Saturday 15 June 2013

छोट्या पडद्यावरचा हर्क्युल प्वाइरॉ - संक्षिप्त परिचय

रहस्यकथावाचनाचे वेड तुला कधी लागले? असा प्रश्न कुणी मला विचारला, तर त्याचे नेमके उत्तर देणे अवघड आहे. सुरूवातीला बाबूराव अर्नाळकर, गुरूनाथ नाईक, सुहास शिरवळकर वाचून या साहित्यप्रकाराची जी गोडी लागली, ती पुढे आपसूकच इंग्रजी साहित्याकडे वळून स्थिरावली. या वाचनप्रवासात अर्ल स्टॅन्ले गार्डनरचा 'पेरी मेसन' (उपाख्य सुशिंचा 'बॅ. अमर विश्वास'), सर आर्थर कॉनन डायल यांचा 'शेरलॉक होम्स' या सारख्या मुख्य व्यक्तिरेखा मनात कायमचे घर करून गेल्या. त्या जोडीलाच पेरी मेसनची डेला स्ट्रीट ही सचिव, पॉल ड्रेक हा मदतनीस तसेच शेरलॉक होम्सचा डॉ. वॉटसन हा मदतनीस यासारख्या पूरक व्यक्तिरेखाही मनावर त्यांची अमीट छाप सोडून गेल्या.

बहुतांशी पुरूष लेखकांची मक्तेदारी असलेल्या रहस्यकथा लेखनाच्या प्रांतात अ‍ॅगाथा ख्रिस्ती या सिद्धहस्त लेखिकेकडे एक प्रकारचे अनभिषीक्त सम्राज्ञीपदच आहे. साधारणपणे एखाद्या ग्रंथाइतका ऐवज असलेल्या ख्रिस्तीबाईंनी लिहीलेल्या कित्येक रहस्यकथा अप्रतिम आहेत, बेजोड आहेत. त्यांचे पुस्तक एकदा हातात घेतले, की वाचकाला जागीच खिळवून ठेवते. ते सोडवत नाही. इंजिनिअरिंगचे विद्यार्थी 'नाईट मारून' सबमिशन वगैरे करतात, त्या धर्तीवर नाईट मारून असे एखादे पुस्तक वाचत एखादा पूर्ण सप्ताहांत ('वीकेंड') सहज सत्कारणी लावता येतो.

काही वर्षे थोडेसे बाजूला पडलेले रहस्यकथावाचनाचे वेड २००९ मधे ऑनसाईट गेल्यावर पुन्हा उफाळून आले. यावेळी माध्यम मात्र वेगळे, टेलिव्हिजनचे होते. डेव्हिड सुशे (David Suchet)या अभिनेत्याने छोट्या पडद्यावर साकारलेला अ‍ॅगाथा ख्रिस्तींचा मानसपुत्र 'हर्क्युल प्वाइरॉ' (Hercule Poirot)पाहिला, आणि सुरुवातीच्या अर्ध्या तासातच मी या कसलेल्या अभिनेत्याचा चाहता झालो.

छोट्या पडद्यावर आयटीव्ही या ब्रिटीश वाहिनीवर (आणि तसे जगभरच वेगवेगळ्या वाहिन्यांवर) 'हर्क्युल प्वाइरॉ' या रहस्यकथा मालिकेचे प्रसारण नियमीतपणे केले जाते. आता 'डीव्हीडी संच' या स्वरूपातही ती उपलब्ध आहे. या मालिकेची तोंडओळख करून देण्याचा हा एक प्रयत्न.

बेताचीच उंची, काहीशी स्थूलपणाकडे झुकलेली शरीरयष्टी, 'जी जानसे' मेहनत घेउन कोरलेल्या मिशा, डोक्यावर खुलून दिसणारा चकाकता चंद्र, तो झाकणारी ब्रिटीश पद्धतीची गोल टोपी, कपडे काळजीपूर्वक निवडलेले आणि कटाक्षाने फॉर्मलच! एकंदरच व्यक्तिमत्वात स्पष्टपणे दिसून येणारी टापटीप, चालण्याबोलण्यात हरघडी स्पष्टपणे दिसून येणारा काहीसा उर्मटपणाकडे झुकलेला आत्मविश्वास ही या प्वाइरॉची खासियत. हातात नक्षीकाम केलेली छडी घेउन दुडक्या चालीने झपाझाप निघालेला डेव्हिड सुशेचा प्वाइरॉ असा काही डोक्यात बसतो, की सर पीटर उस्तिनोव्हसारखे भलेभले नटही प्वाइरॉ म्हणजेच सुशे या समीकरणाला छेद देउ शकत नाहीत.

छोट्या पडद्यावरच्या प्वाइरॉ मालिकेत काही 'एपिसोड्स' पाउण तासाचे आहेत तर काही दोन तासांचेही (मूव्ही लेंग्थ) आहेत. अ‍ॅगाथा ख्रिस्तींच्या रहस्यकथा इतक्या कमी वेळात सादर करणे हे फार मोठे आव्हान आहे, पण या मालिकेच्या दिग्दर्शकाने आणि तांत्रिक बाबी संभाळणार्‍या चमूने ते लीलया पेलले आहे. ख्रिस्ती बाईंची कथा लिहीण्याची शैली काहीशी 'पसरट' आहे. प्रत्येक प्रसंग वाचकाच्या डोळ्यासमोर स्पष्टपणे उभा रहावा यासाठी त्याचे खूपच विस्तृत वर्णन त्या कटाक्षाने करतात. यात स्थळ, काळ, परिस्थितीजन्य बाह्य बारकावे अत्यंत बारकाईने टिपलेले असतात. त्या जोडीलाच कथानकातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेच्या मनात चाललेली आंदोलने 'स्वगत संवाद' या स्वरूपात तितक्याच ताकदीने उभी केलेली असतात.

या मालिकेतल्या बहुतांशी कथा छोटेखानी आणि टुमदार ब्रिटीश गावांमधे घडलेल्या गुन्ह्यांच्या (प्रामुख्याने खून प्रकरणे) शोधावर आधारित असतात. प्रत्येक व्यक्तीचे स्वभाववैचित्र्य, वेळोवेळी घडणारे चित्रविचीत्र नाट्यमय प्रसंग, आव्हानात्मक परिस्थिती आणि त्यातून उमलत जाणारी या एक से एक व्यक्ती आणि वल्लींममधील नातीगोती (यात काही गोत्यात आणणारी नातीही आलीच!)हा तसा गुंतागुंतीचाच मामला म्हणायला हवा. या पार्श्वभूमीवर कुठे परस्परविरोधी हितसंबंध तर कुठे मूल्यांचा संघर्ष, कधी विकृतीकडे झुकलेली भोगलालसा तर कधी आंधळा स्वार्थ यातून खुनासारखा गंभीर गुन्हा घडतो.

गुन्हा घडल्यावर, क्वचितप्रसंगी एखाद्या 'जागृत नागरिकाला' गुन्हा घडेल अशी चाहूल लागल्यावर या ना त्या कारणाने प्वाइरॉ खुनाच्या तपासात ओढला जातो आणि कथानकाचा मुख्य भाग सुरू होतो. मूळ कथेइतका विस्तार तितकाच तपशीलवार छोट्या पडद्यावरच्या सादरीकरणात जसाच्या तसा सादर करणे अशक्य असले, तरी कथानकाचा आत्मा हरवणार नाही ही काळजी घेत या मालिकेतली एक एक रहस्यकथा आयटीव्हीने अत्यंत परिणामकारकपणे सादर केलेली आहे.

हर्क्युल प्वाइरॉ मालिकेतल्या मुख्य व्यक्तीरेखांचा थोडक्यात परिचय:

हर्क्युल प्वाइरॉ: अ‍ॅगाथा ख्रिस्तींचा हा सगळ्यात लाडका मानसपुत्र मुळात बेल्जियन आहे. त्याला त्याबद्दल सार्थ अभिमानही आहे. फ्रेंच वळणाचे इंग्रजी बोलत असल्याने तो फ्रेंचमन असावा असा गैरसमज होतो, आणि दरवेळी तितक्याच उत्साहाने आणि हिरीरीने प्वाइरॉ आपण बेल्जियन आहोत हे आवर्जुन सांगतो. बेल्जियमच्या पोलिस यंत्रणेचे सर्वोच्च पद भूषवलेला हा एक नाणावलेला पोलिस अधिकारी, काही दुर्दैवी परिस्थितीत परागंदा होउन ब्रिटनमधे आश्रय घेतो. यातच तो कुटुंबापासून दुरावतो, वैयक्तिक जीवनात एकाकी होतो. कामाबद्दलची ओढ त्याला स्वस्थ बसून देत नाही. खाजगी गुप्तहेराचे काम स्वीकारून तो अल्पावधीतच आपले बस्तान बसवतो. स्कॉटलंड यार्ड सारख्या जगात पहिल्या क्रमांकाच्या समजल्या जाणार्या पोलिस यंत्रणेला ज्या गुन्ह्यांची उकल करण्यात नाकी नउ येतात, त्यांची उकल प्वाइरॉ हमखास करतो.

प्वाइरॉच्या हातात फार मोठी तपासयंत्रणा नाही. 'टीम प्वाइरॉ' इन मीन तीन लोकांची आहे. स्वतः प्वाइरॉ, कॅप्टन हेस्टिंग्ज हा सहाय्यक आणि मिस लेमन ही वैयक्तिक सचिव. प्वाइरॉचे खरे शक्तीस्थळ आहे ती त्याची अफलातून बुद्धीमत्ता. त्याच्याच भाषेत 'ग्रे सेल्स'. या ग्रे सेल्सच्या जोरावर अत्यंत धूर्तपणे, योजनाबद्ध पद्धतीने आणि शिताफीने केलेल्या गुन्ह्याची प्वाइरॉ ज्या प्रकारे उकल करतो, त्यावरून 'ग्रे सेल्स' ही एक प्रकारची दैवी देणगीच असावी असे वाटते.

स्वतःविषयी बोलताना 'जगातला सर्वश्रेष्ठ आणि एकमेवाद्वितीय खाजगी गुप्तहेर' अशी प्वाइरॉने स्वतःचीच भलामण करणे, सतत आत्मप्रौढीचा दर्प जाणवेल असे त्याचे काहिसे उर्मटपणे बोलणे, प्रत्येक गोष्टीतला चक्रमपणाकडे झुकणारा अति व्यवस्थितपणा, अतिकाटेकोरपणामुळे काट्याचा नायटा करत किरकोळ चुकीबद्दल सहकार्यांना फैलावर घेणे या सारखे प्वाइरॉच्या व्यक्तिमत्वातले बरेच धारदार 'कंगोरे' डेव्हिड सुशेनी अफलातून साकारले आहेत.स्वभावातल्या या विकृती हौसेने, अहंतेने ओढवून घेतलेल्या नसून परिस्थितीशी झगडताना व्यक्तिमत्वाची तशी मूस कळत नकळत घडत गेलेली आहे हे प्वाइरॉच्या बाकी वर्तनातून सतत जाणवत राहते. त्यामुळे त्या डोक्यात जात नाहीत.

प्वाइरॉच्या व्यक्तिमत्वात आणखी एक विरोधाभास स्पष्टपणे दिसतो. एरवी अय्याशपणे जगणारा, तासनतास मिशा कोरत बसणारा, टेबलवर चहाचे कप, बिस्किटे वगैरेंची अति काटेकोरपणे रचना करत बसणारा प्वाइरॉ खुनाचे एखादे प्रकरण हाती घेतले की पुरता पालटतो. त्याची देहबोली बदलते. त्याच्या नजरेत एक प्रकारची चमक येते. तो वय आणि शरीरयष्टी यांच्याशी विसंगत वाटतील अशा हालचाली चित्त्यासारख्या चपळाईने करतो. प्वाइरॉच्या व्यक्तिमत्वाची ही आणखी एक खासियत.

गुन्ह्यामागच्या रहस्याचा वेध घेताना अचानक तो 'युरेका'चा क्षण येउन प्वाइरॉचे ग्रे सेल्स सगळ्या गुंत्याची क्षणार्धात उकल करत असले, तरी 'केस' स्वीकारल्यापासून ते तो क्षण येईपर्यंत प्वाइरॉने घेतलेली अपार मेहनत स्पष्टपणे दिसून येते. हाती घेतलेल्या कामात स्वत:ला पूर्णपणे झोकून देण्याची प्वाइरॉची उपजत प्रवृत्ती ठळकपणे अधोरेखित होते. जिथे गुन्हा घडला त्या परिसराची आणि संबंधित लोकांची अत्यंत बारकाईने केलेली पाहणी, टिपकागदासारखे प्रत्येक तपशील टिपून घेणे हा सगळा गृहपाठदेखील 'ग्रे सेल्स' इतकाच, किंबहुना थोडा अधिकच महत्वाचा आहे याचे भान प्वाइरॉ क्षणभरही सोडत नाही. त्यामुळेच थोडाफार अतिआत्मविश्वास असूनही त्याच्या व्यावसायिक नैपुण्यात कणभरही उणीव येत नाही.

आर्थर हेस्टिंग्स - गुन्ह्यांच्या तपासकार्यात सहभागी होणारा प्वाइरॉचा हा एकुलता एक सहाय्यक. याची भूमिका 'रामभक्त हनुमान' छापाची आहे. ब्रिटीश लष्करातून 'कॅप्टन' पदावरून निवृत्त झालेला हा हरहुन्नरी माणूस मोठाच रगेल आणि रंगेल आहे. याचे व्यक्तिमत्व अत्यंत रूबाबदार आणि प्रभावी आहे. याच्या चालण्याबोलण्यात बेधडकपणा, सरधोपटपणा आणि लष्करी खाक्या आहे. ह्यू फ्रेजरने (Hugh Frase() ही व्यक्तिरेखा अप्रतिम साकारली आहे. मालिकेतले दोनचार भाग सोडले, तर हा माणूस प्वाइरॉची सावलीसारखी साथ देताना दिसतो. प्वाइरॉबद्दल याला नितांत आदर आहे. सैन्यात नोकरी करताना जगभर भ्रमंती झालेली असल्याने जगभरच्या दंतकथा, पुराणकथा तसेच चित्रविचीत्र चालीरीती, खाण्यापिण्याच्या सवयी, दुर्मिळ भेटवस्तू, विषारी पदार्थ, जादूटोणा असल्या गोष्टींची याला भरमसाठ (आणि अर्धवट!) माहिती आहे.

तपासकार्यात गुंड प्रवृत्तीचे लोक अंगावर आले, आणि त्यांना शिंगावर घेण्याची वेळ आली की हेस्टिंग्जचा हस्तक्षेप ठरलेलाच. "म्हातारबुवा, आता केस माझ्या हद्दीत आली आहे" असे प्वाइरॉला बजावून सांगत त्याला दुय्यम स्थान देत हेस्टिंग्ज त्या वेळेपुरता मुख्य भूमिकेत शिरतो. दादागिरी करणार्या गुंडापुंडांना त्यांच्या ष्टाईलने 'प्रेमाने समजावून सांगणे', गरज पडल्यास त्यांच्याशी दोन हात करणे ते पार गरज पडल्यास त्यांच्या 'खर्चापानी'ची व्यवस्था करणे ही सगळी कामे हेस्टिंग्स निडरपणे आणि खास लष्करी खाक्यात करतो. हेंस्टिंग्जचे स्वतःबद्दल दोन गोड गैरसमज आहेत. पहिला असा की गुन्हे तपासकार्याच्या बाबतीत प्वाइरॉसारखीच आपल्यालाही अलौकिक बुद्धीमत्ता आहे, आणि दुसरा हा की आपल्या व्यक्तिमत्वावर कुठल्याही वयोगटातली 'रूपगर्विता' हमखास भाळते. यातून त्याच्यावर बरेच अनावस्था प्रसंग ओढवतात, त्याने घातलेल्या गोंधळातून एखादा महत्वाचा दुवा अचानक हाती येतो, तर क्वचितप्रसंगी विनोदनिर्मीतीही होते.

मिस फेलिसिटी लेमन - पॉलिन मोरान (Pauline Moran) या अभिनेत्रीने ही भूमिका साकारलेली आहे. प्वाइरॉच्या अतिचिकित्सकपणा, अतिव्यवस्थितपणा, चक्रमपणा या सगळ्या अफलातून गुणसंपदेशी जुळवून घेत त्याचे सचिवपद यशस्वीपणी सांभाळावे तर मिस लेमन यांनीच. प्वाइरॉच्याच शब्दात सांगायचे तर मिस लेमननी जन्माला घातलेली आणि व्यवस्थितपणे 'अप-टू-डेट' ठेवलेली 'फायलिंग सिस्टीम' ही कुणीही तिचा कित्ता गिरवावा इतकी बिनचूक आणि आदर्श प्रणाली आहे. प्वाइरॉचे ते एक सुप्त बलस्थानही आहे. उतारवयातही आकर्षक दिसणार्या मिस लेमनच्या मनात प्वाइरॉबद्दल सुप्त आकर्षण आहे, त्यांचे प्वाइरॉवर एकतर्फी प्रेम आहे असेही काही प्रसंगी लक्षात येते. अर्थातच या आकर्षणाची परिणती प्रेमप्रकरणात होत नाही. क्वचितप्रसंगी किरकोळ कारणावरून मिस लेमनला फैलावर घेणार्या 'परफेक्शनिस्ट' प्वाइरॉला मिस लेमनच्या व्यवस्थितपणा आणि कार्यक्षमतेबद्दल मनोमन कौतुक वाटते हे तो वेळोवेळी दाखवून देतो. मिस लेमन त्यातच समाधान मानत असाव्यात असे दिसते.

जेम्स जॅप - स्कॉटलंड यार्डमधे 'चिफ इन्स्पेक्टर' या वरिष्ठ हुद्यावर असलेल्या आणि मोठी जबाबदारी असलेले हे महत्वाचे पद भूषवणार्या पोलिस अधिकार्याची भूमिका फिलीप जॅकसनने (Philip Jackson) खुलवली आहे. साचेबद्ध ब्रिटीश मानसिकता असलेला हा अधिकारी आणि प्वाइरॉ यांचे संबंध घडीघडीला बदलतात. जॅपला प्वाइरॉबद्दल आदर आहे, आणि त्या जोडीलाच स्कॉटलंड यार्डची अत्यंत प्रबळ यंत्रणा हाताशी असूनही आपल्याला शेवटी प्वाइरॉचीच मदत घेणे भाग पडते याचे वैषम्यही त्याच्या मनात डाचते आहे. त्यामुळे परिस्थितीनुसार तो कधी प्वाइरॉशी सहकार्याची भूमिका घेतो, कधी प्वाइरॉला कायद्याच्या चौकटीची महती सांगून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो, तर कधी तपासकार्यातली माहिती दडवून ठेवत मी प्वाइरॉच्या चार पाउले पुढे आहे अशी शेखी मिरवतो. प्वाइरॉवर कुरघोडी केल्याचे त्याचे हे फसवे समाधान क्षणिक ठरल्यावर प्रांजळपणे आणि मनमोकळेपणाने प्वाइरॉचे कौतुक करत पुन्हा एकदा सहकार्यासाठी हातही पुढे करतो. कर्तव्य चोखपणे बजावताना जॅप आपला अहंकार मधे येउ देत नाही. तो कुठल्याही मोहाला बळी पडत नाही. मी उच्चपदस्थ आहे, अमुक मंत्र्याच्या जवळचा आहे, माझी 'पोच' वरपर्यंत आहे अशा मस्तीत वावरणार्या धनदांडग्यांनी तपासात अडथळे आणले, प्वाइरॉला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर अशा टग्या लोकांना 'तू माझ्या लेखी फक्त एक संशयित आहेस, त्यामुळे तूर्त बाकी गोष्टी गौण ठरतात' असे जॅप स्पष्टपणे बजावतो. त्यावर दुरुत्तर आले, तर अशा लब्धप्रतिष्टीत गुंडापुंडांचा किमान शब्दात कमाल अपमान करून वेळप्रसंगी त्यांना स्कॉटलंड यार्डचा हिसका दाखवून देताना जॅप कुठलीच कसर सोडत नाही.

समारोप - प्वाइरॉच्या जमान्यानंतर गुन्हेगारीमागची कारणे, गुन्हे करण्याची पद्धत थोडीफार बदलली आहे. गुन्हेवैद्यकशास्त्रात (फॉरेन्सिक सायन्स)बरीच प्रगती झालेली आहे. तपासपद्धतीतह आमूलाग्र बदल झालेले आहेत. त्यामुळे काही बाबतीत प्वाइरॉ ही मालिका कालबाह्य वाटते. व्यक्तिगत आवडनिवडही असतेच. वेगवान कथानक आणि थरार यांची आवड असणार्यांना ती संथ, कदाचित रटाळही वाटेल. असे असूनही ब्रिटीश संस्थळांवरची आकडेवारी पाहता प्वाइरॉची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही.

डेव्हिड सुशेचे वय आता ६६ आहे. नोव्हेंबर २०११ मधे आयटीव्ही आणि सुशे यांनी प्वाइरॉ मालिकेतली शेवटच्या (तेराव्या) उपमालिकेचे चित्रीकरण सुरू होईल अशी घोषणा केली होती. यात एक लघुकथा वगळता इतर सर्व भागात काम करण्यासाठी सुशेनी सहमती दर्शवली होती. ही मालिका प्रसारित झाली की नाही हे मला माहित नाही, मात्र ती पाहण्याची उत्सुकता आहेच.

तुनळीवर हर्क्युल प्वाइरॉ मालिकेतील काही संपूर्ण भाग उपलब्ध आहेते. ते सहज हुडकता येतील. त्यापैकी 'प्रॉब्लेम अ‍ॅट सी' या एका भागाचा दुवा देउन समारोप करतो -

http://www.youtube.com/watch?v=AbCnqWP7pBU

No comments:

Post a Comment