Saturday 8 February 2020

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: प्रस्तावना

|| श्री गणेशाय नमः ||

भगवान दक्षिणामूर्ती आणि भगवद्पाद पूज्य श्री आदि शंकराचार्य प्रणित अद्वैत वेदांताची परंपरा अखंड ठेवणार्‍या, तसेच आधुनिक काळाशी सुसंगत पद्धतीने 'आत्मविचार' या साधनापद्धतीचे पुनरुज्जीवन करणार्‍या भगवान श्री रमण महर्षीं या लोकोत्तर ज्ञानी सत्पुरुषाविषयी मराठी भाषेत फारसे साहित्य उपलब्ध नाही.  हे लक्षात घेता आंतरजालावरच्या मराठी साहित्यसागरात भगवान श्री.रमण महर्षींविषयी थोडीफार भर  घालावी असा मानस आहे.

महर्षींची शिकवण आणि त्यांचा उपदेश या विषयीचा 'प्रमाण ग्रंथ' अशी मान्यता डेव्हिड गॉडमन यांनी महत्प्रयासाने संकलित केलेल्या 'बी अ‍ॅज यू आर' या ग्रंथालाच जगभर विखुरलेल्या रमणभक्तांकडून मिळालेली दिसते. महर्षींनी कधीच औपचारिक स्वरूपाची व्याख्याने किंवा प्रवचने दिली नाहीत. महर्षींना वेळोवेळी भेटलेल्या साधकांशी घडलेल्या त्यांच्या व्यक्तिगत स्वरूपाच्या संवादांचे अध्यात्मिक मोल देशोविदेशीच्या साधकांना उमगत गेले, आणि प्रश्नोत्तर स्वरूपात या संवादांचे संकलन आणि अनुवाद करण्याचा परिपाठ सुरू झाला. श्री. गॉडमन यांनी वेगवेगळ्या कालखंडातल्या या संवादांचे संकलन तर केलेलेच आहे, त्या जोडीला चर्चिल्या गेलेल्या विषयांच्या अनुषंगाने वर्गवारी करून सुरेख मांडणीही केलेली आहे. प्रत्येक विषयाला अनुसरून अत्यंत समर्पक अशी प्रस्तावनादेखील श्री. गॉडमन यांनी लिहीलेली आहे. हा सगळा भाग मुळातूनच वाचण्यासारखा आहे. ग्रंथाचे पुढील प्रमाणे सहा विभाग आहेतः १. स्वरूपबोध २. आत्मविचार आणि शरणागती ३. सद्गुरू ४. ध्यान आणि योग ५. प्रचिती आणि ६. अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोह.

गॉडमन यांच्या क्रमवारीशी सुसंगती ठेवत त्यातील निवडक भागाचा अनुवाद करून तसेच पावसच्या परमहंस स्वामी स्वरूपानंद या सत्पुरूषाच्या लेखनातले काही संदर्भ घेत  या पुस्तकाचे सिंहावलोकन करण्याचा प्रयत्न करणार आहे. महर्षींविषयी मराठी भाषेत फारशी पुस्तके उपलब्ध नाहीत, हे लक्षात घेता आंतरजालावर मराठीत उपलब्ध असलेल्या विशाल ज्ञानसागरात महर्षींविषयक माहिती उपलब्ध करून देण्यात खारीचा वाटा उचलणे इतकाच या लेखनामागचा उद्देश आहे. संदर्भासाठीचे साहित्य (रेफरन्स मटेरियल) स्वरूपाचे हे लेखन आहे हे पुन्हा एकदा नमूद करत लेखनाचा श्रीगणेशा करतो.

No comments:

Post a Comment