भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण २० - (मानवी जीवनातले) दु:ख आणि नैतिकता
या प्रकरणात मानवी जीवनातल्या दु:ख, व्यथा तसेच नैतिकतेविषयी भगवान रमण महर्षींचा उपदेश आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:
ईश्वरवादी सिद्धांतप्रणालींमधे स्पष्टपणे दिसत असलेल्या विसंगती आणि विरोधाभासांचा उलगडा करण्यात गेली कित्येक शतके पाश्चात्य जगतातले ब्रह्मवेत्ते आणि तत्वज्ञानी गुंतुन पडलेले आहेत. वानगीदाखल सांगायचे तर - ईश्वर आपली कामे (विश्वनिर्मिती) करताना चुकत नसेल, तर जगात इतके पाप, ताप, दैन्य तसेच अनिर्बंधपणे विघातक कृत्ये करत असलेल्या दुष्ट प्रवृत्ती का आहेत? सर्वशक्तीमान ईश्वराकडे पाप, ताप, दैन्याचा तत्क्षणी परिहार करण्याचे तसेच दुष्ट प्रवृत्तींचे क्षणार्धात निर्दालन करण्याचे करण्याचे सामर्थ्य असूनही तो या गोष्टींकडे कानाडोळा का करतो?
जीव, जगत आणि ईश्वर ही तीन तत्वे निर्विवादपणे अस्तित्वात आहेत, तसेच ती स्वयंसिद्ध आहेत असे बहुतांशी सगळ्याच धर्मांनी गृहीत धरलेले आहे. महर्षी मात्र असे सांगत असत की एकाच महत्तत्वाचे तीन प्रकारे प्राकट्य होते, किंवा उपरोक्त तिन्ही तत्वांचे स्वायत्त अस्तित्व सतत अबाधित असते - हे दोन्ही सिद्धांत मांडणे अहंता (व्यक्तिगत 'मी' ची जाणीव) अस्तित्वात असेल तरच शक्य आहे, अन्यथा नाही. दु:ख भोगणारा जीव, जगत आणि ईश्वर हे त्रिकूट मनोनिर्मीत असल्याचे स्पष्टपणे निदर्शनास आणून देत तदनुषंगिक क्लिष्ट, निरूद्देश आणि प्रायः निष्फळ ठरत असलेल्या चर्चांना महर्षी नेहेमी बगल देत असत.
महर्षी असे सांगत असत की दुष्कृत्यांमुळे दु:खाची तीव्रता वाढत असल्याने दुष्टबुद्धीने कुठलेही कृत्य करणे टाळलेच पाहिजे, मात्र दुष्कृत्ये हे दु:खनिर्मितीमागचे मूळ कारण नाही. महर्षींच्या मते परस्परांशी तसेच जगातल्या इतर सजीव/ निर्जिव सृष्टीबरोबर क्रिया प्रतिक्रिया करण्यात गुंतलेली आपण स्वायत्त, स्वतंत्र व्यक्तिमत्वे आहोत या मनोनिर्मीत संकल्पनेला सत्य मानून जगणेच दु:खाचे मूळ कारण आहे. आपण समग्र अस्तित्वापेक्षा पृथकतेने नांदतो आहोत असा भ्रम मनातच जन्म घेतो. या भ्रममूलक कल्पनेतून निष्पन्न झालेल्या सगळ्या संकल्पनांचे ओझे मनालाच वागवावे लागते. त्यांचे दु:खद परिणामही मनालाच भोगावे लागतात. महर्षींचे मूलगामी विवेचन लक्षात घेतले तर निरंतर विश्लेषण, चिकीत्सा आणि भेदभाव करण्यात गुंतलेले मानवी मनच दु:ख निर्माण करते; किंबहुना मनाला लागलेल्या या अनिष्ट वळणाचीच स्वाभाविक परिणती अपरिहार्यपणे दु:ख भोगावे लागण्यात होते असे म्हणावे लागेल. दुष्कृत्यांचे परिणामस्वरूप किंवा ईश्वरेच्छेमुळे दु:ख भोगावे लागते हे महर्षींना पूर्णपणे अमान्य होते.
महर्षींच्या विवेचनाला आपल्या अनुभवांशी पडताळून पाहिल्यावर बहुतांशी प्रश्नकर्त्यांना व्यक्तिगत पातळीवर ते मान्य करण्यात अडचण नसली, तरी जगात सर्वत्र सातत्याने दिसणारे दु:ख फक्त द्रष्ट्याच्या मनातच अस्तित्वात आहे ही संकल्पना मात्र कित्येकांच्या पचनी पडत नसे. महर्षी मात्र या बाबतीत आपल्या भूमिकेवर अत्यंत ठाम होते, ते कितीही फिरवून फिरवून प्रश्न विचारले तरी आपल्या भूमिकेपासून तसूभरही ढळत नसत असे स्पष्टपणे दिसून येते. एखाद्या व्यक्तीला आत्मसाक्षात्कार झाला तर तिला व्यक्तिगत पातळीवरच नव्हे तर जगात सर्वत्र दिसणारे तथाकथित दु:ख अस्तित्वातच नाही अशी स्वानुभवाने खात्री पटते असा निर्वाळा महर्षींनी नि:संदिग्ध शब्दात दिलेला आहे. याच संकल्पनेला तिच्या अंतिम तार्किक निष्पत्तीपर्यंत नेत स्व-स्वरूपाचा बोध करून घेणे हा स्वत:च्या तसेच इतरेजनांच्या दु:खाचा अंत करण्याचा सगळ्यात परिणामकारक मार्ग आहे असे प्रतिपादन महर्षींनी वेळोवेळी केलेले दिसते.
रमण महर्षी इतरेजनांच्या दु:खाकडे दुर्लक्ष करण्याचा उपदेश आपल्या अनुयायांना देत असत असा त्यांच्या भूमिकेचा अन्वयार्थ लावणे पूर्णपणे चुकीचे, अन्याय्य आणि दुर्दैवी ठरेल. या बाबतीत व्यवहारज्ञानाशी अधिक सुसंगत भूमिका घेत आत्मसाक्षात्कार होण्याआधी साधकांनी स्वत:प्रमाणेच इतरेजनांचेही दु:ख खरेच आहे असे मानून ते दूर करण्यासाठी यथाशक्ती यथामति पावले उचलली पाहिजेत (आत्मौपम्य बुद्धीने वावरले पाहिजे) असा उपदेश महर्षी देत असत. त्या जोडीलाच 'माझ्या तुलनेत दुर्दैवी (आर्थिक, बौद्धिक, सामाजिक प्रतिष्ठा किंवा अन्य बाबतीत खालच्या पातळीवर) असलेल्या लोकांवर मी उपकार करतो आहे' तसेच 'मीच या दुर्दैवी लोकांचा तारणहार आहे' अशा अहंतेला (निकृष्ट पातळीवरच्या मनोव्यापाराला) थारा न देता इतरेजनांना मदत करता आली, तरच पारमार्थिक लाभ होतो अन्यथा नाही ही बाब महर्षी नेहेमी त्यांच्या अनुयायांच्या निदर्शनास आणून देत असत.
जगात वावरताना एखाद्या व्यक्तीच्या आचरणात कुठल्या गोष्टींचा समावेश असलाच पाहिजे किंवा तिने कुठल्या गोष्टी पूर्णपणे त्याज्य मानल्या पाहिजेत अशा नीती नियमांविषयीच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात महर्षींना मुळीच स्वारस्य नव्हते. काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे या संदर्भातल्या जगभरच्या सगळ्या पारंपारिक धारणांचे महाजाल हे बेगडी नीतीमूल्यांच्या आधारे न्यायनिवाडा करत मनाने रचलेले थोतांड आहे; मनोनाश झाल्यावर नीती-अनीतीविषयीच्या सगळ्या संकल्पना पार धुळीला मिळतात असा महर्षींचा नैतिकतेविषयीचा एकंदर दृष्टीकोन होता. धार्मिक किंवा अध्यात्मिक जगतात नैतिकतेचा बडिवार माजवण्याची प्रदीर्घ परंपरा असली, तरी महर्षींनी मात्र अगदीच नाईलाज असेल तरच नैतिकतेच्या संदर्भात काहीशा नाखुशीनेच एखाद दुसरे वक्तव्य केल्याचे स्पष्टपणे दिसून येते.नैतिकतेविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी एखाद्या प्रश्नकर्त्याने महत्प्रयासाने महर्षींवर दबाव आणला, तर आत्मशोध घेणे हे एकमेव कृत्य माझ्या मते सदासर्वकाळ आणि निर्विवादपणे योग्य ठरणारे आहे, तेव्हा आपण तेच हाती घ्या असे सांगून महर्षी मूळ प्रश्नाला बगल देत असत.
प्रश्नः जग दु:खाच्या खाईत लोटले जात आहे. आपल्या मते त्या मागचे कारण काय आहे? ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही व्यक्तिगत तसेच सामूहिक पातळीवर काय करायला हवे?
रमण महर्षी: स्वत:चे खरे स्वरूप जाणून घ्या. तेवढी एकच गोष्ट साध्य करणे पुरेसे आहे.
प्रश्न: बंध किंवा मोक्ष हे वास्तविक पाहता अस्तित्वातच नसतील, तर आम्हाला सुख आणि दु:खाचा खराखुरा अनुभव येण्यामागे काय कारण आहे?
रमण महर्षी: एखादी व्यक्ती जेव्हा तिच्या मूळ (सच्चिदानंद) स्वरूपापासून ढळते, तेव्हा सुखदु:खे खरी वाटायला लागतात. ती खरे सांगायचे तर अस्तित्वातच नसतात.
प्रश्नः जर ईश्वरच 'सबकुछ' आहे, तर आपण केलेल्या कृत्याचे दु:खद परिणाम एखाद्या व्यक्तीला का भोगावे लागतात? जी कृत्ये केल्याने व्यक्तीला दु:ख भोगावे लागते, ती ईश्वरी संकेतानुसार होत नाहीत?
रमण महर्षी: 'मी कर्ता आहे' या भूमिकेतून जो वावरतो, त्यालाच सुख किंवा दु:ख भोगणे भाग पडते.
प्रश्नः पण सगळी कृत्ये तर ईश्वरी संकेतानुसार घडतात, व्यक्ती ही फक्त ईश्वरी सत्तेच्या हातातले एक साधन असते.
रमण महर्षी: हा तर्क तुम्ही फक्त दु:ख भोगावे लागले की वापरता, विनासायास सुख मिळाल्यावर नाही. 'मी ईश्वरी सत्तेच्या हातातले निव्वळ एक उपकरण आहे' अशी शरणागत भूमिका तुम्ही स्थळ, काळ आणि परिस्थितीची पर्वा न करता सुखदु:खाच्या सगळ्या प्रसंगात सातत्याने निभावली, तर दु:ख तुमच्या जीवनातून आपोआप हद्दपार होईल.
प्रश्नः जगात कित्येक महान व्यक्ती आहेत, समाजसेवक आहेत, मात्र त्यांना कुठलाही प्रश्न पुरता सोडवता येत नाही. सर्वत्र पसरलेली अनागोंदी आणि दुरावस्था कमी करता येत नाही.
रमण महर्षी: अशा व्यक्ती बहुतांशी अहं-केंद्रित असतात, आणि तेच त्यांच्या असहायतेचे कारण आहे. हेच लोक स्वरूपात स्थित असते, तर त्यांची गती काही वेगळीच झाली असती.
प्रश्नः ज्ञानी किंवा महात्मे मदत का करत नाहीत?
रमण महर्षी: आपण हा निष्कर्ष कुठल्या आधारावर काढला की ते मदत करत नाहीत? जगभरची समाजहितासाठी चाललेली दांभिक प्रवचनबाजी, तथाकथित सामाजिक कार्यच नव्हे तर आवश्यक वस्तुंचा पुरवठा या स्वरूपात चाललेले ठोस स्वरूपाचे मदतकार्य या तिन्ही गोष्टी एका बाजूला आणि महात्म्यांचे मौन तेवढे दुसर्या बाजूला - यात तुलना केली तर महात्म्यांच्या मौनाचे पारडेच नि:संशयपणे भारी पडेल! (न बोलताच) ज्ञानी इतरांच्या तुलनेत खूप काही साध्य करून जातो.
प्रश्नः कर्म करत असलेल्या व्यक्तीच्या मनात असलेल्या हेतूंचे काय? प्रत्येक कृत्यामागचा कर्त्याचा हेतू महत्वाचा नसतो?
रमण महर्षी: प्रामाणिकपणे, प्रेमपूर्वक, साधनशुचिता पाळून आणि शांत मनाने केलेले कुठलेही कृत्य हे सत्कृत्यच आहे. वासनांनी डागाळलेले, अहंतेचा दंश असलेले आणि मनाचा क्षोभ करणारे कुठलेही कृत्य दुष्कृत्यच ठरते. 'ज्याचा शेवट गोड, ते सारेच गोड' असा विचार करत कुठलेही सत्कृत्य गैरमार्गाने करू नका. गैरमार्गाने केलेले सत्कृत्य देखील शेवटी दुष्कृत्यातच परिणत होते. त्यामुळे कर्म करण्यामागच्या सद्भावनेइतकेच कर्म करण्यासाठी स्वीकारलेल्या पद्धतीच्या साधनशुचितेचे महत्व आहे.
प्रश्नः मुक्ती मिळवण्यासाठी सदाचरण करणे पुरेसे नाही का?
रमण महर्षी: कोणासाठी मुक्ती? मुक्तीची ईच्छा धरणारा कोण आहे? सदाचरण म्हणजे 'सत आचरण', आपल्याला या शब्दाने नेमके काय अभिप्रेत आहे? काय योग्य आहे आणि काय अयोग्य याचा निवाडा कोण करणार? तो कोणत्या निकषांवर करणार? आपापल्या पूर्वसंस्कारांच्या, धारणांच्या आणि पूर्वग्रहांच्या मोजपट्टीने प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने योग्य काय आणि अयोग्य काय याचा निवाडा करत बसते. खरे सांगायचे झाले तर वास्तविकतेचा यथार्थ आणि परिपूर्ण बोध झाला तरच योग्य काय आणि अयोग्य काय हे आपोआप लक्षात येते. मुक्तीची आस ज्याच्या मनात आहे त्या 'मी' चे खरे स्वरूप जाणून घेणे हाच त्यासाठीचा राजमार्ग आहे. बंधनात वावरत असल्याच्या भ्रमात असलेल्या खोट्या 'मी' ला किंवा अहंतेला (अध्यात्मिक साधनेने) तिच्या उगमस्थानाप्रत मागे नेत मूळ (सच्चिदानंद) स्वरूपात विलीन करून टाकणे हेच प्रत्येक व्यक्तीच्या हिताचे ठरेल असे खरे सदाचरण आहे.
पुरवणी:
स्वरूपज्ञान झाल्याने दु:खाचे मूळ कारणच नाहीसे झाल्याचे वर्णन पावसच्या परमहंस स्वामी स्वरूपानंदांनी असे केले आहे:
छाया तैसा देह, मानितो स्वभावे, नाही आम्हा ठावे, सुख-दु:ख
जन्म-मरणाचा, संपला संसार, झाला साक्षात्कार, स्वरूपाचा
कैचा देश-काळ, विश्व चि केवळ, माया-मृगजळ, कळो आले
स्वामी म्हणे आम्ही, अनादि अनंत, सुख-दु:खातीत, स्वयंसिद्ध
अंतर्यामी अवधूत स्थितीत असलेल्या ज्ञान्यासाठी विधी-निषेधांचे महात्म्य उरत नाही हे स्वामीजींनी असे सांगितले आहे:
नेणे विधी ना निषेध, नेणे पाप-पुण्य-बंध
नेणे लौकिक-संबंध, जगी वागतो स्वच्छंद
घर दार ना संसार, सदा राहे निराधार
स्वामी म्हणे संतजन, तया कैचे जगद्भान!

No comments:
Post a Comment