Thursday, 25 June 2020

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ५ - प्रचिती: प्रकरण १६ - साधकांचे भावविश्व आणि त्यांच्या समस्या

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ५ - प्रचिती: प्रकरण १६ - साधकांचे भावविश्व आणि त्यांच्या समस्या

या प्रकरणात अध्यामिक साधकांचे भावविश्व तसेच त्यांच्या समस्यांविषयीचे भगवान श्री रमण महर्षींचे मार्गदर्शन आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा गोषवारा असा आहे:

शारिरीक वेदना, सततची अस्वस्थता, वैचारिक गोंधळ, भाव भावनांचे सतत दोलायमान करणारे हिंदोळे आणि मरूस्थळासारखी अधूनमधून झलक दाखवणारी सुखद शांतता या सगळ्या गोष्टींचा अध्यात्मिक साधनेचे वांछित/ अवांछित परिणाम या स्वरूपात साधकांना नेहेमी प्रत्यय येतो. इथे उल्लेख केलेले अनुभव 'प्रचिती' या विभागातल्या मागील दोन प्रकरणांमधे उल्लेख केलेल्या अनुभवांइतके नाट्यमय स्वरूपाचे नसले, तरी साधकविश्वात या अनुभूतींबद्दल कमालीचे कुतुहल असल्याचे दिसून येते. एक तर आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरचे मैलाचे दगड किंवा त्या मार्गापासून पथभ्रष्ट करणारे चकवे असा त्यांचा अन्वयार्थ लावला जातो. त्या नुसार सकारात्मक अनुभव क्षणिक न  ठरता ते स्थिर व्हावेत किंवा अधिकाधिक कालावधी करता अनुभवता यावेत, तसेच नकारात्मक अनुभवांचा अडसर दूर करता यावा या हेतूने अध्यात्मिक साधक जिवाचे रान करताना दिसतात.

श्री रमण महर्षींचा कल 'अध्यात्मिक अनुभव' या प्रकाराला फारसे महत्व न देण्याकडे होता. अनुभूतींचे विश्लेषण करण्यापेक्षा तसेच अनुभूतींमधे गुंतून पडण्यापेक्षा ज्याला अनुभूती येतात त्या 'मी' विषयीचे भान सजगपणे आणि सातत्याने जागृत ठेवणे अधिक महत्वाचे आहे या गोष्टीवर महर्षी सतत भर देत असत. क्वचित प्रसंगी आपल्या उपदेशाच्या केंद्रस्थानी असलेल्या आत्मविचाराला तात्पुरती बगल देत एखाद्या साधकाला विशिष्ट अनुभूती येण्यामागच्या मूळ कारणाविषयी महर्षींनी सविस्तर उहापोह केल्याची मोजकीच का असेना उदाहरणे आहेत. त्या जोडीलाच क्वचित प्रसंगी महर्षींनी आत्मलाभ व्हावा या दृष्टीने साधकांना आलेल्या अनुभूतींचे उपकारक किंवा अपायकारक असे वर्गीकरण करत तदनुषंगिक मार्गदर्शन केल्याची देखील काही  उदाहरणे आहेत. साक्षेपाने धांडोळा घेतल्यावर मात्र अध्यात्मिक अनुभूतींमधे स्वारस्य घेण्यापासून महर्षी आपल्या भक्तांना सातत्याने परावृत्त करत असत असेच दिसून येते.

अध्यात्मिक अनुभूतींविषयी चर्वितचर्वण करण्याबाबत कमालीचे अनुत्सुक असलेले महर्षी एखाद्या निष्ठावंत अध्यात्मिक साधकाने ध्यानधारणा करताना व्यत्यय आणत असलेल्या वास्तवदर्शी समस्येशी निगडीत प्रश्न विचारला असता त्याला तत्परतेने मार्गदर्शन करत असत. साधकांनी मांडलेल्या समस्या, त्यांच्या तक्रारी, त्यांच्या व्यथा महर्षी अतिशय संयत वृत्तीने, सहानुभूतीपूर्वक तसेच अगदी जिवाचे कान करून समजावून घेत असत. त्यांच्या समस्यांचे समाधान होईल या दृष्टीने अत्यंत विधायक स्वरूपातली उत्तरे महर्षींकडून मिळत असत. पुढ्यात उभ्या असलेल्या साधकाची/ साधिकेची परिपक्वता लक्षात घेत जर संयुक्तिक  वाटले तरच आत्मस्वरूपाच्या दृष्टिकोनातून पाहिले असता कुठलीच समस्या अस्तित्वात असू शकत नाही ही बाब त्याच्या/ तिच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न महर्षी करत असत.

प्रश्नः ध्यान करत असताना काही वेळा मला एका विशिष्ट प्रकारच्या आनंदाची अनुभूती येते. अशा वेळी मी स्वता:ला "हा आनंद कोण अनुभवतो आहे" असा प्रश्न विचारायला हवा का?
रमण महर्षी: तुमचे मन स्वरूपात पूर्णपणे लीन झालेले असेल, तुम्ही अनुभवता तो आनंद जर खरोखरचा आत्मानुभूतीचा आनंद असेल, तर तुम्हाला अशी शंका येण्याची शक्यताच उरणार नाही. हा प्रश्नच स्पष्ट करतो की तुम्ही अजून आत्मस्थिती प्राप्त केलेली नाही. सगळ्या शंका उपस्थित करणार्‍याचे 'मी' चे मूळ स्वरूप किंवा त्याचे उगमस्थान गवसले तरच सगळ्या शंकाकुशंकांचा अंत होतो. एक एक शंका दूर करत बसणे फारसे हितावह नसते. एका शंकेचे निरसन केले तर तिच्या उत्तरातूनच दुसरी शंका निर्माण होते, आणि मारूतीच्या शेपटाप्रमाणे ही मालिका अंतहीन होत जाते. मात्र शंकाकुल असलेल्या व्यक्तीने आपल्या मूळ स्वरूपाचा शोध आरंभला तर शंका कुशंकांच्या कचाट्यात सापडलेला 'मी' वास्तविक पाहता अस्तित्वातच नाही हे तिच्या लक्षात येते. स्वरूपबोध झाला की सगळ्या शंका कुशंकांचा आपोआप अंत होतो.

प्रश्नः ध्यानस्थ असताना कधीकधी आनंदाची उत्कट प्रचिती आल्याने डोळ्यात आनंदाश्रू तरळल्याची जाणीव मला होते. इतर वेळी मात्र मला अशी अनुभूती येत नाही. या मागे काय कारण आहे?
रमण महर्षी: सच्चिदानंद स्वरूप ही एक निरंतर अस्तित्वात असलेली गोष्ट असल्याने स्वरूपानंदाची येरझार होणे संभवत नाही. ज्या गोष्टींची येरझार झाल्याचे अनुभवता येते त्या मनोनिर्मीत असल्याने तुम्ही तिकडे फारसे लक्ष न पुरवलेलेच बरे.

प्रश्नः  ध्यानातल्या आनंदाने देहात विलक्षण चैतन्याचा संचार होतो, मात्र ती अनुभूती ओसरल्यावर मला खिन्न, निरूत्साही आणि हताश झाल्यासारखे वाटते. असे का होते?
रमण महर्षी: आनंदाची अनुभूती येत असताना तसेच ती ओसरल्यानंतर परतून मूळ स्थितीत आल्यावर - या  दोन्ही स्थितीत त्या अनुभवण्यासाठी तुम्ही सदोदित उपस्थित असता हे तुम्हाला मान्य आहे तर. सगळ्या अनुभूती अनुभवताना तुम्ही  आपल्या मूळ स्वरूपाचा शोध घेणे एकीकडे सुरूच ठेवा. तुम्हाला स्वरूपाचा यथोचित बोध झाला, की मग या तथाकथित अनुभूती तुमच्या खिजगणतीतही नसतील अशी मला खात्री आहे.

प्रश्नः ध्यान करत असताना अवांतर विचार आणि वासनांकडे धाव घेण्याच्या मनाच्या ओढाळ प्रवृत्तीवर मात करण्यासाठी मी काय करायला हवे? विचारांवर ताबा मिळवण्यासाठी मला माझ्या जीवनाचे नियमन कशा प्रकारे करता येईल?
रमण महर्षी: तुमचे मन जसजसे स्वरूपानुसंधानात स्थिर होत जाईल, तसतसे इतर विचार आपोआपच बाजूला पडत जातील. मन दुसरे तिसरे काहीही नसून नानाविध विचारांचे ते एक गाठोडे आहे. विचारांच्या या वटवृक्षाचे मूळ 'मी आहे' हा विचारच आहे. 'मी' च्या मूळ स्वरूपाकडे तुमची दृष्टी वळेल आणि त्याचे उगमस्थान तुम्हाला गवसेल तेव्हा सगळे विचार  स्वरूपात विलीन होऊन जातील.

नियमीपणे ठरलेल्या वेळी जागे होणे, स्नान संध्या करणे, मंत्रपठण किंवा जपजाप्य करणे तसेच चित्तशुद्धीसाठी अन्य कर्मकांडे करणे या गोष्टी उपयुक्त आहेत यात शंकाच नाही. मात्र उपरोक्त सगळ्या गोष्टी आत्मविचाराकडे ज्यांचा कल नाही किंवा आत्मविचार करण्याचे सामर्थ्य ज्यांच्या ठायी नाही अशा साधकांसाठीच राखून ठेवलेल्या आहेत. आत्मविचार करणे ज्यांना शक्य आहे अशा साधकांसाठी यम नियम, शिस्तबद्धता, कर्मकांडे आणि तत्सम गोष्टींची मुळीच गरज नाही.   

No comments:

Post a Comment