Sunday, 17 May 2020

महर्षी गीता - भगवान रमण महर्षी कृत गीता-सार

एकदा एका भक्ताने भगवद्गीतेचे सार सांगणारा एकच श्लोक कोणता असे विचारले असता भगवान रमण महर्षींनी पुढील श्लोक सांगीतला होता:

जाण पांडवा, मी भूतांचा असे आदि-मध्यांत
नित्य राहतो आत्म रूप मी सर्वांच्या हृदयात
(श्री स्वामी स्वरूपानंद कृत श्रीमत भावार्थ गीता १०.२०)

पुढे महर्षींनी गीता-सार सांगण्यासाठी भगवद्गीतेतल्या निवडक ४२ श्लोकांची सुसंगत आणि क्रमवार मांडणीदेखील केली (इथे हा श्लोक चौथ्या क्रमांकावर येतो). परमहंस स्वामी स्वरूपानंदांच्या श्रीमत भावार्थ गीतेतील श्लोक त्याच क्रमाने घेतले, तर महर्षींनी सुचवलेले गीता-सार असे होईलः

(1)
संजय सांगे धृतराष्ट्राते पार्थ तसा उद्वेगे
मान खालती घालुनी रथी बसला होता मागे
भरूनी आले नयन त्यातुनी घळघळ वाहे नीर
कारूण्ये अति दीन जाहला म्हणुनी सुटला धीर
(भावार्थ गीता २.१)

(2)
वदे श्री-पति, "क्षेत्र बोलती पार्था या देहाते
ह्याते जाणे तया बोलती 'क्षेत्रज्ञ' असे ज्ञाते"
(भावार्थ गीता १३.१)

(3)
सर्व क्षेत्री मी चि किरीटी, क्षेत्रज्ञ वसे जाण
क्षेत्र-क्षेत्रज्ञासी जाणणे ते चि मानितो ज्ञान
(भावार्थ गीता १३.२)

(4)
जाण पांडवा, मी भूतांचा असे आदि-मध्यांत
नित्य राहतो आत्म रूप मी सर्वांच्या हृदयात
(भावार्थ गीता १०.२०)

(5)
दिवस उगवला जसा मावळे अस्तापाठी उदय
रिते चि भरते भरले सरते हा सृष्टीचा न्याय!
उपजे ते ते विनाश पावे नाश पावले निपजे
अटळ गोष्ट ही म्हणुनि अर्जुना, तुज हा शोक न साजे
(भावार्थ गीता २.२७)

(6)
होउनि गेला होणार पुढे असा न ह्याते जाण
जन्म न पावे न निमे अज हा शाश्वत नित्य पुराण
जाण विनाशी देह जाय परि भंग नसे आत्म्याते
शस्त्रे छाया तोडिली तरी काय रूते अंगाते?
(भावार्थ गीता २.२०)

(7)
न तुटे न जळे न भिजे न सुके असे सर्व-गत नित्य
तेवि स्थिर हा अचल सनातन हा अव्यक्त अचिंत्य
(भावार्थ गीता २.२४)

(8)
ते अविनाशी जाण जे असे अखिल जगा व्यापोनी
विनाश अव्यय तत्वाचा त्या करू शकेना कोणी
(भावार्थ गीता २.१७)

(9)
जे नाही ते असेल कुठुनी अभाव अस्तित्वाचा?
तत्वज्ञांनी निर्णय केला ह्या दोहींचा साचा
जसे वेगळे करी मिसळले राजहंस पय-पाणी
तद्वत विश्वी गुप्त सार ते शोधी तत्वज्ञानी
सुवर्ण आणिक हीण निवडिती बुद्धिमंत तावून
उपाधीतुनी तेवि काढिती संत सार शोधून
की पाखडुनी भूस टाकुनी केवळ दाणा घेती
तैसे ज्ञानी माया त्यजुनी ब्रह्मपदी स्थिर होती
(भावार्थ गीता २.१६)

(10)
सूक्ष्म म्हणूनि ते लिप्त न होते जसे सर्वगत गगन
भरला देही सर्वत्र तसा अलिप्त आत्मा जाण
(भावार्थ गीता १३.३२)

(11)
पद अविनाशी स्वयंप्रकाशी तेजोमय ते पूर्ण
प्रकाशित तया करू न शकती सूर्य चंद्र वा अग्न
पावता जिथे पुन्हा न परते स्वर्ग-नरक-संसारी
जीव समरसे ते चि मम असे परं-धाम अवधारी
(भावार्थ गीता १५.६)

(12)
विश्वी भरले विश्व जाहले जरी ते चि संपूर्ण
तरी लोपता विश्व तत्वता ते न लोपते जाण!
त्या अव्यक्ताक्षर तत्वाते 'परम गति' असे म्हणती
पावता चि मत्परंधाम ते जन्म-मरण ना पुढति
(भावार्थ गीता ८.२१)

(13)
सांडुनि जाती घन वर्षांती जसे स्वभावे गगन
तेवि जयाते सोडुनि गेले मोह आणि अभिमान
पदार्थमात्री अनासक्त जे अध्यात्मी तल्लीन
नितांत निर्मळ बुद्धि जयांची नसे वासनाधीन
सुख दु:खादि द्वंद्व-बंध ते आकळिती न जयांते
सहजे ज्ञाते पावती चि ते अव्यय परम-पदाते
(भावार्थ गीता १५.५)

(14)
विषय-विलासामाजी चि पिसा होउनि जो साचार
शास्त्र-विधीते त्यजुनी येथे करितो स्वैराचार
न च कल्पांती ती परम गती तया लाभते जाण
सुख हि न च मिळे मग ते कुठले तया ब्रह्म-निर्वाण!
(भावार्थ गीता १६.२३)

(15)
तरी अर्जुना, एक चि नाना नाशिवंत भूतांत
सम अविनाशी ईश्वर पाहे तो ज्ञाता निभ्रांत
(भावार्थ गीता १३.२७)

(16)
मिळे सागरा अखंड-धारा जशी जान्हवी जगती
तसा भक्त तो मला भेटतो अनन्य-भावे अंती
मिळता अनली इंधन जैसे अग्निरूप ते होते
साक्षात्कारी तेवि संपते देव-भक्त हे नाते
मजसी मिळता नुरे तत्वता 'मी-तो' ऐसे द्वैत
म्हणुनि राहे मी चि होऊनी मज माजी चि निवांत!
अनन्य-भक्ति करी भारता, तो चि तत्वता माते
असा जाणतो आणि पाहतो समरस होतो तेथे
(भावार्थ गीता ११.५४)

(17)
स्वभाव ज्याचा जसा तयाची श्रद्धा हि तशी मानी
श्रद्धा धरितो तसा चि होतो श्रद्धा-मय हा प्राणी
(भावार्थ गीता १७.३)

(18)
ब्रह्म-निष्ठ तो ज्ञान पावतो तत्पर संयम-शील
परम शांति मग ती मिळवाया तया न लागे वेळ
(भावार्थ गीता ४.३९)

(19)
सदा रंगले नित्य जे भले प्रेमे माझ्या ठायी
ज्ञान-भक्ति-सुख देवोनि तया निज-धामाते नेई
(भावार्थ गीता १०.१०)

(20)
जाण अर्जुना, करूनी करूणा स्वये प्रकटुनी हृदयी
तया दावितो तेजस्वी तो ज्ञान-दीप लवलाही
प्रकाश होता नुरे तत्वता भ्रांति-रूप अंधार
मद्भक्ताला तदा संपला जन्म-मरण-संसार
(भावार्थ गीता १०.११)

(21)
आत्म-ज्ञाने असे जयांचे हरपले अज्ञान
तया प्रकटवी पर-तत्वाते रवि-सम ते चि ज्ञान
जशी उजळता पूर्व दिशा ती दिशा उजळती दाही
आत्मानुभवे तया स्वभावे विश्वी न दुजे काही
जिथे पहावे तिथे दिसावे आत्म-रूप जगतात
आत्मरूपता अशी प्रकटता रंगुनि जाती त्यात
(भावार्थ गीता ५.१६)

(22)
थोर इंद्रिये त्याहुनी मन ते थोर त्याहुनी बुद्धी
त्या बुद्धीहुनी परमात्म जो तो चि थोर निरूपाधि
(भावार्थ गीता ३.४२)

(23)
त्या आत्म्याते जाणुनि राहे आत्म-बळे स्थिर तेथे
आणि संहरी अजिंक्य ऐशा काम-रूप शत्रुते
(भावार्थ गीता ३.४३)

(24)
प्रदीप्त अग्नि जसा जाळुनी टाकी काष्ठे पूर्ण
ज्ञानाग्नि तसा भस्मसात करी सर्व हि कर्मे जाण
(भावार्थ गीता ४.३७)

(25)
नसे अपेक्षा फली जयाची सकल हि कर्मे करिता
'मी कर्ता, हे करीन' न शिवे संकल्प असा चित्ता
ज्ञानाग्निने अशी जयाची कर्मे जळुनी जाती
सुजाण नर ते त्या पुरूषाते 'पंडित' ऐसे म्हणती
(भावार्थ गीता ४.१९)

(26)
आत्म-ज्ञानी निष्काम यती स्वाधीन अंतःकरण
क्रोध-रहित जे सर्वत्र तया असे ब्रह्म-निर्वाण
योगी-जन तो कस पावतो ह्या देही चि ब्रह्म
ऐक भारता, तुज सांगतसे संक्षेपे ते वर्म
(भावार्थ गीता ५.२६)

(27)
मग ह़ळूहळू उपरत व्हावे धैर्य-युक्त बुद्धीने
आत्म-स्थित मन करूनी काही नच चिंतावे त्याने
(भावार्थ गीता ६.२५)

(28)
ज्या ज्या विषयाकडे धावते मन चंचल अस्थिर ते
तेथतेथुनी झणि आवरूनी स्व-वश करावे त्याते
जरी स्वभावे स्थिर न च होई तरी सुखे सोडावे
आणि पुनरपि तसे स्व-रूपी हळूचि परतू द्यावे
सवय लागता अशी सहज ते आत्म-रूपी रंगेल
आत्म-रूप ते होता स्थिरता कधी न मग भंगेल
(भावार्थ गीता ६.२६)

(29)
जये साधिला मनोलय असा पवनद्वारा गगनी
मोक्ष लक्षुनि तृष्णा-भीति-क्रोधरहित होवोनी
मन-बुद्धीसह इंद्रिय-वृत्ती रिगता चि महा-शून्यी
तो चि पावतो संयमी मुनी जीवन्मुक्ती निदानी!
(भावार्थ गीता ५.२८)

(30)
आत्म्याठायी भूतमात्र ते सकळा भूती आत्मा
सर्वत्र चि हे समत्व पाहे असे योग-युक्तात्मा
(भावार्थ गीता ६.२९)

(31)
नित्य अंतरी चिंतन करूनी उपासिती जे भक्त
अनन्य-भावे अखंड माते होउनिया संयुक्त
निज-सायुज्या नेउनी तया अथवा भक्ति-प्रेम
देउनी असा मी चि तयांचा वाहे योग-क्षेम!
(भावार्थ गीता ९.२२)

(32)
नित्य जोडला एकनिष्ठ तो असे श्रेष्ठ सर्वात
मी अत्यंत प्रिय त्यासि तसा तो प्रिय मज अत्यंत!
अनन्य सहजे निरंतर भजे मी चि होउनी माते
असुनी देही आत्म-रूप तो त्यजी देह-भावाते
(भावार्थ गीता ७.१७)

(33)
योगी ज्ञानी भक्त भला तो बहु जन्मांती शरण
मज सर्वस्वी येउनि चुकवी जन्म आणखी मरण!
पाहे अथवा निवांत राहे तरी तयाते मीच
सबाह्य-अभ्यंतरी दिसतसे नसे दुजे काहीच
आत्मानुभवे जग चि आघवे वासुदेव-मय झाले
बहु दुर्लभ तो महंत विश्वी विश्व होउनी खे़ळे!
(भावार्थ गीता ७.१९)

(34)
सोडुनि नाना मन:कामना आत्म-तुष्ट जो राहे
आत्म-द्वारा, तया बोलती स्थित-प्रज्ञ तू पाहे
(भावार्थ गीता २.५५)

(35)
निष्कामत्वे जगी वावरे जो नि:स्पृह निरूपाधि
निरहंकारी निर्मम नर तो परम शांति संपादी
(भावार्थ गीता २.७१)

(36)
सर्वा भूती भगवंत असा भाव बाणला म्हणुनी
कवणाते तो नुबगे ज्याते तेवि नुबगती कोणी
विषय निमाला विश्वी झाला विश्व-रूप जो पाही
म्हणुनि जयाला चित्ती नुरला हर्ष-विषाद मुळी हि
जगती न दुजे ह्यास्तव सहजे निर्भय जो अक्रोधी
प्राणाहुनि तो प्रिय मज होतो पार्था सम्यग्बोधी!
(भावार्थ गीता १२.१५)

(37)
समान मानापमान मानी समान शत्रू-मित्र
निश्चल राहे विश्वी पाहे आत्म-रूप सर्वत्र
होता ब्रह्मावबोध कर्मारंभ खुंटला ज्याचा
जाण अर्जुना, तो चि त्रिगुणातीत बोलिला साचा
(भावार्थ गीता १४.२५)

(38)
परी रंगला आत्म-सुखी जो जया आत्म-संतृप्ती
आत्म्यात चि तो संतुष्ट तया कार्य उरे ना जगती
असुनि देही तया न राहे देह-धर्म-संबंध
म्हणुनि तयाचा कर्तव्याचा सुटला सहजे बंध
(भावार्थ गीता ३.१७)

(39)
कर्म तयाने केले अथवा न च केले ह्या जगती
तरि धनंजया, अ-संगा तया काय तयाची महती!
नसे तयाचा मोह गुंतला इथे भूत-मात्रात
देह विसरला अखंड रमला जो आत्मानंदात
परी अर्जुना, जोवरी मना भेटे ना हे ज्ञान
कर्म-साधना तोवरी जना उचित सर्वथा जाण
(भावार्थ गीता ३.१८)

(40)
आणि मिळे ते गोड मानितो जो निर्मत्सर झाला
सुख दु:खादि द्वन्द्वे ती ना स्पर्शू शकती ज्याला
मिळो यश तसे न मिळो तेथे असे सदा सम-भावे
जरी आचरे कर्म सकल तो कर्म-बंध न च पावे
(भावार्थ गीता ४.२२)

(41)
पार्था, पाहे ईश्वर राहे सर्व-भूत-हृदयात
निज-मायेने तो चि खेळवी जगत्सुत्र निभ्रांत
घालुनी यंत्री माया-सूत्री तो परमेश नियंत्री
भूते सगळी जशी बाहुली सूत्र-धार कळसूत्री
(भावार्थ गीता १८.६१)

(42)
त्या हृदयस्था शरण सर्वथा जाई अर्जुना, भावे
जसे जान्हवी-जळ सर्वस्वी सागराकडे धावे
कृपा तयाची होता साची स्वानंदैकनिधान
पावशील तू परम शांतिचे दिव्य अव्यय स्थान
(भावार्थ गीता १८.६२)

भगवद्गीतेचे सारतत्व संक्षिप्त स्वरूपात ४२ निवडक श्लोकांमधून सांगून झाल्यावर फलश्रुती किंवा सांगता या स्वरूपात भगवान रमण महर्षींनी एक श्लोक तामिळ भाषेत रचला, त्याचा भावानुवाद असा करता येईलः

ज्याने अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करत असताना शाश्वत सत्याचा सहजतेने उपदेश केला, अर्जुनाच्या भवतापाचे लीलया निवारण केले, मानवी देहाच्या स्वरूपात अवतरलेल्या हे कृपासिंधू, तू आमचे रक्षण कर.

||श्रीकृष्णार्पणमस्तु||

Friday, 1 May 2020

श्री शेषाद्री स्वामी आणि भगवान श्री रमण महर्षी

श्री शेषाद्री स्वामी हे रमण महर्षींना समकालिन असलेले सिद्ध सांप्रदायिक सत्पुरूष होते. रमण महर्षी आणि स्वामींमधे आंतरिक जिव्हाळ्याचे आणि परस्पर आदराचे नाते होते. शेषाद्री स्वामींविषयी उल्लेख केला नाही तर महर्षींच्या चरित्राला पूर्णत्व येत नाही. महर्षींच्या आयुष्यात त्यांच्या भूमिकेला एक अनन्यसाधारण असे महत्व होते.

वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी सर्वसंगपरित्याग करून रमण महर्षी अरूणाचलाच्या आश्रयाला आले. तेथे निर्मनुष्य असलेल्या तळघरासारख्या जागेत असलेल्या 'पाताळलिंगम' या ठिकाणी महर्षींना याची देही याचि डोळा आपलाच मृत्यु होत असल्याचा अनुभव आला, तसाच पुढे निर्विकल्प समाधी अवस्था प्राप्त झाली. देहभान हरपलेल्या अवस्थेत त्या गुफेत महर्षी किती दिवस ध्यानस्थ होते हे सांगता येणे अवघड आहे. शेषाद्री स्वामींना दृष्टांत होत असत. एके दिवशी कोवळ्या वयातल्या एका सुकुमार योग्याचा अस्थिपंजर झालेला देह स्वामींना स्वप्नात दिसला आणि "या मुलाचे रक्षण कर" असा आदेशच अरूणाचलेश्वराने दिला. आपल्याला घडलेले दृष्टांत फोल नसतात हे पक्के माहित असलेल्या स्वामींनी त्या बालयोग्याचा शोध आरंभला. अरूणाचलाचा कानाकोपरा धुंडाळून देखील तो बालयोगी काही सापडेना. तेव्हा अरूणाचलेश्वरासमोर बैठक मारत स्वामींनी संकल्प सोडला की आता जोवर त्या बालयोग्याचा शोध लागत नाही तोवर अन्न किंवा पाण्याचे देखील सेवन करणार नाही. त्याला हुडकण्यासाठी आकाशपाताळ एक करेन. मनाच्या त्या उद्विग्न अवस्थेत अचानक स्वामींच्या लक्षात आले की आपण पाताळलिंगम या निर्जन स्थानी तर शोध घेतलेलाच नाही.

ते तडक पाताळलिंगम गुफेत येऊन पोचले. तिथे पाहतात तर काय आश्चर्य! अस्थिपंजर झालेला एक कोव़ळ्या वयातला मुलगा तिथे समाधिस्थ बसलेला त्यांना दिसला. देहाचे भान नसल्याने त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी क्षते पडलेली होती, पिसवांसारख्या परजीवी कीटकांनी केलेल्या जखमा चिघळलेल्या होत्या. स्वामींच्या डोळ्यात नकळत अश्रू आले. त्या अस्थिपंजर देहाला कडेवर घेत त्याचा पुत्रवत सांभाळ करायचे त्यांनी मनोमन ठरवले. रमण महर्षींच्या जीवनात शेषाद्रींचा प्रवेश झाला तो असा.

तिरूवन्नमलै गावाच्या पंचक्रोशीत शेषाद्री स्वामींची ख्याती एक विक्षिप्त अवलिया अशा स्वरूपाची होती. शेषाद्री स्वामींना संताप आला तर त्यांच्या पुढ्यात असलेल्या माणसाची खैर नसे. त्यांनी उच्चारलेले शब्द हमखास खरे होत असत. त्यामुळे गावात त्यांच्याबद्दल एक प्रकारची आदरयुक्त भीती होती. अध्यात्मात रूचि असलेल्या कित्येकांना त्यांच्याबद्दल नितांत आदर होता, तर काहींच्या लेखी ते फक्त एक विक्षिप्त व्यक्ती होते. शेषाद्रींचे कित्येक किस्से प्रसिद्ध आहेत. वानगीदाखल सांगायचे तर शेषाद्री स्वामी गावातून जात असताना समोरून एक गावकरी आणि एक रेडा येत होता. स्वामींनी त्या माणसाला विचारले, हे काय आहे? तो माणूस बुचकळ्यात पडला आणि म्हणाला, "महाराज, हा तर रेडा आहे". यावर स्वामी म्हणाले, "अरे रेड्या, ते ब्रह्म आहे!" स्वामींचे कोड्यात टाकणारे बोलणे लोकांना अगम्य वाटत असे.

गावकर्‍यांचा लेखी अडाणी आणि विक्षिप्त असलेल्या शेषाद्री स्वामींना आयुर्वेदाचे तसेच वनौषधींचे सखोल ज्ञान होते. याच ज्ञानाच्या जोरावर अस्थिपंजर झालेल्या बाल रमण महर्षींवर उपचार करायला त्यांनी सुरूवात केली. स्वतःचे शून्य उत्पन्न असलेल्या आणि भिक्षेवर निर्वाह करत असलेल्या स्वामींवर परस्वाधीन असलेल्या बालयोग्याची जबाबदारी आलेली होती. त्याचे पालन पोषण कसे करायचे हा प्रश्नच होता. समाधीस्थ असलेला तो कुमार जिवंत आहे का हे पाहण्यासाठी गावातली टवाळ मुले त्याला त्रास देत असत. क्वचित प्रसंगी दगड किंवा वीट देखील फेकून मारत असत. शेषाद्रींनी आपला रूद्रावतार दाखवल्यावरच हा प्रकार बंद झाला. शेषाद्रींनी त्या कालखंडात तळहातावरच्या फोडाप्रमाणे महर्षींची काळजी घेतली.

समाधीस्थ असलेल्या देहाच्या अन्नपाण्याच्या गरजा अत्यंत मर्यादित असतात. शेषाद्रींना हे माहित होते. अरूणाचलाला रोज पंचामृताचा अभिषेक होत असे. महादेवाच्या पिंडीच्या मागच्या बाजूस असलेल्या एका पन्हाळीतून हे पंचामृत खाली पडत असे. हे पंचामृतच आपण तयार केलेल्या द्रोणात गोळा करून  दिवसातून दोन तीन वेळा तेच समाधीस्थ असलेल्या बालकाला ते भरवत असत. देहधारणेसाठी ते पुरेसे ठरत असे. स्वामींनी केलेले उपचार आणि दैवी कृपा यांच्या जोरावर महर्षी या अवस्थेतून कालांतराने बाहेर आले. निर्विकल्प समाधीच्या पलीकडे असलेल्या 'सहज समाधी' अवस्थेत त्यांचे ईश्वरी कार्यही सुरू झाले.

महर्षींच्या अध्यात्मिक अधिकाराची जाणीव असल्याने शेषाद्री स्वामींनी कधीही त्यांचे गुरूपद घेण्याचा प्रयत्न केला नाही. वयाने मोठे असल्याने ते महर्षींचा उल्लेख माझा लहान भाऊ असाच करत असत. रमणाश्रमात आलेल्या यात्रेकरूंनी, खास करून मद्रास सारख्या शहरी भागातून आलेल्या उच्चशिक्षीत लोकांनी ध्यानधारणा करणे किंवा महर्षींकडून शंकानिरसन करून घेणे सोडून आश्रमाचे व्यवस्थापन किंवा सामाजीक, राजकीय विषयावर टीकाटिप्पणी सुरू केली की शेषाद्री स्वामी अस्वस्थ होत असत. स्पष्टवक्ते असल्याने ते अशा लोकांची कानउघाडणी करत असत. एका उच्च्पदस्थ आणि गर्भश्रीमंत व्यक्तीला ते म्हणाले होते, 'हे पहा, हा माझा भाऊ रमण. याला हजार रूपये पगार आहे. मला शंभर रूपये पगार आहे. इतक्या दूरवर आला आहात तर भलत्याच गोष्टीत लक्ष न घालता एक रूपयाची तरी कमाई कराल. की जसे आलात तसेच खंक अवस्थेत परत जाणार आहात?"

रमण महर्षींची आई उतार वयात अरूणाचलाच्या आश्रयाला आल्यानंतर "मी शेषाद्री स्वामी. मी संन्यासी आहे. या आश्रमात मात्र रमण नावाचा एक प्रापंचिक राहतो" अशी रमण महर्षींची फिरकी घ्यायला ते कमी करत नसत. महर्षींबरोबर सलगीच्या नात्याने आणि अनौपचारिकपणे बोलण्याइतका अधिकार विरळ्याच व्यक्तींचा होता. शेषाद्री स्वामी त्यापैकीच एक होते. महर्षीही नेहेमी स्मितहास्य करून स्वामींच्या हजरजबाबीपणाला आणि विनोदबुद्धीला दात देत असत. रमणाश्रमाला लागूनच शेषाद्री स्वामींचा मठ आणि त्यांची समाधी आहे. रमणाश्रमाला भेट देण्याची संधी मिळाली, तर शेषाद्री स्वामींच्या समाधीचे दर्शन न चुकता घ्या असे नम्रपणे सुचवून तसेच रमण महर्षी, शेषाद्री स्वामीं आणि सद्गुरू श्री गुरव सरांना वंदन करून लेखाची सांगता करतो.