संतूर - जम्मू काश्मिरमधले तिथल्या 'सुफीयाना मौसिकी' या लोकसंगीतात वापरले जाणारे एक साधेसुधे वाद्य. स्वरमंडलसारखी रचना असलेले आणि जेमतेम दीड सप्तकांचा आवाका असलेले हे तंतुवाद्य काश्मिरी लोकगीते गाताना साथीला घ्यायची खरे तर परंपरा होती, पण काश्मिर नरेशांच्या पदरी असलेल्या राजपुरोहितांच्या घराण्यात जन्म घेण्याचे भाग्य लाभलेल्या पं. उमादत्त शर्मांच्या मनात मात्र या वाद्याच्या भविष्याबद्दल काही वेगळेच मनसुबे आकार घेत होते. वास्तविक पाहता त्या काळात तरी राजपुरोहितांच्या घराण्यात गाणे बजावणे या प्रकाराला फारशी प्रतिष्ठा नव्हती. राजपुरोहिताने गाणे बजावणे करणे शिष्टसंमतही नव्हते. पण अभिजात संगीताविषयीची आंतरिक ओढ पं. उमादत्त शर्मांना स्वस्थ बसून देत नव्हती. त्यांनी चोरून मारून का होईना, बनारस घराण्यातल्या थोर गायक पं. बडे रामदासजींकडून तालीम घ्यायला सुरूवात केली आणि नेटाने रियाझ करत बनारस घराण्याच्या गायकीत चांगलेच नैपुण्य मिळवले. जोडीला तबल्याचा अभ्यासही सुरू होताच.
चाकोरीबद्ध विचार करणारी सामान्य पोटभरू व्यक्ती आणि सृजनशील कलावंत यात जात्याच मोठा फरक असतो. ईश्वरी वरदान लाभलेल्या कलावंताकडे नवनिर्मितीसाठी आवश्यक असलेली दिव्यदृष्टी तर असतेच, आपले स्वप्न वास्तवात आणण्यासाठी वाटेत कितीही काटेकुटे आले, ठेचा लागल्या, अपमान झाले तरी अथक प्रयत्न करत राहण्याची आंतरिक ओढही असते. ज्योतिष्य, आयुर्वेद वगैरेंचा गाढा अभ्यास असलेल्या आणि उर्दु, पर्शियन, संस्कृत, डोगरीसह अनेक भाषांवर प्रभुत्व असलेल्या प्रकांडपंडित उमादत्त शर्मांच्या दिव्यदृष्टीला संतूरमधे दडलेल्या कित्येक शक्यता स्पष्टपणे दिसत होत्या. त्यामुळे संतूरचे स्वरूप बदलून हे वाद्य अभिजात (शास्त्रीय) संगीतासाठी परिपूर्ण कसे करता येईल यावर त्यांचा सतत विचार सुरू होता, त्या दृष्टीने संशोधनही सुरू होते. शर्माजींच्या प्रयत्नांना म्हणावे तसे यश मात्र मिळत नव्हते.
१३ जानेवारी १९३८ ला शर्माजींना पुत्ररत्नाचा लाभ झाला. काश्मिरी पंडितांच्या परंपरेप्रमाणे लहान बाळाच्या जिभेवर केशराने ओमकार रेखाटण्याचा विधी झाला. धार्मिक वळणाच्या आणि अध्यात्मिक पिंड असलेल्या उमादत्त शर्मांनी सुचवल्याप्रमाणे मुलाचे 'शिवकुमार' असे नामकरणही झाले. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात. या उक्तीप्रमाणेच उमादत्त शर्मांना संतूरविषयीचे त्यांचे स्वप्न पूर्णत्वाला नेण्याची क्षमता त्यांच्या मुलात लहानपणीच दिसली. बनारसची गायकी आणि तबला शिकणार्या शिवकुमारांमधे असलेली विलक्षण प्रतिभा उमादत्तजींनी हेरली. एके दिवशी छोट्या शिवकुमारांच्या हातात संतूर देत दे म्हणाले, "शिव, आजपासून तुला या वाद्याची आराधना करायची आहे." हिंदुस्थानी अभिजात वाद्यसंगीताच्या इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवण्याजोगाच म्हणावा लागेल. शिवकुमारांनी केलेला अथक रियाझ, त्यांची तपश्चर्या कुठवर पोचली आहे ही पाहण्याची वेळ आलेली होती. १९५५ मधे पोरसवदा वयाचे शिवकुमार मोठ्या उत्साहाने आणि आशेने संतूरवादनाचे कार्यक्रम करण्यासाठी मुंबापुरीच्या मायानगरीत येउन पोचले.
मुंबापुरीची पहिली सफर या युवक संतूरवादकासाठी एक पूर्णपणे निराश करणारा अनुभव मात्र ठरली. शिवकुमार शर्मा नामक काश्मिरी युवक आणि त्याचे संतूरवादन हा सांगितिक वर्तुळात बहुतांशी थट्टामस्करीचा विषय ठरला. कसले अजब वाद्य आहे, या वरून उंदीर पळाला तरी कानाला गोड लागेल, पण यावर अभिजात रागदारी संगीत वाजवणे हे जरा अतिच होते आहे अशी हेटाळणी कित्येक नामवंत संगीत समीक्षकांनी, कलाकारांनी उघडपणे केली. मोजक्याच लोकांनी शिवकुमारांमधल्या असामान्य प्रतिभेचे कौतुक केले. त्यातल्या हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या लोकांनी संतूरवर शास्त्रीय रागदारी संगीत वाजवता येईल या संकल्पनेशी सहमती दर्शवली. बहुतांशी संगीत तज्ञांनी आपली असामान्य प्रतिभा संतूरसारख्या वाद्यामागे वाया न घालवता सतार किंवा सरोद शिकणे बरे पडेल, अजूनही वेळ गेलेली नाही असा मोलाचा सल्ला शिवकुमारांना दिला.
मोठ्या उत्साहाने जम्मूची जन्मभूमी सोडून, घरातली छत्रछाया सोडून मुंबईला आपली कर्मभूमी करण्याच्या इराद्याने इतक्या दूरवर आलेले शिवकुमार हताश होउन जम्मूकडे परत फिरले. हा मोठ्याच कसोटीचा कालखंड होता. त्यांच्या खंतावलेल्या मनाला द्विधा मनस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नव्हता. बेभरवशाच्या संगीत क्षेत्राच्या आपण खरोखरच मागे लागावे का? संतूरचा नाद सोडून देत सतार किंवा सरोदवादन शिकावे का? असे सगळे प्रश्न पडल्याने मन सतत दोलायमान होत होते. शेवटी शिवजींनी एकदाच पक्का निर्धार केला - ज्या अर्थी आपले सद्गुरू संतूर या वाद्याला शास्त्रीय संगीताच्या व्यासपीठावर प्रतिष्ठेचे स्थान मिळवून देणे हेच तुझे जीवितकार्य आहे असे आत्मविश्वासाने सांगत आलेले आहेत, त्याचाच अर्थ असा की प्रत्यक्षात तसे घडण्याची पुरेपूर शक्यता आहे. जर कुठे उणीव असेलच, तर ती आपल्या प्रयत्नात आहे. त्यामुळे आता जे काही भले बुरे होईल ते होउ द्यावे, पण आपले आयुष्य आपण संतूरसाठीच खर्ची घालावे. शिवकुमार पुन्हा एकदा नव्या हुरूपाने रियाझ करायला लागले. एखाद्या योगी पुरूषासारखे संतूरविषयक चिंतन, मनन आणि निदीध्यासाच्या मागे लागले. निव्वळ इच्छाशक्तीच्या जोरावर अशा कचाट्यातून बाहेर पडून यशस्वी होणार्या व्यक्ती मुर्दाड,दुराग्रही, हटवादी होतात. मात्र श्रद्धा आणि गुरूभक्तीच्या जोरावर हा काट्याकुट्यांनी भरलेला हा खडतर प्रवास पार पाडत आपले ध्येय साध्य करणारे शिवजींसारखे कलावंत शांत, संयत आणि अनाग्रहीच राहतात.
संतूरच्या या शोधयात्रेतच सभोवतालच्या नितांत सुंदर निसर्गाशी शिवकुमारांची नाळ जोडली गेली. त्यामुळे सतत रियाझ करत असतानाही त्यांना कधी थकवा जाणवला नाही. सृजनाची प्रेरणा कलाकाराला निसर्गातून मिळते, पुस्तकातून नाही असे शिवजी आवर्जुन सांगतात. हळूहळू शिवजींच्या चिंतन मननाला आकार येत गेला. संतूरच्या रचनेत त्यांनी काही महत्वाचे बदल केले. तीन सप्तकांमधे सपाट तानेसह सगळ्या प्रकारच्या तानक्रियेचा प्रयोग करत रागदारीचा लीलया विस्तार करणे त्यामुळे शक्य व्हायला लागले. संतूर अक्रोडच्या लाकडापासून बनलेल्या स्ट्रायकरने (कलाम) वाजवतात. हे पियानोच्या जातकुळीतले 'आघाती' स्वरूपाचे वाद्य असल्याने एखाद्या स्वरावर सलग थांबणे (ठहराव) शक्य होत नाही. मींड, गमक या सारखे वाद्यवादनातले आवश्यक मानले जाणारे प्रकार वाजवणे शक्य होत नाही. थोडक्यात सांगायचे तर सारंगी वादनात गज वापरून, सतार वादनात उजव्या हाताने आघात करत डाव्या हाताने तारा खेचून, किंवा व्हायोलिनवर 'बो' च्या करामती खेचून सहजगत्या जे अलंकार वाजवता येतात, ते संतूरवर उतरवताना मात्र अत्यंत कष्टसाध्य होतात.
शिवजींनी कलामच्या सहाय्याने संतूरच्या तारांवर आघात केल्यानंतर जो किणकिणता नाद निर्माण होतो, त्याचाच कलात्मक उपयोग करत ठहराव असल्याचा आभास निर्माण केला. त्याचा वापर करत ध्रुपद अंगाने जाणारी आलापचारी वाजवण्याची पद्धत विकसीत केली. वाद्यातल्या मूळ ध्वनिमाधुर्यात, ध्वनिच्या गुणवत्तेत फारसे फेरफार होणार नाहीत आणि वादनातले सातत्य, प्रवाहित्व टिकून राहिल अशा पद्धतीने मर्यादित प्रमाणात का होईना गमक आणि मींडचा आभास व्हावा अशा प्रकारे कलामचा वापर करण्याची पद्धती विकसीत केली. प्रत्येक वाद्याचा एक 'स्वभाव' असतो, आणि त्याच्याशी विसंगत असे इतर वाद्यांचा आभास निर्माण करणारे वादन केल्याने रसभंग होतो. शिवाय तसे वादन करताना खूप मर्यादा येतात आणि ते सलगपणे करता येत नाही. उलट असे प्रकार केल्याने वाद्याचा आब कमी होतो आणि निकृष्ट दर्जाची नक्कल केल्यासारखा परिणाम हाती येतो. त्यामुळे संतूर वादन शंभर टक्के संतूर वादनच राहिल, मधेच सतार किंवा सरोदची छटा दिसता कामा नये अशी एक प्रकारची सांगितिक प्रतिज्ञाच शिवजींनी निभावली असे म्हणावे तर अतिशयोक्ती होणार नाही.
शिवजींच्या संतूर वादनाची सुरूवात संथ आलापचारीने होते. ती ध्रुपद अंगाची असल्याने मुर्की, खटका वगैरे प्रकार वर्ज्य असतात. नंतर जोड अंगाचे वादन ते करतात. यात पूर्णपणे तालबद्ध नसले तरी लयीच्या अंगाने रागस्वरूप उलगडत जाणारे वादन असते. सांगता अत्यंत वेगवान लयीतल्या झाल्याने होते. त्यानंतर तबल्याच्या साथीने विलंबीत किंवा मध्य लयीतली गत आणि शेवटी द्रुतगतीतली गत असा वादनाचा क्रम असतो. कारकीर्दीच्या सुरूवातीला मसीतखानी आणि रजाखानी अंगाने त्रितालातल्या गती वाजवणार्या शिवकुमार शर्मांनी पुढे रूपक, झपताल, एकताल यासारखे प्रचलित ताल तसेच मत्त ताल (९ मात्रा), रूद्र ताल (११ मात्रा), जय ताल (१३ मात्रा) आणि पंचम सवारी (१५ मात्रा) अशा तालांमधेही तितक्याच सहजतेने वादन केलेले दिसते. पिलू, पहाडीसारख्या रागांवर आधारलेल्या धुन तसेच लोकसंगीतावर आधारलेल्या धुन वाजवण्यात कौशल्य मिळवलेले शिवकुमार शर्मांच्या तोडीचे वादक कलाकार मोजकेच असतील.
शिवकुमारांचे संतूर वादन सर्वार्थाने समृद्ध असते. ज्यांना संगीतातल्या तांत्रिक बाबी समजत नाहीत, अशांना संतूरमधून प्रकटणार्या नादमाधुर्याचा, भाव आणि नवरसांच्या उत्कट अभिव्यक्तीचा आस्वाद घेता येतो. एखादे तरल भावचित्र मनात साकार व्हावे, किंवा खळाळता झरा, समुद्रात उसळाणार्या लाटा किंवा स्तब्ध उभ्या असलेल्या हिमशिखराचे चित्र डोळ्यापुढे उभे रहावे इतके परिणामकारक रागस्वरूप शिवजी सहज उभे करतात. त्यांचा ललत ऐकताना भल्या पहाटे शुचिर्भूत होउन मंदिरात ध्यानस्थ बसल्याची जाणिव होते, रागेश्री ऐकताना मिलनासाठी अतुर झालेली सुंदर अभिसारिका डोळ्यापुढे येते, मारवा अनाम हुरहुर लावून जातो तर श्री ऐकताना हृद्यस्थ जनार्दनाला शरण गेल्याची भावस्थिती प्रत्ययाला येते.
ठहराव, मींड, गमक या बाबतीत आपल्या वाद्यात असलेल्या अंगभूत उणीवांवर मात करत तबलावादनातल्या खंड, जाति आणि छंद या लयकारीच्या तंत्राचा उपयोग करून बनारस घराण्याच्या गायकीच्या अंगाने रागविस्तार करण्याची जी आगळी वेगळी पद्धत शिवजींनी विकसीत केली आहे, ती स्वतंत्र संशोधनाचा किंवा डॉक्टरेटच्या कित्येक प्रबंधांचा विषय व्हावा इतकी समृद्ध आहे. खंड, जाति आणि छंद या प्रकारच्या तसेच तालाच्या सव्वापट, दीड पट, पावणेदोन पट (आड, कुआड, बिआड) लयीत शिवजींइतक्या सहजतेने वादन करणारे कलाकार मोजकेच आहेत. सव्वापटीपेक्षा कमी, मात्र मूळ लयीपेक्षा किंचीत जास्त लयीत सलग वादन करत त्याच लयीत तिहाई किंवा नौहक्का वाजवत तडफेने समेवर येण्याचे काम शिवजी लीलया करतात. त्यांची साथ करणे ही तबलजीसाठी सत्वपरीक्षाच असते. मैफिलीच्या सुरूवातीला शंभरावर तारा असलेली आपली 'शततंत्री वीणा' हाती घेउन स्वरमेळ साधत असतानाच शिवजी आपण किती सुरेल आहोत याची चुणूक दाखवतात. महान वादकाचे एक लक्षण असे सांगतात, की तिन्ही सप्तकांपैकी एखाद्या स्वरात थोडा जरी फेरफार वाटला, तर त्या क्षणी हे कलाकार तो दुरूस्त करून घेतात. बरेच वेळा असे किरकोळ फेरफार वादनाच्या प्रवाहित्वात बाधा पडणार नाही अशा प्रकारे नकळतच करून घेतले जातात. स्वरमेळा श्रुतीबद्ध असेल तर जाणकार श्रोत्याला एखादी स्वरसंगती वाजवली, नुसते वाद्य छेडले तरी रागस्वरूपाचा उलगडा होतो. शिवजींच्या वादनात या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात.
संतूरबरोबर संगत करणार्या तबलजीला निव्वळ ठेका धरून बसण्याची सक्ती नसते. उलट लयतालावरचे आपले प्रभुत्व दाखवून द्यायची पूर्ण संधी असते. शिवकुमारांच्या सुरूवातीच्या कालखंडात उ. शफात अहमद आणि त्यांची अशीच जोडी जमलेली होती. दुर्दैवाने शफात अहमदना अकालीच देवाज्ञा झाली आणि नियतीने हा रंगलेला डाव अर्ध्यावरच मोडला. शिवजींनी तीन पिढ्यांमधल्या आघाडीच्या जवळजवळ सगळ्याच तबलजींबरोबर अप्रतिम वादन केलेले आहे. त्यातल्या त्यात पं. रविशंकर - उ. अल्लारखाँ, उ. अली अकबर - पं. स्वपन चौधरी किंवा उ. विलायत खाँ - पं. किशन महाराज यांच्याप्रमाणेच पं. शिवकुमार शर्मा - उ. झाकिर हुसेन ही जोडी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात नावाजली जाते. लयतालावर असामान्य प्रभुत्व असलेल्या शिवजी आणि झाकिर हुसेन यांचे साद प्रतिसाद, लयकारीचे प्रकार वाजवताना त्यांनी काढलेल्या एकमेकांच्या खोड्या अत्यंत विलोभनीय असतात.
श्रद्धा, गुरूभक्ती आणि त्या जोडीलाच अथक प्रयत्न, चिंतन, मनन आणि निदीध्यासातून साकारलेली पं. शिवकुमार शर्मांची तपश्चर्या फळाला आलेली दिसते.आजमितीला संतूर आणि शिवकुमार शर्मा हे जणू समानार्थी शब्द झालेले आहेत. संतूरला अभिजात संगीताच्या व्यासपीठावर सतार, सारंगी किंवा सरोदच्या तोलामोलाचे स्थान मिळालेले आहे. पं. शिवकुमार शर्मांना पद्मविभूषणसह देशोदेशींचे सन्मान, पुरस्कार मिळालेले आहेत. या बाबतीत स्वतः शिवजींना कृतार्थ करणारा एक प्रसंग सांगून या लेखाची सांगता करतो. उ. विलायत खाँ साहेबांच्या शेवटच्या कालखंडात त्यांच्या एका मैफिलीला कित्येक दिग्गज कलाकार आवर्जुन उपस्थित होते. मैफिलीनंतर अनौपचारिक गप्पाची मैफल सुरू झाली. संगीताचाच विषय होता. बोलता बोलता विलायत खाँसाहेब आपल्याच तंद्रीत बोलायला लागले - "आपल्या सगळ्या कलाकारांच्या मांदियाळीमधे दोन कलाकार बेजोड आहेत, एक बिस्मिल्लाभाई आणि दुसरी शिवभाई. या दोघांमागे व्यक्तिशः संगीतातल्या घराण्याची प्रतिष्ठा नाही, ते वाजवत असलेल्या वाद्याशी लोकांचा परिचय नाही, आणि तरीही या दोघांनी आपल्या वाद्याला सतार आणि सरोदच्या उंचीवर नेउन ठेवले आहे. हे काम इतर कुणीही केलेले दिसत नाही." शिवजी म्हणतात - आजवरच्या माझ्या आयुष्यात मला मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार विलायत खाँसाहेबांचे ते शब्द आहेत. आपल्या आयुष्यातला कृतार्थ करणारा तो क्षण शिवजींनी आपल्या स्मृतीत कायमचा जपून ठेवला असेल यात शंकाच नाही.

पुरवणी -
पं. शिवकुमार शर्मा - कौशी कानडा (तबला - उ. झाकिर हुसेन)
पं. शिवकुमार शर्मा - पहाडी धुन (तबला - उ. शफात अहमद)