रमण महर्षी हे आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवलेले सद्गुरू आहेत. विसाव्या शतकाचा पूर्वार्ध हा या दक्षिण भारतीय संतांचा कार्यकाळ होता. १८९७ साली तमिळनाडूमधे मदुराईजवळच्या एक खेड्यात त्यांचा जन्म झाला. वडिलांचा शेतीचा व्यवसाय होता. त्यांच्या तीन पुत्रांपैकी महर्षी हे दुसरे अपत्य होते. महर्षींचे कुटुंब धार्मिक वळणाचे होते. कुलदेवतांची विधीवत सेवा करणे तसेच मंदिराना भेटी देण्याचा त्यांचा परिपाठ होता. या कुटुंबाच्या इतिहासात एक आगळीवेगळी घटना घडलेली होती. अवधूत अवस्थेत भ्रमण करणार्या एका योगी पुरूषाला भिक्षा नाकारण्याची कोंण्या पूर्वजाकडून आगळिक घडल्याने त्याने या कुटुंबाबद्दल शापवाणी उच्चारलेली होती. महर्षींच्या अय्यर परिवारात प्रत्येक पिढीत एक तरी पुरूष सर्वसंगपरित्याग करून संन्यस्त जीवन जगेल असा शाप त्या योग्याने दिलेला होता.
शालेय जीवनात छोट्या रमणला फारसे स्वारस्य नव्हते. आपले काम करतानाही तो वेगळ्याच तंद्रीत असायचा. अंतर्मुख होणे आणि आत्मपरीक्षण करण्याकडे त्याचा खास ओढा होता हे मात्र सहज दृगोचर होत असे. आपली खरी ओळख नेमकी काय आहे याविषयीचे मूलगामी प्रश्न, उदा. "मी कोण आहे?" तो विचारत असे. आपल्या स्वरूपाची खरी ओळख आणि त्याचे उगमस्थान याविषयी असलेले गूढ उलगडावे असा निदीध्यासच त्याने घेतला होता असे म्हणावे तर ते अतिशयोक्त ठरणार नाही.
छोट्या रमणच्या व्यक्तित्वाची आणखी एक खासियत अशी की तो अत्यंत गाढ निद्रा घेत असे. निद्रादेवीच्या अधीन असताना त्याला एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवले किंवा अगदी चोपून काढले तरी त्याची झोपमोड होत नसे. गमतीने महिनोमहिने झोप घेणार्या रामायणातल्या एका पात्रावर बेतलेली 'कुंभकर्ण' अशी उपाधीही त्याला प्रदान करण्यात आलेली होती.
१८९६ च्या उन्हाळ्यात छोट्या रमणने चित्ताची एक वेगळीच अवस्था (जागृती, निद्रा आणि सुषुप्तीपलीकडची तुर्यावस्था) अनुभवली, जिचा त्याच्यावर अगदी खोलवर परिणाम झाला. त्याला एक विलक्षण प्रचिती आली जिचा आपला मृत्यु आणि पुनर्जन्म याची देही याची डोळा अनुभवला आहे असा अन्वयार्थ त्याने लावला. आपले अस्तित्व या देहाच्या पलीकडे आहे ही स्पष्ट अनुभूती देणारे काही दिव्य अनुभव त्याच्या चिदाकाशात विजेचा कडकडाट व्हावा तसे अतर्क्य पद्धतीने चमकून गेले. या घटना घडत असताना भौतिक शरीर किंवा आजूबाजूचे स्थूल जगत दोन्हींवर अवलंबून नसणारी अशी एक शाश्वत, नित्य आणि सनातन अशी सद्वस्तु आपण आहोत ही प्रगाढ प्रचिती त्याला अनुभवता आली.
छोट्या रमणच्या व्यक्तित्वाची आणखी एक खासियत अशी की तो अत्यंत गाढ निद्रा घेत असे. निद्रादेवीच्या अधीन असताना त्याला एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवले किंवा अगदी चोपून काढले तरी त्याची झोपमोड होत नसे. गमतीने महिनोमहिने झोप घेणार्या रामायणातल्या एका पात्रावर बेतलेली 'कुंभकर्ण' अशी उपाधीही त्याला प्रदान करण्यात आलेली होती.
१८९६ च्या उन्हाळ्यात छोट्या रमणने चित्ताची एक वेगळीच अवस्था (जागृती, निद्रा आणि सुषुप्तीपलीकडची तुर्यावस्था) अनुभवली, जिचा त्याच्यावर अगदी खोलवर परिणाम झाला. त्याला एक विलक्षण प्रचिती आली जिचा आपला मृत्यु आणि पुनर्जन्म याची देही याची डोळा अनुभवला आहे असा अन्वयार्थ त्याने लावला. आपले अस्तित्व या देहाच्या पलीकडे आहे ही स्पष्ट अनुभूती देणारे काही दिव्य अनुभव त्याच्या चिदाकाशात विजेचा कडकडाट व्हावा तसे अतर्क्य पद्धतीने चमकून गेले. या घटना घडत असताना भौतिक शरीर किंवा आजूबाजूचे स्थूल जगत दोन्हींवर अवलंबून नसणारी अशी एक शाश्वत, नित्य आणि सनातन अशी सद्वस्तु आपण आहोत ही प्रगाढ प्रचिती त्याला अनुभवता आली.
या सगळ्या विलक्षण आंतरिक दृष्टांतांच्या जोडीलाच 'अरूणाचल' या शब्दाविषयीचे अनिवार आकर्षणही रमणला जाणवत असे. अरूणाचलाबरोबर असेलेले उत्कट भक्तीभावनेचे नाते गहिरे होत होते, त्या जोडीलाच या एका शब्दाभोवतीच नियतीने आपले जीवन गुंफलेले आहे असेही रमणला जाणवत असे. वयाच्या सोळाव्या वर्षी योगायोगाने अरूणाचल नाव असलेला एक पर्वत खरोखरच अस्तित्वात आहे ही माहिती रमणपर्यंत पोचली आणि त्याच्या आनंदाला पारावारच उरला नाही. आज आधुनिक सुविधा असलेले तिरूवन्नमलै हे गाव या पर्वताभोवतीच वसलेले आहे.
रमणचे शालेय शिक्षण संपत आलेले होते, आणि त्या सुमारासच कुणीतरी अत्यंत बेदरकारपणे रमण कुठलेही शिक्षण घेण्यासाठी लायक नाही अशा स्वरूपाची टीका त्याच्यावर केली. उद्विग्न होउन शिक्षणाला रामराम ठोकण्याचा ठाम निर्णय रमणने त्याच वेळी घेतला. विख्यात तमिळ संतांविषयीची पुस्तके वाचण्याची रमणला उपजतच गोडी होती, त्यामुळे घरादाराचा त्याग करून धार्मिक साधकाप्रमाणे जीवन व्यतित करावे या निष्कर्षापर्यंत रमण पोचला. साहजिकच आपल्या धार्मिक श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या अरूणाचलाकडे प्रस्थान ठेवावे असे त्याने ठरवले.
वयाच्या सतराव्या वर्षी सर्वसंगपरित्याग करत रमणने अरूणाचल गाठण्यासाठी वाटचाल सुरू केली. चार दिवसांच्या बहुतांशी रेल्वेने केलेल्या खडतर प्रवासानंतर तो अरुणाचली पोचला. तिथे पोचल्यावर तो थेट मंदिराच्या गाभार्यात उभा ठाकला आणि तिथल्या शिवलिंगासमोर उभे राहून त्याने आपले मनोगत व्यक्त केले - "ईश्वरी आदेशानुसार मी सर्वसंगपरित्याग करून आज येथे (आपल्या कर्मभूमीत) दाखल झालेलो आहे."
अरूणाचल पर्वताच्या परिसरातल्या मंदिरांमधे आणि गुहांमधे ध्यानस्थ अवस्थेत, अध्यात्मिक चित्तशुद्धीचा ध्यास घेत आणि शुकासारखे पूर्ण वैराग्य आणि मौन पाळत रमणने दहा वर्षे व्यतित केली. या कालखंडात लोकांनी विक्षीप्त ठरवलेल्या आणि एकांतात राहणार्या शेषाद्री स्वामी या योगी पुरूषाने पुत्रवत रमणचा सांभाळ केला. याच सुमारास अध्यात्माच्या प्रांतातले एक अधिकारी सद्गुरू 'ब्रह्म स्वामी' या नावाने रमणची ख्याति व्हायला लागली आणि साधकांनी या स्वामींच्या भेटीला येणेही सुरू झाले. या शिष्यवर्गापैकी काही लोक हे प्रकांड पंडितही होते, त्यांच्याकडून अध्यात्मपर काही पवित्र ग्रंथांचाही लाभ रमणला होत असे. दक्षिण भारतातल्या अनेकविध भाषांमधले ग्रंथ वाचून धार्मिक प्रांतातल्या पंथ परंपरांविषयीची मोलाची माहितीही याच काळात त्याने आत्मसात केली.
सुरूवातीच्या कालखंडात रमणच्या पार्श्वभूमिविषयी जाणून घेताना त्याच्या मातृभाषेतून संवाद साधूनही शिष्यवर्गाला बरीच अडचण येत असे, कारण रमण बोलणे टाळत असे आणि आपले मौन भंग होउ देत नसे. जसजसा काळ लोटला तशी ही मौनी साधूची अवस्था हळूह़ळू मागे पडली आणि आश्रमसदृश वातावरणात अत्यंत संयत आणि सहज व्यावहारिक जीवन व्यतित करण्याची सुरूवात झाली.
भारतातून तसेच परदेशातून आपल्या नानाविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी अगणित साधक या स्वामींकडे यायला लागले. या शिष्यांपैकी गणपती मुनि हे स्वतः एक महान योगी पुरूष होते. व्यंकटरमण अय्यर या जन्मनावातील 'रमण' हा शब्द घेऊन स्वामींचे 'भगवान श्री रमण महर्षी' असे नामकरण गणपति मुनिंनीच केले, आणि पुढे तेच जनमानसात रूढ झाले. कालौघात रमण महर्षींच्या शिष्यवर्गाने अरूणाचल पर्वताच्या सान्निध्यात एका मंदिराची (मातृमंदिर) तसेच एका आश्रमाची निर्मिती केली. या आश्रमात कित्येक यात्रेकरूंच्या निवासाची व्यवस्था होउ शकते.
आश्रमातल्या जीवनशैलीचे वर्णन असे करता येईल - रमण महर्षी आश्रमाच्या स्वयंपाकघरात स्वतः पहाटेपासून कार्यरत असत. न्याहारी किंवा भोजनाच्या वेळी इतर शिष्यगणांसोबतच अन्नग्रहण करण्याचा महर्षींचा शिरस्ता होता. आपल्याला कुठलीही खास सुविधा किंवा सवलत दिलेली त्यांना खपत नसे. कुठलाही पदार्थ असो तो सर्वांना मिळाला अशी खात्री करून घेत मगच तो ते स्वतःच्या पानात घेत असत. श्री रमणाश्रम ही जागा अरूणाचलाच्या परिसरातील पशु पक्ष्यांसाठी एक भयमुक्त संचार करता येईल असे आश्रयस्थान होते (आजही तसेच आहे). आश्रमाच्या परिसरातली माकडे, गायी, खारी तसेच मोर आणि इतर पक्षी यांच्याविषयी महर्षींना मोठाच जिव्हाळा होता. प्राण्यांना हिडीस फिडीस करणे तर दूरच, महर्षींनी प्रत्येक प्राण्याचे नामकरण केलेले होते, आणि या नावानेच ते प्रत्येकाचा कटाक्षाने आदरपूर्वक उल्लेख करत असत.
"मी कोण आहे?" या प्रश्नातून अभिव्यक्त होणारी, आपल्या स्वरूपाचा शोध घेणारी 'आत्मविचार' ही साधनाच महर्षींनी निरंतर सुरू ठेवली. मंत्र दीक्षा देणे किंवा नियमीत उपदेश करणे या दृष्टीने पाहता रमण महर्षी हे पारंपारिक पद्धतीचे गुरू नव्हते असेच म्हणावे लागेल. अगदी खरे सांगायचे तर एखाद्या साधकाने मंत्र जपाची साधना करण्याची ईच्छा व्यक्त केलीच, तर महर्षी संस्कृत भाषेतले मंत्र किंवा ईश्वराच्या अनेक नामांपैकी एखादे नाम न सांगता 'मी' ही सहज होणारी जाणीव किंवा 'मी आहे' या अहंस्फुरणाकडे लक्ष पुरवायला सांगायचे. त्या योगे साधकाचे चित्त बाह्य शब्द किंवा वस्तुकडे आकृष्ट न होता त्याच्या 'शुद्ध अस्तित्वाचे' किंवा स्वत:च्या सच्चिदानंद स्वरूपाचे गूढ थेटपणे उलगडण्यासाठीच मनाची एकाग्रता व्हावी असा हेतू असे.
असे असले तरी रमण महर्षींनी अनौपचारिक पद्धतीने दीक्षा देण्याची अनेक उदाहरणे आहेत. या दीक्षा निव्वळ कृपाकटाक्षाने, अनाहूतपणे केलेल्या स्पर्शाने आणि स्वप्न दृष्टांताने घडून येत असत. महर्षींच्या उपस्थितीत अशी काही विलक्षण ताकद होती, की त्यांनी वरपांगी काहीच कृती केली नाही तरी आश्रमात आलेल्या यात्रेकरूंवर त्यांच्या सहवासाने खोलवर प्रभाव पडत असे. महर्षींची भेट झाल्यावर कित्येक परिपक्व साधकांच्या उर्वरित आयुष्याचा प्रवाहच क्षणार्धात बदलून जात असे. रमण महर्षींनी कित्येक साधकांना स्वप्नात दर्शन देत आणि फक्त काही क्षणांच्या उत्कट नजरानजरेने दीक्षा दिल्याची उदाहरणे आहेत. शेकडो मैलांवर असलेल्या शिष्यांना एका तेजःपुंज आकृतीच्या स्वरूपात महर्षींनी दर्शन द्यावे आणि मग कालांतराने ती आकृती म्हणजेच महर्षी असा त्या शिष्याला प्रत्यक्ष भेटीत उलगडा व्हावा असेही घडलेले आहे.
शेवटच्या काही वर्षात महर्षींना असाध्य अशा कर्करोगाने ग्रासले होते. त्यांना गमावण्याबद्दलची चिंता काही भक्तांनी व्यक्त केल्यावर महर्षींनी केलेले एक विधान मोलाचे आहे, "मी कुठेही निघालेलो नाही, मी कोठे जाणार आहे? जिथे माझे अस्तित्व आहे तिथेच मी निरंतर वास्तव्य करून असणार आहे". जन्म आणि मृत्युच्या द्वैताला ओलांडून गेलेल्या जीवनमुक्ताचे हे विधान खूप काही सांगून जाते.
१९५० साली एप्रिल महिन्यात पद्मासनात आसनस्थ होत 'ओम' या एकाक्षरी मंत्राचा उच्चार करत महर्षींनी देहत्याग केला. प्रसिद्ध फ्रेंच छायाचित्रकार कार्टियर-ब्रेसन त्या वेळी आश्रमात उपस्थित होता. परमपवित्र अरूणाचलाच्या सान्निध्यात अनुभवलेल्या महर्षींच्या महानिर्वाणाच्या वेळच्या खगोलशास्त्रीय घटनेचे वर्णन त्यानी असे केले आहे - "आकाशात मला एक तेजस्वी शेपटी असलेला तारा अचानक उदयाला आलेला आणि मग संथगतीने मार्गक्रमण करताना दिसला. इतके सुंदर दृष्य मी आयुष्यात पाहिलेले नव्हते. अरूणाचलाची जणू एक प्रदक्षिणा करून तो तारा पर्वताच्या माथ्याच्या मागे लुप्त झाला. आम्ही लगेच आमच्या घड्याळाकडे पाहिले. रात्रीचे आठ वाजून सत्तेचाळीस मिनीटे झाली होती. आम्ही तसेच धावत आश्रमात गेलो आणि आम्हाला समजले की नेमक्या त्याच क्षणी आमच्या सद्वुरूंनी आपली लौकिक यात्रा संपवली होती." १४ एप्रिल १९५० च्या त्या दिवशी ही घटना मद्रासच्या सभोवतालच्या गावांमधे कित्येकांनी पाहिली होती. या अलौकिक घटनेचे वृत्तांतही वृत्तपत्रात पुढच्या दिवशी छापून आले होते.
महर्षींनी आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे आजही रमणाश्रमाचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. देश विदेशातून इथे लोटणारा साधकांचा महापूर आजही आटलेला नाही. महर्षींवर गाढ श्रद्धा असलेल्या साधकांना त्यांच्या देही नसण्याची उणीव जाणवत नाही. उलट अरूणाचलाच्या परमपवित्र सान्निध्यात महर्षींच्या अस्तित्वाची आणखीच प्रकर्षाने प्रचिती येते.
|| श्री रमणार्पणमस्तु ||