Friday 3 July 2020

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण २१ - कर्माचा सिद्धांत, प्रारब्ध आणि कर्म स्वातंत्र्य

या प्रकरणात कर्माचा सिद्धांत, प्रारब्ध आणि कर्म स्वातंत्र्याविषयीचा भगवान श्री रमण महर्षींचा उपदेश आपण थोडक्यात जाणून घेणात आहोत.
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा गोषवारा असा आहे:
पौर्वात्य जगतात प्रचलित असलेल्या बहुतांशी सगळ्या धर्मांच्या सिद्धांतप्रणालींनी 'कर्माचा सिद्धांत' मांडलेला आहे. या सिद्धांताचे सगळ्यात लोकप्रिय स्वरूप लक्षात घेतले तर तो असे गृहीतक मांडताना दिसतो, की प्रत्येक व्यक्तीने केलेल्या चांगल्या आणि वाईट कृत्यांची स्वतंत्र खात्यात नोंद ठेवणारी एक वैश्विक गणनप्रणाली अस्तित्वात आहे. प्रत्येक व्यक्तीला तिने केलेल्या कृत्यांची फळे भोगावीच लागतात - चांगल्या कृत्यांची चांगली फळे मिळतात, तर वाईट कृत्यांचे दु:खद परिणाम भोगावे लागतात. हाच सिद्धांत पुढे असे सांगतो की कर्मफलांचे सारे 'संचित' त्याच जन्मात भोगावे लागणे क्रमप्राप्त नसल्याने शिल्लक राहिलेला भाग पुढच्या जन्मात भोगावा लागतो. (जगी सर्व सूखी असा कोण आहे, विचारे मना तूचि शोधून पाहे, मना त्वाची रे पूर्वसंचीत केले, तयासारिखे भोगणे प्राप्त झाले - समर्थ रामदास स्वामी) त्यामुळे कर्माचे विविध प्रकारात वर्गीकरण केलेले आहे. हिंदूंच्या विविध दर्शनांमधे ('schools of thought') उल्लेख असलेल्या पुढील वर्गीकरण पद्धतीचा संदर्भ श्री रमण महर्षी देत असतः
१. संचित कर्मः पूर्वजन्मांमधे साठलेले कर्मांचे ऋण
२. प्रारब्ध कर्मः संचित कर्माचा एक उपसंच, जो या जन्मी भोगणे भाग पडते. कर्माचा सिद्धांत मानवी जीवनातल्या सगळ्या घटना पूर्वनियोजीत असतात असे प्रतिपादन करत असल्याने प्रारब्ध या शब्दाचा अर्थ 'नियती' या स्वरूपात देखील घेतला जातो.
३. आगामी कर्मः या जन्मी केलेल्या कृत्यांमुळे आणि विचारांमुळे संचितात सतत पडत असलेली भर. या पैकी उर्वरित कर्मभोग पुढच्या जन्मात भोगावा लागतो.
श्री रमण महर्षींना उपरोक्त कर्म सिद्धांताची वैधता मान्य असली, तरी ते असे सांगत असत की एखादी व्यक्ती आपले सच्चिदानंद स्वरूपापेक्ष पृथक असे स्वायत्त अस्तित्व आहे अशा भ्रमात जगत असेल तरच तिच्या बाबतीत कर्माचे सिद्धांत लागू होतात. या पातळीवर जगताना (पारमार्थिक अर्थाने अज्ञानी असताना) प्रत्येक व्यक्तीला प्रारब्धवशात भूतकाळात केलेली कृत्ये तसेच भूतकाळात केलेल्या विचारांचे परिणाम अनुक्रमे पूर्वनियोजीत घटनाक्रम तसेच नानाविध अनुभवांच्या स्वरूपात भोगावे लागतात. क्वचित प्रसंगी महर्षी असे देखील सांगत असत की एखादी व्यक्ती तिच्या जीवनात करत असलेली प्रत्येक कृती तसेच तिला जीवनभर येत गेलेले सगळे अनुभव तिच्या जन्माच्या वेळीच निर्धारित केलेले असतात. त्यामुळे आपल्याला जर काही स्वातंत्र्य असेल तर ते इतकेच आहे की कर्ता किंवा अनुभोक्ता (सच्चिदानंद स्वरूपापेक्षा विभक्त स्वरूपात) अस्तित्वातच नाही हे जाणून घेणे! आत्मसाक्षात्कार झालेल्या व्यक्तीच्या बाबतीत मात्र सारे कर्तृत्व भोक्तृत्व स्वरूपात विलीन झाल्याने कर्माचा सिद्धांत पूर्णपणे निरर्थक ठरतो.
श्री रमण महर्षी कर्माच्या सिद्धांताला ईश्वरी संकल्पाचे प्रकट स्वरूप मानत असत. ते असा उपदेश देत असत की आत्मसाक्षात्कार होण्याआधी प्रत्येक व्यक्तीच्या प्रारब्धावर नियंत्रण ठेवणारा मनुष्य-सदृश स्वरूपातला ईश्वर मानावाच लागतो. प्रत्येक व्यक्तीला तिने केलेल्या कर्मांचे परिणाम भोगावेच लागतील असा दंडक या ईश्वरानेच घालून दिलेला आहे. प्रत्येक जीवाला संचित कर्मापैकी कुठला भाग कुठल्या जन्मी भोगावा लागेल याची निवड देखील ईश्वरच करतो. आत्मस्वरूपाचा बोध करून घेत कर्मबंधनाची लक्ष्मणरेषा लांघून पुढे जाणे हा एकमेव मार्ग मुक्तीच्या दिशेने जाणारा आहे. देहतादात्म्याने तसेच कर्ताभावाने वावरत असलेल्या व्यक्तीला ईश्वरी न्यायसत्तेच्या अधिकारक्षेत्राबाहेर अन्य कुठल्याही मार्गाने पळून जाता येत नाही.
प्रश्नः देहपात होईपर्यंत प्रारब्ध भोगावे लागते असे मानले जाते. देह अस्तित्वात असतानाच प्रारब्धावर मात करणे शक्य आहे का?
रमण महर्षी: होय, ते शक्य आहे. जड देह आणि सच्चिदानंद स्वरूप यांच्या मधे शिरकाव केलेल्या अहंकार या तिसर्‍या घटकावर कर्माची गती अवलंबून आहे. जिथे कर्माच्या सिद्धांताची सत्ता चालते तो अहंकारच जर त्याच्या उगमस्थानी (स्व-स्वरूपात) विलीन होत शून्यवत झाला, तर पूर्णपणे त्याच्यावरच अवलंबून असलेली कर्माची गती आपोआप थांबते. जिथे 'अहं' नाही तिथे कर्माची गती आपोआप खुंटते.
प्रश्नः अशी कुठली यंत्रणा अस्तित्वात आहे जी संचित कर्माचा एक छोटासा हिस्सा निवडते, आणि असे ठरवते की तो अमुक एका जन्मात प्रारब्धाच्या स्वरूपात भोगावा लागेल?
रमण महर्षी: प्रत्येक व्यक्तीला तिच्या कर्माची फळे भोगणे अनिवार्य असले, तरी त्याचे/ तिचे हित साधता येईल अशा दृष्टीने त्यांचे व्यवस्थापन करण्याचा आटोकाट प्रयत्न ईश्वरी सत्ता करते. ईश्वर संचिताचे कुशलतेने व्यवस्थापन करत असला तरी संचितात भर घालण्याचे किंवा त्यातून सवलत देण्याचे काम कदापि करत नाही. मानवाचे अचेतन मन चांगल्या आणि वाईट कर्मांचे भले मोठे गोदाम आहे. याच गोदामातून त्या त्या वेळी प्रत्येक व्यक्तीच्या अध्यात्मिक विकासाला सहाय्यभूत ठरेल अशा गोष्टींची, मग त्या सुखद असोत किंवा दु:खद, नेमकी निवड ईश्वर करतो. त्यामुळे कुठलीही गोष्ट यदृच्छेने कधीच घडत नाही.
प्रश्नः आम्ही आज जे अनुभवतो आहोत ते प्राग्जन्मी केलेल्या कर्मांचे फळ आहे. आम्ही पूर्वी केलेल्या चुका जर आम्हाला समजल्या, तरच आम्हाला त्या दुरूस्त करता येतील.
रमण महर्षी: तुम्ही एखादी चूक दुरूस्त केलीत असे गृहीत धरले, तरी तुम्हाला असंख्य जन्म घ्यावे लागतील इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही जन्मोजन्मी गोळा केलेले संचित कर्म शिल्लक उरते. त्यामुळे आपण विचारणा करत आहात ती पद्धत मुळातच चुकीची आहे. तुम्ही कर्माच्या वृक्षाची जितकी छाटणी कराल, तितक्याच जोमाने त्याची वाढ होते. तुम्हाला कर्म-वृक्षाचे मूळ शोधून काढून ते छाटून टाकावे लागेल.
प्रश्नः कुठलेही नियोजन न करता किंवा ती मिळवण्याचा प्रयत्न न करताच एखादी भोग्य वस्तू मला विनासायास मिळाली, आणि मी तिचा उपभोग घेतला, तर (कर्माच्या दृष्टीने) तिचे वाईट परिणाम भोगावे लागणार नाहीत, नाही का?
रमण महर्षी: तसे होत नाही. प्रत्येक कृत्याचे परिणाम भोगावेच लागतात. प्रारब्धवशात एखादी गोष्ट तुमच्या नशिबी आली, तर तुम्हाला ती टाळता येत नाही हे खरे आहे. ती गोष्ट अधिक प्रमाणात मिळावी, किंवा त्या अनुभवाची पुनरूक्ती व्हावी अशी भावना न ठेवता, त्या गोष्टीबाबात फारशी आसक्ती न बाळगता तुम्ही तिचा स्वीकार केलात तर 'जन्म घेणे लागे वासनांचे संगे' या उक्तीप्रमाणे आगामी जन्मांना कारणीभूत ठरून ती तुमचे नुकसान करणार नाही. याच नाण्याची दुसरी बाजू अशी आहे, की त्या गोष्टीचा उपभोग घेताना तुमची आसक्ती वाढली आणि साहजिकच ती अधिक प्रमाणात मिळावी अशी तुमची वासना बळावली; तर अशा वासनांची परिणती अपरिहार्यपणे 'पुनरपि जननं, पुनरपि मरणं' अशा शृंखलेत होते.
प्रश्नः एखाद्या व्यक्तीच्या जीवनातल्या महत्वाच्या घटना (जन्मस्थान, जन्मत:च मिळणारे ठराविक देशाचे नागरिकत्व, कौटुंबिक परिस्थिती, व्यवसायाची निवड किंवा व्यावसायिक कारकीर्दीचा आलेख, लग्न, अपत्यप्राप्ती) पूर्णपणे कर्मप्रारब्धानुसार घडतात हे मी समजू शकतो, पण तिच्या संपूर्ण जीवनपटातला एकून एक तपशील संगतवार लक्षात घेतला तर अत्यंत गौण ठरतील अशा कार्यकलापांसकट तिने केलेली प्रत्येक कृती आधीच निश्चीत झाली असावी हे कसे शक्य आहे? (रमणाश्रमात त्या काळी विद्युत उपकरणे नव्हती) आता क्षणभर इकडे लक्ष द्या. माझ्या हातात असलेला पंखा मी नुकताच खाली ठेवला. मी अमुक एके दिवशी, अमुक वाजून अमुक मिनीटांनी आधीच ठरलेल्या कालावधीपुरता वापर करून झाला की तो पंखा आधीच ठरलेल्या ठिकाणी खाली ठेवला - हे सगळे पूर्वनिर्धारीत आहे का?
रमण महर्षी: खचितच. देह करत असलेली प्रत्येक कृती आणि त्याला ज्या ज्या अनुभवांमधून जावे लागते ते सारे अनुभव या दोन्ही गोष्टी देह अस्तित्वात येतो तेव्हाच ठरलेल्या असतात.
प्रश्नः मग मानवाला असलेल्या कर्म स्वातंत्र्याला किंवा आपण करत असलेल्या कृत्यांची त्याने/ तिने जबाबदारी घेण्याला काय अर्थ उरतो?
रमण महर्षी: देहतादात्म्यापासून मुक्त होण्याचे सामर्थ्य मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्ञानप्राप्तीचा निदीध्यास घ्यावा आणि 'प्रयत्नांती परमेश्वर' या न्यायाने स्वरूपज्ञान प्राप्त करावे या एकाच बाबतीत मानव स्वतंत्र आहे. मानवी देह अटळ असलेल्या प्रारब्धाप्रमाणे पूर्वनिर्धारीत कार्यकलापातून जाण्यासाठी बाध्य असतो. देहाशी तादात्म्य साधून कर्मफलात गुंतून पडायचे, की कर्मफलात आसक्ती न ठेवता प्रारब्धवशात होत असलेल्या सगळ्या कार्यकलापांचे निव्वळ साक्षी बनून रहायचे ही एकच गोष्ट ठरवण्याचे स्वातंत्र्य मात्र मानवाकडे प्रत्येक क्षणी असते.
पुरवणी:
समसामयिक असलेले रमण महर्षी आणि आईनस्टाईन हे आपापल्या प्रांतातले दिग्गज प्रत्येक गोष्ट पूर्वनिर्धारीत असते (Everything is predetermined) असे मानत होते. त्या संदर्भात गॅरी वेबर यांनी केलेल्या विवेचनाचा दुवा देत लेखमालेचा समारोप करतो -

|| श्रीकृष्णार्पणमस्तु ||

No comments:

Post a Comment