Saturday, 15 February 2014

सामरस्य सिद्धांत - श्री संत बाबामहाराज आर्वीकर

 ज्ञानेश्वरीतला अंतरंग सोहळा प्रकट करणारा श्री संत बाबामहाराज आर्वीकर यांच्या ग्रंथातला एक अप्रतिम वेचा:

ज्ञानेश्वरीचे लाडके नाव आहे 'भावार्थदीपिका'. या अभिधानात तिचे कार्य व तिच अंतरंगीय सोहळा प्रकट होतो. ज्ञानाची स्मामिनीच भक्ती आहे. ज्ञानेश्वरी ज्ञानविलासिनी असेलहि, पण ती भक्तीची अभिमानी आहे. श्रांतास छाया, दुखि:तास माया व पतितास दया अशी करूणामूर्ति म्हणजे ज्ञानेश्वरी. तत्वज्ञान व काव्य, जीवन व साक्षात्कार, अर्थ व संवेदना, साहित्य व चमत्कृती, दिव्यता व रसोन्मेष ज्या तर्‍हेने ज्ञानेश्वरीत क्रीडले आहेत, त्या तर्‍हेने मराठी साहित्यप्रांगणात अद्याप तरी अविष्कृति झालेली नाही.
ज्ञानदेवीचा मौलिक सिद्धांत अद्वैतवाद नव्हे तर द्वैताद्वैतविलक्षण भक्ती हाच होय. यालाच सामरस्य सिद्धांतही म्हणतात. विश्वात्मदेवाच्या पूजनार्थ ज्ञानदेवांच्या तबकात कर्म, ज्ञान, योग, मंत्र व तंत्र या पंचज्योतींचा भक्तीमयी प्रकाश आहे. ज्ञानेश्वरीचा भक्तीपंथ हा मोक्षाच्या वाटेवरून वैकुंठपीठास जाणारा नव्हे, तर मोक्षाचा अधिपति भगवंत हा वैराण वाळवंटात सवंगड्यांसमवेत नाचण्यास येण्यासाठी आखलेला पंथ आहे. ज्ञानेशांनी संपूर्ण महाराष्ट्रदेश परिशुद्ध जीवनधर्माने सचेत करून ओजस्वी व तेजस्वी धर्मपरंपरा निर्माण केली.
ज्ञान, कर्म वा योग हे भक्तीवाचून शून्य होत. भक्तीतूनच ते उगवतात व भक्तीरूप होऊन अंती भक्तविलासात प्रकट होतात हे मर्म जाणावे. आजच्या काळास योग्य वळण देण्यास भक्तीपंथाचा राजमार्गच संतांना रूचला आणि तोच त्यांनी विशेषे गौरवला. देवतेची कल्पना केवळ जीवदशेसाठीच ते मानतात, नाहीतर त्यांची देवता लागलीच 'विश्वात्मक रूप' धारण करते. ज्ञानेश हे सर्व संप्रदाय आपलेच मानीत आहेत, म्हणूनच की काय आज ज्ञानेशांनी दिग्दर्शित केलेल्या भगवान विठ्ठलाच्या नगरीत, संतांचे माहेरी सर्व संप्रदाय एकत्र होऊन 'वारकरी' म्हणून पंढरीच्या वाळवंटात निर्मळपणे व एकोप्याने वावरताना दिसतात. त्यांचे भक्तीमत ही एका विशाल व करूणामयी भावदशेचीच अखंड भारतवर्षास मिळालेली देणगी आहे.
ज्ञानेशप्रणित भक्ती पूर्ण वेदप्रणित आहे पण याहीपुढे तिच्या उदारतेने जीवनपद्धतीतली मोठीच उणीव भरून निघाली आहे. वर्णरहित आराधना व जीवनरचना ही त्यांच्या भक्तीची महानता व विशेषता होय. गुरूतत्वाचेच ईश्वरसंज्ञक पूजन त्यांच्या भक्तीत आहे. चार वर्णांच्या कर्मकांडी बेबंद धार्मिकशाहीला आलेले ढोंग वा दंभ हे स्वरूप मोडून त्यांनी सर्वांस जीवनकल्याणाची 'राजमार्गी' वाट प्रशस्त केली आहे. तसेच त्यांनी जातीपातीपेक्षा गुरूंच्या स्थितीचा विचार केला आहे. अहो! गुरूंची जात पाहणारे वेडेच नव्हेत का? ब्रह्म कोणत्या जातीचे असे विचारणे म्हणजे ब्रह्मताच सोवळ्यात बांधणे होय. अज्ञानाची परिसीमा आहे, हा गुरूंच्या ज्ञातीवैशिष्ट्यांचा विचार! व्यवहाराच्या कडीकुलुपात ब्रह्मता ओवळी म्हणून बांधू नका. ज्ञानेशांनी सर्वप्रथम हा आवाज उठविला. तुकोबा-रामेश्वर, चोखोबा-गिरधरपंत अशा गुरूशिष्य जोड्या यातूनच उदयाला आल्या. असा कोण मूर्ख शिष्य आहे की जो गिरिकंदरी भ्रमण करणार्‍या सिद्ध पुरूषास प्रथम जात विचारील? त्याची जातपात सारे हरवलेले असते. ज्ञानेश म्हणतात - यातिकुळ माझे गेले हरपून, वेदसंपन्नु होय ठायी, परि कृपणु ऐसा आणु नाही. नाथसंप्रदायाचे ते तत्व आहे. जीव वा हंस हीच जात, ब्रह्म जे त्याचे स्थान, एवढेच जाणले व तसा आदेश प्रसृत केला. उदारता, सामरस्यबोध, व्यापकता व सहजता यामुळे ज्ञानेशप्रणित भक्तीसिद्धांत आपल्या आगळ्या वैशिष्ट्याने आजही भारतवर्षात नांदत आहे.
- श्री संत बाबामहाराज आर्वीकरकृत 'दिव्यामृतधारा' ग्रंथातून