्य: कुठलाही वैद्य/ हकीम/ उजव्या डोळ्याचे तज्ञ/ डाव्या कानाचे तज्ञ अथवा आधुनिक वैद्यकशास्त्र/ आयुर्वेद/ युनानी/ योगाभ्यास यांना मी पाठिंबा देऊ शकत नाही. अशा लोकांनी स्वतंत्र लेख लिहून आपली बाजू मांडावी. माझी त्याला ना नाही. पण माझ्या लेखावर प्रतिक्रिया देऊ नये इतकीच नम्र विनंती.

टीप: लेखात आरोग्य या जागी अध्यात्म आणि निरामय च्या ऐवजी निराकार असे वाचायला लेखकाची ना नाही. उलट तसे केल्याने धोंडो, मुत्तुस्वामी आणि मंदफार्त या तीन आधुनिक ज्ञानमार्गी संतांचे दर्शन स्पष्ट होण्यास मदतच होईल. असल्या ज्ञानमार्गाने बसल्या जागी, उभ्याउभ्याच 'मोकळे' झालेल्या सगळ्या महायोग्याना (कि महाभागांना) साष्टांग दंडवत घालून हा लेख त्यांच्या चरणी समर्पित करतो.