तिन्हीसांजेची वेळ होती. एका अभिजात संगीतप्रेमी मित्राला भेटायला त्याच्या सोलापुरातल्या एका चाळीतल्या घरी गेलो होतो. त्याचे वडील पट्टीचे व्हायोलिन वादक आणि निष्णात संगीत शिक्षक होते. घराचे दार सताड उघडेच होते. दारात पाऊल ठेवताच सतारीचे 'मारव्याचे' सूर कानी पडले. संथ आलापी सुरू होती. त्या सतारवादकाने धैवतापासून मींड घेत कोमल रिषभ असा काही नेमका लावला, की त्या स्वरात ओतप्रोत भरलेली आर्तता, व्यथा थेट काळजाला भिडली.
एकही अवाक्षर न उच्चारता मी नादब्रह्मात बुडून गेलेल्या गुरुजींजवळ मांडी घालून बसलो. त्यांच्याशी फक्त नजरेनेच संवाद सुरू होता. समजून उमजून शास्त्रीय संगीताचा एकत्र आस्वाद घेणार्या श्रोत्यांचे भावबंध कळत नकळत जुळतात आणि त्यातून पुढे रक्ताच्या नात्यांपेक्षाही जवळची नातीगोती तयार होतात. जवळजवळ अर्धा तास चाललेली ती विलक्षण आलापी संपली. त्यानंतर थोडा वेळ टाचणी पडली तरी आवाज व्हावा अशी शांतता होती. श्रोत्यांना टाळ्या वाजवण्याचेही भान नव्हते. अशी शांतता ही कलावंताला मिळणारी फार मोठी दाद असते. श्रोते भानावर आले आणि टाळ्यांचा एकच कडकडाट सुरू झाला. तो बराच वेळ चालू होता.
टाळ्यांचा कडकडाट थांबल्यावर ते सतारवादक अदबीने हिंदीत बोलायला लागले. "या वाद्यावर मारवा वाजवण्याचा एक प्रयत्न मी आपल्यासमोर केला आहे. या रागाला षड्ज-पंचमाचा आधार नाही. पंचम वर्ज्य, तर षड्ज अत्यंत कमी प्रमाणात लावायचा. त्यामुळे सतारीच्या तारा जुळवतानाच कोमल रिषभ सतत कानी पडेल अशा रीतीने त्या जुळवण्याची पद्धत मी वापरून पाहिली आहे." असा काहीसा त्या बोलण्याचा मथितार्थ होता. गुरुजी अगदी मन लावून ते ऐकत होते. गुरुजींनी टेपरेकॉर्डर बंद केला आणि नंतर बराच वेळ मारवा आणि उस्ताद विलायत खाँ या विषयावर ते भरभरून बोलत होते. खाँसाहेबांच्या जादूभर्या सतारीशी माझा परिचय झाला तो असा.
त्या दिवशी उस्ताद विलायत खाँसाहेबांच्या जाहीर कार्यक्रमांच्या (लाईव्ह कॉन्सर्टस) चार पाच कॅसेट्स घेऊनच घरी गेलो.गुरुजींकडून आणि इतर माध्यमांमधून पुढे त्यांच्या सतारवादनातल्या अनोख्या तंत्राबद्दल आणि त्यांच्या लोकविलक्षण चरित्राबद्दल माहिती मिळत गेली. ध्वनिमुद्रिकांचा संग्रह जमत गेला. या 'सनातनी बंडखोर' स्वरयात्रीचा सांगीतिक प्रवासही उलगडत गेला.
विलायत खाँसाहेबांचा जन्म आता बांगलादेशात असलेल्या गौरीपूर संस्थानात १९२८ मध्ये झाला असावा. त्यांच्या जन्मतिथीबद्दलच्या माहितीत एकवाक्यता नाही. त्यांचे घराणे मूळचे रजपूत, पण पुढे मुस्लिम धर्म स्वीकारलेले. घराण्यात सूरबहार आणि सतारवादनाची पिढ्यानपिढ्यांची परंपराच होती. त्यांचे वडील उस्ताद इनायत खाँ हे त्या काळचे इटावा किंवा इमदादखानी घराण्याचे आघाडीचे सूरबहार आणि सतारवादक होते. विलायत खाँ जेमतेम ९ वर्षांचे असतानाच त्यांच्या कुटुंबावर वज्राघात झाला. इनायत खाँसाहेबांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे काका वाहिद खाँ यांच्याकडे त्यांचे सूरबहार आणि सतारीचे शिक्षण सुरू झाले. आई बशीरन बेगम यांचे माहेरचे घराणे गायकांचे, त्यामुळे आजोबा उस्ताद बंदे हसन आणि आई बशीरन बेगम कडून विलायत खॉंसाहेबांना गायकीची तालीम मिळायला लागली. एक वेळ अशी आली की सतारवादनाकडचे त्यांचे लक्ष कमी होत गेले आणि गायकीकडचा ओढा विलक्षण वाढला.
आपल्या मुलाचे सतारवादनाकडे दुर्लक्ष होत आहे हे लक्षात आल्यावर बशीरन बेगमना आपल्या मुलाला स्पष्टपणे सांगावे लागले, "माझे माहेरचे घराणे गायकांचे तर सासरचे सतार वादकांचे आहे. लग्नानंतर मी सासरच्या घराण्याशीच एकनिष्ठ राहणे सयुक्तिक आहे, नव्हे तोच माझा धर्म आहे. त्यामुळे तुला संगीतक्षेत्रात जर नाव करायचे असेल, तर ते सतारवादक होऊनच करावे लागेल. अन्यथा या क्षेत्रातून बाहेर पड." हा निर्वाणीचा इशारा ऐकून विलायत खाँसाहेब हादरून गेले. सतारवादनाची तालीम मिळणे अवघड, आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आणि त्यात आईने सुनवलेला हा निर्णायक फैसला!
बशीरन बेगमच्या त्या निर्णयामागे काही दैवी योजना असावी. एकतर संगीतक्षेत्रातून बाहेर पडणे किंवा येनकेनप्रकारेण सतार वादनाच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत सतार आणि सूरबहार वादकांच्या आपल्या घराण्याचे नाव उज्ज्वल करणे हे दोनच पर्याय छोट्या विलायतसमोर होते. अत्यंत जिद्दी, मनस्वी आणि उपजतच प्रतिभावंत असलेल्या विलायतने साहजिकच दुसरा पर्याय निवडला. मग वडिलांच्या शिष्यवर्गापैकी काही ज्येष्ठ शिष्यांकडून सतारवादनातले इटावा घरण्याचे खास तंत्र आणि बारकावे शिकायला त्याने सुरुवात केली. प्रसंगी मान अपमान सहन करत, काबाडकष्ट करत घेतला वसा टाकायचा नाही अशा निर्धारानेच तो सतारवादनाचे इमदादखानी घराण्याचे तंत्र आत्मसात करायला लागला.
एकीकडे पोटाची खळगी भरण्यासाठी गॅरेजमध्ये काम करायचे, मिळेल तशी तालीम घ्यायची आणि चार पैसे जास्तीचे मिळावे यासाठी त्याच गॅरेजच्या रखवालदाराचे काम पत्करून तिथेच रात्री अपरात्री रियाज करायचा असा अत्यंत कष्टप्रद दिनक्रम सुरू झाला. त्यातच सतारवादनावर चिंतन, मनन सुरू झाले. अत्यंत जिद्दी आणि मनस्वी स्वभाव आणि त्या जोडीला सर्वश्रेष्ठ सतारवादक होणे या निदीध्यास इतका प्रबळ होता की अन्नान्न दशा असलेल्या त्या विपरीत परिस्थितीतही या लोकविलक्षण कलाकाराचा व्यक्तिगत आणि सांगीतिक पिंड मात्र वेगाने आकाराला येत होता.
विलायत खाँसाहेबांची रियाजाची पद्धतही अफलातून होती. एक मेणबत्ती पेटवायची, ती विझेपर्यंत एक पलटा घोटून काढायचा. मेणबत्ती विझली की छोटीशी विश्रांती, थोडेसे धूम्रपान आणि मग पुढची मेणबत्ती पेटवायची आणि दुसरा पलटा सुरू! सिगारेटचा माझ्याइतका विधायक उपयोग कुणीच केला नसेल असे पुढे खाँसाहेब गमतीने म्हणायचे ते यामुळेच. आधी सतारवादक विलायतवर कुरघोडी करू पाहणारा आपल्यातला गायक आता सतारवादकात मिसळून जातो आहे, एकरूप होऊ पाहतो आहे हे खॉंसाहेबांच्या एव्हाना लक्षात आले होते.
सतार वाजवताना उजव्या हाताने मिजराफीचा तारांवर आघात करत डाव्या हाताने स्वरावली वाजवतात. त्या काळी तंत अंगाने होणारे वादन प्रचारात असल्याने आणि मींड, गमक सारखे प्रकार वाजवताना येत असलेल्या वाद्याच्या अंगभूत मर्यादांमुळे उजव्या हाताने केल्या सतारीच्या तारांवर केल्या जाणार्या आघातांचे तालबद्ध, लयबद्ध वादनप्रकार प्रगत झालेले असले तरी डाव्या हाताने केल्या जाणार्या 'खिंचकामावर' मात्र फारसा विचार झालेला नव्हता.
सतार वादनातल्या या मर्यादा खाँसाहेबांमधल्या सतत अतृप्त असणार्या कलावंताला, पट्टीच्या गायकाला अस्वस्थ करत होत्या. त्यांच्यावर मात करण्यासाठी खाँसाहेबांनी सतारीच्या रचनेत मूलभूत बदल करायला सुरुवात केली. 'तब्ली, 'जवारी' या सारख्या भागांची रचना बदलत आणि पडदे मिळवण्याच्या पद्धतीचा तसेच चिकारीच्या तारेवर सातत्याने आघात करण्याच्या पद्धतीचा नव्या रचनेशी ताळमेळ साधत खाँसाहेबांनी सतारीतल्या मींड, गमक वाजवताना येणार्या मर्यादांवर मात केली. डाव्या हाताने तारा खेचण्याचे नवे तंत्र विकसीत करत ख्याल गायकीतली आलापचारी, तानक्रिया तिच्या सगळ्या बारकाव्यांसकट सतारीवर उतरवायला सुरुवात केली. गायकीतल्या निरनिराळ्या घराण्यांचा अभ्यास करत, त्यातली सौंदर्यस्थळे सतारीवर सही सही वाजवून काढत सतारीला चक्क 'गाता गळा' दिला. सतारीवर वाजवल्या जाणार्या 'गायकी अंग' या नव्या बाजाचे विलायत खाँसाहेबच जनक आहेत, 'आर्किटेक्ट' आहेत असे म्हणावे तर अतिशयोक्ती होणार नाही.