Saturday 3 August 2013

तबला (4) - तबला आणि शास्त्रीय वाद्यसंगीत

या भागात तबल्याचा शास्त्रीय वाद्यसंगीतात साथीचे वाद्य या दृष्टीने आस्वाद घेऊ या. शास्त्रीय संगीतात कलाकारांच्या काही जोड्या/ संच प्रसिद्ध आहेत. जगदविख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यानी आजच्या आघाडीच्या सार्याच तबलावादकांच्या बरोबर बहारदार वादन केलेले आहे. पण उ. झाकिर हुसेन साथीला असल्यावर जी मजा येते तिला मात्र तोड नाही. किर्वाणी, लतांगी यासारख्या कर्नाटक शैलीतल्या रागाना हिंदुस्तानी संगीतात रुजवणे, रूळवणे हे श्रेय प्रामुख्याने महान सतार वादक उ. अब्दुल हलीम जाफर खान यांचे. प्रस्तुत फितीत शिवजी किर्वाणी रागातली द्रुत लयीतली बंदिश आणि मग अतिद्रुत लयीत रोमांचकारक 'झाला' वाजवत आहेत. यात ते आणि उ. झाकिर हुसेन यांचा विलक्षण 'तालमेल' अनुभवता येईल. तबला हे तसे 'एकसुरी' वाद्य. पण संतूर च्या तारा दाबून त्यावर पंजाने आघात करून एक वैचित्र्यपूर्ण नादनिर्मिती शिवजी करतात, तिला सहीसही संगत करताना उस्तादजी डग्ग्यामधून जी स्वरनिर्मिती करतात ती अफलातूनच आहे.



आता याच कलाकारद्वयीची 'मिश्र पहाडी' मधील एक नजाकतीने भरलेली धून ऐकू या. धून वाजवताना रागदारीचे नियम बरेच शिथील असतात. त्याचा सदुपयोग कसा करावा याचा हा वस्तुपाठच आहे. झाकिर हुसेन यानी पकडलेला दादरा तालाचा ठेका त्यातील वैविध्य आणि दंगदारपणा दोन्ही द्रुष्टीने ऐकत राहावा असा आहे. किर्वाणीच्या फितीत केलेली सही सही साथ, आणि इथे घेतलेली काहीशी दुय्यम, सहाय्यक भूमिका हा फरकही सहज लक्षात येईल. तबलावादकाकडे तयारीबरोबरच सांगितिक जाण आणि प्रगल्भता असावी लागते हे ही स्पष्ट होईल.



उस्ताद शाहिद परवेज यांचे हे सतारवादन. झिंजोटी या रागातली ते वाजवत असलेली ही गत दहा मात्रांच्या झपतालात निबद्ध आहे. तिची खासियत अशी की समेला येतानाच्या तीन मात्रा दीड दीड मात्रा असे 'वजन' ठेऊन सातत्याने वाजवल्याने एक वेगळाच डौलदारपणा आलेला आहे. नेमक्या समेवर न येत किंचित अलीकडे अथवा नंतर (अतीत, अनागत) असे समेचा आभास निर्माण करणे असा तालाशी लपंडाव, हुलकावणीचा खेळ खेळता येतो. या फितीत हे ऐकायला मिळेल. गायकी अंग आणि तंत अंग असे बेमालूम मिश्रण असलेल्या या कसदार आणि गाढ्या लयीतल्या वादनाला त्याचा 'आब' राखत समर्पक साथ कशी करावी हेच पंडित कुमार बोस दाखवून देत आहेत.



तबलावादनाच्या क्षेत्रात झाकिर हुसेन यांच्या शिष्या अनुराधा पाल यांचे महत्त्वाचे योगदान आहे. या क्षेत्रातही स्त्रिया मागे नाहीत. पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीवादनाला साथ करताना सवाल - जबाब पद्धतीने केलेल्या वादनाची ही फित. (सवाल - जबाब या प्रकाराबद्दल नामवंत समीक्षकानमध्ये उलटसुलट मतप्रवाह आहेत. याने रंजकता वाढते हा एक मतप्रवाह तर रसहानी होते, अभिजात संगीताची पातळी खालावते असा एक मतप्रवाह. माझी याविषयक मतप्रदर्शन करण्याची पात्रता नाही, त्यामुळे फक्त उल्लेख करतो. )



उ. झाकिर हुसेन यांच्यावरील सहा भागातला हा माहितीपट. या भागात वाद्यसंगीताच्या साथीवर भर आहे, सुरेख भाष्य आहे. त्यामुळे अधिक काही लिहीत नाही. हा माहितीपट अथ ते इति बघायलाच हवा.



या काहीशा संक्षिप्त अशा लेखमालेचा समारोप सांगितिक संकेतानुसार एका अप्रतिम भैरवीने करतो. एका खाजगी (घरगुती) मैफिलीत इमदादखानी घराण्याचे दिग्गज सतारवादक पंडित बुधादित्य मुख्रर्जी यानी गायकी अंगाने केलेले हे अप्रतिम वादन आणि त्याला सुभेन चटर्जी यांची संतुलित, पोषक अशी साथ! 'रसो वै सः' असा अपार्थिव अनुभव येण्यासाठी आणखी काय हवे?


 

तबला (3) - नृत्याची साथ

तबल्याविषयक लेखमालेच्या या भागापासून तबल्याचा साथीचे वाद्य या दृष्टीने विचार करायचा आहे. भारतात हिंदुस्तानी आणि कर्नाटक संगीत हे दोन मुख्य प्रवाह आहेत. या पैकी ही लेखमाला हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत या प्रवाहाशी प्रामुख्याने निगडीत आहे. हिंदुस्तानी संगीतात लोकमान्यतेच्या दृष्टीने (प्रचार आणि प्रसार हे मापदंड लावता) मुख्य प्रवाह असलेल्या ध्रुपद गायकीची जागा ख्याल ने घेतली ( तशीच पखवाजाची जागा तबल्याने घेतली). हे स्थित्यंतर काळाच्या ओघात झाले, तसेच परकीय आक्रमक इथे स्थिरावल्यावर झालेली सांगितीक देवाणघेवाणही बर्याच प्रमाणात कारणीभूत ठरली. हे बदल दूरगामी परिणाम करणारे ठरले. हा एक स्वतंत्र अभ्यासाचा, चिंतनाचा आणि व्यासंगाचा विषय आहे. असो. आज हिंदुस्तानी संगीताच्या नृत्य, गायन आणि वादन या तिन्ही प्रकाराना तसेच उपशास्त्रीय संगीताला तबल्याची साथ असावी हा नियमच झालेला आहे.



आता कथ्थक नृत्याची साथ करणार्या तबलजीची काय खासियत असावी हे थोडक्यात पाहू. नृत्याची साथ करणार्या तबलजीची तयारी विलक्षणच असावी लागते. कथ्थक शिकलेल्या नर्तकांचा तबल्याचा व्यासंग अफाट असतो. त्याना बरोबरीने, सहीसही साथ करायची तर त्या तोडीचाच व्यासंग असणे क्रमप्राप्त असते. हे नर्तक लय आणि तालाच्या बाबतीत भलतेच जहांबाज असतात. उपज अंगाने (ऐनवेळी सुचेल तसे) अवघड 'हिसाब' असणारे 'गिनती' चे बोल रचून ते तत्क्षणी सादर करत असताना त्याना प्रत्युत्तर द्यायचे तर निव्वळ पाठांतर असून चालत नाही, त्या जोडीला प्रसंगावधान आणि हजरजबाबीपणा पण असावा लागतो. आणि यात तबलजी कुठल्याही बाजूने कमी पडला, तर ते जाणकारांच्या लगेच लक्षात येऊन तो चक्क उघडा पडतो. बिरजू महाराजांची साथ करायची, तर तबलजीचा कस तर लागतोच नव्हे ती त्याची सत्त्वपरीक्षाच असते असे म्हणावे तर अतिशयोक्ती ठरू नये. या फितीवरून त्यांचा व्यासंग आणि तालावरचे प्रभुत्व यांचा सहज अंदाज येईल.

चक्रदार म्हणजे एक ठराविक बोलमाला तीन वेळा वाजवून समेवर येणे असे सोपे करून सांगता येइल. यात मध्ये विराम नसेल, ती बोलमाला सलग तीन वेळा वाजत असेल तर त्या प्रकाराला 'बेदम' असे म्हणतात. फिरकीची डायल असणार्या जुन्या फोनचा डायल करताना जो 'टरटर' आवाज येतो, तो तसा 'बेहिसाब' असतो. या बेहिसाब प्रकारावर बिरजू महाराजानी रचलेला असाच एक चक्रदार पद्धतीचा बोल, आणि त्याला तत्क्षणी उ. झाकिर हुसेन यानी दिलेले अत्यंत समर्पक प्रत्युत्तर हा अक्षरशः अंगावर काटा आणणारा प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर जिवंतपणे उभा राहतो. या फितीत महाराजजी गिनती चे चक्रदार सादर करत आहेत.



पंडित आनिंदो चटर्जी यानी कथ्थक ची साथ करतानाची आमद (सुरूवातीला केलेले एकल वादन) आणि रेला दोन्ही अफलातून आहेत.



नृत्य, गायन आणि वादन तिन्हीचा बेजोड मिलाफ असणारी एक ध्वनिचित्रफीत देउन या भागाची सांगता करतो. यात पंडित राजन - साजन मिश्रा जी 'पढंत' करतात त्यातून तबल्याची जी भाषा आहे, ती निव्वळ हिसाब - किताबाची चोपडी नसून या भाषेतही काव्य आहे, ती अर्थवाही आहे. शिवाय संताप, कंटाळा, शृंगार इत्यादी भावछटा व्यक्त करायलाही ती समर्थ आहे याचा अंदाज येईल. शेवट एका अप्रतिम तराण्याने केलेला आहे. (पुढील भागात वादनाच्या साथीचा विचार करू)


 

तबला (2) - तबला एकल वादन - वैविध्य

तबला म्हणजे उ. झाकिर हुसेन असे एक समीकरणच झाल्यात जमा आहे इतकी या कलाकाराची चतुरस्त्र प्रतिभा आणि तपश्चर्या मोठी आहे. असे असूनही आपण आणि श्रोते असा एक भावबंध जुळून यावा, आपले वादन फारशी जाणकारी नसलेल्यासाठीही रंजक ठरावे यासाठी ते आवर्जून प्रयत्न करतात आणि ते हुकूमीपणे जमवूनही आणतात. मूळ पंजाब घराण्याचे असूनही त्यानी इतर घराण्यांचा सखोल अभ्यास, आणि गाढा व्यासंग केलेला आहे. उ. झाकिर हुसेन हा स्वतंत्र लेखच काय लेखमालेचा विषय होईल. विस्तारभयास्तव थोडक्यात आटपते घेतो. तबला वादनातील रेला हा प्रकार इथे उस्तादजी उलगडून सांगत आहेत. ते कुठलाही बोल द्रुत वाजवत असताना जो नाद कानावर पडतो त्यात एकप्रकारची 'रव' (पदरव, गुंजारव या शब्दातील रव) जाणवते. उ. थिरकवा खानसाहेबांच्या वादनातली ही खासियत. तिचा प्रत्यय ऐकताना येईल. पतियाळा घराण्याचे ज्येष्ठ गायक अजय चक्रवर्ती (उ. बडे गुलाम अलींचे पट्टशिष्य) येथे वेगळ्या भूमिकेत आहेत. त्यानी वाजवलेल्या नगम्यामुळे वादन अधिकच रंगतदार झाले आहे.



पंडित स्वपन चौधरी हे आणखी एक बुजूर्ग तबलावादक. उ. अली अकबर खानसाहेबांबरोबर सर्वाधिक काळ संगत त्यानीच केलेली आहे. हे अमेरिकेत वास्तव्यास असल्याने त्यांच्या एकल तबलावादनाचे (सोलो) कार्यक्रम भारतात तुलनेने कमीच होतात. 'धिर धिर' हा बोल ते विलक्षणच वाजवतात. तयारी आणि नादमाधुर्य दोन्हीत ते कसे बेजोड आहेत याचा प्रत्यय या छोटेखानी फितीमध्ये येईल. त्यानीच वाजवलेला 'तक धीन तक' चा लखनौ घराण्याचा (पूरब बाज) अवघड कायदा किती डौलदार आहे हे ऐकायलाच हवे. बनारस घराण्याचा जोरकस, खुला बाज आणि हा नरम, बंद बाज यातील नादाच्या गुणवत्तेचा (टोनल क्वालिटी) फरक सहज लक्षात येईल. या वादनाला पण्डित रमेश मिश्रा यांची सारंगीची साथ हा दुग्धशर्करा योगच आहे.





पंडित आनिंदो चटर्जी हे बूजुर्ग तबला वादक 'घेघे तीट' या बोलावर आधारित उ. हबीबुद्दिन खानसाहेबांच्या खानदानी बंदिशी पेश करताना. यांच्या वादनात इतकी सहजता आहे, की विलक्षण मुष्कील काम करत असतानाही ते आरामखुर्चीत बसून वर्तमानपत्र चाळत आहेत असे वाटावे. हा बोल ऐकत असताना कबुतरांची जोडी 'गुटुरघू' करते आहे असा भास होईल अशा रंजक पद्धतीने उ. झाकिर हुसेन पेश करतात. इथे तो पारंपारिक पद्धतीने वाजवलेला आहे.



पाकिस्तानात वास्तव्य असलेले अब्दुल सत्तार तारी खान हे एक हरहुन्नरी तबला वादक. उपशास्त्रीय संगीताला साथ करण्यात यांचा हातखंडा आहे. मेहदी हसन, गुलाम अली यांच्या गझल गायकीच्या कित्येक मैफिली त्यानी गाजवल्या आहेत. हे स्वतः उत्तम गझल गायकही आहेत. त्यांच्या 'लाईट' वादनाने या लेखाची सांगता करतो.








 

Friday 26 July 2013

तबला (1) - बनारस बाज

तबला या तालवाद्याविषयीचा हा लेख. कुठल्याही शुभकार्याची सुरूवात श्री गजाननाच्या स्मरणाने करायला हवी. तशी ती पंडित किशन महाराज या बनारस घराण्याच्या महान तबला वादकाच्या गणेश परणाने करू. ते सुरूवातीला डमरूवादनाचा आभास होईल असा एक बोल वाजवून मग गणेश परणाचे बोल वाजवून दाखवत आहेत. हे वादन उतारवयातील आहे पण बनारस घराण्याचा जोरकस बाज, पखवाजशी साधर्म्य असणारे बोल ही खासियत सहज दिसून येईल. सोनू निगम, जगजीत सिंग आणि गिरिजा देवी यांची दिलखुलास दाद पण वेधक ठरणारी आहे.


महाराजजींच्या शिष्यपरिवारापैकी आजचे आघाडीचे वादक सुखविंदर सिंग नामधारी यांची ही पखवाज जोडी वादनाची झलक. या फारशा प्रचलित नसलेल्या वाद्यावरचे त्यांचे असाधारण प्रभुत्व कळून येते. पखवाज हे मूळ वाद्य, त्याचे दोन भाग करून तबला तयार केला गेला असे मानले जाते, त्याला हे वादन ऐकून पुष्टीच मिळेल. माझ्या ओळखीच्या एक बुवांनी पखवाज सात्त्विक, तबला राजसिक आणि ढोलकी तामसी वाद्य आहे असे काहीतरी स्पष्टीकरण बोलण्याच्या ओघात दिल्याचे स्मरते.



महाराजजींचे नातू शुभ महाराज यांचे तबलावादन. किशन महाराजांच्या वादनात 'तिहाई' हा प्रकार वेगवेगळ्या अंगाने, ढंगाने आणि वैचित्र्यपूर्ण पद्धतीने येत असे. या प्रकारावर त्यांची हुकूमत होती. कुठल्याही मुष्किल तालात, कुठल्याही मात्रेपासून आड, कुआड लयीत तिहाई घेऊन खाडकन सम गाठणे यात त्यांचा हातखंडा होता. (साथ करत असतील, आणि मुख्य वादक लयतालाला पक्का नसेल, तर त्याची टोपी उडवणारा हा प्रकार आहे) त्यामागे लय आणि तालाचा जो सूक्ष्म विचार असतो, 'हिसाब' असतो त्याची झलक या तरूण कलाकाराच्या वादनात दिसते. या ध्वनिचित्रफितीत प्रसिद्ध तबलावादक अरविंदकुमार आझाद टाळीवर ठेका धरत आनंद लुटताना दिसतात.



कुमार बोस हे किशन महाराजांचेच एक ज्येष्ठ शिष्य. डोळसपणे रियाझ करून बनारसच्या मुख्य प्रवाहापेक्षा काहीशी 'हटके' अशी शैली त्यानी विकसित केली आहे. वेगवान वादन करत असतानाही बोलांची स्पष्टता, त्यांचा 'निकास' आणि गाढी लय यात कुठेही तडजोड होत नाही हे दिसून येईल. बोलांचे ठराविक वजन आणि त्यांचा निकास (मराठीमध्ये उदगार असे म्हणता येईल) या गोष्टी लिपिबद्ध करता येणे अशक्य आहे. त्यामुळेच वेदविद्येसारखीच तबला ही 'गुरूमुखी' विद्या आहे. ती पुस्तकातून शिकता येणे अशक्य आहे. दैवी देणगी (लय, ताल अंगात असणे- हा शब्द आवडत नसेल तर नैसर्गिक गुणवत्ता म्हणा हरकत नाही), चिकाटीने केलेला सातत्यपूर्ण आणि डोळस रियाझ (सराव) आणि सदगुरुंचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद या त्रयीला पर्याय नाही.



बनारस घराण्याच्या पं. सामताप्रसाद या थोर तबलावादकांच्या वादनाचा दुवा देऊन हा भाग संपवतो.








 

Saturday 20 July 2013

सूफी गीत ... (स्वैर भावानुवाद)

(स्वैर भावानुवाद)

हे साकी, वारूणीचा तो अमूल्य चषक माझ्याकडे सुपूर्त कर,
जेणेकरून त्या आंतरिक आनंदाची मजा मला पुन्हा एकदा लुटता येईल,
आणि बाकी सारी भिस्त पवित्र परमात्म्याच्या प्रेमावर ठेवता येईल,
अशी प्रार्थना करत त्या अनोख्या मधुशालेच्या दरवाजात मी शांतपणे प्रतिक्षा करत होतो.

माझ्या प्रिय पुत्रा, सर्वप्रथम तुला अहंतेने ग्रासलेल्या मनाप्रती मृत्यु स्वीकारावा लागेल,
मग मी आशीर्वचन दिलेल्या तुझ्या वाग्दत्त वधूची साद तुला ऐकू येईल,
त्या उंबरठ्यापलीकडे एक पाउल टाक, तिथेच तुझी प्रिया तुला सापडेल,
मधुशालेतून शेखसाहेबांची साद ऐकू आली.

चिखलात डुंबणार्‍या म्हशीसारखा ऐहिक सुखांच्या आधीन होउन लोळत पडतोस,
आता तुझ्याच अंत:करणातल्या पवित्र मौनात निमग्न होउन स्तब्ध रहा,
मग स्वप्नमयी जीवनाच्या झंझावातात पालापाचोळ्यासारखा उडून न जाता,
अवघाची संसार सुखाचा होउन आत्मिक विरहव्यथा तुला कधीच ग्रासणार नाही.

इतस्ततः विखुरलेले त्याच्या आत्म्याचे सजीव स्पंद मग एकत्र आले,
त्याला अंतरीचे सद्गुरू गवसले आणि त्याने सगळा भार त्यांच्यावर टाकला,
त्याच्या दशेंद्रियांनी त्याच भावदशेत कित्येक दाहक उन्हाळे, सर्द हिवाळे आणि मुसळधार पावसाळे अनुभवले,
मग ईश्वराच्या खास विश्वासातला एक देवदूत तो अमूल्य पुरातन चषक घेउन त्याच्या पुढ्यात हजर झाला.

त्या सच्च्या सूफीने आपल्या सद्गुरूंची आज्ञा शिरसंवाद्य मानली होती,
प्रयत्नांची पराकाष्ठा करत अंतर्यामी अत्यंत शांत राहून कैवल्य स्थिती प्राप्त केलेली होती,
अत्यंत धीरोदात्तपणे त्या अनोख्या मधुशालेत त्याने अथक प्रतिक्षा केलेली होती,
हळुवारपणे दरवाजा उघडला... आता तो मुक्त होता!

मूळ काव्यः

A SUFI SONG

I'm quietly waiting at the tavern door,
Oh cup bearer hand me a cup of wine,
So I may enjoy the bliss of Self once more,
And rest assured in the love of God Divine.

The Sheikh called from inside the tavern hall,
"First dear child you must die to ego mind,
You'll hear the blessed bridegroom's call,
Cross the threshold, and the bride you'll find.

You wallow in the pleasures of the world,
Be still in the sacred silence of your heart,
Then in life's dream you'll no more be hurled,
From soul's wedded state ne'er more depart".

His fragments of soul then came together,
He found his Inner Master and then gave up,
His senses wandered through all winds of weather,
Then the faithful bearer brought the vintage cup.

The Sufi had obeyed his master's call,
He'd done his best to stay quite calm and be,
He'd waited with great patience in the tavern hall,
The door then slowly opened and he was free.

- Alan Jacobs

Sunday 16 June 2013

एक सुरेल आठवण

माझ्या 'नॉस्टॅल्जिक' आठवणी बहुतांशी शास्त्रीय वाद्य संगीताच्या आहेत. कधी काळच्या कित्येक मैफली ध्वनीचित्राफितीसारख्या मनात कोरलेल्या आहेत. २९ डिसेंबर २००२ ची उ. विलायत खान साहेबांची सवाई मधली (शेवटची) मैफल त्या पैकी एक.

उ. विलायत खान हे माझं शास्त्रीय वाद्यासंगीताच्या क्षेत्रातील दैवत. सतार या तंतू वाद्याच्या रचने मध्ये आणि ती वाजवण्याच्या तंत्रामध्ये महत्वाचे बदल करून तिला 'गायकी अंग' देण्याचं आणि 'विलायातखानी बाज' प्रस्थापित करण्याचं 'अवतार कार्य' च त्यांनी केलं. निव्वळ सतारच नव्हे, तर एकूणच शास्त्रीय वाद्य संगीताच्या प्रचलित मर्यादा ओलांडणारी ती क्रांतीच होती. जपानी वाद्यवृंदाबरोबर फिनलंड मध्ये (कन ) फ्युजन(?) सादर करणे अशा प्रकारचे जाहिरातबाज माकडचाळे त्यांना कधीच पटले नाहीत. मैफलीत सतारीवर चांदनी केदार, आणि पिआनो वर 'मूनलाईट सोनाटा' वाजवा. आधी हिंदुस्तानी आणि कर्नाटक संगीताचा मेळ घाला, मग "east meets west" वगैरे प्रकार करा अशी त्यांची रोकठोक भूमिका होती. असो. या विषयावर आपल्या जुजबी माहितीच्या जोरावर मी आपले काही मत व्यक्त करणे हा 'तुमचा पगार किती आणि तुम्ही बोलता किती' असाच प्रकार होईल त्यामुळे फ्युजन वगैरेबद्दल थोरथोर लोकांमध्ये मतभेद आहेत इतकेच सांगत आवरते घेतो.

थकलेले आणि खूपच आजारी दिसणारे खान साहेब आधार घेतच रंगमंचावर आले. सम्राटासारखे जगणाऱ्या त्या माणसाची अशी अवस्था पाहून फार वाईट वाटलं. अशा अवस्थेत मैफिलीत वाजवायची काय गरज आहे असा प्रश्न पडला. खान साहेबांनी सतार हातात घेतली, जोग आणि तिलंग अशा जोड रागात आलापी सुरू झाली, आणि सगळा नूर च पालटला. खान साहेब विलक्षण चैतन्यमय दिसायला लागले. हा तिथे अनुभवता येणाऱ्या नादब्रह्माचा 'साईड इफेक्ट' असेच म्हणायला हवे. मुळात गायकी अंगानी वाजवणं मुष्कील. गमक, मींड असे सगळे प्रकार वाजवताना बरेच वेळा हात साथ देत नव्हता. आयुष्य एखाद्या कलेसाठी वाहून घेतल्यावर जी एक प्रकारची हुकुमत येते, ती मात्र क्षणोक्षणी जाणवत होती. सतार खांसाहेबांच्या शरीराचाच अवयव असावी असं वाटत होतं. ख्याल 'साकार' होत होता. जोग आणि तिलंग हे तसे पूर्णपणे वेगळ्याच 'मूड'चे आणि तसे विसंगत ठरतील असे राग. या दोन्हीचा मेळ घालत एक तिसराच राग 'सिद्ध' करणे हे मोठ्या तपश्चर्येशिवाय शक्य नाही. खानसाहेब मात्र राग 'दोराहा' वाजवताना हे लीलया करत होते.

एखादी मुष्कील हरकत हवी तशी हातातून निघाल्यावर त्यांच्या चेहेऱ्यावर जो तृप्तीचा भाव दिसायचा, किंवा लहान मुलासारखं निर्व्याज हास्य यायचं - सगळंच अलौकिक, अपार्थिव होतं. 'हे अवघड काम आहे, आणि आता माझं वय झालं आहे, पण विजय (घाटे) जी सांभाळून घेतील' अशी प्रस्तावना करत त्यांनी असा काही तयार झाला वाजवला कि नेमका तरुण (? ) कोण आहे हा प्रश्न पडावा आणि कोण कुणाला सांभाळून घेतो आहे हे स्पष्ट व्हावं. याच मैफिलीत मध्येच सतारीची तार तुटली, खान साहेबांनी ती पटकन बदलून जणू काही घडलंच नाही अशा थाटात परत वाजवायला सुरुवात केली. त्या नंतर एक अप्रतिम रागमाला खानसाहेबांनी सादर केली. रागमाला कसली, एक प्रकारचा झंझावातच होता तो! सलग सादरीकरणाच्या सौंदर्याला बाधा येणार नाही अशा रीतीने 'सांधा बदलत' कित्येक रागरागीण्यांची झलक अत्यंत कलात्मक पद्धतीने ते दाखवत होते. असे प्रकार भक्तिभावाने आनंद लुटत ऐकणेच बरे. विश्लेषण करायला गेल्यास हाती काही गवसतंय, तोवर बरंच काही निसटून जावं असाच तो विलक्षण प्रकार होता. स्वरांच, रागांचं एक मनोहारी इंद्रधनुष्यच बघता आलं, अनुभवता आलं. विजय घाटे पूर्ण मैफिलीत समरसून अत्यंत समर्पक संगत करत होते.

श्रोत्यांमध्ये पं. शिवकुमार शर्मा, उ. शफात अहमद, श्रीमती प्रभा अत्रे इ. दिग्गज होते. त्यांची मनापासून दाद मिळत होती. माझ्या "अशा अवस्थेत मैफिलीत वाजवायचं काय नडलं आहे" या टिपिकल पोरकट, पुणेरी प्रश्नाचं असं जोरदार 'विलायातखानी' बाजाचं उत्तर मिळालं. हाच कुंडली मधला राजयोग असावा. २००४ मध्ये खान साहेबाना देवाज्ञा झाली. आता असा योग पुन्हा येणार नाही.
 

दहा बोटं आणि आपले आशीर्वाद - उस्ताद झाकिर हुसेन

(गौरी रामनारायण यांनी घेतलेल्या उ. झाकिर हुसेन यांच्या मुलाखतीचा अनुवाद)

आंतरराष्ट्रीय पातळीवर तबलावादनाच्या क्षेत्रात एकमेवाद्वितीय स्थान मिळवूनही अत्यंत शालीन, विनम्र असणार्‍या उस्ताद झाकिर हुसेन यांचा हा एक किस्सा. कलाक्षेत्रावरच्या (चेन्नई) त्यांच्या अप्रतिम तबलावादनने भारावून गेलेल्या रूक्मिणीदेवींनी त्यांना विचारलं, "झाकिर, बेटा तुला दहाच बोटं आहेत की शंभर?" उस्तादजींनी हात जोडत एका क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं, "माझ्याजवळ दहा बोटं आणि आपले आशिर्वाद आहेत".

उस्तादजी पत्नी आणि दोन मुलींसमवेत कॅलिफोर्नियामधे राहतात. अमेरिकेतल्या दोन मैफिलींमधल्या प्रवासात गौरी रामनारायण यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. तिचा हा सारांश. ही मुलाखत साधारणपणे १५ ते २० वर्षापूर्वीची आहे.

प्रश्नः पॉप, जॅझ आणि फ्यूजन संगीतात आंतरराष्ट्रीय पातळीवर 'स्टार' झाल्यानंतरही आपण हिंदुस्थानी अभिजात संगीतातली आपली पारंपारिक 'प्रतिमा' कशी जपता?

उ. झाकिर हुसेनः (असे प्रश्न) मला असे वाटतं की घाईगडबडीने काढलेले निष्कर्ष, चुकीच्या धारणा आणि पूर्वग्रहांमधून जन्माला येतात. नको त्या गोष्टींना फाजिल महत्व देण्याची लोकांची वाईट खोड आहे. त्यांना वाटतं की ह माणूस नको त्या गोष्टींमागे लागला आहे. माझ्या बाबतीत बोलायचं तर मी सर्वप्रथम एक 'संगतकार' आहे. कार्यक्रम उ. अली अकबर यांचा असो की उ. विलायत खाँ यांचा, मी त्यांना साथ करतो. त्यातून बरंच शिकतो.

माझे जॅझचे कार्यक्रम आता मर्यादित प्रमाणात होतात. दोन वर्षातून एखादा महिनाच मी 'फ्यूजन'साठी देतो. मी आज अशा स्थितीत आहे की मला नेमकं काय करायचं आहे, ते किती प्रमाणात करायचं आहे हे मी ठरवू शकतो. माझ्या संगीतासाठी योग्य पार्श्वभूमी नाही अशा ठिकाणी मी जात नाही. मी मंचावर चकचकीत जॅकेट किंवा गुडघ्यापर्यंत बूट वगैरे घालून 'रॉक स्टार'सारखाही कधीच जात नाही. माझ्या कार्यक्रमांपैकी ९५ टक्के तरी कार्यक्रम भारतीय शास्त्रीय संगीताचेच असतात. गेली २५ वर्षे मी व्यावसायिक संगीतकार म्हणून सातत्याने जगभर प्रवास करतो आहे. त्यात न चुकता दरवर्षी चार महिने तरी हिंदुस्थानात येतो आणि इथल्या कलाकारांची संगत करतो. काही कलाकार कदाचित असे करत नसतील.

प्रश्नः इतक्या धावपळीच्या नित्यक्रमामुळे तुमच्या रियाझावर परिणाम होतो का?

उ. झाकिर हुसेनः असं घडून चालणार नाही. वर्षाला जवळजवळ दीडशे कार्यक्रम म्हणजे सततचा प्रवास ठरलेलाच आहे. हॉटेलमधे जायचं, संध्याकाळी कार्यक्रम करायचा, परत येउन हॉटेलमधून मुक्काम हलवायचा आणि हेच चक्र पुढच्या दिवशी दुसर्‍या शहरात चालू ठेवायचं. तरीही मी सतत रियाझ करतो. आज सकाळी मृदंगमबरोबरचा कार्यक्रम संपल्यावर संध्याकाळे पं. बिरजू महाराजजींच्या नियोजीत कार्यक्रमासाठी मी तबला सभागृहातच ठेवला, पण इथे (हॉटेल) परत आल्यावर त्या समोरच्या टेबलवर ठेवला आहे तो 'खंजिरा' घेउन मी नेहेमीसारखाच रियाझ केला.

सततचा रियाझ हा (कलाकाराच्या आयुष्यातला) फार महत्वाचा घटक आहे. निव्वळ हाताची तयारीच नव्हे, तर तुमचं तुमच्या मूळ स्त्रोताशी, परंपरेच्या गंगोत्रीशी सतत संलग्न राहणं महत्वाचं आहे. मला आपल्याला मिळालेल्या वारशाचा सार्थ अभिमान आहे. त्याच्या सतत सान्निध्यात राहण्यातच आनंद आहे, या गुरूपरंपरेवर माझी नितांत श्रद्धा आहे. तिची अमर्याद शक्ती मला वेळोवेळी जाणवलेली आहे. हे स्पष्टपणे सांगताना मी बिचकत नाही, की ही भावनिक गुंतवणूक, हे तादात्म्यच मला श्रोत्यांच्या अंतःकरणापर्यंत सहज घेउन जातं.

प्रश्नः इतरांपेक्षा तुमचं वेगळेपण तुमच्या वादनातील सहजस्फूर्तता ('ओरिजिनॅलिटी')हेच आहे. तुम्ही पुढच्या क्षणी काय वाजवाल याचा अंदाज बांधता येत नाही. हा गुण उपजत लाभलेला आहे की त्यावर तुम्ही मेहनत घेतलेली आहे?

उ. झाकिर हुसेनः सुदैवाने माझी जडणघडण होत असताना मी उ. अली अकबर खाँ यांच्यासमवेत मी कित्येक वर्षे राहिलो. कला सादर करण्यासाठी लागणारा कच्चा आराखडा ('ब्लू प्रिंट') करून त्यांचं समाधान होत नसे. उ. विलायत खाँसाहेब आणि पं. रविशंकरजीही त्याच पठडीतले. पारंपारिक वादनशैलीत ते कमालीचे निष्णात आहेतच, त्यांचं तांत्रिक गोष्टींवर इतकं अफलातून प्रभुत्व आहे, की ते कधीही त्या समृद्ध भांडवलाच्या जोरावर श्रोत्यांना मंत्रमुग्ध करू शकतात.

पण मी त्यांना नेहेमीच चाकोरीबाहेरच्या नित्यनूतन गोष्टींच्या शोधात असलेलं पाहिलं आहे. मी त्यांना धोके पत्करताना पाहिलं आहे. प्रयोग हा कलेचा एक अविभाज्य घटकच आहे. प्रयोग आणि प्रयत्न करत राहणं महत्वाचं. कित्येक वेळा ते व्यर्थ जातील, पण शेवटी यशच मिळेल अशी ठाम श्रद्धा हवी. कारकिर्दीच्या सुरूवातीला माझीही वादनाची ठराविक पद्धत होती. पण साथसंगत करताना उ. अली अकबर खाँसाहेबांकडे पाहून मला खात्री वाटायला लागली, की काही धोके पत्करत उपज अंगाने वादन केले तर त्यात काही चूक नाही.
प्रयोग करा आणि त्याचा परिणाम काय होतो हे नीट पडताळून पहा. मंचावर अशा वृत्तीने वाजवू नका, की मला खूप माहिती आहे, तेव्हा मी 'हेच' वाजवणार. मला बाकी गोष्टींशी देणंघेणं नाही! आता १५ वर्षांनंतर साचेबद्ध पद्धतीने मी मुळीच वाजवत नाही. प्रत्येक क्षणाला मी 'जिवंत' प्रतिसाद देतो. दुसरी गोष्ट, माझ्या वडिलांचा दृष्टीकोन असाच होता आणि त्याचं त्यांना काय फळ मिळालं हे मी समक्ष पाहिलं आणि अनुभवलं. तरीही, मला आपल्यापेक्षा ज्येष्ठ कलाकारांची साथ करताना स्वतःचं कठोर परीक्षण करायची सवय लागली. एका प्रकारे माझ्यातला समीक्षकच माझा आधारवड ठरला.

पुढील कालखंडात एक फार मोठा फायदा मला अगदी विनासायास मिळाला. माझा आत्मविश्वास वाढलेला होता आणि मला आणखी चार पावले पुढे जायची आंतरिक उर्मी होती. तेव्हा असे दोन दिग्गज संगीतकार मला भेटले, ज्यांनी मला आश्वस्त केले, "झाकिर, मनमोकळेपणानी वाजव, आम्ही तुझ्या सदैव पाठीशी आहोत". पं. शिवकुमार शर्मा आणि पं. हरिप्रसाद चौरसियांनी मला त्यांच्याबरोबर वादन करत असताना संपूर्ण स्वातंत्र्य तर दिलंच त्या जोडीला सतत प्रोत्साहनही दिलं. कुठलीही आडकाठी न ठेवता ते माझ्याबरोबर मुक्तपणे सांगितीक संवाद साधण्यासाठी पुढे आले. शिवजींच्या विलोभनीय स्मितहास्यातूनच आणि एखाद्या बोलक्या कटाक्षातूनच मला त्यांची संमती आणि आनंद स्पष्टपणे दिसून यायचा!

प्रश्नः हे तसं अद्भुतच आहे, कारण हे दोन्ही दिग्गज वादक तशी 'नाजूक' वाद्यं वाजवतात आणि आक्रमक तबलावादनामुळे त्यांच्या वादनात रसहानी होण्याचीच शक्यता जास्त असं वाटतं.

उ. झाकिर हुसेनः अगदी बरोबर! मला वाटतं असं काही झालं नसावं, कारण हे दोघे महान कलावंत आहेत (त्यांनी विचारपूर्वकच संमती दिली असणार). माझ्या मते एकांतात कलावंताची वाढ होत नाही, नव्हे ते अशक्यच आहे म्हणा ना! आपल्या सहकार्‍यांकडून मिळणारं प्रोत्साहन, त्यांच्याकडून मिळणारी प्रेरणा, त्यांनी पुढ्यात उभे केलेले आव्हान या सगळ्या गोष्टी आपली गुणवत्ता वाढण्यासाठी, परिपक्वता येण्यासाठी आणि समाधान मिळण्यासाठी अनिवार्यच आहेत. मला या सगळ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकारांकडून या गोष्टी अगदी भरभरून मिळत आलेल्या आहेत.

प्रश्नः तुमच्या अफाट लोकप्रियतेमुळे मुख्य कलाकारांना तुमचा (साथीदाराचा) हेवा तर वाटत नाही?

उ. झाकिर हुसेनः (स्मितहास्य करत) तसं असतं, तर मला इतकं वाजवताच आलं नसतं!

प्रश्नः आपल्या वादनावर बंधन पडू नये यासाठी तुम्ही गायकांची साथ करणं थांबवलं आहे का?

उ. झाकिर हुसेनः गेली १० वर्षे सोडली तर मी गायकांबरोबर भरपूर वाजवलं आहे. पं. ओंकारनाथ ठाकूर ते पं. जसराज या तीन पिढ्यांमधील जवळजवळ प्रत्येक विख्यात गायकाची मी साथ केलेली आहे. कंठसंगीत हाच आपल्या परंपरेचा गाभा आहे. तोच तर आपला खरा खजिना आहे. गायकीची साथ करताना येणार्‍या स्वाभाविक मर्यादांची मला जाण आहे, आणि संगीतातल्या माझ्या 'योगशिक्षणाचाच' तो एक महत्वाचा भाग आहे. संयम ठेउन, मोजकंच वाजवून मोठा परिणाम साधण्याची ती खुबी आहे. एक कलाकार म्हणून परिपूर्ण होण्यासाठी हा 'योग' साधणे आवश्यकच आहे.

स्वतंत्र तबलावादन करताना किंवा नृत्याची साथ करताना मला प्रत्येक मात्रा 'मोठी' (विस्तृत) दिसते. कंठसंगीतातही हेच होतं. तुम्ही वाजवलेलं प्रत्येक अक्षर शंभरपटीनी मोठं दिसतं (अधिक परिणामकारक ठरतं). मात्र यामुळे अजिबात कष्ट न पडता तुम्ही नेमके काय करत आहात ते तुमच्या सहज लक्षातही येतं. प्रत्येक अक्षरात, बोलात एक प्रकारची 'शान' असते, डौल असतो, श्रीमंती असते आणि 'मेलडी' या एकसंध कलाकृतीची खरी सम्राज्ञी असते. मला यातून वेगळाच आनंद मिळतो. मला अशी 'मेलडी' मनोमन आवडते. माझ्या वादनाविष्कारात जी सौंदर्यदृष्टी मला अभिप्रेत असते ती पुन्हा नव्याने उजळून निघते.

प्रश्नः या सौंदर्यदृष्टीविषयी थोडे विस्ताराने सांगाल?

उ. झाकिर हुसेनः कला मंचावर सादर करताना आपल्या तांत्रिक कौशल्याचा उपयोग करणे आणि तो देखील योग्य प्रमाणात आणि योग्य रीतीने करणे ही गोष्ट साधावी लागते. आपल्यापैकी बर्‍याचजणांकडे फार उच्च गुणवत्ता असते, पण एक संगतकार या दृष्टीने पाहता आपली 'तयारी' किती दाखवावी याची त्यांना पुरेशी जाणीव नसते. त्यासाठी थोडा विराम घेउन सगळ्या गोष्टींचा यथास्थित विचार करावा लागतो. आपण काय कमावलं आणि काय गमावलं याचा अंदाज घ्यावा लागतो.

आपल्याजवळ असलेल्या विद्वत्तेपैकी समोरच्या श्रोत्यांसमोर आजच किती प्रकट करावी? त्यांना नेमकं काय ऐकायचं आहे? या प्रश्नांची उत्तरं दरवेळी नव्यानं मिळवावी लागतात. तुम्ही वेगवेगळे प्रयोग करून पहा. त्यांचा परिणाम काय होतो, त्यावर प्रतिक्रिया कशा उमटतात हे जोखून पहा. त्यातून आपला अविष्कार घडवत रहा. आपण कुठपर्यंत जायचं, थांबायचं कुठं याचं भान ठेवा ही माझी विचारशैली आहे. फक्त 'हवा' व्हावी म्हणून मी कधीच वाजवत नाही. मला वाटतं कंठसंगीतातून ही दृष्टी सहज मिळते. वाद्यसंगीत समजावून घेतानाही तिचा हमखास उपयोग होतो.

प्रश्नः तुमच्या तबल्यामधे अमाप 'मेलडी' आहे. तुम्ही गायनही करता का?
उ. झाकिर हुसेनः (हसत) ते शक्य होईल असं वाटत नाही. माझी 'तालीम' विधीवत सुरू असल्याने मला गायन शिकवलं गेलं. त्यात रागविज्ञान आणि शेकडो बंदिशींचा समावेश होता. मला शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि लोकसंगीतातल्या गायनामधला भाव लक्षात घ्यावा लागतो. एखाद्या मृदंगवादकाला कृतींची माहिती असते तसंच हे आहे.

प्रश्नः तुम्ही प्रत्येक अक्षरातून एक 'किमया' साधता. प्रत्येक अक्षर स्पष्ट वाजतं, आणि दोन अक्षरांमधला विराम किंवा काही काळाकरताची स्तब्धता प्रभावी ठरते. अतिशय दृत लयीतदेखील तुम्ही गडबड केली किंवा घाईत आहात असं का दिसत नाही?

उ. झाकिर हुसेनः मी (मनातल्या मनात) एक तरल कॅनव्हास वापरतो. त्यामुळेच एखाद्या ठिकाणी एक 'ठिपका' जरी असेल, तरी त्याचा मोठा प्रभाव पडतो. स्तब्धतेत, शांततेत एक विलक्षण शक्ती दडलेली असते. याच विरामांमुळे कलेची अभिव्यक्ती संपन्न होते, परिपूर्ण होते. प्रत्येक आघाताला महत्व येतं. वेगानं धावणार्‍या गाडीत बसण्याइतकाच आनंद एखाद्या वटवृक्षाखाली स्तब्ध बसून राहण्यातही असतोच ना!

प्रश्नः तुम्हाला तबल्याव्यतिरिक्त इतर तालवाद्ये वाजवता येतात का?

उ. झाकिर हुसेनः माझ्या घरात जगभरातील जवळजवळ शंभरएक तालवाद्ये आहेत. ती वाजवण्याचा आनंद तर मी लुटतोच, त्यातूनच माझं कौशल्य वाढतं आणि त्या वादनशैलीची सांगड घालून मी तबल्यातून वेगवेगळ्या प्रकारची 'नादनिर्मीती' करण्याचा अथक प्रयत्न करत असतो. अर्थात यातून रसहानी होउ नये ही खबरदारी घ्यावी लागतेच. माझा तबला काही कोंगो बोंगो आणि ड्रम्ससारखा वाजत नाही.

प्रश्नः संगीतक्षेत्रातले तुमचे आदर्श कोण आहेत?

उ. झाकिर हुसेनः किती म्हणून सांगू! त्यातल्या बर्‍याचजणांची लोकांना फारशी माहिती नाही. काहींची नावं मलाही आठवत नाहीत, पण त्यांचं वादन आजही सहीसही लक्षात आहे! मी माझ्या वडिलांचा आदर्श सुरूवातीपासूनच समोर ठेवला होता. त्यांचे कित्येक अविस्मरणीय कार्यक्रम मी जिवाचे कान करून ऐकले आहेत, पाहिले आहेत. माझ्यावर पं. किशन महाराजजी, पं. सामता प्रसादजी आणि उ. निजामुद्दीन खाँ यांचा गहरा प्रभाव पडलेला आहे. त्यांच्या जमान्यात ते अतुलनीयच होते. मलाही तसं व्हावं असं वाटायचं.
कित्येकजणांना मी प्रत्यक्ष पाहिलेलं नाही, पण त्यांच्या ध्वनिफिती ऐकून मी मंत्रमुग्ध होतो. थिरकवा खाँसाहेबांचा तबला मी पुन्हा पुन्हा ऐकतो. वाटतं की या गोष्टी एखाद्या मर्त्य मानवाच्या हातातून इतक्या लाजबाब कशा निघत असतील? आपल्यालाही असं वाजवता यायला पाहिजे. कधी विलायत खाँसाहेबांना सतार वाजवताना पाहिलं की आपण अशीच सतार वाजवावी असंही वाटायचं.

प्रश्नः तुम्ही आपले वडिल आणि भाउ यांच्यासमवेत बरेच कार्यक्रम करता. उ. अल्लारखाँ अजूनही तुम्हाला शिष्यच मानतात का?

उ. झाकिर हुसेनः माझ्यासाठी ते सदैव गुरूच आहेत आणि असतील. मला वाटतं अलीकडे ते मला मित्र मानायला लागले आहेत. अलीकडे ते अगदी माझ्या हातावर टाळी देत देत मला विनोदही ऐकवतात. ते माझ्या चुका दुरूस्त करत नाहीत, पण पुढचा मार्ग दाखवतात. त्यांच्याजवळ देण्यासारखं नेहेमीच काहीतरी असतं. आपली परंपरा ही तशी मौखिक परंपरा आहे. कपाटातून एखाद्या ग्रंथाचा ५० वा खंड काढून ४१० वे पान पहा असला प्रकार यात नसतो. कधी कधी मी माझ्या खोलीत टीव्ही बघत असताना ते अचानक येतात, म्हणतात, "सहज म्हणून सांगतो, आत्ताच एक बोल आठवला" आणि लगेच त्यांची पढंत सुरू होते. मी आपला पटकन ते बोल लिहून घेतो आणि मग तबला घेउन रियाझ सुरू होतो.

प्रश्नः तुम्ही अपयशाला कसे सामोरे जाता?

उ. झाकिर हुसेनः आम्ही करतो त्या प्रत्येक गोष्टीत धोका पत्करावा लागतो. खास करून कलाकारांना या गोष्टीला सामोरे जावेच लागते, निव्वळ शास्त्रार्थ करणार्‍यांना नाही! कित्येक मैफिली नीरस होतात. त्यामुळे मी हताश मात्र होत नाही. एक माणूस म्हणून आपल्याला काही मर्यादा असतात. आपण प्रत्येक गोष्ट बिनचूक करू शकत नाही, किंवा दरवेळी त्याच उंचीवर पोचू अशी खात्री देउ शकत नाही. अपयशातून मी काहीतरी शिकतो. पुढे जातो. यशापेक्षा अपयशाचाच उपयोग जास्त. त्यातून मुर्दाडपणा येत नाही, तारतम्य येतं आणि पाय सतत जमिनीवर राहतात.

((गौरी रामनारायण यांनी घेतलेल्या उ. झाकिर हुसेन यांच्या मुलाखतीचा अनुवाद)

स्वरमग्न - उस्ताद अमजद अली खाँ

हिंदुस्थानी अभिजात संगीताची लोकांवर 'जादू' होते, याचं एक महत्वाचं कारण आहे - या संगीतात असणारी लोकसंगीताची झलक. एक परिष्कृत ('सॉफिस्टिकेटेड') तरीही सरळ, साधी, सच्ची स्वररचना. या संगीतात असे कित्येक 'शास्त्रीय' प्रकार आहेत ज्यात थक्क करून टाकणार्‍या चमत्कृती आणि अगाध सौंदर्य आहे. असं म्हणतात की या संगीतातले राग 'जिवंत' आहेत, आणि रागांच्या महत्तेपायी नव्हे तर आपली सांगितीक जाणीव शाबूत आहे हे समजण्यासाठी एखाद्या जिवंत व्यक्तीइतकाच मान रागस्वरूपालाही द्यावा लागतो.

पं. कुमार गंधर्व म्हणायचे, "तुम्ही ज्या प्रकारे गाता, त्यात रागाच्या मूळ वृत्तीचा उपमर्द होऊ नये हे भान राखा. प्रत्येक रागाच्या अंतरंगात जिवंतपणा आहे, त्याच्या हृद्याचे स्पंदन ऐका. त्याचा मान राखा". संगीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी नीट स्वरात मिळवलेल्या तानपुर्‍याच्यातून सभोवती निर्मीत होणारा गूढरम्य नाद हा त्यांच्या वाटचालीतला महत्वाचा सवंगडी ठरतो. त्यामुळेच वरपांगी साध्या वाटणार्‍या या वाद्याकडेही लोक कुतूहलाने बघतात.

नंतर वारंवार एक गोष्ट जाणवायला लागते की राग म्हणजे फक्त एखाद्या थाटातला किंवा तालात बांधलेला निर्जीव नियमबद्ध स्वरसमूह नाही. तो कुठल्या प्रहरी कुठल्या ऋतूत सादर करावा याचं एक रहस्य आहे. कोणता राग कधी सादर करावा याचे नियम काटेकोरपणे पाळले जातात. या शतकाच्या सुरूवातीस कित्येक संगीतकारांनी आपल्या ध्वनिफिती प्रकाशित करायला नकार दिला. ते म्हणत, लोक ज्या रितीने जगतात त्याला अनुसरून ते या ध्वनिफिती कधीही आणि कुठेही बिनडोकपणे लावतील आणि त्यातून आमच्या राग-रागिणींचा अपमान होईल. तुम्ही उस्ताद अमजद अली खाँसाहेबांना भेटलात, तर असे संगीतविषयक असे अनेक किस्से आणि पैलू तुमच्या पुढे येत राहतात.

आपल्या आयुष्यातला एक किस्सा ते न कंटाळता पुनःपुन्हा सांगतात. राष्ट्रपती भवनात अमजद अलींच्या तीर्थरूपांचा (उ. हाफिज अली खाँ) सत्कार होता. समारंभानंतर राष्ट्रपती महोदयांनी त्यांना आदराने विचारलं, "मी आपल्यासाठी काय करू शकतो?" तेव्हा उस्तादजींनी उत्तर दिलं, "राष्ट्रपती हे पद म्हणजेच आपण हिंदुस्थानचे सम्राट आहात. आपल्याला अशक्य असं काहीच नाही. ऑल इंडिया रेडिओवरून राग दरबारी प्रसारित होताना कित्येकदा त्याचा 'खून' पडतो. शक्य असेल तर हे त्वरीत बंद करा!" राष्ट्रपती स्मितीत झाले. त्यांनी स्वतःला सावरत परत प्रश्न विचारला, "आपली काही वैयक्तिक मागणी असेल तर ती सांगा. मी रेडिओला आवश्यक त्या सूचना देईनच". यावर उस्तादजींनी फक्त नमाज पढण्यासाठी घरी रवाना होण्याची परवानगी मागितली!

तसं पाहिलं तर उ. अमजद अलींना संगीताचं शिक्षण मिळणं अशक्य कोटीतलंच होतं. उ. हफीज अली ६५ वर्षांचे असताना त्यांना हा मुलगा झाला! त्यामुळे त्यांना असं वाटायचं की सगळ्यांच्या सदिच्छा पाठीशी असल्या तरी या मुलाला शिकवण्यासाठी पुरेसा अवधी मात्र आपल्याजवळ नाही. आपल्या परंपरेशी नातं जोडण्यासाठी राग, थाट किंवा ताल 'ओळखणं' किंवा बंदिशी पाठ करणं पुरेसं नाही. एवढ्या तुटपुंज्या भांडवलावर घराण्याची परंपरा टिकवणारे संगीतकार होता येत नाही.

ज्या सांगितीक 'करामती' करून लहान वयात मुलं आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवून नावारूपाला येतात, त्या अमजद अली लीलया करून दाखवायचे. तरीही त्यांची रवानगी 'औपचारिक' शिक्षणासाठी मॉडर्न स्कूलमधे होणे टळले नाही. तसे घडूनही या मुलाच्या मनात खोलवर सतत एक जाणीव होती, जी त्याला कधीच दृष्टीआड करता आली नाही. ज्याला आपण शिक्षण समजतो आहोत, ते एका मर्यादेपर्यंत अपरिहार्यच आहे, पण ते निव्वळ 'ठोकळेबाज' आहे. ज्याच्यापुढे आपले आयुष्य 'घडवण्याची', खर्‍या अर्थाने जगण्याची संधी हात जोडून उभी आहे, त्याच्या दृष्टीने असली पोपटपंची कुचकामी आहे.

हा मुलगा भर दुपारी रियाझ करण्यासाठी नित्यनेमाने चक्क घरी पळून जायचा. सुदैवाने त्यावेळी प्रसिद्ध शिक्षणतज्ञ एम. एन. कपूर दिल्लीच्या या मॉडर्न स्कूलच्या प्राचार्यपदी होते. त्यांनी हेरलं की निव्वळ परीक्षेत चांगले गुण मिळवण्याच्या हेतूने शाळेत येणार्‍या मुलांपैकी हा विद्यार्थी नाही. त्यांनी शाळेच्या कार्यालयीन वेळेत घरी जाण्याची खास सवलत अमजद अलींना दिली. शेवटी अमजद अलींनी शालेय शिक्षणातली अंतिम परीक्षाही व्यवस्थित पार पाडली. शालेय अभ्यासक्रमाला पुरेसा 'न्याय' देत फार थोडा वेळ झोप घेऊन ते रोज बारा ते चौदा तास न चुकता रियाझ करायचे.

सरोद हे हिंदुस्थानी अभिजात संगीताची परंपरा लक्षात घेता तुलनेने एक नवं वाद्य आहे. मध्य अशियातल्या गुराख्यांकडून 'स्थलांतरित' होत होत हे वाद्य अमजद अलींच्या 'बंगश' घराण्यातल्या पूर्वजांकडून भारतात आलं. (जंजीर मधल्या प्राणनी आपल्या अदाकारीने अजरामर केलेल्या 'यारी है इमान मेरा' गाण्यात पार्श्वसंगीतात वापरले आहे ते 'रबाब' हे अफगाणी वाद्य आणि सरोदची जातकुळी एकच आहे). काळाच्या ओघात बरेच रचनात्मक बदल होत सरोदनी आजचं स्वरूप घेतलं आहे.

अत्यंत प्रभावशाली, पुरूषी, खर्जातला आवाज ही या वाद्याची खासियत. या वाद्याला 'पडदे' नाहीत. वादकाचे कान विलक्षण 'तयार' नसतील आणि तो स्वराला पक्का नसेल तर सरोद त्याला क्षणार्धात 'बेपरदा' करते असे अमजद अली नेहेमी म्हणतात. वाद्याच्या ध्वनीची गुणवत्ता मु़ळातच इतकी अप्रतिम आहे, की फारशी धडपड न करताही दोन चार स्वरावली वाजवताच नाणावलेल्या सरोद वादकाला मैफिल ताब्यात घेता येते. आपल्या मनात उमटेल त्या प्रमाणे वाद्य 'गायला' लागावं यासाठी स्वतः अमजद अलींनीही या वाद्यात बरेच तांत्रिक बदल केलेले आहेत.

वडिलांकडून मिळालेल्या पक्क्या तालिमीला डोळस रियाझाची जोड दिल्यानेच आत्ममग्न, स्वतःशीच संवाद साधणारं असं अमजद अलींचं आगळंवेगळं सांगीतिक व्यक्तिमत्व घडत गेलं आहे. सरोद वादनातल्या तांत्रिक गोष्टींबरोबर आपल्या वडिलांकडूनच कलेतली 'अंतर्मुखता' त्यांना परंपरेनेच मिळालेली आहे. सरोद हातात घेतल्यावर ते फार कमी वेळा आपल्या श्रोतृवर्गाकडे आवर्जुन लक्ष देताना दिसतात. आपल्या वादनात ते इतके तल्लीन होउन जातात, की एकदा डोळे मिटून घेतल्यावर भर मैफिलीत सभागृहाच्या आत-बाहेर करणार्‍या 'असुरांची' चाहूलही त्यांना सहजी अस्वस्थ करू शकत नाही. श्रोत्यांकडे वारंवार बघून मैफिल रंगते आहे की नाही अशी 'चाचपणी' करतानाही ते फारसे दिसत नाहीत. एखाद्या सृजनशील व्यक्तीला आपल्याच कलाकृतीकडे तिची निर्मीती सुरू असताना तटस्थपणे पाहता येण्यासाठी लागतो तो 'स्थितप्रज्ञ' भाव त्यांच्याकडे सहजच आला आहे हे लक्षात येते.

अमजद अलींच्या पत्नी सौ. शुभलक्ष्मी यांचे साहचर्य लाभणे ही त्यांच्या सांगितीक जीवनातली एक खूप मोठी जमेची बाजू आहे. उस्तादजींचे ते एक सुप्त बलस्थानच आहे. सौ. शुभलक्ष्मी या मूळच्या आसामच्या, पण वृत्तीने मात्र पूर्णपणे दक्षिण भारतीय! कै. रूक्मिणीदेवींच्या ऐन उमेदीच्या काळात चेन्नईच्या विख्यात 'कलाक्षेत्रात' तब्बल दहा वर्षे शुभलक्ष्मींना भरतनाट्यमचं शिक्षण त्यांच्याकडून मिळालं. दाक्षिणात्य संस्कृतीतही त्या पूर्णपणे रममाण झाल्या. त्यांचं तमिळ भाषेवर असाधारण प्रभुत्व आहे. अमजद अलींच्या घरातच हिंदुस्थानी आणि कर्नाटकी संगीताचा असा सुरेख मिलाफ झालेला आहे. एक कलाकार या दृष्टीने पाहता शुभलक्ष्मी याच अमजद अलींच्या आद्य समीक्षकाचे काम चोखपणे करतात, त्यांना मोलाच्या सूचनाही देतात.

आपल्या दोन मुलांचं यथास्थित संगोपन करण्यासाठी शुभलक्ष्मीजींनी आपल्या यशस्वी कारकिर्दीवर भर उमेदीच्या काळात पाणी सोडलं. आज ही दोन्ही मुलं यशस्वीरीत्या आपली उज्वल परंपरा पुढे नेताना दिसतात. अमान अली आणि अयान अली 'बंगश' जगभर आपल्या वडिलांच्या जोडीने तसेच आपसातल्या जुगलबंदीच्या सरोद वादनाच्या मैफिली अक्षरशः गाजवतात. या त्रयीने सरोदच्या तारा छेडताच त्या वाद्यातून उमटणारा वेगळाच गाज, सुरांचे माधुर्य आणि 'बंगश' घराण्याची राजमुद्रा भाळी घेउन आलेला शैलीदार नाद चटकन ओळखता येतो. श्रोत्यांच्या मनावर तो कायमची छापही सोडून जातो. या मुलांच्या वादनातून हे सहज सिद्ध होतं की उ. हफीज अलींचं घराणं काळाच्या कसोटीवर निर्विवादपणे उतरलेलं आहे.

सच्चं, सुरेल आणि पराकोटीचं सृजनशील जीवन जगण्यासाठी लागणारी आई सरस्वतीच्या कृपेची शिदोरी अमजद अलींनी आपल्या मुलांना दिलेली आहे. हाडाचे कलावंत असलेले वडिल आपल्या मुलांना यापेक्षा वेगळे आणखी काय देउ शकतात? आपली विद्या अमान आणि अयानच्या हाती सुपूर्त करून, घराण्याची परंपरा अखंड ठेउन अमजद अलींनी आपलं गीत, संगीत 'अमर' केलेलं आहे. सरोद वादनाच्या क्षेत्रात आणि एकंदरच हिंदुस्थानी अभिजात संगीतातल्या वाद्यसंगीताच्या महान परंपरेत त्यांचं स्वत:चं अढळ असं ध्रुवपदच त्यामुळे निर्माण झालं आहे.

[श्री. राघव मेनन यांच्या 'द साँग ऑफ अमजद अली खाँ या लेखावर आधारित]

चिरंतनाचा किनारा (भावानुवाद)

शेवटी चिरंतन कालप्रवाहाचा किनारा मला सापडला आणि तिथेच मी स्थानापन्न झालो. चिंतनात मग्न, (त्या प्रवाहात) सूर मारण्यासाठी, (मनमुराद) पोहण्यासाठी, आणि अंततः अमर्त्यतेच्या त्या सागराशी एकरूप होण्यासाठी.

'पिंडे पिंडाचा ग्रासु' करून, मी तेजस्वी प्रकाशाचा सागरच होउन गेलो. कित्येक पूर्वजन्मांच्या स्वप्नवत लाटा आता त्या एकाच तेजशलाकेच्या सागरात विरघळून गेल्या आहेत.

(पिंडे पिंडाचा ग्रासु - आपल्या 'मी'पणाचा, अहंतेचा आपल्याच सच्चिदानंद आत्मस्वरूपात विलय करणे)

- "चिरंतनाचा किनारा" या परमहंस योगानंद यांच्या कवितेचा भावानुवाद

At last I found the banks of eternity and there I sat, musing, to plunge, swim, and melt in that ocean of immortality.

Melting myself within Myself ,I became the ocean of luminous light. All dream waves of many incarnations have melted into the sea of one flame."

-"Banks of Eternity" a poem by Paramhansa Yogananda

संदेहमुक्ती (भावानुवाद)

श्री. अ‍ॅलन जेकब्ज - श्री. रमण महर्षी फाउंडेशन (युके) चे अध्यक्ष यांच्या एका कवितेचा स्वैर भावानुवादः

Once and for all, let's end all confusion, Brahman is Real the world's an illusion.
लोपता समूळ, जगाचा आभास, येते प्रचितीस, ब्रह्ममात्र
सार्‍या संदेहांना, घेउनी प्रचिती, द्यावी मूठमाती, कायमची

We're tricked by the senses and fickle mind, There's nothing truly lasting here to find.
जगी शोधू जाता, सारे अशाश्वत, मिळे ना शाश्वत, येथे काही
फसवाच सारा, दहा इंद्रियांचा, चंचल मनाचा, मायाभास

...All's a mirage of mobile flux and change, Beyond our limited perceptual range,
जडसृष्टी सारी, नसे वस्तु सत्य, आभासी अनित्य, मृगजळ
तरी पहा तिचा, नसे आदि अंत, दशेंद्रिये तेथ, पांगुळती

The planet's perishing and in decay,But Reality's unchanging in every way.
अरे धरित्रीही, असे नाशिवंत, काळाग्नीच्या मुखात, चालली ती
परि सर्वभावे, सत्य सनातन, असे चिरंतन, आत्मरूप

Sadhak met a Sage on a mountain preaching, Gladly he asked Him for some teaching.
गिरीकंदरात, भेटे सत्पुरूष, देई उपदेश, अनायास
हर्षित साधक, अरूणाचलीच्या देवा, म्हणे मज द्यावा, उपदेश

He answered "all you see isn't as it seems, The life you live is just a film of dreams,
बोले सत्पुरूष, दृष्यजात सारे, वाटतसे खरे, तैसे नाही
आजवर तुझ्या, जीवनाची वाट, होती चित्रपट, स्वप्नमय

So wake up child from this sleep of delusion Once and for all end all chronic confusion"
मोहनिद्रेतून, मायावी मदिर, जागा हो सत्वर, वत्सा माझ्या
जुन्या संदेहांना, साधोनी जागृती, दे रे मूठमाती, कायमची

(अरूणाचलीच्या देवा - भगवान रमण महर्षी)

मूळ काव्यः

END CHRONIC CONFUSION

Once and for all, let's end all confusion, Brahman is Real the world's an illusion.

We're tricked by the senses and fickle mind, There's nothing truly lasting here to find.

...All's a mirage of mobile flux and change, Beyond our limited perceptual range,

The planet's perishing and in decay, But Reality's unchanging in every way.

Sadhak met a Sage on a mountain preaching, Gladly he asked Him for some teaching.

He answered "all you see isn't as it seems, The life you live is just a film of dreams,

So wake up child from this sleep of delusion Once and for all end all chronic confusion"

- Alan Jacobs

Saturday 15 June 2013

छोट्या पडद्यावरचा हर्क्युल प्वाइरॉ - संक्षिप्त परिचय

रहस्यकथावाचनाचे वेड तुला कधी लागले? असा प्रश्न कुणी मला विचारला, तर त्याचे नेमके उत्तर देणे अवघड आहे. सुरूवातीला बाबूराव अर्नाळकर, गुरूनाथ नाईक, सुहास शिरवळकर वाचून या साहित्यप्रकाराची जी गोडी लागली, ती पुढे आपसूकच इंग्रजी साहित्याकडे वळून स्थिरावली. या वाचनप्रवासात अर्ल स्टॅन्ले गार्डनरचा 'पेरी मेसन' (उपाख्य सुशिंचा 'बॅ. अमर विश्वास'), सर आर्थर कॉनन डायल यांचा 'शेरलॉक होम्स' या सारख्या मुख्य व्यक्तिरेखा मनात कायमचे घर करून गेल्या. त्या जोडीलाच पेरी मेसनची डेला स्ट्रीट ही सचिव, पॉल ड्रेक हा मदतनीस तसेच शेरलॉक होम्सचा डॉ. वॉटसन हा मदतनीस यासारख्या पूरक व्यक्तिरेखाही मनावर त्यांची अमीट छाप सोडून गेल्या.

बहुतांशी पुरूष लेखकांची मक्तेदारी असलेल्या रहस्यकथा लेखनाच्या प्रांतात अ‍ॅगाथा ख्रिस्ती या सिद्धहस्त लेखिकेकडे एक प्रकारचे अनभिषीक्त सम्राज्ञीपदच आहे. साधारणपणे एखाद्या ग्रंथाइतका ऐवज असलेल्या ख्रिस्तीबाईंनी लिहीलेल्या कित्येक रहस्यकथा अप्रतिम आहेत, बेजोड आहेत. त्यांचे पुस्तक एकदा हातात घेतले, की वाचकाला जागीच खिळवून ठेवते. ते सोडवत नाही. इंजिनिअरिंगचे विद्यार्थी 'नाईट मारून' सबमिशन वगैरे करतात, त्या धर्तीवर नाईट मारून असे एखादे पुस्तक वाचत एखादा पूर्ण सप्ताहांत ('वीकेंड') सहज सत्कारणी लावता येतो.

काही वर्षे थोडेसे बाजूला पडलेले रहस्यकथावाचनाचे वेड २००९ मधे ऑनसाईट गेल्यावर पुन्हा उफाळून आले. यावेळी माध्यम मात्र वेगळे, टेलिव्हिजनचे होते. डेव्हिड सुशे (David Suchet)या अभिनेत्याने छोट्या पडद्यावर साकारलेला अ‍ॅगाथा ख्रिस्तींचा मानसपुत्र 'हर्क्युल प्वाइरॉ' (Hercule Poirot)पाहिला, आणि सुरुवातीच्या अर्ध्या तासातच मी या कसलेल्या अभिनेत्याचा चाहता झालो.

छोट्या पडद्यावर आयटीव्ही या ब्रिटीश वाहिनीवर (आणि तसे जगभरच वेगवेगळ्या वाहिन्यांवर) 'हर्क्युल प्वाइरॉ' या रहस्यकथा मालिकेचे प्रसारण नियमीतपणे केले जाते. आता 'डीव्हीडी संच' या स्वरूपातही ती उपलब्ध आहे. या मालिकेची तोंडओळख करून देण्याचा हा एक प्रयत्न.

बेताचीच उंची, काहीशी स्थूलपणाकडे झुकलेली शरीरयष्टी, 'जी जानसे' मेहनत घेउन कोरलेल्या मिशा, डोक्यावर खुलून दिसणारा चकाकता चंद्र, तो झाकणारी ब्रिटीश पद्धतीची गोल टोपी, कपडे काळजीपूर्वक निवडलेले आणि कटाक्षाने फॉर्मलच! एकंदरच व्यक्तिमत्वात स्पष्टपणे दिसून येणारी टापटीप, चालण्याबोलण्यात हरघडी स्पष्टपणे दिसून येणारा काहीसा उर्मटपणाकडे झुकलेला आत्मविश्वास ही या प्वाइरॉची खासियत. हातात नक्षीकाम केलेली छडी घेउन दुडक्या चालीने झपाझाप निघालेला डेव्हिड सुशेचा प्वाइरॉ असा काही डोक्यात बसतो, की सर पीटर उस्तिनोव्हसारखे भलेभले नटही प्वाइरॉ म्हणजेच सुशे या समीकरणाला छेद देउ शकत नाहीत.

छोट्या पडद्यावरच्या प्वाइरॉ मालिकेत काही 'एपिसोड्स' पाउण तासाचे आहेत तर काही दोन तासांचेही (मूव्ही लेंग्थ) आहेत. अ‍ॅगाथा ख्रिस्तींच्या रहस्यकथा इतक्या कमी वेळात सादर करणे हे फार मोठे आव्हान आहे, पण या मालिकेच्या दिग्दर्शकाने आणि तांत्रिक बाबी संभाळणार्‍या चमूने ते लीलया पेलले आहे. ख्रिस्ती बाईंची कथा लिहीण्याची शैली काहीशी 'पसरट' आहे. प्रत्येक प्रसंग वाचकाच्या डोळ्यासमोर स्पष्टपणे उभा रहावा यासाठी त्याचे खूपच विस्तृत वर्णन त्या कटाक्षाने करतात. यात स्थळ, काळ, परिस्थितीजन्य बाह्य बारकावे अत्यंत बारकाईने टिपलेले असतात. त्या जोडीलाच कथानकातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेच्या मनात चाललेली आंदोलने 'स्वगत संवाद' या स्वरूपात तितक्याच ताकदीने उभी केलेली असतात.

या मालिकेतल्या बहुतांशी कथा छोटेखानी आणि टुमदार ब्रिटीश गावांमधे घडलेल्या गुन्ह्यांच्या (प्रामुख्याने खून प्रकरणे) शोधावर आधारित असतात. प्रत्येक व्यक्तीचे स्वभाववैचित्र्य, वेळोवेळी घडणारे चित्रविचीत्र नाट्यमय प्रसंग, आव्हानात्मक परिस्थिती आणि त्यातून उमलत जाणारी या एक से एक व्यक्ती आणि वल्लींममधील नातीगोती (यात काही गोत्यात आणणारी नातीही आलीच!)हा तसा गुंतागुंतीचाच मामला म्हणायला हवा. या पार्श्वभूमीवर कुठे परस्परविरोधी हितसंबंध तर कुठे मूल्यांचा संघर्ष, कधी विकृतीकडे झुकलेली भोगलालसा तर कधी आंधळा स्वार्थ यातून खुनासारखा गंभीर गुन्हा घडतो.

गुन्हा घडल्यावर, क्वचितप्रसंगी एखाद्या 'जागृत नागरिकाला' गुन्हा घडेल अशी चाहूल लागल्यावर या ना त्या कारणाने प्वाइरॉ खुनाच्या तपासात ओढला जातो आणि कथानकाचा मुख्य भाग सुरू होतो. मूळ कथेइतका विस्तार तितकाच तपशीलवार छोट्या पडद्यावरच्या सादरीकरणात जसाच्या तसा सादर करणे अशक्य असले, तरी कथानकाचा आत्मा हरवणार नाही ही काळजी घेत या मालिकेतली एक एक रहस्यकथा आयटीव्हीने अत्यंत परिणामकारकपणे सादर केलेली आहे.

हर्क्युल प्वाइरॉ मालिकेतल्या मुख्य व्यक्तीरेखांचा थोडक्यात परिचय:

हर्क्युल प्वाइरॉ: अ‍ॅगाथा ख्रिस्तींचा हा सगळ्यात लाडका मानसपुत्र मुळात बेल्जियन आहे. त्याला त्याबद्दल सार्थ अभिमानही आहे. फ्रेंच वळणाचे इंग्रजी बोलत असल्याने तो फ्रेंचमन असावा असा गैरसमज होतो, आणि दरवेळी तितक्याच उत्साहाने आणि हिरीरीने प्वाइरॉ आपण बेल्जियन आहोत हे आवर्जुन सांगतो. बेल्जियमच्या पोलिस यंत्रणेचे सर्वोच्च पद भूषवलेला हा एक नाणावलेला पोलिस अधिकारी, काही दुर्दैवी परिस्थितीत परागंदा होउन ब्रिटनमधे आश्रय घेतो. यातच तो कुटुंबापासून दुरावतो, वैयक्तिक जीवनात एकाकी होतो. कामाबद्दलची ओढ त्याला स्वस्थ बसून देत नाही. खाजगी गुप्तहेराचे काम स्वीकारून तो अल्पावधीतच आपले बस्तान बसवतो. स्कॉटलंड यार्ड सारख्या जगात पहिल्या क्रमांकाच्या समजल्या जाणार्या पोलिस यंत्रणेला ज्या गुन्ह्यांची उकल करण्यात नाकी नउ येतात, त्यांची उकल प्वाइरॉ हमखास करतो.

प्वाइरॉच्या हातात फार मोठी तपासयंत्रणा नाही. 'टीम प्वाइरॉ' इन मीन तीन लोकांची आहे. स्वतः प्वाइरॉ, कॅप्टन हेस्टिंग्ज हा सहाय्यक आणि मिस लेमन ही वैयक्तिक सचिव. प्वाइरॉचे खरे शक्तीस्थळ आहे ती त्याची अफलातून बुद्धीमत्ता. त्याच्याच भाषेत 'ग्रे सेल्स'. या ग्रे सेल्सच्या जोरावर अत्यंत धूर्तपणे, योजनाबद्ध पद्धतीने आणि शिताफीने केलेल्या गुन्ह्याची प्वाइरॉ ज्या प्रकारे उकल करतो, त्यावरून 'ग्रे सेल्स' ही एक प्रकारची दैवी देणगीच असावी असे वाटते.

स्वतःविषयी बोलताना 'जगातला सर्वश्रेष्ठ आणि एकमेवाद्वितीय खाजगी गुप्तहेर' अशी प्वाइरॉने स्वतःचीच भलामण करणे, सतत आत्मप्रौढीचा दर्प जाणवेल असे त्याचे काहिसे उर्मटपणे बोलणे, प्रत्येक गोष्टीतला चक्रमपणाकडे झुकणारा अति व्यवस्थितपणा, अतिकाटेकोरपणामुळे काट्याचा नायटा करत किरकोळ चुकीबद्दल सहकार्यांना फैलावर घेणे या सारखे प्वाइरॉच्या व्यक्तिमत्वातले बरेच धारदार 'कंगोरे' डेव्हिड सुशेनी अफलातून साकारले आहेत.स्वभावातल्या या विकृती हौसेने, अहंतेने ओढवून घेतलेल्या नसून परिस्थितीशी झगडताना व्यक्तिमत्वाची तशी मूस कळत नकळत घडत गेलेली आहे हे प्वाइरॉच्या बाकी वर्तनातून सतत जाणवत राहते. त्यामुळे त्या डोक्यात जात नाहीत.

प्वाइरॉच्या व्यक्तिमत्वात आणखी एक विरोधाभास स्पष्टपणे दिसतो. एरवी अय्याशपणे जगणारा, तासनतास मिशा कोरत बसणारा, टेबलवर चहाचे कप, बिस्किटे वगैरेंची अति काटेकोरपणे रचना करत बसणारा प्वाइरॉ खुनाचे एखादे प्रकरण हाती घेतले की पुरता पालटतो. त्याची देहबोली बदलते. त्याच्या नजरेत एक प्रकारची चमक येते. तो वय आणि शरीरयष्टी यांच्याशी विसंगत वाटतील अशा हालचाली चित्त्यासारख्या चपळाईने करतो. प्वाइरॉच्या व्यक्तिमत्वाची ही आणखी एक खासियत.

गुन्ह्यामागच्या रहस्याचा वेध घेताना अचानक तो 'युरेका'चा क्षण येउन प्वाइरॉचे ग्रे सेल्स सगळ्या गुंत्याची क्षणार्धात उकल करत असले, तरी 'केस' स्वीकारल्यापासून ते तो क्षण येईपर्यंत प्वाइरॉने घेतलेली अपार मेहनत स्पष्टपणे दिसून येते. हाती घेतलेल्या कामात स्वत:ला पूर्णपणे झोकून देण्याची प्वाइरॉची उपजत प्रवृत्ती ठळकपणे अधोरेखित होते. जिथे गुन्हा घडला त्या परिसराची आणि संबंधित लोकांची अत्यंत बारकाईने केलेली पाहणी, टिपकागदासारखे प्रत्येक तपशील टिपून घेणे हा सगळा गृहपाठदेखील 'ग्रे सेल्स' इतकाच, किंबहुना थोडा अधिकच महत्वाचा आहे याचे भान प्वाइरॉ क्षणभरही सोडत नाही. त्यामुळेच थोडाफार अतिआत्मविश्वास असूनही त्याच्या व्यावसायिक नैपुण्यात कणभरही उणीव येत नाही.

आर्थर हेस्टिंग्स - गुन्ह्यांच्या तपासकार्यात सहभागी होणारा प्वाइरॉचा हा एकुलता एक सहाय्यक. याची भूमिका 'रामभक्त हनुमान' छापाची आहे. ब्रिटीश लष्करातून 'कॅप्टन' पदावरून निवृत्त झालेला हा हरहुन्नरी माणूस मोठाच रगेल आणि रंगेल आहे. याचे व्यक्तिमत्व अत्यंत रूबाबदार आणि प्रभावी आहे. याच्या चालण्याबोलण्यात बेधडकपणा, सरधोपटपणा आणि लष्करी खाक्या आहे. ह्यू फ्रेजरने (Hugh Frase() ही व्यक्तिरेखा अप्रतिम साकारली आहे. मालिकेतले दोनचार भाग सोडले, तर हा माणूस प्वाइरॉची सावलीसारखी साथ देताना दिसतो. प्वाइरॉबद्दल याला नितांत आदर आहे. सैन्यात नोकरी करताना जगभर भ्रमंती झालेली असल्याने जगभरच्या दंतकथा, पुराणकथा तसेच चित्रविचीत्र चालीरीती, खाण्यापिण्याच्या सवयी, दुर्मिळ भेटवस्तू, विषारी पदार्थ, जादूटोणा असल्या गोष्टींची याला भरमसाठ (आणि अर्धवट!) माहिती आहे.

तपासकार्यात गुंड प्रवृत्तीचे लोक अंगावर आले, आणि त्यांना शिंगावर घेण्याची वेळ आली की हेस्टिंग्जचा हस्तक्षेप ठरलेलाच. "म्हातारबुवा, आता केस माझ्या हद्दीत आली आहे" असे प्वाइरॉला बजावून सांगत त्याला दुय्यम स्थान देत हेस्टिंग्ज त्या वेळेपुरता मुख्य भूमिकेत शिरतो. दादागिरी करणार्या गुंडापुंडांना त्यांच्या ष्टाईलने 'प्रेमाने समजावून सांगणे', गरज पडल्यास त्यांच्याशी दोन हात करणे ते पार गरज पडल्यास त्यांच्या 'खर्चापानी'ची व्यवस्था करणे ही सगळी कामे हेस्टिंग्स निडरपणे आणि खास लष्करी खाक्यात करतो. हेंस्टिंग्जचे स्वतःबद्दल दोन गोड गैरसमज आहेत. पहिला असा की गुन्हे तपासकार्याच्या बाबतीत प्वाइरॉसारखीच आपल्यालाही अलौकिक बुद्धीमत्ता आहे, आणि दुसरा हा की आपल्या व्यक्तिमत्वावर कुठल्याही वयोगटातली 'रूपगर्विता' हमखास भाळते. यातून त्याच्यावर बरेच अनावस्था प्रसंग ओढवतात, त्याने घातलेल्या गोंधळातून एखादा महत्वाचा दुवा अचानक हाती येतो, तर क्वचितप्रसंगी विनोदनिर्मीतीही होते.

मिस फेलिसिटी लेमन - पॉलिन मोरान (Pauline Moran) या अभिनेत्रीने ही भूमिका साकारलेली आहे. प्वाइरॉच्या अतिचिकित्सकपणा, अतिव्यवस्थितपणा, चक्रमपणा या सगळ्या अफलातून गुणसंपदेशी जुळवून घेत त्याचे सचिवपद यशस्वीपणी सांभाळावे तर मिस लेमन यांनीच. प्वाइरॉच्याच शब्दात सांगायचे तर मिस लेमननी जन्माला घातलेली आणि व्यवस्थितपणे 'अप-टू-डेट' ठेवलेली 'फायलिंग सिस्टीम' ही कुणीही तिचा कित्ता गिरवावा इतकी बिनचूक आणि आदर्श प्रणाली आहे. प्वाइरॉचे ते एक सुप्त बलस्थानही आहे. उतारवयातही आकर्षक दिसणार्या मिस लेमनच्या मनात प्वाइरॉबद्दल सुप्त आकर्षण आहे, त्यांचे प्वाइरॉवर एकतर्फी प्रेम आहे असेही काही प्रसंगी लक्षात येते. अर्थातच या आकर्षणाची परिणती प्रेमप्रकरणात होत नाही. क्वचितप्रसंगी किरकोळ कारणावरून मिस लेमनला फैलावर घेणार्या 'परफेक्शनिस्ट' प्वाइरॉला मिस लेमनच्या व्यवस्थितपणा आणि कार्यक्षमतेबद्दल मनोमन कौतुक वाटते हे तो वेळोवेळी दाखवून देतो. मिस लेमन त्यातच समाधान मानत असाव्यात असे दिसते.

जेम्स जॅप - स्कॉटलंड यार्डमधे 'चिफ इन्स्पेक्टर' या वरिष्ठ हुद्यावर असलेल्या आणि मोठी जबाबदारी असलेले हे महत्वाचे पद भूषवणार्या पोलिस अधिकार्याची भूमिका फिलीप जॅकसनने (Philip Jackson) खुलवली आहे. साचेबद्ध ब्रिटीश मानसिकता असलेला हा अधिकारी आणि प्वाइरॉ यांचे संबंध घडीघडीला बदलतात. जॅपला प्वाइरॉबद्दल आदर आहे, आणि त्या जोडीलाच स्कॉटलंड यार्डची अत्यंत प्रबळ यंत्रणा हाताशी असूनही आपल्याला शेवटी प्वाइरॉचीच मदत घेणे भाग पडते याचे वैषम्यही त्याच्या मनात डाचते आहे. त्यामुळे परिस्थितीनुसार तो कधी प्वाइरॉशी सहकार्याची भूमिका घेतो, कधी प्वाइरॉला कायद्याच्या चौकटीची महती सांगून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो, तर कधी तपासकार्यातली माहिती दडवून ठेवत मी प्वाइरॉच्या चार पाउले पुढे आहे अशी शेखी मिरवतो. प्वाइरॉवर कुरघोडी केल्याचे त्याचे हे फसवे समाधान क्षणिक ठरल्यावर प्रांजळपणे आणि मनमोकळेपणाने प्वाइरॉचे कौतुक करत पुन्हा एकदा सहकार्यासाठी हातही पुढे करतो. कर्तव्य चोखपणे बजावताना जॅप आपला अहंकार मधे येउ देत नाही. तो कुठल्याही मोहाला बळी पडत नाही. मी उच्चपदस्थ आहे, अमुक मंत्र्याच्या जवळचा आहे, माझी 'पोच' वरपर्यंत आहे अशा मस्तीत वावरणार्या धनदांडग्यांनी तपासात अडथळे आणले, प्वाइरॉला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर अशा टग्या लोकांना 'तू माझ्या लेखी फक्त एक संशयित आहेस, त्यामुळे तूर्त बाकी गोष्टी गौण ठरतात' असे जॅप स्पष्टपणे बजावतो. त्यावर दुरुत्तर आले, तर अशा लब्धप्रतिष्टीत गुंडापुंडांचा किमान शब्दात कमाल अपमान करून वेळप्रसंगी त्यांना स्कॉटलंड यार्डचा हिसका दाखवून देताना जॅप कुठलीच कसर सोडत नाही.

समारोप - प्वाइरॉच्या जमान्यानंतर गुन्हेगारीमागची कारणे, गुन्हे करण्याची पद्धत थोडीफार बदलली आहे. गुन्हेवैद्यकशास्त्रात (फॉरेन्सिक सायन्स)बरीच प्रगती झालेली आहे. तपासपद्धतीतह आमूलाग्र बदल झालेले आहेत. त्यामुळे काही बाबतीत प्वाइरॉ ही मालिका कालबाह्य वाटते. व्यक्तिगत आवडनिवडही असतेच. वेगवान कथानक आणि थरार यांची आवड असणार्यांना ती संथ, कदाचित रटाळही वाटेल. असे असूनही ब्रिटीश संस्थळांवरची आकडेवारी पाहता प्वाइरॉची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही.

डेव्हिड सुशेचे वय आता ६६ आहे. नोव्हेंबर २०११ मधे आयटीव्ही आणि सुशे यांनी प्वाइरॉ मालिकेतली शेवटच्या (तेराव्या) उपमालिकेचे चित्रीकरण सुरू होईल अशी घोषणा केली होती. यात एक लघुकथा वगळता इतर सर्व भागात काम करण्यासाठी सुशेनी सहमती दर्शवली होती. ही मालिका प्रसारित झाली की नाही हे मला माहित नाही, मात्र ती पाहण्याची उत्सुकता आहेच.

तुनळीवर हर्क्युल प्वाइरॉ मालिकेतील काही संपूर्ण भाग उपलब्ध आहेते. ते सहज हुडकता येतील. त्यापैकी 'प्रॉब्लेम अ‍ॅट सी' या एका भागाचा दुवा देउन समारोप करतो -

http://www.youtube.com/watch?v=AbCnqWP7pBU

विसरभोळा

[ओ. हेन्री यांच्या 'द रोमान्स ऑफ द बिझी ब्रोकर' वर आधारित]

हार्वे मॅक्सवेल एक यशस्वी शेअर ब्रोकर होते. पीचर त्याच्या कार्यालयात स्वीय स्वचिवाचे काम करत होता. तो गुरूवारचा दिवस होता. सकाळी साडेनउला मॅक्सवेल नेहेमीप्रमाणे घाईघाईने आपल्या स्टेनोबरोबर ऑफिसमधे आले. स्टेनोचा बदललेला आविर्भाव बघून एरवी मख्ख असणार्‍या पीचरच्या चेहर्‍यावर एक क्षण आश्चर्याचे भाव नकळत उमटले. एका क्षणार्धात "गुड मॉर्निंग, पीचर" म्हणत मॅक्सवेल चित्त्याच्या चपळाईने आपल्या टेबलाकडे झेपावले. ग्राहकांची पत्रे आणि तारा यांचा एक मोठा ढीगच त्यांची वाट बघत होता. स्टेनो आपला रिवाज सोडून अजूनही मालकिणीच्या रूबाबात वावरत होती. तिच्या आगाऊपणाकदे लक्ष द्यायला पीचरकडेही नेमका त्या दिवशी वेळ नव्हता. तो पुन्हा आपल्या कामात मग्न झाला.

ही स्टेनो एका वर्षापूर्वी कामावर रुजू झालेली होती. तिच्या वागण्यात एक प्रकारचा भारदस्तपणा होता. ती लावण्यवती होती. तिच्या सौंदर्यात सहजपणे नजरेत भरणारी खानदानी शान होती. पाहताक्षणी ती ठरावीक साच्यातल्या स्टेनोग्राफर पोरींसारखी नाही हे कळून येत असे. पीचर कामात आकंठ बुडालेला असला तरी तिची बदललेली वागणूक मात्र त्याच्या वारंवार लक्षात येत होती. कार्यालयात आल्याबरोबर नेहेमीप्रमाणे आपल्या केबिनमधे न जाता मॅक्सवेलच्या चेंबरमधे ती रेंगाळली. मॅक्सवेलना आपलं अस्तित्व जाणवावं इतकी लगटही तिने दोनचारवेळा केली. पण त्या वेळी मॅक्सवेल मात्र 'माणसातले' राहिलेले नव्हते. एखाद्या स्वयंचलित यंत्रासारख्या त्यांच्या हालचाली शिताफीने होत होत्या. आजूबाजूच्या जगाशी त्यांचा काडीमात्र संबंध राहिलेला नव्हता.

तब्बल पाचव्या वेळी तिने लगट केल्यावर मॅक्सवेल खेकसले, "ही काय कटकट आहे? काही महत्वाचं काम आहे?". त्यावर "काही नाही, चालू दे!" म्हणत स्टेनो सोफिया तिच्या केबिनमधे गेली. "पीचर", एखाद्या वरिष्ठ अधिकार्‍याच्या स्वरात तिने पीचरला प्रश्न विचारला, "नव्या स्टेनोला रुजू करून घेण्याबद्दल साहेब काल काही बोलले होते का?". पीचरला तिची बोलण्याची पद्धत खटकली, पण नवीन स्टेनो घ्यायचीच आहे तर उगाच वाद नको असा विचार करत तो शांतपणे म्हणाला, "होय. काही जणी दहा वाजता मुलाखतीसाठी येणार आहेत. पण अजूनतरी च्युईंग गम चघळणारं आणि चित्रविचीत्र केशभूषा केलेलं एकही 'ध्यान' आलेलं नाही!". पीचरच्या बोलण्यातला बोचरेपणा तिला चांगलाच झोंबला, पण त्यावर कुठलीही प्रतिक्रिया न दर्शवता ती शांतपणे म्हणाली, "तर मग ते 'ध्यान' येईपर्यंत मी नेहेमीप्रमाणे आपले काम करते". बरोबर दहाच्या सुमारास तीन विचीत्र केशभूषा केलेल्या आणि दोन च्युईंग गम चघळणार्‍या टिपीकल स्टेनो दिसणार्‍या पोरी मुलाखतीसाठी कार्यालयात दाखल झाल्या.

मॅक्सवेलना अक्षरशः एका क्षणाची उसंत नव्हती. जवळच्या फोनची घंटी सतत खणखणत होती. ग्राहकांची गर्दी वाढत चाललेली होती. बुकिंग घेणार्‍या कारकुनांची चांगलीच तारांबळ उडालेली दिसत होती. हार्वे मॅक्सवेलचा प्रत्येक क्षण मूल्यवान होता. त्यांच्या ग्राहकांची भरीव गुंतवणूक असणार्‍या बारा स्टॉकना चांगलाच उठाव आलेला होता. त्यातील वेचक स्टॉकमधे हार्वेंची स्वता:ची गुंतवणूकही होती. ते त्या वेळी करार, कर्ज, उचल, पावत्यांच्या जगातच वावरत होते. पै पैशाच्या या खेळात भाव-भावनांना अजिबात थारा नव्हता. सकाळी उठल्यापासून हार्वे मनाने याच जगातले झालेले होते. त्यांना स्वतःचं असं भान नव्हतं.

मुलाखतीसाठी आलेल्या पहिल्या 'ध्यानाला' बरोबर घेउन पीचर हार्वेंच्या केबिनमधे गेला. "या आपल्याकडे स्टेनोच्या जागेसाठी मुलाखत द्यायला आलेल्या आहेत" पीचरनी परिचय करून दिला. हार्वे जवळजवळ किंचाळलेच, "पीचर, कामाचा ताण असह्य होत असेल, तर जोडीला एखादा मदतनीस घ्या. मी कुणालाही मुलाखतीसाठी बोलावलेले नाही. एक वर्षभर सोफिया चांगले काम करते आहे. तिला बदलण्याची काही गरज नाही. मुलाखतीसाठी आलेल्या सगळ्या उमेदवारांना परत पाठवा आणि माझा वेळ पुन्हा वाया घालवू नका".

"म्हातारबुवांनाच कामाचा ताण झेपत नाही खरे तर. यांचा विसरभोळेपणा त्यामुळे दिवसेंदिवस वाढतच चालला आहे" असे पुटपुटत पीचर लगबगीने कँटिनकडे गेला. एक कप चहा घेउन तो लगेच परत आला. हार्वेंची जेवणाची सुट्टी झालेली होती. ग्राहकांची वर्दळही थोडी कमी झालेली दिसत होती. हार्वेंना थोडी उसंत मिळालेली दिसली. इतक्यात त्यांचं लक्ष सोफियाकडे गेलं आणि ते लगबगीने धावतच तिच्या टेबलकडे गेले. समोर बसलेला पीचर हे सगळे बघतो आहे याची त्यांना जाणीवच नव्हती.

"सोफी, मला फक्त दोनचार मिनीटांची उसंत मिळालेली आहे. बर्‍याच दिवसांपासून तुला लग्नाबद्दल विचारणार होतो, पण मग त्यासाठी वेळच मिळाला नाही. मी रिकामटेकड्या लोकांसारखा तुझ्या मागेमागे गोंडा घोळत फिरू शकत नाही. त्यामुळे तुला फक्त दोन मिनीटे विचार करण्यासाठी देतो. मला लगेच निर्णय हवा आहे". सोफियानी आश्चर्यानी त्यांच्याकडे पाहिलं. एक क्षण तिचा स्वतःवरच विश्वास बसला नाही. तिला क्षणभर भोवळच आली. मग स्वतःला सावरत हार्वेंच्या गळ्यात हात टाकत ती म्हणाली, "मी तर आधी घाबरूनच गेले होते. पण आता माझ्या लक्षात येते आहे. कामाच्या प्रचंड दडपणाखाली तुमची ही अशी अवस्था झालेली आहे. हार्वे, स्मरणशक्तीला थोडा ताण देउन पहा. ऑफिसमधून घरी परत जातानाच काल रात्री आठ वाजता सेंट फ्रान्सिस चर्चमधे आपलं लग्न झालेलं आहे".

"अभिनंदन साहेब, हार्दिक अभिनंदन सोफिया मॅडम" पीचर स्वतःला सावरत शांतपणे म्हणाला. सकाळपासून घडणार्‍या अनाकलनीय घडामोडींमागचं कोडं त्या क्षणी उलगडलेलं होतं!

निरूत्तर

मिर्झा बर्जिसचा आणि माझा कित्येक तपांचा पक्का दोस्ताना होता. आमच्या वृत्तीत, स्वभावात आणि कौटुंबीक पार्श्वभूमीत जमीन अस्मानाचा फरक असूनही तो टिकून होता. मिर्झा एका ख्यातनाम नबाबी खानदानातला होता. तो परिस्थितीने पुरता गांजून गेलेला होता. तरीही रक्तात मुरलेली घमेंड, मिजास अजूनही तशीच होती. 'उपरसे शेरवानी और अंदरसे परेशानी' अशा आपल्या केविलवाण्या अवस्थेची जाणीव त्याला वारंवार व्हायची, पण तो पुरता असहाय होता. परिस्थितीवर मात करण्यासाठी काही प्रयत्न करेल तर तो मिर्झा बर्जिस कसला? 'ठेविले अनंते' तैसेची राहून आर्थिक परेशानी लपवून ठेवत आपल्या शेरवानीला मात्र तो प्राणपणाने जपत होता. त्यातच धन्यता मानत होता. शेवटी सुंभ जळाला तरी पीळ जात नाही असे म्हणतात तेच खरे! मग्रुरीने वागलो तरच आपला खानदानी रूबाब समाजाच्या लक्षात येतो असाही या बापड्याचा गोड गैरसमज होता.

एके दिवशी दुपारी आम्ही त्याच्या अलीशान पण पुरता खटारा झालेल्या गाडीतून 'अनारकली'मधे मोजड्या विकत घ्यायला गेलो. मिर्झासाहेबांनी आपल्या गाडीतून खाली उतरण्याची तसदी घेतली नाही. मोठ्या रूबाबात त्याने हॉर्न वाजवला आणि दुकानाच्या मालकाला 'सलीमशाही' मोजड्या दाखवण्याचचं फर्मान सोडलं. या प्रकारच्या मोजड्या मुघल सम्राट वापरायचे असा त्यांचा लौकिक होता. अजूनही गावात शाही खानदानातला असा मिर्झाचा दबदबा होता. दुकानदारानी आपल्या एका चुणचुणीत नोकराला खास त्याच्या तैनातीसाठी धाडलं. दुकानातला मोजड्यांचा एकही प्रकार मिर्झाच्या पसंतीस उतरत नव्हता. तो प्रत्येक नग पाहून तोंड वाकडं करत होता. खरं तर सलीमशाही मोजड्या विकत घेण्याची त्याची ऐपत उरलेली नव्हती. येनकेनप्रकारेण आपला डामडौल दाखवण्यासाठी हौस मात्र फिटलेली नसावी. मला या सार्‍याच अभद्र प्रकाराचा उबग यायला लागला होता.

मिर्झा अक्षरश: भिकेला लागायचे दिवस आता फार दूर नव्हते. इतक्यात एक आंधळा भिकारी आपल्या चारपाच वर्षांच्या मुलीला घेउन आला. "आंधळ्याला काही धर्म करा बाबा" तो भसाड्या आवाजात किंचाळला. "गरीबाला चार आठ आणे मदत करा बाबा, चार दिवस खायाला न्हाई", त्याच्या मुलीनी दीनवाण्या आवाजात विनवणी केली. मिर्झानी त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं, पण त्यांचा ओरडा काही थांबला नाही. शेवटी वैतागून मिर्झा किंचाळला, "चला, व्हा पुढं!". यावर त्या मुलीनी चक्क आपला फाटका फ्रॉक वर करत खपाटीला गेलेलं पोट दाखवलं. मिर्झा पुटपुटला, "साली बेशरम जात! पैसे मिळवायला वाट्टेल ते करतील." तो पुन्हा जोराने खेकसला, "चला पुढे व्हा! बेशरम!!!". भिकारी यावर जागचा हलला नाही. मिर्झानी आपलं दारिद्र्य झाकण्याची ती सुवर्णसंधी दवडली नाही. रागारागाने त्याने आपली गाडी सुरू केली आणि 'अनारकली'मधून काहीही खरेदी न करताच आम्ही परत फिरलो.

या घटनेनंतर काही महिन्यांनी आम्ही एका चित्रपटाला गेलो. चित्रपटात नाविन्य म्हणाल तर नावालाही नव्हतं. उलट अगदी ठरावीक साचेबंद 'मसाला' खचाखच भरलेला होता. नायिका मात्र फटाकडी होती. अभिनय बेताचाच असला तरी दिसायला, नाचायला जोरदार होती. तेवढी एकच जमेची बाजू असली तरी नायिकेमुळे चित्रपट किमान सुसह्य तरी होत होता. मिर्झा नायिकेच्या अदाकारीत पुरता गुंगला होता. कथानकाकडे बहुधा माझंच लक्ष असावं. त्यात नाममात्रही सुसंगती नव्हती. बँकेतल्या एका कनिष्ठ लिपीकाच्या आयुष्याभोवती गोष्ट गुंफलेली होती. या भल्या माणसावर अफरातफरीचा खोटा आळ येतो. हाय खाउन त्याची पत्नी मरते. त्याचा एकुलता एक मुलगा (बहुधा भावी नायक) आपल्या आजीसोबत रहायला लागतो. घरातला कर्ता माणूस तुरूंगात गेल्याने त्यांच्यावर एकदम भीक मागायची वेळ येते. दोघे जोडीने मुंबईतल्या एका बकाल वस्तीतला गजबजलेल्या चौकात पदपाथावर बसून भयाण पार्श्वसंगीताच्या साथीने भसाड्या आवाजात गात भीक मागायला लागतात.

एकीकडे हा प्रसंग सुरू होता, इतक्यात मिर्झा अचानक मला म्हणाला, "तुझा हातरूमाल मिळेल का जरा? मी बहुधा घरीच विसरून आलो आहे." मी निमूटपणे त्याला आपला हातरूमाल दिला. माझ्या लक्षात आलं, की त्या प्रसंगानंतर शेवटपर्यंत मिर्झाची सतत तगमग सुरू होती. त्याला आपल्या भविष्याची चाहूल अस्वस्थ करत असावी. चित्रपट संपल्यावरही तो डोळे पुसतच आपल्या खुर्चीतून उठला. मी सहजच विचारलं, "मिर्झा, तू लेका चक्क रडत होतास की काय?" शरमेने त्याची मान खाली झुकली. पुन्हा उसनं आवसान आणून तो म्हणाला, "मुळीच नाही. माझ्या डोळ्यात सिगारेटचा धूर गेला होता!" त्याच्या आवाजातला कंप स्पष्टपणे जाणवत होता. मला तो काळजाला चरे पाडणारा वाटला.

मिर्झा अचानक उन्मादाचा झटका आल्यासारखा किंचाळला, "दारिद्र्याचं हे असलं उघडं नागडं प्रदर्शन मांडणार्‍या तथाकथित कलाकारांना चाबकानी फोडून काढायला हवं. असल्या चित्रपटांवर सेन्सॉरनीच बंदी घालायला हवी". एवढं बोलून तो अचानक माझ्या हाताचा आधार घेत मटकन खाली बसला. नंतरची चार क्षण टिकलेली शांतता मला स्मशानशांततेसारखी वाटली. स्वत:ला सावरत मिर्झानी मला प्रश्न विचारला, "एवढे पैसे खर्च करून, उधारी करून प्रेक्षक काय हे दारिद्र्य बघायला येतात? या कल्पनादारिद्र्याचा तुला संताप नाही का येत?" मी बिचारा या प्रश्नाचं काय उत्तर देणार होतो? काहीतरी थातुरमातुर उत्तर देणार, इतक्यात ओलावलेल्या पापण्यांची प्रकर्षाने जाणीव झाली. डोळ्यातून नकळत ओघळलेल्या दोन चुकार अश्रूंनीच मिर्झाच्या प्रश्नाचं खरं उत्तर देउन टाकलेलं होतं.

(संकल्पना एका पाश्चात्य लघुकथेवर आधारित)

खिडकी

माधवराव देवळे त्या 'बुद्रुक' खेडेगावात खास विश्रांती घेण्यासाठी गेले होते. त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनी किमान दोन महिने कामकाज बंद ठेउन पूर्णपणे विश्रांती घेण्याची त्यांच्यावर जवळजवळ सक्तीच केलेली होती. कुठलाही शारिरीक किंवा मानसिक ताण त्यांची तोळामासा झालेली प्रकृती लक्षात घेता कदाचित प्राणघातक ठरला असता. अनायासे त्यांच्या बहिणीच्या एका जीवश्चकंठश्च बालमैत्रिणीकडे त्यांची 'पेईग गेस्ट' पद्धतीने राहण्याची व्यवस्थाही झालेली होती. तशी तजवीज बहिणीने करून ठेवलेली होती. माधवरावांजवळ त्यांचा परिचय करून देणारी एक चिठ्ठीही दिली होती. पूर्णपणे अपरिचीत लोकात आणि फारशा सुखसुविधा नसलेल्या एका आडवळणी टिकाणच्या 'बुद्रुक' गावात राहून प्रकृती सुधारण्याच्या दृष्टीने कितपत फायदा होईल याबद्दल माधवराव साशंक होते.

बस थांब्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अनंतराव पाटलांच्या घरी माधवराव पोचले, तेव्हा त्यांना चांगलाच थकवा जाणवत होता. त्यांचं स्वागत स्वत:च्यात तंद्रीत हरवलेल्या एका शाळकरी मुलीनं केलं. त्या मुलीला आपल्याकडे हा आगंतुक पाहुणा येणं फारसं आवडलं नसावं. तिच्या चेहर्‍यावर नाराजीची छटा स्पष्टपणे दिसत होती. "माझी मामी थोड्या वेळात खाली येईल. तोवर मी आपलं सामान ठेवून घ्यायला मदत करते", ती मुलगी वरपांगी का असेना नम्रपणे बोलली. तंद्रीमधून बाहेर आल्यावर ती चांगलीच चुणचुणीत वाटत होती. तिच्या वागण्याबोलण्यात वयाशी विसंगत असा पोक्तपणाही दिसून येत होता. "या गावात आपण पहिल्यांदाच येताय ना?", तिचा अपेक्षित प्रश्न आला. "होय, आणि ते ही डॉक्टरांच्या सल्ल्यावरून, नव्हे हुकूमावरून!" माधवरावांनी कसंबसं कृत्रिम हसू चेहेर्‍यावर आणत उत्तर दिलं.

"मग आपण माझ्या मामीला ओळखत नसाल", तिचा दुसरा प्रश्न. "नाही, मला त्यांचं नाव आणि इथला पत्ता माझ्या बहिणीनी दिला आहे.", माधवरावांनी उत्तर दिलं. "हम्म. तीन महिन्यांपूर्वी माझ्या मामीच्या आयुष्यात ती दुर्दैवी घटना घडली, आणि तेव्हापासून ती भ्रमिष्टासारखी वागते. असंबद्ध वागते बोलते. बहुधा आपल्या बहिणीलाही घडल्या प्रकाराबद्दल काही माहिती नसावी." ती मुलगी म्हणाली. तिचं नाव अबोली होतं. त्या शांत आणि निवांत गावात अपघात किंवा दुर्घटना घडण्याची शक्यता खूपच कमी होती. घराच्या मागच्या बगिच्याकडे तोंड करून असलेली एक भलीमोठी फ्रेंच पद्धतीची खिडकी सताड उघडी होती. हवेत जाणवण्याइतका गारठा असूनही ती बंद केलेली नव्हती.

"काका, ही खिडकी इतका गारठा असूनही उघडी का आहे याचं तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, पण ती दुर्दैवी कहाणीच यामागं आहे. तीन महिन्यांपूर्वी माझे मामा, त्यांचा एक मित्र आणि त्यांचा लाडका शिकारी कुत्रा 'झुमरू' या खिडकीतून उडी मारून घरामागच्या पायवाटेनं नदीपलीकडच्या जंगलात शिकारीसाठी गेले. तो त्यांचा नेहेमीचा आणि सवयीचा रस्ता होता. दुर्दैवानं नदी पार करताना ते एका भोवर्‍यात सापडले. तिघांच्याही मृतदेहाचा शोध आजवर लागलेला नाही. गावात अधूनमधून त्यांच्या आकृती रात्रीच्या काळोखात अस्पष्टपणे दिसतात अशी वदंता आहे."

बोलता बोलता अबोलीचा स्वर थोडा हळवा झाला. आवंढा गिळत ती म्हणाली, "अजूनची माझ्या मामीचा ठाम विश्वास आहे की तिचे यजमान, त्यांचा मित्र आणि झुमरू कुत्रा याच खिडकीतून परत येतील. तिच्या हट्टाखातर ही खिडकी कायम उघडी ठेवावी लागते. मामी दिवसभर तिचे यजमान एका हातात रायफल आणि दुसर्‍या हातात पांढरा ओव्हरकोट घेउन ताडताड चालताना कसे रूबाबदार दिसतात, त्यांना कडक कॉफीच आवडते आणि थालिपीठ लोण्याशिवाय दिलेले चालत नाही असली कौतुकं करत बसते. खरं सांगायचं तर मलाही कधीकधी खिडकीतून पाहताना त्या तीन आकृती दूरवर दिसल्याचे भास होतात." इतकं बोलून अबोली वार्‍याच्या वेगाने बाहेर निघूनही गेली. माधवरावांना थोडं हायसं वाटलं, कारण अबोलीची बडबड ऐकून त्यांचं डोकं गरगरायला लागलं होतं. पोरींची नावं आणि त्यांचं रूप किंवा स्वभाव यात हमखास टोकाची विसंगती का असावी असा विचार करत त्यांनी डोळे मिटून घेतले.

त्यांना थोडी डुलकी लागते न लागते इतक्यात अबोलीची मामी त्यांच्या खोलीत आली. "मला थोडा उशीरच झाला, माफ करा" तिची बडबड सुरू झाली. "मला वाटतं की ही खिडकी उघडी ठेवल्यानं तुम्हाला फारसा त्रास होणार नाही. माझे यजमान शिकारीसाठी बाहेर गेलेले आहेत. ते इतक्यात परत येतील. ते नेहेमी बगिचातून जंगलाच्या दिशेने जाणार्‍या पायवाटेनेच परत येतात." त्यानंतर ओसंडून वाहणार्‍या उत्साहाच्या भरात आपल्या घरातली सजावट, यजमानांचा स्वभाव, त्यांच्या आवडीनिवडी यांच्याबद्दल ती जाडजूड बाई आपल्या नैसर्गिक तारस्वरात तासभर एकसुरी बडबड करत राहिली. या बाईची अखंड सुरू असलेली टकळी एकदाची थांबावी या हेतूने माधवराव थोडा आगाउपणा करत मधेच बोलले, "मी थोडी विश्रांती घेउ का? या गावात मी खरं तर पूर्ण विश्रांती मिळावी या एकमेव हेतूनेच आलो आहे. मला कुठलाही तणाव सहन होत नाही".

"असं काय" अबोलीची मामी शून्यात बघत म्हणाली. माधवरावांच्या बोलण्याकडे तिचं धड लक्ष नव्हतं. बोलताबोलता तिची नजर खिडकीकडे वळली आणि अचानक तिचे डोळे लकाकले, चेहर्‍यावर विलक्षण तजेला आला. खिडकीतून बाहेर बघत ती पुढे बोलायला लागली, "शेवटी एकदाचे हे परत येताना दिसताहेत. बरोब्बर कॉफी घ्यायच्या वेळेला ते इथं पोचतील". इतक्यात अबोली परत आली. ती भयचकीत होऊन खिडकीतून बाहेर बघायला लागली. माधवरावांनी नकळत आपली खुर्ची त्या दिशेला वळवली. घरामागच्या बगिच्यात तीन आकृती दिसत होत्या. त्यातली एक अक्राळविक्राळ शिकारी कुत्र्याची होती. त्यामागून येणार्‍या दोन धिप्पाड पुरूषांपैकी एकाच्या हातात रायफल होती आणि खांद्यावर पांढरा ओव्हरकोट झुलत होता. माधवरावांच्या अंगावर सरसरून काटा आला, पण स्वतःला सावरत एकही शब्द न बोलता ते घराच्या दर्शनी भागाकडे असलेल्या मुख्य दरवाजातून सुसाट पळत बाहेर पडले. अंगातलं उरलंसुरलं त्राण गोळा करून समोरचं पटांगण पार करून बस थांब्याकडे जाणार्‍या हमरस्त्याजवळ एका झाडाखाली ते डोकं धरून मटकन खाली परत बसले ते तिथून थेट बस थांब्यावर जाउन परतीची गाडी पकडायची हा निर्धार करूनच!

"ब्लॅक कॉफी तयार असेलच. आम्ही पहा कसे अगदी बरोब्बर वेळेत परत फिरलो", आपला ओव्हरकोट खुर्चीवर टाकत अबोलीच्या मामांनी त्यांची नेहेमीची फर्माईश केली. "आम्हाला पाहताक्षणी इथून पळून गेलेला तो किडकिडीत माणूस कोण होता?" त्यांनी थोडं आश्चर्यानीच विचारलं. "ते श्री. देवळे होते. बहुधा मनोरूग्ण असावेत. तुम्हाला येताना पाहून भूत पाहिल्यासारखे पळत सुटले. निदान मला तरी ते पाहताक्षणीच थोडे वेडसरच वाटले." पाटलीणबाईंनी उत्तर दिलं.

"मला वाटतं आपल्या झुमरूला पाहून त्यांची अशी गाळण उडाली असेल.", अबोली शांतपणे स्पष्टीकरण द्यायला लागली, "थोड्याच वेळापूर्वी आमच्या गप्पा झाल्या. एकदोन वर्षांपूर्वी त्यांच्या गावच्या कबरस्तानातून 'शॉर्टकट'ने जाताना काही भटकी कुत्री त्यांच्या मागं लागली होती. एका अर्धवट खणलेल्या कबरीमधे उडी मारून त्यांनी एक रात्र तिथेच काढली होती. या प्रसंगाचा त्यांच्या मनावर खोलवर आघात झाला, आणि आजतागायत ते पूर्णपणे बरे झालेले नाहीत." कसोटीच्या क्षणी अजिबात वेळ न दवडता एखाद्या निष्णात तबलजीने 'उपज' अंगाने तिहाई वाजवावी इतक्या सहजतेने लोणकढी थाप मारणं आणि ती लीलया पचवणं हीच तर अबोलीची खासियत होती. या बाबतीत तिचा हात धरू शकेल असा पंचक्रोशीत कुणीही नव्हता!

(एच. एच. मुनरो उर्फ 'साकी' यांच्या 'द ओपन विन्डो' या लघुकथेवर आधारित)

आगंतुक

नव्या वर्षाचा हा पहिला महिना. नेमके बोलायचे झाले तर आज एकतीस जानेवारी. गेले तीस दिवस मी प्रचंड दडपणाखाली आहे. केव्हाही काहीतरी अघटीत घडेल अशी भीती आम्हा तिघांनाही सतावते आहे. एकतीस डिसेंबरच्या रात्री 'ती' पार्टी झालीच नसती तर बरं असं आता आम्हा तिघांनाही राहून राहून वाटतं. आम्हा तिघांव्यतिरिक्त त्या पार्टीला हजर असणारा आमचा मित्र रिचर्ड कॅरेक त्यादिवसापासून बेपत्ता आहे आणि त्याचा शोध घेण्याची हिंमत आम्हा तिघांमधेही नाही. त्या दिवशी कॅरेकने सांगितलेली त्याची चित्तरकथा अशक्य कोटीतली वाटेल अशी असली तरी ती पूर्णपणे काल्पनिक आहे असं आम्हा तिघांनाही वाटत नाही.

आम्ही तिघांनीही विज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखेत 'डॉक्टरेट' मिळवलेली आहे. मी भौतिकशास्त्रात तर मेडिसननी 'अमूर्त' अंकगणितात आणि ब्रॅझेलनी संगणकप्रणालीशास्त्रात जागतिक पातळीवर आपापल्या संशोधनाचा ठसा उमटवलेला आहे. आम्हा तिघांना एकत्र आणणारा आणि आमचा याराना टिकवून ठेवणारा सगळ्यात महत्वाचा दुवा म्हणजे आमचा विज्ञान काल्पनिका लिहीण्याचा छंद. एकतीस डिसेंबरच्या रात्री ठरल्याप्रमाणे आम्ही तिघे मेडिसनच्या घरी एकत्र जमलेलो होतो. तिघांनीही उंची स्कॉचचे दोन दोन लार्ज पेग रिचवलेले होते. हॉलीवूडमधल्या नटनट्यांच्या भानगडींपासून ते राजकारणापर्यंत सगळ्या विषयांवर मनमुराद गप्पा सुरू होत्या. आमच्यासोबत रिचर्ड कॅरेकही त्याची लाडकी रेड वाईन घेत शांतपणे बसलेला होता. तो नेहेमीसारखाच शांत बसून आमची बकवास ऐकत होता.

रिचर्ड कॅरेक हा माणूसच थोडा रहस्यमय आणि आगळावेगळा वाटायचा. तीन वर्षांपूर्वी अचानकच हा आगंतुक आमच्या विद्यापीठात प्रकट झाला. आम्ही स्वत:ला फारफार बुद्धीमान, व्यासंगी, विद्वान वगैरे वगैरे समजत असलो, तरी रिचर्ड या बाबतीत आमच्याही खूपच पुढे होता. त्याची आकलनशक्ती, विद्वत्ता, धारणाशक्ती आणि प्रगल्भता आमच्यापेक्षा कित्येक पटींनी उजवी होती. त्यालाही विज्ञान काल्पनिका लिहीण्याचा नाद लागला आणि क्वचितप्रसंगी का होईना, तो आमच्यात मिसळायला लागला. त्याच्या विद्यापीठात येण्यापूर्वीच्या आयुष्याबद्दल तो एका चकार शब्दानेही कधीच बोलायचा नाही. जवळजवळ पूर्ण दिवस तो वेधशाळेतल्या दुर्बिणीला वाहिलेला असायचा. अपरात्रीसुद्धा तो आपल्या खोलीत भुतासारखा एकटाच बसून आकडेमोड करताना दिसायचा. 'वैश्विक किरण' या विषयात आपलं खूपच प्रगत आणि महत्वाचं संशोधन चालू आहे या व्यतिरिक्त तो आपल्या कामाविषयी काहीही बोलायचा नाही. मात्र बोलण्याच्या ओघात सहज लक्षात यायचं की पार पुरातत्व विद्येपासून ते मानसशास्त्र, तत्वज्ञान आणि खगोलशास्त्रापर्यंत सगळ्याच ज्ञानशाखांचा त्याचा गाढा व्यासंग होता.

सगळ्या फालतू गप्पा संपल्यावर बोलण्याच्या ओघातच आमचा परग्रहावरील जीवसृष्टीबद्दल उहापोह सुरू झाला. आमच्या काल्पनिकांमधून अशा जीवसृष्टीचा उल्लेख हमखास यायचा. माझी एक वाईट खोड आहे, दारू चढली की माझ्यातला सारासार, वस्तुनिष्ठ आणि व्यावहारिक विचार करणारा वैज्ञानीक अंतर्धान पावतो आणि माझा एकदम 'विश्वयोगी ओशो' होउन जातो. मला मनोविष्लेषणपर थापाबाजी करणे, 'जगाच्या कल्याणा संताच्या विभूती' असा मोठेपणा स्वत:वर ओढवून घेणे, जगाचे कल्याण करण्यासाठी काहीच्याकाही उपाययोजना सुचवणे, पांचट विनोद करणे, तर्कशास्त्राचा खिमा करत इतरांना निरूत्तर करणे, आपले विचार प्रत्येक बाबतीत किती जगावेगळे आहेत आणि 'सुलझे हुवे' आहेत याचे रूखवत मांडणे असले झटके यायला लागतात.

मी बरळायला लागलो, "ज्या समाजात आपण राहतो, तिथे बुद्धीवंतांची साली अजिबात कदर नाही. सगळ्याच क्षेत्रात सत्तांध राजकारणी आणि धर्मांध बुवा, बापूंच्या भ्रष्टाचाराचं थैमान सुरू आहे. जातीच्या, धर्माच्या नावाखाली चाललेला गुंडांचा नंगानाच निमूटपणे सहन करावा लागतो आहे. कधीही आण्विक युद्धाचा भडका उडेल आणि या ग्रहाची राखरांगोळी होईल. आपल्या विज्ञान काल्पनिका तरी काय आहेत? उद्विग्नतेतून बाहेर पडण्यासाठी आपण शोधलेली ती एक पळवाट आहे. काल्पनिक विश्वात गुंग झालो की या जगाचा विसर पडतो. सगळे साधूसंतही साले पळपुटेच आहेत. समाजापासून पळून हिमालयात जायचं, आणि मग गुहेत बसून अप्सरांची स्वप्ने पहायची. आपल्यात आणि या पळपुट्या अध्यात्मात काय फरक आहे? माझ्या अध्यात्मात आधी अप्सरा येतात आणि नंतर जमल्यास थोडेफार आत्मज्ञान येते. कवेत अप्सरा नसली तर करायचे काय त्या आत्मज्ञानाचे?" मी मोठ्या आशेने आपला हात टाळीसाठी पुढे केला, आणि बाकी तिघांच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसणारा वैताग पाहून तो निमूटपणे खाली घेतला.

इतक्यात कधी नव्हे ते रिचर्ड कॅरेक स्वत:हून बोलायला लागला, "मला एकदाच माझ्या कल्पनेतल्या परग्रहावर जायची संधी मिळाली आणि दुर्दैवाने तीच माझ्या आजवरच्या आयुष्यातली सर्वात दुर्दैवी घटना ठरू पाहते आहे. ती सगळी कहाणीच मी आता तुम्हाला सांगतो." कॅरेकनी घसा खाकरत त्याच्या नेहेमीच्या संथ लयीत पुढे बोलायला सुरूवात केली, "माझ्या पूर्वायुष्यात मी एक शास्त्रज्ञ होतो. मी बर्‍याच विज्ञान काल्पनिका लिहील्या. माझ्या कथांमधून मी नेहेमीच परग्रहावरच्या एका अर्ध-सुसंस्कृत समाजाचा उल्लेख करायचो. या ग्रहावरच्या लोकांची सरासरी बुद्धीमत्ता असामान्य असायची, पण वैचारिक पातळी अत्यंत खालची! यांचा सगळा काळ युद्ध करण्यात किंवा युद्धाची तयारी करण्यात जायचा. आपल्या कळप करण्याचा वृत्तीमुळे यांनी आपल्याच ग्रहाचे नव्हे तर अंतराळस्थानकांचेही वेगवेगळे झेंडे लावून स्वतंत्र इलाके केलेले असायचे.

एकेदिवशी मला माझ्या वरिष्ठांचा निरोप आला. माझ्या कथासृष्टीत वर्णन केल्याप्रमाणे एक ग्रह खरोखरच जी-आय-ए सूर्यमालेत अस्तित्वात होता. आमच्या मातृग्रहावरच्या प्रगत समाजात देव, देश, धर्म वगैरे खुळचट कल्पना कधीच्याच रद्दबातल झालेल्या होत्या. शिवाय निकृष्ट वैचारिक पातळी असलेल्या आणि मागास आयुष्य जगणार्‍या कित्येक समूहांचे शिरकाण करून माझ्या 'झिऑन' समाजाचे माझ्या संपूर्ण मातृग्रहावर एकछत्री साम्राज्यही स्थापन झालेले होते. आमच्या मातृग्रहावरचे इंधनस्त्रोत संपत आल्यामुळे 'पृथ्वी' नामक या ग्रहावरची निर्दयी संस्कृती नष्ट करून तिथे वस्ती करण्याचा आमचा इरादा होता. तशी योजना सुव्यवस्थितपणे तयार झाल्यावर तिच्या पहिल्या टप्प्यात पृथ्वीवर राहून हेरगिरी करण्यासाठी निवडलेल्या पाच जणात माझा समावेश झाला. माझ्या गुणसूत्रांमधे यथायोग्य बदल करून, आवश्यक ते प्रशिक्षण देउन माझी रवानगी करण्यात आली.

माझ्या मेंदूत बसवलेल्या एका जैविक उपकरणाद्वारे माझ्याशी सतत संपर्क साधला जात होता. माझ्या कल्पनेपेक्षाही पृथ्वीवरचं जग गलिच्छ, ओंगळवाणं, मागास आणि प्रतिगामी निघालं. माझा जीव घुसमटल्यासारखा व्हायला लागला. सुदैवानं मला काही सूज्ञ लोकही भेटले. मी त्यांच्यासारखाच माझ्या मातृग्रहावरच्या खरोखरच्या जीवनशैलीचे वर्णन करणार्‍या कथा विज्ञान काल्पनिका म्हणून लिहायला लागलो. त्यांना खूप प्रसिद्धीपण मिळाली. काही दिवसात अचानक माझा माझ्या मातृग्रहाशी संपर्क तुटला. माझ्या बुद्धीमत्तेच्या जोरावर पृथ्वीवर कोठेही आरामात राहण्याजोगी कमाई करणे मला सहज शक्य होते. माझी माणसं पुन्हा संपर्क साधतील ही वेडी आशाही होती." कॅरेक थोडावेळ बोलायचा थांबला.

"मग या ग्रहावरून तू परत कधी आलास?", कॅरेकनी नशेत बडबड केली असं समजून ब्रॅझेलनी थट्टेखोर स्वरात प्रश्न विचारला. "परत कुठला जातोय? इथेच अडकून पडलोय मी असहायपणे. साहित्यीक भाषेत जिला 'त्रिशंकू अवस्था' म्हणतात ती हीच!", कॅरेक हताशपणे म्हणाला आणि रडवेल्या चेहर्‍याने पार्टी अर्ध्यात सोडून लांबलांब ढांगा टाकत निघून गेला. नशेत असल्याने सगळ्या गोष्टींचा अन्वयार्थ लावायला आम्हाला थोडा विलंबच लागला, पण मग मात्र आमची नशा खाडकन उतरली. नीट विचार केला तेव्हा कॅरेक अजिबात नशेत नव्हता यावर माझं, ब्रॅझेलचं आणि चक्क मेडिसनचंही कधी नव्हे ते एकमत झालं. कशीही असली तरी मला प्रिय असलेली पृथ्वीवरची आमची 'महान मानवी संस्कृती' खरोखर धोक्यात होती?

(एडमंड हॅमिल्टन यांच्या 'एक्झाईल' या लघुकथेवर आधारित)