Tuesday, 30 June 2020

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण १९ - ईश्वराचे स्वरूप

वैदिक सहा दर्शनांपैकी (सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा आणि वेदांत) सांख्य आणि मीमांसा ही दर्शने निरीश्वरवादी आहेत. निरीश्वरवाद ही संकल्पना जुनीच आहे. वैदिक परंपरेला निरीश्वरवादाचे वावडे नाही. असे असले तरी काळाच्या कसोटीवर उतरल्याने (मूळ तत्वांना बाधा न आणता बदलत्या काळानुसार अत्यंत उच्च कोटीच्या सत्पुरूषांनी वेळोवेळी उजाळा दिल्याने) वेदांत तत्वज्ञानाची महती आजही अखंडपणे टिकून आहे या गोष्टीचा आवर्जुन उल्लेख करत मूळ विषयाकडे वळतो.
या प्रकरणात ईश्वराच्या स्वरूपाविषयीचा भगवान रमण महर्षींचा उपदेश आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:
प्रथमदर्शनी भगवान रमण महर्षींनी ईश्वराविषयी केलेली विधाने एकमेकांशी विसंगत असल्याने तसेच काही बाबतीत ती परस्पर विरोधी देखील असल्याने कोड्यात टाकणारी वाटतात. प्रसंगोप्पात त्या त्या संदर्भानुसार परमेश्वर कधीच काही करत नाही (तो सदैव अकर्ता असतो), तर कधी ईश्वरी संकल्पाविना झाडाचे पान देखील हलत नाही अशी विधाने ते करत असत. कधी ईश्वर ही एक मनोनिर्मीत संकल्पना आहे, तर कधी ईश्वर ही चराचराला व्यापून दशांगुळे उरणारी एकमेव वस्तुस्थिती किंवा सद्वस्तु (सत्य) असल्याचे ते सांगत असत. प्रश्नकर्त्यांच्या आकलनक्षमतेतला तसेच त्यांच्या वैचारिक पार्श्वभूमीतला फरक लक्षात घेतला, तर महर्षींसमवेत त्यांचे वेगवेगळ्या पातळ्यांवर संवाद होत असल्याचे जणू प्रतिबिंबच महर्षींनी दिलेल्या वरपांगी पाहता विसंवादी वाटत असलेल्या उपदेशांमधे स्पष्टपणे दिसून येते.
सगुण साकार स्वरूपात ईश्वराची भक्ती करत असलेल्या साधकांचा बुद्धिभेद न करता देव मनुष्य-सदृश स्वरूपात अस्तित्वात आहे या गृहीतकार आधारित असलेले विवेचन महर्षी करत असत. ईश्वरच सृष्टीचा निर्माता आहे, श्रीकृष्णाने करंगळीने गोवर्धन पर्वत उचलावा तसे आपल्या दैवी शक्तीने तोच जगाचा भार वाहतो आहे, सगळ्या जीवसृष्टीचे भरणपोषण करण्याची काळजी तोच घेतो आहे, तसेच ईश्वरी संकल्पाच्या विरोधात गेले असता काहीही साध्य करता येत नाही - साधारणत: अशा स्वरूपाचा उपदेश सगुण साकार उपासकांना महर्षी देत असत. साधकाचे/ साधिकेचे स्वतंत्र व्यक्तिमत्व जोवर अस्तित्वात आहे, तोवर सगुण साकार ईश्वरभक्ती उपकारक आहे (किंवा तोच चित्तशुद्धीचा राजमार्ग आहे) हा महर्षींच्या शिकवणीचा गाभा होता. (हाच मार्ग पुढे अनन्य शरणागतीच्या/ समर्पणभावाच्या आणि ओघानेच आत्मज्ञानप्राप्तीच्या दिशेने जातो. 'भक्ती ही ज्ञानमाता आहे' असे महर्षी नेहेमी सांगत असत).
त्या उलट सगुण साकाराविषयी आकर्षण नसलेल्या (निर्गुण निराकाराकडे ओढा असलेल्या) साधकांना ईश्वर आणि ईश्वरी सत्तेविषयीच्या उपरोक्त संकल्पना 'अथ ते इति' मनोनिर्मीत असून प्रत्येकाच्या अंतर्यामी जन्मजातच लाभलेल्या ईश्वरी प्रचितीचा/ सच्चिदानंद स्वरूपाचा (हृदयस्थो जनार्दनः) अनुभव घेण्यात त्या बाधक ठरतात असा उपदेश महर्षी देत असत. महर्षींच्या सर्वोच्च पातळीवरच्या उपदेशात 'ईश्वर' तसेच 'स्व-स्वरूप' या शब्दांचा प्रयोग आत्मसाक्षात्कार झाल्यावर ज्या स्वयंसिद्ध स्वसंवेद्य परतत्वाची (सर्वेश्वराची) प्रचिती येते, त्या अद्वैतानुभूतीचेच जणू ते समानार्थी शब्द असावेत अशा प्रकारे केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे महर्षींच्या उपदेशानुसार आत्मसाक्षात्कार हाच ईश्वरी साक्षात्कार आहे. ईश्वराची (द्वैतभावाने) प्रचिती घेणे असा ईश्वरी साक्षात्काराचा अर्थ होत नाही, उलट साधक आणि ईश्वर यांच्या संबंधातला द्वैतभाव नष्ट झाल्यावर साधकाचा आपल्या स्वायत्त अस्तित्वाचा भ्रम लयाला गेल्याने त्याला एकतत्वाचा बोध होतो असा अर्थ महर्षींना अभिप्रेत आहे या त्यांनी वेळोवेळी केलेल्या विवेचनातून स्पष्ट होते (उदाहरणः अरे अरे ज्ञाना झालासी पावन । तुझें तुज ध्यान कळों आले ॥ तुझा तूंचि देव तुझा तूंचि भाव । फिटला संदेह अन्य तत्त्वी ॥ - संत ज्ञानेश्वर महाराज).
भगवान रमण महर्षींनी आत्मानुभवाच्या पातळीवरून केलेल्या ईश्वरविषयक विवेचनाचा गोषवारा असा घेता येईलः
१. ईश्वर स्वसंवेद्य, स्वयंसिद्ध आणि निराकार आहे. ईश्वर उपाधी रहित, निखळ अस्तित्वमात्र तसेच विशुद्ध चैतन्यस्वरूप आहे.
२. ईश्वरी शक्तीच्या आधारे ईश्वरातच जग प्रकट होते (ईश्वर आणि जगाचा स्वरूप - संबंध आहे), मात्र तो विश्वाचा निर्माता नाही. संकल्प आणि वासनांपासून ईश्वर नित्यमुक्त आहे. ईश्वरी अस्तित्व स्वयंसिद्ध असले तरी ईश्वर कधीच संकल्पयुक्त क्रिया करत नाही.
३. आपण आणि ईश्वर एकरूप असल्याचा बोध नसेल, तर स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा भ्रम निर्माण होतो. या भ्रमाचे आवरण दूर केले की फक्त ईश्वरच बाकी उरतो किंवा साधक आणि ईश्वर एकरूप होऊन जातात (उदा. देव पाहावयासी गेलो, तेथे देवची होउनी ठेलो - संत तुकाराम महाराज).
सर्वेश्वराव्यतिरिक्त हिंदू पुराणांमधे नॉर्स किंवा ग्रीक पुराणांप्रमाणेच बहुविध देव/ देवतांचे वर्णन केलेले आहे. याच देव/ देवता सांप्रतच्या काळात हिंदू धर्माचे प्रमुख वैशिष्ट्य झाल्याचे दिसून येते. या देव देवता त्यांची उपासना करत असलेल्या लोकांइतक्याच सत्य आहेत असे सांगून महर्षी कित्येकांना आश्चर्याचा धक्का देत असत. आत्मसाक्षात्कार झाल्यावर ईश्वर (एकेश्वरवादी) असेल किंवा बहुविध देव/ देवता (इष्टदैवत या स्वरूपात) असतील; साधकांच्या दृष्टीने पाहता त्यांचे प्राक्तन एकसारखेच असते (देवतेचे स्वतंत्र अस्तित्व उरत नाही, साधकच उपास्य देवतेत विलीन होऊन जातो) हे महर्षीं मान्य करत असत. साक्षात्कारी स्थिती प्राप्त करण्याआधी विश्वाचे संचलन करत असलेल्या सर्वोच्च ईश्वरी सत्तेने नेमेलेले विशिष्ट जबाबदारी पार पाडणारे उच्चपदस्थ अधिकारी अशा स्वरूपात देव/ देवतांचे पूजन करणे किंवा त्यांची सकाम उपासना करण्याला देखील महर्षी मान्यता देत असत.
प्रश्नः ईश्वराचे वर्णन सगुण साकार आणि निर्गुण निराकार दोन्ही पद्धतींनी केले जाते. सगुण साकार ईश्वराच्या सर्वव्यापी स्वरूपातच अवघे जग समाविष्ट आहे असे मानले जाते. असे असेल तर या जगाचाच एक घटक असलेल्या आम्हाला परमेश्वराच्या व्यक्त स्वरूपाचा सहजतेने प्रत्यय यायला हवा.
रमण महर्षी: ईश्वराच्या तसेच जगाचा स्वरूपाविषयी किंवा सत्यासत्यतेविषयी निर्णय घेण्याआधी तुम्ही स्व-स्वरूपाची ओळख करून घेणे तुमच्या हिताचे आहे.
प्रश्नः स्व-स्वरूपाचा बोध झाल्यानेच ईश्वरी साक्षात्कार घडेल?
रमण महर्षी: खचितच, देव तुमच्या अंतर्यामी आहे.
प्रश्न: मग स्व-स्वरूपाला जाणून घेण्यात किंवा ईश्वरी साक्षात्कार होण्यात अडसर कशाचा आहे?
रमंण महर्षी: इतस्ततः भटकणारे मन आणि जगण्याची विपर्यस्त पद्धत.
प्रश्नः ईश्वर ही एक व्यक्ती आहे का?
रमण महर्षी: होय, ईश्वर नेहेमीच प्रथमपुरूषी एकवचनी ('मी' चे शुद्ध चैतन्यस्वरूप) असतो, तो नेहेमी दत्त म्हणून तुमच्या पुढ्यात उभा असतो. तुम्ही जागतिक घडामोडींना अवास्तव महत्व देत असल्याने तो दृष्टीआड होतो. तुम्ही अवांतर गोष्टींमधे स्वारस्य घेणे थांबवले आणि केवळ ईश्वरप्राप्तीचाच मनोमन ध्यास घेतला तर (अवांतर गोष्टी दृष्टीआड होत) सच्चिदानंद स्वरूपात फक्त त्याचेच प्राकट्य शिल्लक उरते.
प्रश्नः आपण असे सांगता की ईश्वरविषयक मांडलेली कुठलीही व्याख्या, मग ती कितीही उच्च उदात्त आणि महान असेल, तरी ती निव्वळ संकल्पनाच असते. याचा अर्थ असा घ्यावा का की ईश्वरच अस्तित्वात नाही?
रमण महर्षी: नाही, (ज्याच्याविषयी कुठलीही संकल्पना शब्दात मांडता येत नाही असे) ईश्वराचे अस्तित्व नित्यसिद्ध आहे.
प्रश्नः मी जेव्हा जेव्हा सगुण साकार रूपात ईश्वराचे पूजन करतो, दर वेळी आपण काही चूक तर केली नाही ना असा एक संदेह माझ्या मनात निर्माण होतो. अमर्याद असलेल्या ईश्वराला मर्यादेत बंदिस्त करणे, निराकाराला साकार स्वरूपात भजणे हा एक प्रकारचा प्रमादच नाही का? त्याच वेळी निर्गुण निराकार स्वरूपात ईश्वरी उपासना करताना सातत्य ठेवणे मला कठिण जाते.
रमण महर्षी: तुम्ही विशिष्ट नावाने पुकारले असता लगेच प्रतिसाद द्याल की नाही? तुम्ही नामरूपात्मक जगतच सत्य आहे असे मानून जगता, तोवर सगुण साकार स्वरूपातच तुम्ही ईश्वरी उपासना करावी यात आक्षेपार्ह काय आहे? आपल्या स्वरूपाचा बोध होत नाही तोवर ईश्वरी उपासना सुरू ठेवा, ती सगुण साकार किंवा निर्गुण निराकार स्वरूपात असल्याने काही फरक पडत नाही.
पुरवणी:
पावसच्या परमहंस स्वामी स्वरूपानंदांनी केलेले मार्गदर्शन अध्यात्मिक साधकांच्या दृष्टीने मोलाचे आहे:
शब्दाचे पांडित्य, कल्पनेच्या गोष्टी, वाउगी चावटी, करू नये
तेणे पोटी उठे, दंभ अभिमान, आत्म-समाधान दूर राहे
गोडी कळावया, द्यावा गूळ खाया, देव ओळखाया, स्वानुभव
स्वामी म्हणे नाही, पांडित्याचे काम, स्वये आत्माराम, दाखवावा
(संदर्भः स्वामी स्वरूपानंद कृत संजीवनी गाथा)
स्वामीजींची वर-प्रार्थना अशी आहे:
उदारा जगदाधारा देई मज असा वर | स्व-स्वरुपानुसंधानी रमो चित्त निरंतर ||१||
काम-क्रोधादिका थारा मिळो नच मदंतरी | अखंडित वसो मूर्ति तुझी श्रीहरी साजिरी ||२||
शरीरी हि घरी दारी स्त्रीपुत्रादि परिग्रही | अनासक्त असो चित्त आसक्त त्वदनुग्रही ||३||
नको धन नको मान नको लौकिक आगळा | सोडवी हा परी माझा मोहपाशातुनी गळा ||४||
नको भोग नको त्याग नको विद्या नको कला | अवीट पदपद्माची अमला भक्ति दे मला ||५||
नर नारी हरिरूप दिसो बाहेर अंतरी | राम कृष्ण हरी मंत्र उच्चारो मम वैखरी ||६||
मी-माझे मावळो सर्व तू तुझे उगवो अता | मी-तूपण जगन्नाथा, होवो एक चि तत्वता ||७||
देव-भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता | दाखवी देव-देवेशा, प्रार्थना ही तुला आता ||८||
(संदर्भः स्वामी स्वरुपानंद कृत भावार्थ ज्ञानेश्वरी)

Sunday, 28 June 2020

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण १७ - विश्वनिर्मिती विषयक सिद्धांतप्रणाली आणि जगाचे सत्यत्व

या प्रकरणापासून 'अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोह' हा विभाग सुरू होतो. या विभागातल्या पहिल्या प्रकरणात विश्वनिर्मिती संबंधित विविध सिद्धांतप्रणाली तसेच जगाच्या सत्यत्वाविषयीचा भगवान रमण महर्षींचा उपदेश आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:
अध्यात्मिकतेशी संलग्न असलेल्या सैद्धांतिक प्रणालींमधे रमण महर्षींना 'न के बराबर' इतकेच स्वारस्य होते. 'स्व' विषयीचे सजग भान जागृत ठेवणे ही साधकांच्या जीवनातली सर्वोच्च प्राथमिकता व्हावी ही एकमेव गोष्ट महर्षींच्या दृष्टीने सगळ्यात मोलाची होती. ती साध्य करायची असेल तर तर्कवितर्क करण्यात वेळ दवडण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती (साधना/ उपासना) करणेच अत्यंत महत्वाचे आहे असे आग्रही प्रतिपादन ते सातत्याने करत असत. निव्वळ सैद्धांतिक स्वरूपाच्या चर्चांना प्रोत्साहन मिळू नये या दृष्टीने तर्ककुतर्क सुरु झाले की महर्षी एक तर मौन धारण करत असत, किंवा शक्य असेल तर प्रश्नकर्त्याला ' जो सगळ्या शंका कुशंका उपस्थित करतो आहे त्याच्या स्वरूपाचा शोध घेण्याकडे लक्ष केंद्रित केलेत तर तेच तुमच्या हिताचे ठरेल' असे सांगत संवादाची दिशाच बदलण्याचा ते प्रयत्न करत असत. क्वचित प्रसंगी साधकांच्या दृष्टीने खरोखर उपयुक्त ठरेल असे वाटले तरच तत्वज्ञानाच्या विविध पैलूंवर महर्षींनी सविस्तर भाष्य देखील केलेले दिसते. प्रश्नकर्त्याने तळमळीने विचारलेले प्रश्न संपल्यावर त्याने/ तिने निव्वळ आपलाच मुद्दा पुढे रेटण्यासाठी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली किंवा संवादाचा रोख वांझोट्या बौद्धिक कसरतींच्या ('स्टराईल इंटेलेक्चुअलिझम') दिशेने जातो आहे हे लक्षात आल्यावर मोठ्या खुबीने विषयांतर करून प्रश्नकर्त्याचे लक्ष त्याच्या/ तिच्या जिव्हाळ्याच्या तसेच व्यावहारिक दृष्ट्या उपयुक्त असलेल्या विषयांकडे वळवण्यात महर्षी कुशल होते.
जगाचे सत्यत्व किंवा विश्वाच्या उत्पत्तीबाबात सामान्यज्ञानाने ('कॉमन सेन्स') काढलेल्या निष्कर्षांपेक्षा रमण महर्षींचा दृष्टीकोन खूपच आगळावेगळा असल्याचे सर्वज्ञात असल्याने त्यांच्याबरोबर झालेल्या तात्विक चर्चेत हे दोन्ही विषय प्रामुख्याने चर्चिले जात असत. प्रश्नकर्त्याची भूमिका तसेच त्याच्या/ तिच्या वैचारिक परिपक्वतेशी सुसंगत ठरतील अशा पद्धतीने अन्य तात्विक विषयांप्रमाणेच महर्षी या दोन्ही विषयांवर दिलेली उत्तरे देखील शिंप्याने एखाद्याच्या मापाचे कपडे शिवावे तद्वतच 'बेतून' देत असत. असे असले तरी महर्षींच्या संकल्पना बहुसंख्य लोकांनी नि:शंकपणे स्वीकारलेल्या तसेच मनोभावे अंगिकारलेल्या भौतिक जगाच्या सत्यत्वाचे पूर्णपणे खंडन करण्याकडे झुकलेल्या होत्या हे सहज लक्षात येते.
भौतिक जगाविषयी बोलताना महर्षी तीन वेगवेगळ्या भूमिका घेत असत. तिन्ही भूमिकांचे महर्षींनी वेळोवेळी (ठराविक परिप्रेक्ष्यात) समर्थन केलेले दिसले, तरी त्यांनी वेळोवेळी केलेल्या टिकाटिप्पणींकडे साक्षेपाने पाहिले असता पहिले दोन सिद्धांतच सत्य आहेत किंवा साधकांसाठी उपयुक्त आहेत असे त्यांचे ठाम मत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
१. अजातवाद ('अगा जे घडलेची नाही', कार्यकारणभाव पूर्णपणे नाकारणारा सिद्धांत, अध्यात्मिक सत्य) -
जगाच्या उत्पत्तीसंबंधी विचार करू पाहता मुळात जगाची उत्पती कधीच झालेली नाही असे प्रतिपादन करणारी 'अजातवाद' ही एक प्राचीन हिंदू तत्वप्रणाली आहे. भौतिक जगातल्या कार्यकारणभावाला ही तत्वप्रणाली पूर्णपणे नाकारते. ज्ञानसिद्ध व्यक्तीची प्रचिती लक्षात घेतली तर आत्मतत्व ही एकमेव सद्वस्तु अपरिवर्तनीय वास्तविकतेच्या स्वरूपात निरंतर नांदत असते. त्यामुळे आत्मस्वरूपात कुठलीही गोष्ट अस्तित्वात येणे किंवा तिचे अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यताच नसते. जगाच्या उत्पत्तीविषयीचच्या बहुतांशी सगळ्याच सिद्धांतप्रणाली काळ, अवकाश आणि कार्यकारण भावावर आधारित असल्याने या तीन गोष्टी गृहीत न धरता त्या मांडताच येत नाहीत. अजातवाद ही एकमेव पूर्णपणे विपरीत भूमिका घेणारी सिध्दांतप्रणाली आहे. अजातवाद असे सांगतो की काळ, अवकाश आणि कार्यकारण भावाचे अस्तित्व फक्त अज्ञानी व्यक्तीच्या मनातच असते. आत्मप्रचिती आली की या तिन्ही गोष्टी अस्तित्वातच नाहीत असा बोध होतो.
अजातवाद सिद्धांतप्रणाली जगाचे सत्यत्व (व्यावहारिक वस्तुस्थिती) नाकारत नाही. जगाच्या उत्पत्तीची प्रक्रिया मात्र अजातवादाला पूर्णपणे अमान्य आहे. ज्ञानी व्यक्तीला जगाच्या सत्यत्वाचाच अनुभव येतो, मात्र परस्परांवर क्रिया प्रतिक्रिया घडत असल्याने सतत परिवर्तनशील असलेल्या नानाविध प्रकारच्या जड वस्तु आणि उर्जा यांची गोळाबेरीज असे त्या जगाचे स्वरूप नसते. ज्ञानदृष्टीने पाहता आत्मस्वरूपात अकारण प्रकट झालेला एक देखावा इतकेच जगाचे सत्यस्वरूप आहे. हा मुद्दा उलगडून दाखवताना महर्षी असे सांगत असत की जगत रूपी देखाव्याचे खरे स्वरूप किंवा त्या देखाव्यामागे सुप्त स्वरूपात असलेले पायाभूत चैतन्य (substratum) आणि स्वसंवेज्ञतेचे कार्यकलाप संभवत नसलेले निखळ अस्तित्व (beingness of the Self) ही एकच गोष्ट असल्याने स्वसंवेज्ञतेतच अपरिहार्यपणे जगद्रूप असलेला देखावा समाविष्ट झालेला असतो. ज्ञानसिद्ध व्यक्तीसाठी जग प्रकट स्वरूपात दृष्टीगोचर असल्याने नव्हे, तर आत्मस्वरूपाचाच एक अविभाज्य घटक या स्वरूपात सत्य असते.
जगाचे उगमस्थान (स्वसंवेज्ञता) तसेच त्याच्या अनेकत्वामागे दडलेल्या एकत्वाविषयी अज्ञानी व्यक्ती मात्र पूर्णपणे अनभिज्ञ असते. परिणामस्वरूप ज्ञानेंद्रियांमार्फत मिळवलेल्या माहितीचा सातत्याने चुकीचा अन्वयार्थ लावत उर्जेच्या संयोगाने क्रिया प्रतिक्रियांमधे गुंतलेल्या स्वायत्त वस्तुंचा समूह अशा स्वरूपात अज्ञानी व्यक्ती तिच्या मनानेच सतत आभासी जगाची निर्मिती करत राहते. अज्ञाननिर्मित जग मूळ वस्तुस्थितीवर मनाने आरोपित केलेले असल्याने ज्ञानदृष्टीने पाहता त्याचे मूल्य स्वप्नाइतकेच आहे. या सगळ्या उहापोहाचे सार रमण महर्षी एका वाक्यात सांगत असत - आत्मस्वरूपात अंतर्भाव असलेला एक देखावा या स्वरूपात जग सत्य आहे, मात्र मनाने मूळ सत्यस्वरूपावर आरोपित केलेले जग मिथ्या आहे.
२. दृष्टी - सृष्टी वाद (मी आहे त्यामुळे जग आहे, मीच माझे जग निर्माण करतो, प्रातिभासिक सत्य) -
'अजातवाद' सिद्धांतप्रणाली प्रश्नकर्त्याच्या पचनी पडत नसेल तर महर्षी असे प्रतिपादन करत असत की 'मी आहे' या विचाराबरोबरच ('मी' च्या सापेक्षतेत) जग अस्तित्वात येते (उदा. गाढ झोपेतून जाग आल्यावर). 'मी आहे' हा विचार नसेल तर जगाचे ('मी' च्या सापेक्षतेत असलेले) अस्तित्व संपुष्टात येते (उदा. निद्रीस्त झाल्यावर). अद्वैत वेदांतात या सिद्धांतप्रणालीला दृष्टी - सृष्टी वाद असे नाव दिलेले आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर अज्ञानी व्यक्ती अनुभवत असलेले जग हे मुळातच वस्तुस्थितीवर मनाने आरोपीत केलेले स्वप्न असल्याने मन निद्रिस्त झाले की त्या जगाचे अस्तित्व संपुष्टात येते. मन स्वतःला पूर्णपणे सत्य वाटेल असे आभासी जगत निर्माण करण्यासाठी सक्षम आहे हा सिद्धांत सिद्ध करण्यापुरतीच दृष्टी - सृष्टी वादाची धाव आहे. आत्मस्वरूपाच्या भूमिकेतून पाहिले असता आभासी 'मी' ने मनाद्वारे निर्माण केलेले स्वप्नवत जगत असे जगाचे एकंदर स्वरूप असल्याने जगाची खरोखरच निर्मिती झालेली आहे असे अजिबात सिद्ध होत नाही. रमण महर्षी कधी कधी असे सांगत असत की 'दृष्टी - सृष्टी वाद' सिद्धांतप्रणालीत विश्वनिर्मीतीशी संबंधित अंतिम सत्याचा समावेश नसला, तरी एक कामचलाउ गृहीतकप्रमेय ('वर्किंग हायपोथेसिस') या स्वरूपात तिचा स्वीकार करणे साधनेच्या दृष्टीकोनातून पाहता उपयुक्त आहे. हा मुद्दा आणखी स्पष्ट करून सांगताना जगाकडे सातत्याने 'मनाने निर्माण केलेला एक चकवा' या स्वरूपात पाहण्याची सवय लावून घेतली, तर बाह्य जगताविषयी वाटणारे आकर्षण साहजिकच कमी होते. त्या योगे चित्त विचलित होणे कमी झाल्याने सतत स्वरूपानुसंधान साधणे सुलभ आणि सुकर होते असे स्पष्टीकरण महर्षी देत असत.
३. सृष्टी - दृष्टी वाद (जगाचे स्वायत्त अस्तित्व, उत्क्रांती वाद, व्यावहारिक सत्य) -
जगाच्या उत्पत्तीबद्दल सामान्यज्ञानाने ('कॉमन सेन्स') आकलन होण्याजोगी ही एक सिद्धांतप्रणाली आहे. या सिद्धांतप्रणालीनुसार 'कार्यकारण भावाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेली वस्तुनिष्ठ वास्तविकता' असे जगाचे स्वरूप असल्याने जगाच्या निर्मितीचा मागोवा घेतला असता कोण्या एका विवक्षित क्षणी जगाच्या निर्मितीची घटना घडली असावी ही एकमेव शक्यता संभवते. पाश्चात्य जगतात प्रचलित असलेल्या बायबल मधील सृष्टीच्या उत्पत्तीची कथा ते 'बिग बँग थिअरी' पर्यंतच्या सगळ्या संकल्पनांचा समावेश सृष्टी - दृष्टी वादातच होतो. अजातवाद किंवा दृष्टी - सृष्टी वादाचा भावार्थ समजावून घेण्यासाठी एखादा साधक पूर्णपणे अपात्र आहे किंवा त्या सिद्धांतप्रणालीं त्याला पूर्णपणे अमान्य आहेत असे लक्षात आल्यावरच महर्षी सृष्टी - दृष्टी वादावर आधारलेल्या सिद्धांतप्रणालींचा उल्लेख करत असत. बौद्धिक कुतुहल शमविण्यापलीकडे सृष्टी - दृष्टी वादावर आधारलेल्या सिद्धांतप्रणालींची धाव जात नसल्याने पारमार्थिक साधकांनी त्यांना अवास्तव महत्व देण्याची गरज नाही अशी शिकवण महर्षी सातत्याने देत असत.
*** व्यावहारिक सत्य, प्रातिभासिक सत्य आणि अध्यात्मिक सत्य या वेदांतातल्या संकल्पना उपरोक्त विवेचनात स्पष्ट केलेल्या आहेत.
प्रश्नः सृष्टीची निर्मिती कशी झाली? काही लोक म्हणतात की ती पूर्वनियोजीत (ईश्वरी संकल्प) घटना आहे. काही लोक म्हणतात की ही सारी ईश्वराची लीला आहे. सत्य नेमके काय आहे?
रमण महर्षी: जगभरच्या धार्मिक साहित्यामधे विविध सिद्धांत दिलेले आहेत. पण (सृष्टीची) निर्मिती खरोखर झालेली आहे का? निर्मिती झालेली असेल तरच तदनुषंगिक स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. आपल्यापैकी किती जणांना विश्वनिर्मितीविषयीच्या सगळ्या सिद्धांतप्रणालींची साद्यंत माहिती असते? एक गोष्ट मात्र आपल्याला पक्की माहित आहे की मी अस्तित्वात आहे. साहजिकच मी असा सल्ला देतो आहे की 'मी' चे खरे स्वरूप आधी जाणून घ्या, विश्वनिर्मिती झाली अथवा नाही हे त्या नंतर ठरवायला काय हरकत आहे?
प्रश्नः विश्वनिर्मितीच्या मागचा हेतू काय आहे?
रमण महर्षी: (स्मितहास्य करत) हा प्रश्न उपस्थित व्हावा हा एकमेव हेतू आहे. या प्रश्नाचा छडा लावण्यासाठी प्रयत्न सुरू करा, आणि शेवटी अवघ्या अस्तित्वाच्या निर्मितीची गंगोत्री असलेल्या आत्मस्थितीत लीन होऊन जा किंवा वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर सर्वोच्च सत्याचा साक्षात्कार करून घ्या. विश्वनिर्मितीमागच्या हेतूचा शोध घेण्यासाठी केलेल्या मानवी प्रयत्नांची परिणती शेवटी स्वरूपाचा शोध घेण्यातच होते. अनात्मतत्वाला दूर सारत सच्चिदानंद स्वरूपाचा त्याच्या चैतन्यमय विशुद्ध अवस्थेत साक्षात्कार झाला तरच साधकाचे समाधान होते. परम विश्रांत असलेली आत्मस्थिती प्राप्त केल्यावर साधकाचे प्रयत्न आपोआप थांबतात.
विश्वनिर्मीतीबद्दल जगभर किती सिद्धांतप्रणाली असाव्यात याची तर गणतीच नाही! त्यांचा सारा शोध बहिर्गामी आहे (बाह्य जगाच्या वस्तुनिष्ठ विश्लेषणाच्या आधारे चाललेला आहे). काळ आणि अवकाश अमर्याद असल्याने रोज नवनव्या सिद्धांतप्रणाली निर्माण होत राहतील. त्या मन आणि बुद्धीच्या चौकटीतच घुसमटत राहतील. त्या पेक्षा मनाच्या उगमस्थानाचा शोध आरंभला, तर काळ आणि अवकाशाच्या मर्यादा ओलांडून स्वरूपाची प्रचिती येते.
तुमच्या लक्षात येईल की जो तो आपले स्वत:चे समाधान करण्यासाठी विश्वाच्या उत्पत्तीचे वैज्ञानिक किंवा तार्किक स्पष्टीकरण शोधण्याच्या प्रयत्नात असतो. या बाबतीत निर्णायक स्वरूपाची तर्कनिष्पत्ती निघणे कालत्रयी तरी शक्य होणार आहे का? क्रमसृष्टीवर (क्रमशः विकसित होत गेलेले जग) आधारित असंख्य सिद्धांतप्रणाली आहेत. त्या उलट दृष्टी - सृष्टी वादाप्रमाणे 'युगपात सृष्टी'(simultaneous creation) हेच सृष्टीचे खरे स्वरूप आहे. द्रष्टा नसेल तर कुठलीही गोष्ट दृश्यमान होत नाही. द्रष्ट्याच्या स्वरूपाचा शोध घेतला तर अवघी सृष्टी द्रष्ट्यातच सामावलेली दिसते. दृष्टीला बहिर्मुख करून अंतहीन असलेल्या इंद्रियगोचर घडामोडींचा अन्वयार्थ लावत बसल्याने हाती काय येणार आहे?
प्रश्न: महर्षी नेहेमी असे सांगतात की माया आणि ब्रह्म एकच आहे. हे कसे शक्य आहे?
रमण महर्षी: आदि शंकराचार्यांची 'माया' ही संकल्पना नीट न समजल्यानेच त्यांना अनाठायी आणि अनुदार टीकेचे धनी व्हावे लागले. शंकराचार्यांचा उपदेश असा आहे: १. ब्रह्म सत्य आहे २. जग मिथ्या आहे आणि ३. जगच ब्रह्म आहे. दुसरे विधान करून आचार्य थांबले नाहीत. तिसरे विधान अत्यंत महत्वाचे आहे, कारण त्या विधानाच्या संदर्भात बाकी दोन्ही विधानांचा खरा भावार्थ लक्षात येतो. आत्मस्वरूपात अंतर्भाव असलेला देखावा असा बोध झाला तर जग सत्यस्वरूप/ ब्रह्मस्वरूप आहे, आत्मस्वरूपापेक्षा पृथकत्वाने नांदणारे (नानाविध वस्तुंनी बनलेले, कार्यकारण भाव असलेले) जग असा बोध झाला तर तेच जग मिथ्या/ मायास्वरूप आहे. अर्थातच द्रष्ट्याच्या प्रचितीनुसार अन्वयार्थ बदलला तरी तत्वतः माया आणि ब्रह्म यात अभेदच आहे!
*** ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रहैव नापरः (निरालम्बोपनिषद – २८)

Thursday, 25 June 2020

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ५ - प्रचिती: प्रकरण १६ - साधकांचे भावविश्व आणि त्यांच्या समस्या

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ५ - प्रचिती: प्रकरण १६ - साधकांचे भावविश्व आणि त्यांच्या समस्या

या प्रकरणात अध्यामिक साधकांचे भावविश्व तसेच त्यांच्या समस्यांविषयीचे भगवान श्री रमण महर्षींचे मार्गदर्शन आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा गोषवारा असा आहे:

शारिरीक वेदना, सततची अस्वस्थता, वैचारिक गोंधळ, भाव भावनांचे सतत दोलायमान करणारे हिंदोळे आणि मरूस्थळासारखी अधूनमधून झलक दाखवणारी सुखद शांतता या सगळ्या गोष्टींचा अध्यात्मिक साधनेचे वांछित/ अवांछित परिणाम या स्वरूपात साधकांना नेहेमी प्रत्यय येतो. इथे उल्लेख केलेले अनुभव 'प्रचिती' या विभागातल्या मागील दोन प्रकरणांमधे उल्लेख केलेल्या अनुभवांइतके नाट्यमय स्वरूपाचे नसले, तरी साधकविश्वात या अनुभूतींबद्दल कमालीचे कुतुहल असल्याचे दिसून येते. एक तर आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरचे मैलाचे दगड किंवा त्या मार्गापासून पथभ्रष्ट करणारे चकवे असा त्यांचा अन्वयार्थ लावला जातो. त्या नुसार सकारात्मक अनुभव क्षणिक न  ठरता ते स्थिर व्हावेत किंवा अधिकाधिक कालावधी करता अनुभवता यावेत, तसेच नकारात्मक अनुभवांचा अडसर दूर करता यावा या हेतूने अध्यात्मिक साधक जिवाचे रान करताना दिसतात.

श्री रमण महर्षींचा कल 'अध्यात्मिक अनुभव' या प्रकाराला फारसे महत्व न देण्याकडे होता. अनुभूतींचे विश्लेषण करण्यापेक्षा तसेच अनुभूतींमधे गुंतून पडण्यापेक्षा ज्याला अनुभूती येतात त्या 'मी' विषयीचे भान सजगपणे आणि सातत्याने जागृत ठेवणे अधिक महत्वाचे आहे या गोष्टीवर महर्षी सतत भर देत असत. क्वचित प्रसंगी आपल्या उपदेशाच्या केंद्रस्थानी असलेल्या आत्मविचाराला तात्पुरती बगल देत एखाद्या साधकाला विशिष्ट अनुभूती येण्यामागच्या मूळ कारणाविषयी महर्षींनी सविस्तर उहापोह केल्याची मोजकीच का असेना उदाहरणे आहेत. त्या जोडीलाच क्वचित प्रसंगी महर्षींनी आत्मलाभ व्हावा या दृष्टीने साधकांना आलेल्या अनुभूतींचे उपकारक किंवा अपायकारक असे वर्गीकरण करत तदनुषंगिक मार्गदर्शन केल्याची देखील काही  उदाहरणे आहेत. साक्षेपाने धांडोळा घेतल्यावर मात्र अध्यात्मिक अनुभूतींमधे स्वारस्य घेण्यापासून महर्षी आपल्या भक्तांना सातत्याने परावृत्त करत असत असेच दिसून येते.

अध्यात्मिक अनुभूतींविषयी चर्वितचर्वण करण्याबाबत कमालीचे अनुत्सुक असलेले महर्षी एखाद्या निष्ठावंत अध्यात्मिक साधकाने ध्यानधारणा करताना व्यत्यय आणत असलेल्या वास्तवदर्शी समस्येशी निगडीत प्रश्न विचारला असता त्याला तत्परतेने मार्गदर्शन करत असत. साधकांनी मांडलेल्या समस्या, त्यांच्या तक्रारी, त्यांच्या व्यथा महर्षी अतिशय संयत वृत्तीने, सहानुभूतीपूर्वक तसेच अगदी जिवाचे कान करून समजावून घेत असत. त्यांच्या समस्यांचे समाधान होईल या दृष्टीने अत्यंत विधायक स्वरूपातली उत्तरे महर्षींकडून मिळत असत. पुढ्यात उभ्या असलेल्या साधकाची/ साधिकेची परिपक्वता लक्षात घेत जर संयुक्तिक  वाटले तरच आत्मस्वरूपाच्या दृष्टिकोनातून पाहिले असता कुठलीच समस्या अस्तित्वात असू शकत नाही ही बाब त्याच्या/ तिच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न महर्षी करत असत.

प्रश्नः ध्यान करत असताना काही वेळा मला एका विशिष्ट प्रकारच्या आनंदाची अनुभूती येते. अशा वेळी मी स्वता:ला "हा आनंद कोण अनुभवतो आहे" असा प्रश्न विचारायला हवा का?
रमण महर्षी: तुमचे मन स्वरूपात पूर्णपणे लीन झालेले असेल, तुम्ही अनुभवता तो आनंद जर खरोखरचा आत्मानुभूतीचा आनंद असेल, तर तुम्हाला अशी शंका येण्याची शक्यताच उरणार नाही. हा प्रश्नच स्पष्ट करतो की तुम्ही अजून आत्मस्थिती प्राप्त केलेली नाही. सगळ्या शंका उपस्थित करणार्‍याचे 'मी' चे मूळ स्वरूप किंवा त्याचे उगमस्थान गवसले तरच सगळ्या शंकाकुशंकांचा अंत होतो. एक एक शंका दूर करत बसणे फारसे हितावह नसते. एका शंकेचे निरसन केले तर तिच्या उत्तरातूनच दुसरी शंका निर्माण होते, आणि मारूतीच्या शेपटाप्रमाणे ही मालिका अंतहीन होत जाते. मात्र शंकाकुल असलेल्या व्यक्तीने आपल्या मूळ स्वरूपाचा शोध आरंभला तर शंका कुशंकांच्या कचाट्यात सापडलेला 'मी' वास्तविक पाहता अस्तित्वातच नाही हे तिच्या लक्षात येते. स्वरूपबोध झाला की सगळ्या शंका कुशंकांचा आपोआप अंत होतो.

प्रश्नः ध्यानस्थ असताना कधीकधी आनंदाची उत्कट प्रचिती आल्याने डोळ्यात आनंदाश्रू तरळल्याची जाणीव मला होते. इतर वेळी मात्र मला अशी अनुभूती येत नाही. या मागे काय कारण आहे?
रमण महर्षी: सच्चिदानंद स्वरूप ही एक निरंतर अस्तित्वात असलेली गोष्ट असल्याने स्वरूपानंदाची येरझार होणे संभवत नाही. ज्या गोष्टींची येरझार झाल्याचे अनुभवता येते त्या मनोनिर्मीत असल्याने तुम्ही तिकडे फारसे लक्ष न पुरवलेलेच बरे.

प्रश्नः  ध्यानातल्या आनंदाने देहात विलक्षण चैतन्याचा संचार होतो, मात्र ती अनुभूती ओसरल्यावर मला खिन्न, निरूत्साही आणि हताश झाल्यासारखे वाटते. असे का होते?
रमण महर्षी: आनंदाची अनुभूती येत असताना तसेच ती ओसरल्यानंतर परतून मूळ स्थितीत आल्यावर - या  दोन्ही स्थितीत त्या अनुभवण्यासाठी तुम्ही सदोदित उपस्थित असता हे तुम्हाला मान्य आहे तर. सगळ्या अनुभूती अनुभवताना तुम्ही  आपल्या मूळ स्वरूपाचा शोध घेणे एकीकडे सुरूच ठेवा. तुम्हाला स्वरूपाचा यथोचित बोध झाला, की मग या तथाकथित अनुभूती तुमच्या खिजगणतीतही नसतील अशी मला खात्री आहे.

प्रश्नः ध्यान करत असताना अवांतर विचार आणि वासनांकडे धाव घेण्याच्या मनाच्या ओढाळ प्रवृत्तीवर मात करण्यासाठी मी काय करायला हवे? विचारांवर ताबा मिळवण्यासाठी मला माझ्या जीवनाचे नियमन कशा प्रकारे करता येईल?
रमण महर्षी: तुमचे मन जसजसे स्वरूपानुसंधानात स्थिर होत जाईल, तसतसे इतर विचार आपोआपच बाजूला पडत जातील. मन दुसरे तिसरे काहीही नसून नानाविध विचारांचे ते एक गाठोडे आहे. विचारांच्या या वटवृक्षाचे मूळ 'मी आहे' हा विचारच आहे. 'मी' च्या मूळ स्वरूपाकडे तुमची दृष्टी वळेल आणि त्याचे उगमस्थान तुम्हाला गवसेल तेव्हा सगळे विचार  स्वरूपात विलीन होऊन जातील.

नियमीपणे ठरलेल्या वेळी जागे होणे, स्नान संध्या करणे, मंत्रपठण किंवा जपजाप्य करणे तसेच चित्तशुद्धीसाठी अन्य कर्मकांडे करणे या गोष्टी उपयुक्त आहेत यात शंकाच नाही. मात्र उपरोक्त सगळ्या गोष्टी आत्मविचाराकडे ज्यांचा कल नाही किंवा आत्मविचार करण्याचे सामर्थ्य ज्यांच्या ठायी नाही अशा साधकांसाठीच राखून ठेवलेल्या आहेत. आत्मविचार करणे ज्यांना शक्य आहे अशा साधकांसाठी यम नियम, शिस्तबद्धता, कर्मकांडे आणि तत्सम गोष्टींची मुळीच गरज नाही.   

Wednesday, 24 June 2020

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ५ - प्रचिती: प्रकरण 15 - दृष्टांत आणि सिद्धी

या प्रकरणात दृष्टांत आणि सिद्धींविषयक भगवान रमण महर्षींचा अभिप्राय आपण जाणून घेणार आहोत.
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:
ध्यानधारणेमुळे होणारे अवांछित परिणाम काही वेळा साधकांना विस्मयचकित करतात. ध्यानावस्थेत असताना अकस्मात देव देवतांचे दर्शन झाल्याची, अद्भुत सुगंध दरवळल्याची तसेच क्वचित प्रसंगी अतिंद्रिय सिद्धी (उदा. सुदूर असलेल्या गोष्टींचे दर्शन होणे, इतर व्यक्तींच्या मनातले विचार ओळखता येणे, हवी ती वस्तू प्राप्त होणे इ. ) प्राप्त झाल्याची नोंद कित्येक साधकांनी करून ठेवलेली आहे. या दोन्ही गोष्टी प्रयत्नाने (हेतुपुरस्सर) साध्य करता येत असल्याचा दावा देखील काही योग साधकांनी केलेला दिसतो. विशिष्ट पद्धतीच्या योगिक प्रक्रियांनी सिद्धी प्राप्त करता येतात असे उल्लेख काही प्राचीन ग्रंथांमधे केलेले दिसतात. योगशास्त्रविषयक ग्रंथसंपदेत महर्षी पतंजलिंच्या 'योगसूत्र' या ग्रंथाला महत्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. योगसूंत्रांमधे अष्टसिद्धी प्राप्त होण्यात सहाय्यभूत ठरतील अशा योगिक प्रक्रियांचे सविस्तर वर्णन केलेले आहे.
हेतुपुरस्सर दृष्टांत घडावेत किंवा सिद्धी प्राप्त व्हाव्यात या दिशेने प्रयत्न करण्यापासून श्री. रमण महर्षी त्यांच्या भक्तांना सातत्याने परावृत्त करत असत. दृष्टांत आणि सिद्धी या दोन्ही गोष्टी मनोनिर्मित असल्याने त्यांचा आत्मलाभ होण्याच्या दृष्टीने उपाय होण्यापेक्षा अपाय होण्याचीच शक्यता कित्येक पटीने जास्त आहे ही बाब महर्षी सातत्याने निदर्शनास आणून देत असत. भक्तांना दृष्टांत झाल्याची उस्फूर्त आणि अहेतुकपणे प्रचिती आली तर महर्षींनी ती अध्यात्मातल्या प्रगतीचा एक संकेत असल्याचे अपवादात्मक प्रसंगी मान्य केल्याची मोजकीच उदाहरणे आहेत. अशा प्रसंगी दृष्टांत झालेल्या भक्ताला तो मानसिक पातळीवरचा क्षणभंगुर अनुभव आहे; तसेच असे अनुभव आत्मसाक्षात्काराच्या तुलनेत खालच्या प्रतलावरचे असल्याने दुर्लक्ष करण्याजोगे असल्याची जाणीव महर्षी न चुकता करून देत असत.
अवचितपणे सिद्धी प्राप्त झाली असता तिची भुरळ पडल्याने पथभ्रष्ट होण्याच्या संभाव्य धोक्याची रूपरेषा महर्षी समजावून सांगत असत. सिद्धी प्राप्त केल्याने अहंतेपासून मुक्ती न मिळता उलट अहंकार बळावण्याचीच शक्यता जास्त आहे असे महर्षी स्पष्टपणे बोलून दाखवत असत. सिद्धी प्राप्त करण्याची हाव आणि आत्मसाक्षात्कार या दोन गोष्टींमध्ये अंतर्विरोध असल्याने त्या एकत्र राहूच शकत नाहीत; त्या पैकी एका गोष्टीचीच निवड करावी लागते असे महर्षींचे ठाम मत होते.
आत्मस्वरूप प्रत्येक व्यक्तीच्या अत्यंत निकट आहे. ते चिरंतन आहे. त्या उलट सिद्धी मात्र सर्वार्थाने अनात्मस्वरूप, बाह्य जगात मिरवण्याजोग्या आणि अशाश्वत असे फसवे मृगजळ आहे. सच्चिदानंद स्वरूप ही सहजस्थिती आहे. सिद्धी प्रयत्नपूर्वक मिळवाव्या लागतात. अतिंद्रिय किंवा अतिमानस शक्तीं मनाला हव्याहव्याश्या वाटतात. त्या वश करण्यासाठी मनाला सतत सतर्क ठेवावे लागते. त्या उलट मनोनाश झाल्यावर स्वरूप आपोआप प्रकट होते. स्वरूपाचे सजग भान टिकवण्यासाठी प्रयत्नांची गरज नसते. सिद्धी अहंकाराच्या आश्रयानेच प्रकट केल्या जातात. स्वरूपबोध हा अहंकाराच्या पल्याडचा प्रांत असल्याने अहंतेचा नाश केल्यावरच त्याचा साक्षात्कार होतो असा उपदेश महर्षी सातत्याने देत असत.
प्रश्नः महर्षी पतंजलिंनी उल्लेख केलेल्या सिद्धी खरोखर अस्तित्वात आहेत की ती निव्वळ त्यांच्या मनोविश्वातली स्वप्नसदृश गोष्ट आहे?
रमण महर्षी: महर्षि पतंजलिंनी स्वत:च स्पष्टपणे नमूद केलेले आहे की सगळ्या सिद्धी मनोनिर्मित आहेत. त्या आत्मसाक्षात्काराच्या मार्गातला अडसर आहेत. ब्रह्मस्वरूप झालेल्या किंवा स्वरूप साक्षात्कार झालेल्या साधकाच्या लेखी त्या कवडीमोलाच्याही नसतात.
प्रश्नः तथाकथित बुवा आणि बापूंच्या (अतिंद्रिय) शक्तींविषयी आपले काय मत आहे?
रमण महर्षी: या शक्ती उच्च पातळीवरच्या असतील किंवा निकृष्ट पातळीवरच्या असतील, त्या मनोनिर्मित असतील अथवा अतिमानस स्थितीत अनुभवलेल्या असतील; ज्या व्यक्तीकडे अतिंद्रिय शक्ती आहे असे मानले जाते त्या व्यक्तीच्या संदर्भातच (पूर्णपणे व्यक्तिनिष्ठ स्वरूपातच) त्यांचे अस्तित्व असते. (पारमार्थिक लाभ करून घ्यायचा असेल तर) अशा व्यक्तीचे मूळ स्वरूप काय आहे याचा तिला शोध घ्यावाच लागेल.
प्रश्नः अध्यात्मिक मार्गावर वाटचाल करत असताना मैलाचे दगड या स्वरूपात सिद्धी प्राप्त होत जातात, की सिद्धी आणि मुक्ती परस्परविरोधी गोष्टी आहेत?
रमण महर्षी: आत्मसाक्षात्कार होणे ही सर्वोच्च सिद्धी आहे. तुम्हाला क्षणभर जरी सत्यस्वरूपाचा साक्षात्कार झाला, तर तुमचे (सिद्धींच्या मोहात पाडून) अज्ञानाच्या खाईत लोटत असलेल्या मार्गांविषयीचे आकर्षंण कायमचे संपुष्टात येईल.
प्रश्नः मग सिद्धींचा उपयोग काय आहे?
रमण महर्षी: दोन प्रकारच्या सिद्धी असतात, त्या पैकी एक प्रकार आत्मसाक्षात्कारात विघ्न निर्माण करणारा आहे. मंत्रजप केल्याने, रहस्यमय गुणधर्म असलेल्या काही रसायनांचे सेवन केल्याने, कठोर तपश्चर्या केल्याने तसेच ठराविक प्रकारची समाधी लावणे साध्य केल्याने सिद्धी प्राप्त होतात अशी एक धारणा रूढ झालेली आहे. उपरोक्त पद्धतीने शक्ती प्राप्त करणे हे आत्मसाक्षात्कारासाठी उपयुक्त ठरणारे साधन नाही. उलटपक्षी अशा पद्धतीने सिद्धी प्राप्त झाल्या तरी तुम्ही अज्ञानाच्या गर्तेतच अधिक खोलवर रूतत जाल!
प्रश्नः मग या पेक्षा वेगळ्या प्रकारच्या (उपकारक) सिद्धी कशा असतात?
रमण महर्षी: तुम्हाला स्वरूप साक्षात्कार झाला तर तुमच्या ठायी निसर्गत:च असलेले आंतरिक सामर्थ्य आणि प्रज्ञान यांचे सहजस्फूर्त प्राकट्य होत जाणे असे या सिद्धींचे स्वरूप असते. स्वरूपसिद्धी प्राप्त होताना साधकावस्थेत घडलेल्या अत्यंत सहज, सुलभ आणि सात्विक तपश्चर्येची परिणती निसर्गतःच काही उपकारक सिद्धींमधे होते. या सिद्धी ईश्वरी कृपेच्या स्वरूपात आपल्या आपण (साधकाने जाणीवपूर्वक प्रयत्न न करताच) साधकाला मिळून जातात. प्रत्येक साधकाच्या प्रारब्धानुसार त्यांचे स्वरूप निरनिराळे असते. असे असूनही सिद्धी वश झाल्याने म्हणा किंवा त्या प्राप्त न झाल्याने म्हणा; परम शांतीत अचलपणे स्थित झालेला ज्ञानी तिळमात्रही विचलीत होत नाही. ज्ञान्याला स्वरूप साक्षात्कार झाल्यामुळे पक्के माहित असते की आत्मसिद्धी ही एकमेव शाश्वत सिद्धी आहे. आत्मसिद्धीच्या जोडीला विनासायास मिळत असलेल्या सिद्धी कुणालाही प्रयत्नपूर्वक मिळवता येत नाहीत. तुम्ही साक्षात्कारी स्थितीत असाल तेव्हाच अशा सिद्धींची साक्षात प्रचिती येते.
पुरवणी:
संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत बाराव्या अध्यायाच्या सुरूवातीला आत्मसिद्धी/ सोहंसिद्धीचे काव्यात्म पद्धतीने वर्णन केलेले आहे. इथे समाविष्ट केलेल्या निवडक ओव्यांमधला 'योगसुखाचे सोहळे' ते 'समाधिबोधे निजविसी, बुझाऊनि' हा भाग अत्यंत महत्वाचा आहे. आई जगदंबेने बाळाला मांडीवर घेत त्याचे सोहंसिद्धीचे लळे पुरवावे, 'आधारशक्तीच्या' (कुंडलिनी) बळावर त्याचे संगोपन करावे, अनाहत नादाचा खुळखुळा वाजवावा, चिदाकाशाच्या पाळण्यात त्याला झुलवावे, सत्रावीचे स्तन्य द्यावे, प्रत्यकज्योतीने त्याला ओवाळावे, हातात मन पवनाची (प्राणशक्तीची) खेळणी द्यावी, आत्मसुखाची बाळलेणी लेववावी आणि समाधीचा बोध देत त्याला निजवावे अशा प्रकारचे हे एक नितांत सुंदर रूपक आहे. माऊलींनी त्या आधी गुरूंच्या कृपादृष्टीने वैषयिक वासना निर्विष होतात, त्यांची डंख करण्याची क्षमता संपते; तसेच प्रसादरसाचे कल्लोळ उठल्याने साधकाच्या जीवनातून शोकसंतप्त भावना कशी हद्दपार होते याचे सुंदर वर्णन केलेले आहे.
*** सत्रावीचे स्तन्य - पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, अंतःकरण पंचक आणि प्राण या सोळा कला आहेत. स्वरूपानंद किंवा अमृतकला ही सत्रावी कला मानली जाते.
जय जय वो शुद्धे । उदारे प्रसिद्धे ।
अनवरत आनंदे । वर्षतिये ॥ १ ॥
विषयव्याळें मिठी । दिधलिया नुठी ताठी ।
ते तुझिये गुरुकृपादृष्टी । निर्विष होय ॥ २ ॥
तरी कवणातें तापु पोळी । कैसेनि वो शोकु जाळी ।
जरी प्रसादरसकल्लोळीं । पुरें येसि तूं ॥ ३ ॥
योगसुखाचे सोहळे । सेवकां तुझेनि स्नेहाळे ।
सोऽहंसिद्धीचे लळे । पाळिसी तूं ॥ ४ ॥
आधारशक्तीचिया अंकीं । वाढविसी कौतुकीं ।
हृदयाकाशपल्लकीं । परीये देसी निजे ॥ ५ ॥
प्रत्यक्ज्योतीची वोवाळणी । करिसी मनपवनाचीं खेळणीं ।
आत्मसुखाची बाळलेणीं । लेवविसी ॥ ६ ॥
सतरावियेचें स्तन्य देसी । अनुहताचा हल्लरू गासी ।
समाधिबोधें निजविसी । बुझाऊनि ॥ ७ ॥
म्हणौनि साधकां तूं माउली । पिके सारस्वत तुझिया पाउलीं ।
या कारणें मी साउली । न संडीं तुझी ॥ ८ ॥
अहो सद्गुरुचिये कृपादृष्टी । तुझें कारुण्य जयातें अधिष्ठी ।
तो सकलविद्यांचिये सृष्टीं । धात्रा होय ॥ ९ ॥

Monday, 22 June 2020

विभाग ५ - प्रचिती - प्रकरण १४ - समाधी - भाग १

या प्रकरणापासून 'प्रचिती' या पाचव्या विभागाची सुरूवात होते. अध्यात्म हा वास्तविक पाहता प्रचितीचाच प्रांत आहे. या विभागातल्या पहिल्या प्रकरणात समाधीविषयीचा रमण महर्षींचा उपदेश आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:
ध्यानसाधनेच्या प्रगत टप्प्यावर आपल्या सच्चिदानंद स्वरूपाचे सजग भान येणे किंवा ध्यान साधत असताना अत्यंत उत्कटपणे ध्येय वस्तूत (उदा. नाम, प्रतिमा, मूर्ती इ.) अखंडपणे लीन होणे ही अवस्था साधकांना अनुभवता येते. पौर्वात्य जगतातल्या अध्यात्मिक साहित्यात ही प्रचिती दर्शवण्यासाठी 'समाधी' हा शब्द प्रचुरतेने वापरला जातो . नानाविध अध्यात्मिक संप्रदायांमधे तसेच विविध धर्मांमधे समाधीच्या वेगवेगळ्या अवस्था आणि नानाविध प्रकारांचे सविस्तर वर्णन केलेले आढळते. प्रत्येक संप्रदाय आपापली आगळीवेगळी परिभाषा वापरत असल्याचे तसेच आपापल्या पद्धतीने समाधीचे वर्गीकरण करत असल्याचे तसेच समाधीच्या विविध प्रकारांची प्रतवारी ठरवत असल्याचेही स्पष्टपणे दिसून येते.
श्री. रमण महर्षी समाधीचे ढोबळमानाने तीन प्रकारांमधे वर्गीकरण करत असतः
१. सहज निर्विकल्प समाधी: ज्याने/ जिने (अध्यात्मिक साधना सफल झाल्यावर) अंततः अहंतेला कायमचेच दूर सारले आहे, अशा ज्ञानसिद्ध व्यक्तीची ही निरंतर टिकणारी स्थिती असते. या समाधीचे वर्णन करत असताना वापरलेले सहज (स्वाभाविक) आणि निर्विकल्प (अचल, कुठलाही फरक न पडणारी) हे दोन्ही शब्द अत्यंत महत्वाचे आहेत. सहजस्थितीत असलेला ज्ञानी सामान्यजनांप्रमाणेच लौकिक जगतात सहजतेने कार्यरत राहू शकतो. स्वरूपबोध हीच सहजस्थिती झालेल्या ज्ञान्याला तो स्वतः इतरेजनांपेक्षा आगळा वेगळा आहे असे वाटत नाही. ज्ञान्याला तो स्वतः आणि बाह्य जगत हे विभक्त स्वरूपात न दिसता समग्र अस्तित्वाची एकरस आणि अखंड अनूभूति विनासायास येत राहते. अस्तित्वात असलेली प्रत्येक गोष्ट अविभाज्य असलेल्या स्वरूपाचेच प्राकट्य आहे अशी अनूभूती ज्ञान्याला मिळते (संत ज्ञानेश्वरांनी याच अनुभूतीच्या सैद्धांतिक विवेचनाच्या जोडीलाच 'चिद्विलास' - एकाच चैतन्याचा विलास या स्वरूपात नितांत सुंदर असे काव्यात्म वर्णन देखील केलेले आहे).
२. केवल निर्विकल्प समाधी: ही आत्मसाक्षात्कारापूर्वीची पायरी आहे. या स्थितीत असताना प्रयत्न न करताच स्वसंवेज्ञता अनुभवता येते, मात्र ती क्षणिक स्वरूपाची असते. या स्थितीत अहंकाराचा संपूर्ण नाश झालेला नसतो. केवल निर्विकल्प समाधीत साधकाचे देहभान हरपते. स्वरूपाची किंवा स्वसंवेज्ञतेची तात्पुरती झलक मिळत असली, तरी केवल निर्विकल्प समाधी स्थितीत कर्मेंद्रियांचा तसेच ज्ञानेंद्रियांचा योग्य तो उपयोग करणे किंवा व्यावहारिक जगात कार्यरत असणे साधकाला शक्य होत नाही.
३. सविकल्प समाधी: सविकल्प समाधी स्थितीत अथक प्रयत्न करून आत्मभान टिकवावे लागते. ती किती काळ टिकेल हे पूर्णपणे समाधी अवस्था टिकवण्यासाठी साधक करत असलेल्या प्रयत्नांवर अवलंबून असते. स्वरूपावरचे ध्यान डळमळीत झाले, की स्वसंवेज्ञतेची प्रचिती विरत जाते.
प्रश्नः सहज समाधीचा अनुभव साधकाला कधी प्राप्त करता येतो?
रमण महर्षी: अगदी सुरूवातीपासूनच. (याच नाण्याची दुसरी बाजू अशी आहे की) केवल निर्विकल्प समाधी वर्षानुवर्षे अनुभवत आलेल्या साधकाने जर वासनांना मुळापासून नष्ट केलेले नसेल तर त्याला मुक्ती मिळत नाही.
प्रश्नः सहजावस्था प्राप्त होण्याआधी निर्विकल्प समाधीचा अनुभव येणे अनिवार्य आहे का?
रमण महर्षी: कुठल्याही प्रकारच्या समाधीमध्ये (मग ती निर्विकल्प असो अथवा सविकल्प) कायमचे स्थित होणे हीच सहजस्थिती असते. देहभान असे आपण कशाला म्हणतो? जड देहात चैतन्याचा आविर्भाव झाला की देहभान येते. अस्तित्वात आपल्याच ठायी परिपूर्णतेने नांदणारे असे एक विशुद्ध चैतन्य आहे. देह आणि देहभान या दोन्हींचा या विशुद्ध चैतन्यावर कुठलाही प्रभाव पडत नाही. देहभान असेल किंवा नसेल तरी ते निरंतर जसे आहे तसेच राहते. साधकाने जर या विशुद्ध चैतन्यातच स्वत:ची मांड पक्की केलेली असेल, तर मग देहभान हरपले काय किंवा जागृत राहिले काय, त्याने काय फरक पडणार आहे? समाधी अवस्थेची अत्यंत उत्कट प्रचिती येणे हा देहभान पूर्णपणे हरपण्याचा एक फायदा आहे, मात्र सर्वोच्च असलेली ज्ञानसिद्धी प्राप्त झाल्यानंतर देहभान असल्याने किंवा नसल्याने ज्ञानसिद्ध व्यक्तीला त्याने काहीच फरक पडत नाही.
प्रश्नः समाधी आणि (जागृती, निद्रा आणि सुषुप्तीपेक्षा वेगळी असलेली) चौथी अवस्था किंवा तुर्यावस्था एकच आहेत का?
रमण महर्षी: समाधी, तुर्या किंवा निर्विकल्प या सगळ्यांचा भावार्थ एकच आहे, तो म्हणजे आत्मस्वरूपाचे सतत भान असणे. जागृती, निद्रा आणि सुषुप्तीपेक्षा वेगळी असलेली चौथी अवस्था किंवा विशुद्ध चैतन्यमय अवस्था असा तुर्यावस्था या शब्दाचा अर्थ होतो. ही चौथी अवस्था चिरंतन असते आणि बाकी तीन अवस्था तिच्यातच ये जा करत राहतात. मन त्याच्या उगमस्थानामध्ये हृदयकेंद्रात विलीन होत असल्याची तसेच ते निश्चल होत असल्याची सजग जाणीव तुर्यावस्थेत असते. असे असले तरी माफक प्रमाणात का होईना विचारांचे अतिक्रमण तुर्यावस्थेत होत राहते. तुर्यावस्थेत इंद्रियांचे कार्य देखील काही अंशी का असेना सुरूच राहते . निर्विकल्प स्थितीत इंद्रिये पूर्णपणे शांतवल्याने तसेच विचारांचे काहूर पूर्णपणे थांबल्याने तिला एक अत्यंत उत्कट आणि आल्हासदायक स्थिती असे म्हणावे लागेल. सविकल्प समाधीतही तुर्यावस्था प्राप्त करता येते.
प्रश्नः समाधी अवस्था उल्हसित करणारी असते की ती हर्षोन्मादाचा अनुभव देते?
रमण महर्षी: प्रत्यक्ष समाधी अवस्थेत निव्वळ असीम शांतताच नांदत असते. समाधीतून बाहेर येत असताना मन पुनरूज्जीवीत होते, त्या वेळी समाधीतल्या शांततेच्या आठवणीने हर्षोन्माद अनुभवता येतो. भक्तीमार्गात हर्षोन्मादाचा अनुभव आधी येतो. आनंदाश्रू येणे, तनु रोमांचीत होणे, आवाज सद्गदित होणे इ. अष्टसात्विक भावांच्या स्वरूपात हर्षोन्मादाची भावस्थिती प्रकट होते. अंततः अहंता पूर्णपणे लयाला गेली आणि सहजस्थितीचा लाभ झाला की अष्टसात्विक भाव आणि हर्षोन्माद आपोआप नाहीसे होतात.
प्रश्नः (ध्यानाच्या प्रगत अवस्थेत) मन जेव्हा स्वरूपात विलीन व्हायला लागते तेव्हा कित्येक वेळा साधकांना भयगंड ग्रासून टाकतो असे दिसते.
रमण महर्षी: समाधी अवस्थेत प्रवेश करताना अल्पशा प्रमाणात अहंतेची जाणीव मागे शिल्लक राहिल्याने (अहंता स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी निकराचे प्रयत्न करत असल्याने) साधकांना भयग्रस्ततेचा तसेच शरीराचा थरकाप होत असल्याचा अनुभव येतो. जेव्हा कणभरही अवशेष मागे न ठेवता अहंतेचा पूर्णपणे नाश होतो तेव्हा साधक विशुद्ध चैतन्याने व्यापलेल्या विस्तीर्ण अवकाशात स्थिर होतो. असे स्थैर्य लाभले की भयग्रस्तता संपून फक्त आनंदच मागे उरतो. शरीराचा थरकाप होणे देखील थांबते.
प्रश्नः समाधी स्थितीचा अनुभव घेतल्यानंतर साधकांना सिद्धी देखील प्राप्त होतात का?
रमण महर्षी: सिद्धींचे प्रदर्शन मांडायचे असेल तर ते ज्यांच्यासमोर मांडायचे अशा इतरेजनांची (अर्थातच द्वैतभावाची) गरज भासणे अनिवार्य आहे . सिद्धींचे प्रदर्शन करत असलेल्या व्यक्तीकडे (अद्वैत/ कैवल्य) ज्ञानाचा अभाव असतो हे उघड आहे. त्यामुळे कवडीमोल सिद्धींबाबत विचार न केलेलाच बरा. ज्ञानप्राप्ती हेच साधकाचे अंतिम ध्येय असले पाहिजे, तसेच कैवल्य ज्ञान प्राप्त करण्याची एकमेव अभिप्सा त्याच्या ठायी असली पाहिजे.
प्रश्नः माझे मन त्या (समाधी/ निर्विचार) स्थितीत क्षणभरही बुडून जात नाही.
रमण महर्षी: त्या साठी "मी सच्चिदानंद स्वरूप आहे, माझे खरे अस्तित्व मन आणि इंद्रियगोचर घडामोडींपलीकडे आहे" अशी दृढ श्रद्धा असणे अनिवार्य आहे (श्रद्धावान लभते ज्ञानम).
प्रश्नः (मी सश्रद्ध आहे) असे असले तरी स्वरूपात लीन होण्याचे सगळे प्रयत्न उधळून लावणारा मन हा एक कधीच ताब्यात न येणारा चौखूर उधळलेला जणू उन्मत्त अश्वच आहे असा अनुभव मला येतो.
रमण महर्षी: मन सक्रिय राहिल्याने काय फरक पडतो? त्याचा सारा खेळ स्वरूपाच्या आधारानेच तर चालतो. मनाचे सारे खेळ एकीकडे सुरू असतानाच तुम्ही आपले लक्ष सजगपणे स्वरूपावर स्थिर ठेवा.
पुरवणी:
ध्यानधारणेच्या प्रगत टप्प्यावर साधकांना येत असलेल्या अनुभूतीचे पावसच्या प. पू. स्वामी स्वरूपानंदांनी असे वर्णन केले आहे:
इंद्रिये प्रबळ, सर्वथा ती जाण, मनाच्या आधीन, होती मग
प्राणामाजी मन, एकवटे पूर्ण, मिळो लागे प्राण, शून्यालागी
ऐसा योगाभ्यास, स्वभावे चि होय, नेणो कैसा काय, धनंजया
आणि तयाचिया, मनो-मंदिरात, येवोनि रहात, समाधी ती
सहजस्थिती प्राप्त व्हावी किंवा आत्मलाभ व्हावा या साठी लागणारी अर्हता स्वामीजींच्या शब्दात अशी आहे:
यापरी जो काम-, क्रोध लोभातून, मोकळा होवोन, राहे स्वस्थ
तयासि च लाभे, एवढे गहन, आत्मप्राप्ति धन, धनंजया
(संदर्भः स्वामी स्वरूपानंद कृत अभंग ज्ञानेश्वरी नित्यपाठ स्तोत्र)