Sunday 9 February 2020

विभाग १ - स्वरूपबोध - प्रकरण २ - स्वरूपाचे भान, स्वरूपाविषयीचे अज्ञान आणि साधकांच्या श्रेणी

मागच्या प्रकरणात 'स्व' च्या मूळ स्वरूपाविषयीचे रमण महर्षींचा उपदेश थोडक्यात समजावून घेतल्यावर आता तोच धागा पकडून साधकांचे प्रकार किंवा त्यांच्या श्रेणींबद्दल महर्षींचा दृष्टीकोन या प्रकरणात बघायचा आहे.

तत्पूर्वी मराठी संत साहित्यातला एक संदर्भ आवर्जुन देतो. पावसच्या परमहंस स्वामी स्वरूपानंदांच्या वर-प्रार्थनेची सुरूवात 'उदारा जगदाधारा देई मज असा वर, स्व-स्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर' अशी होते. त्यांनी रचलेल्या अभंग ज्ञानेश्वरीच्या नित्यपाठाची सुरूवात 'आत्मरूपा तुज, करी नमस्कार, तुझा जयजयकार, असो देवा' अशी होते. संजीवनी गाथेत स्वामीजी असे म्हणतात -

सद्गुरू गणनाथ उदार समर्थ, घाली नयनांत ज्ञानांजन |
सहज समाधि सापडले धन, लाचावले मन तया ठायी |
चालता बोलता न ढळे आसन, न भंगे ते मौन कदा काळी |
स्वामी म्हणे लाभे अवीट आनंद, लागलासे छंद स्व-रूपाचा ||

नाथपंथी 'सोहम' साधना हा ज्ञानमार्ग असल्याने ही शिकवण रमण महर्षींच्या उपदेशाशी किती साधर्म्य राखणारी आहे हे सहज लक्षात येईल.

डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:

भगवान रमण महर्षी क्वचित प्रसंगी असे सूचित करत की अध्यात्मिक साधकांच्या ढोबळमानाने तीन श्रेणी असतात. आपल्या मूळ स्वरूपाविषयीची फक्त जाणीव करून देताच पहिल्या आणि सगळ्यात उच्च कोटीच्या साधकांना तत्क्षणी आत्मसाक्षात्कार होतो. ही 'सद्योमुक्ती' असते. ही श्रेणी वगळून इतर साधकांना 'क्रममुक्ती' साधावी लागते. दुसर्‍या श्रेणीतल्या काही पूर्वाभ्यास असलेल्या साधकांना अल्प काळ का होईना आत्मस्वरूपाचे चिंतन, मनन, निदीध्यास साधल्याने त्यांच्या आत्मस्थितीची बैठक एकदम पक्की होते. या श्रेणीतल्या साधकांनाही फारसे सायास घ्यावे लागत नाहीत. तिसर्‍या श्रेणीतल्या अध्यात्मिक साधकांना तुलनेने काहीसे दुर्दैवी म्हणावे लागेल, कारण कित्येक तपांच्या महत्प्रयासाने केलेल्या साधनेनंतरच अशांना आत्मलाभ प्राप्त होऊ शकतो.

या तीन श्रेणी सहज लक्षात येण्यासाठी रमण महर्षी अग्नि प्रदिप्त होण्याच्या क्रियेचा एक दाखला देत असत - दारूगोळ्याचे एखादे कोठार तुमच्या ताब्यात आले, तर एक ठिणगीदेखील त्याला पेटवण्यासाठी पुरेशी ठरते. कोळशासारखा ज्वलनशील पदार्थ असेल तर आगीच्या संपर्कात आल्यावर तो अल्पावधीतच पेट घेताना दिसेल. मात्र भिजलेले लाकूड तुमच्या हाती पडले तर ते वाळवण्यासाठी आणि मग पुढे ते पेटवण्यासाठी तुम्हाला बराच वेळ आणि इंधन खर्ची घालावे लागेल.

याच अनुषंगाने एका महत्वाच्या विषयाचाही परामर्ष घेता येईल. महर्षींच्या उपदेशात कित्येक वेळा तार्किक विसंगती दिसते. बरीच परस्पर विरोधी विधाने दिसतात. काही वेळा तर महर्षींनी एकाच प्रश्नाची दोन तीन वेगवेगळी उत्तरे वेगवेगळ्या साधकांना दिल्याचेही दिसून येते. साधकांच्या श्रेणी, त्यांची अध्यात्मिक परिपक्वता, त्यांचे पूर्वग्रह आणि पूर्वसंस्कार या गोष्टी लक्षात घेता त्यांचा रूचेल, पचेल आणि आत्मसात करता येईल असा उपदेश करणे हा सद्गुरूंचा हेतू असतो. तर्कसुसंगती राखत एखाद्याच ठराविक विचारसरणीचे, साधनपद्धतीचे किंवा साम्यवाद, समाजवाद या सारख्या एखाद्या 'वादाचे' आग्रही प्रतिपादन आणि तदनुषंगिक खंडन मंडन करणे हा शुष्क तत्वज्ञान्यांचा प्रांत आहे. गुरूत्वाचा अधिकार असलेल्या साक्षात्कारी संतांना देखील क्वचित प्रसंगी असे तात्विक प्रतिपादन करावे लागत असले, तरी शिष्यांच्या पारमार्थिक प्रगतीविषयी तळमळ असलेले आणि सहजस्वभावाने करूणामय असलेले रमण महर्षींसारखे सद्गुरू वेगवेगळ्या पूर्वपीठिका बरोबर घेऊन आलेल्या शिष्यांशी संवाद साधताना वरवरच्या तर्कसंगतीला अवास्तव महत्व देत नसतील तर त्यात आश्चर्य कसले?

रमणाश्रमात भगवान रमण महर्षींचा शिष्यांशी संवाद सुरू व्हायचा होता. आश्रमात आलेल्या यात्रेकरूंमधे पाश्चिमात्य देशातून आलेल्या कृश शरीरयष्टीच्या उतारवयाच्या एका व्यक्तीचाही समावेश होता. या व्यक्तीच्या वागण्याबोलण्यामधे कमालीचे मार्दव होते, शालिनता होती. आल्यापासून ही व्यक्ती अत्यंत मोजकेच आणि मृदु भाषेत बोलत होती. आहार देखील अत्यंत संयत आणि सात्विक होता. महर्षींचा शिष्यांशी संवाद सुरू झाला. अत्यंत अदबशीरपणे ही व्यक्ती मात्र आदरपूर्वक शांतपणे कोपर्‍यातल्या एका जागी बसून होती. आश्रमात प्रवेश केल्यापासूनच या व्यक्तीच्या प्रत्येक हालचालीतून आंतरिक शांतता आणि सत्वगुणाचा उत्कर्ष दिसून येत होते. पुढे पुढे करणे, आपले महत्व अधोरेखित करणे किंवा आपला प्रश्न विचारण्यासाठी धडपड करणे तर सोडाच, महर्षींचा एक दोन तास संवाद सुरू असताना ही व्यक्ती जणू काही समाधी अवस्थेत असावी तशी निश्चलपणे बसून होती. प्रश्नोत्तरे संपली आणि तेथून प्रस्थान करण्यासाठी महर्षी आपल्या जागेवरून उठले. श्रोत्यांची पांगापांग होत होती. एका कोपर्‍यात निश्चलपणे बसलेल्या त्या वृद्ध व्यक्तीची दखलही कुणी घेतली नाही. दोन चार पावले पुढे आल्यावर महर्षींची नजर या व्यक्तीवर पडली. क्षणभर त्या व्यक्तीशी महर्षींची नजरानजर झाली. काही मोजकेच क्षण महर्षींची कृपादृष्टी त्या व्यक्तीकडे रोखलेली होती. महर्षीच्या चेहर्‍यावर त्यांचे अत्यंत विलोभनीय असे स्मितहास्य तरळले. त्या व्यक्तीच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते. शाब्दिक संवाद असा काही झालाच नाही. रात्रीच्या भोजनानंतर त्या व्यक्तीने तिरूवन्नमलै सोडले. पुन्हा ही व्यक्ती कुणालाच दिसली नाही. 'गुरोस्तु मौन व्याख्यानं, शिष्यास्तु छिन्नसंशयः' अशा प्रकारची ती 'मौनी दीक्षा' होती. अध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत परिपक्व असलेल्या उच्च कोटीच्या साधकांसाठी भगवान रमण महर्षींकडून कुठल्याही औपचारिक विधीचा किंवा आलंबनाचा अंतर्भाव नसलेली मौनी दीक्षा प्रदान होत असे.
साधकांच्या परिपक्वतेनुसार रमण महर्षींनी दिलेल्या उत्तरांची उदाहरणे पुढील भागात पाहू या.

प्रश्नः इहवाद केंद्रित (ऐहिक) दृष्टीचा लोप झाल्यावरच सहजस्थितीची अनुभूती संभवते. पण (व्यावहारिक जीवन जगत असताना) हे साध्य कसे होईल?

रमण महर्षी: मनाचा लय झाला की सारे जग लयाला जाते. मन हेच जगाचे उगमस्थान आहे. त्याचा लोप झाला की सहजस्थिती आपोआप दृगोचर होते. स्वरूप सातत्याने 'मी' 'मी' अशा अहंस्फुरणेने स्वत:ची जाणीव करून देत असते. ते स्वयंप्रकाशी आणि स्वसंवेद्य असते. ते नेहेमी 'आत्ता आणि इथेच' अस्तित्वात असते. त्या सर्वव्यापी चैतन्यातच आपला देखील समावेश असतो. पाण्यात पोहणार्‍या मासोळीने पाण्याचा शोध घ्यावा, तद्वत आपण या स्वरूपाचा शोध का बरे घ्यावा? आपल्या पूर्वासुरींनी सांगूनच ठेवले आहे - 'आपल्या दृष्टीला ज्ञानात विलीन करेल, त्याला सारे जग ब्रह्मस्वरूपच दिसेल' (सर्वं खलु इदं ब्रह्म).

प्रश्नः मान्य आहे, कालांतराने योग्य वेळ आली की हे मला पण उमजेल.
रमण महर्षी: तुम्ही या क्षणी तेच आहात (तत्वमसि). स्थळ, काळ आणि परिस्थितीने स्वरूप कधीच प्रभावित होत नाही. उलटपक्षी या सगळ्या गोष्टींचा स्वरूपातच समावेश असतो. तुम्ही सभोवताली जे काही पाहता ते सगळे तुमच्या आतच सामावलेले असते (पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी). एक किस्सा सांगून हे स्पष्ट करता येईल.

एका धनाढ्य स्त्रीच्या गळ्यात एक महागडा मणिहार होता. एकदा घाईगडबडीत तिला त्याचा विसर पडला आणि तिची अशी समजूत झाली की आपला मणिहार हरवलेला आहे. ती चिंताग्रस्त झाली आणि तिने घरभर त्या मणिहाराचा शोध घेतला पण तो काही सापडला नाही. तिने परिचितांना आणि कुटुंबातल्या सदस्यांना त्या मणिहाराविषयी काही माहिती आहे का असे विचारले, तसेच तो शोधायला मदत करा अशी विनंती केली. सगळ्यांनी नन्नाचा पाढा वाचला. शेवटी एका मैत्रिणीच्या लक्षात सगळा प्रकार आला. आपल्या मैत्रिणीची चिंता दूर व्हावी यासाठी तिने आश्वासक स्वरात मणिहार गळ्यातच आहे हे त्या धनाढ्य स्त्रीच्या लक्षात आणून दिले. हा सगळा गोंधळ सुरू असताना मणिहार आपल्या गळ्यातच होता हे लक्षात आल्याने ती धनाढ्य स्त्री हरखून गेली. इतरांनी मणिहार सापडला का असे विचारले असता ती म्हणाली, "हो, तो  मणिहार नुकताच सापडला आहे." आपला हरवलेला दागिना सापडला आहे अशीच तिची भावना झालेली होती.

आता हे लक्षात घ्या की तिचा हार खरोखर हरवलेला होता का? तो तर सतत तिच्या गळ्यातच तर होता! पण तिच्या भावना देखील समजून घ्या. हरवलेली मौल्यवान वस्तू मिळावी तशी ती हरखून गेलेली होती. आपल्या सगळ्यांची हीच तर कथा आहे. कधी काळी स्वरूप साक्षात्कार घडेल अशा समजूतीने आपण जगत असतो, मात्र आपण कुठल्याही क्षणी इतर कुठलीही गोष्ट नसून स्वरूपच तर असतो!

प्रश्नकर्ता: वेल्लोरला असताना मी सतत अस्वस्थ आणि नाराज असतो. आपल्या सहवासात मात्र मला स्थैर्य आणि आनंदाची अनुभूती येते.
रमण महर्षी: या ठिकाणी मिळणारा आनंद हा खराखुरा आत्मिक आनंद आहे का? आपण असे म्हणता की इथून दूर जाताच तुम्ही परत दु:खीकष्टी होता. याचाच अर्थ असा, की इथे अनुभवता आलेला आनंद हा परिपूर्ण आणि शाश्वत असा आनंद नाही. त्यात दु:ख लपलेले आहे, जे इतरत्र जाताच जाणवायला लागते. तुमचा हा तथाकथित आनंद स्थळ, काळ आणि परिस्थिती सापेक्ष आहे. (अध्यात्मिक दृष्ट्या) उपयुक्त ठरण्यासाठी तुमचा आनंद शाश्वत असायला हवा. स्वरूपी लीन व्हा आणि अनुभवा की तो खरा निर्भेळ आनंद आहे. तुम्ही निरंतर स्वरूपच आहात.

तुम्हाला तुमचे 'असणे' नाकारता येत नाही. हे 'असणे'च सच्चिदानंद स्वरूप आहे. स्वरूपाचा साक्षात्कार ही सततची स्थिती आहे. नित्यसिद्ध अशा स्वरूपाची आस धरावी आणि महत्प्रयासाने साक्षात्कार करून घ्यावा अशी वास्तविक पाहता गरजच नाही.

अस्तित्वात असल्याशिवाय तुम्हाला हा प्रश्न पडणार नाही. आपले असणे तुम्हाला मान्य करावेच लागेल. हे उपाधीरहित निव्वळ 'असणे'च तुमचे स्वरूप आहे, ज्याची प्रचिती तुम्हाला क्षणोक्षणी येतेच आहे. त्यामुळे तुम्ही घेतलेले सगळे कष्ट फक्त आपल्याला स्वरूप साक्षात्कार झालेला नाही अशी चुकीची समजूत आपण करून घेतलेली आहे हा बोध होण्यातच खर्ची पडणार आहे. साक्षात्कारात नित्यनूतन असे काहीच नसते. ती एक सनातन स्थिती आहे. भ्रमाचे आवरण दूर सारले की ती आपोआप प्रकट होते.

No comments:

Post a Comment