Sunday, 16 June 2013

दहा बोटं आणि आपले आशीर्वाद - उस्ताद झाकिर हुसेन

(गौरी रामनारायण यांनी घेतलेल्या उ. झाकिर हुसेन यांच्या मुलाखतीचा अनुवाद)

आंतरराष्ट्रीय पातळीवर तबलावादनाच्या क्षेत्रात एकमेवाद्वितीय स्थान मिळवूनही अत्यंत शालीन, विनम्र असणार्‍या उस्ताद झाकिर हुसेन यांचा हा एक किस्सा. कलाक्षेत्रावरच्या (चेन्नई) त्यांच्या अप्रतिम तबलावादनने भारावून गेलेल्या रूक्मिणीदेवींनी त्यांना विचारलं, "झाकिर, बेटा तुला दहाच बोटं आहेत की शंभर?" उस्तादजींनी हात जोडत एका क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं, "माझ्याजवळ दहा बोटं आणि आपले आशिर्वाद आहेत".

उस्तादजी पत्नी आणि दोन मुलींसमवेत कॅलिफोर्नियामधे राहतात. अमेरिकेतल्या दोन मैफिलींमधल्या प्रवासात गौरी रामनारायण यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. तिचा हा सारांश. ही मुलाखत साधारणपणे १५ ते २० वर्षापूर्वीची आहे.

प्रश्नः पॉप, जॅझ आणि फ्यूजन संगीतात आंतरराष्ट्रीय पातळीवर 'स्टार' झाल्यानंतरही आपण हिंदुस्थानी अभिजात संगीतातली आपली पारंपारिक 'प्रतिमा' कशी जपता?

उ. झाकिर हुसेनः (असे प्रश्न) मला असे वाटतं की घाईगडबडीने काढलेले निष्कर्ष, चुकीच्या धारणा आणि पूर्वग्रहांमधून जन्माला येतात. नको त्या गोष्टींना फाजिल महत्व देण्याची लोकांची वाईट खोड आहे. त्यांना वाटतं की ह माणूस नको त्या गोष्टींमागे लागला आहे. माझ्या बाबतीत बोलायचं तर मी सर्वप्रथम एक 'संगतकार' आहे. कार्यक्रम उ. अली अकबर यांचा असो की उ. विलायत खाँ यांचा, मी त्यांना साथ करतो. त्यातून बरंच शिकतो.

माझे जॅझचे कार्यक्रम आता मर्यादित प्रमाणात होतात. दोन वर्षातून एखादा महिनाच मी 'फ्यूजन'साठी देतो. मी आज अशा स्थितीत आहे की मला नेमकं काय करायचं आहे, ते किती प्रमाणात करायचं आहे हे मी ठरवू शकतो. माझ्या संगीतासाठी योग्य पार्श्वभूमी नाही अशा ठिकाणी मी जात नाही. मी मंचावर चकचकीत जॅकेट किंवा गुडघ्यापर्यंत बूट वगैरे घालून 'रॉक स्टार'सारखाही कधीच जात नाही. माझ्या कार्यक्रमांपैकी ९५ टक्के तरी कार्यक्रम भारतीय शास्त्रीय संगीताचेच असतात. गेली २५ वर्षे मी व्यावसायिक संगीतकार म्हणून सातत्याने जगभर प्रवास करतो आहे. त्यात न चुकता दरवर्षी चार महिने तरी हिंदुस्थानात येतो आणि इथल्या कलाकारांची संगत करतो. काही कलाकार कदाचित असे करत नसतील.

प्रश्नः इतक्या धावपळीच्या नित्यक्रमामुळे तुमच्या रियाझावर परिणाम होतो का?

उ. झाकिर हुसेनः असं घडून चालणार नाही. वर्षाला जवळजवळ दीडशे कार्यक्रम म्हणजे सततचा प्रवास ठरलेलाच आहे. हॉटेलमधे जायचं, संध्याकाळी कार्यक्रम करायचा, परत येउन हॉटेलमधून मुक्काम हलवायचा आणि हेच चक्र पुढच्या दिवशी दुसर्‍या शहरात चालू ठेवायचं. तरीही मी सतत रियाझ करतो. आज सकाळी मृदंगमबरोबरचा कार्यक्रम संपल्यावर संध्याकाळे पं. बिरजू महाराजजींच्या नियोजीत कार्यक्रमासाठी मी तबला सभागृहातच ठेवला, पण इथे (हॉटेल) परत आल्यावर त्या समोरच्या टेबलवर ठेवला आहे तो 'खंजिरा' घेउन मी नेहेमीसारखाच रियाझ केला.

सततचा रियाझ हा (कलाकाराच्या आयुष्यातला) फार महत्वाचा घटक आहे. निव्वळ हाताची तयारीच नव्हे, तर तुमचं तुमच्या मूळ स्त्रोताशी, परंपरेच्या गंगोत्रीशी सतत संलग्न राहणं महत्वाचं आहे. मला आपल्याला मिळालेल्या वारशाचा सार्थ अभिमान आहे. त्याच्या सतत सान्निध्यात राहण्यातच आनंद आहे, या गुरूपरंपरेवर माझी नितांत श्रद्धा आहे. तिची अमर्याद शक्ती मला वेळोवेळी जाणवलेली आहे. हे स्पष्टपणे सांगताना मी बिचकत नाही, की ही भावनिक गुंतवणूक, हे तादात्म्यच मला श्रोत्यांच्या अंतःकरणापर्यंत सहज घेउन जातं.

प्रश्नः इतरांपेक्षा तुमचं वेगळेपण तुमच्या वादनातील सहजस्फूर्तता ('ओरिजिनॅलिटी')हेच आहे. तुम्ही पुढच्या क्षणी काय वाजवाल याचा अंदाज बांधता येत नाही. हा गुण उपजत लाभलेला आहे की त्यावर तुम्ही मेहनत घेतलेली आहे?

उ. झाकिर हुसेनः सुदैवाने माझी जडणघडण होत असताना मी उ. अली अकबर खाँ यांच्यासमवेत मी कित्येक वर्षे राहिलो. कला सादर करण्यासाठी लागणारा कच्चा आराखडा ('ब्लू प्रिंट') करून त्यांचं समाधान होत नसे. उ. विलायत खाँसाहेब आणि पं. रविशंकरजीही त्याच पठडीतले. पारंपारिक वादनशैलीत ते कमालीचे निष्णात आहेतच, त्यांचं तांत्रिक गोष्टींवर इतकं अफलातून प्रभुत्व आहे, की ते कधीही त्या समृद्ध भांडवलाच्या जोरावर श्रोत्यांना मंत्रमुग्ध करू शकतात.

पण मी त्यांना नेहेमीच चाकोरीबाहेरच्या नित्यनूतन गोष्टींच्या शोधात असलेलं पाहिलं आहे. मी त्यांना धोके पत्करताना पाहिलं आहे. प्रयोग हा कलेचा एक अविभाज्य घटकच आहे. प्रयोग आणि प्रयत्न करत राहणं महत्वाचं. कित्येक वेळा ते व्यर्थ जातील, पण शेवटी यशच मिळेल अशी ठाम श्रद्धा हवी. कारकिर्दीच्या सुरूवातीला माझीही वादनाची ठराविक पद्धत होती. पण साथसंगत करताना उ. अली अकबर खाँसाहेबांकडे पाहून मला खात्री वाटायला लागली, की काही धोके पत्करत उपज अंगाने वादन केले तर त्यात काही चूक नाही.
प्रयोग करा आणि त्याचा परिणाम काय होतो हे नीट पडताळून पहा. मंचावर अशा वृत्तीने वाजवू नका, की मला खूप माहिती आहे, तेव्हा मी 'हेच' वाजवणार. मला बाकी गोष्टींशी देणंघेणं नाही! आता १५ वर्षांनंतर साचेबद्ध पद्धतीने मी मुळीच वाजवत नाही. प्रत्येक क्षणाला मी 'जिवंत' प्रतिसाद देतो. दुसरी गोष्ट, माझ्या वडिलांचा दृष्टीकोन असाच होता आणि त्याचं त्यांना काय फळ मिळालं हे मी समक्ष पाहिलं आणि अनुभवलं. तरीही, मला आपल्यापेक्षा ज्येष्ठ कलाकारांची साथ करताना स्वतःचं कठोर परीक्षण करायची सवय लागली. एका प्रकारे माझ्यातला समीक्षकच माझा आधारवड ठरला.

पुढील कालखंडात एक फार मोठा फायदा मला अगदी विनासायास मिळाला. माझा आत्मविश्वास वाढलेला होता आणि मला आणखी चार पावले पुढे जायची आंतरिक उर्मी होती. तेव्हा असे दोन दिग्गज संगीतकार मला भेटले, ज्यांनी मला आश्वस्त केले, "झाकिर, मनमोकळेपणानी वाजव, आम्ही तुझ्या सदैव पाठीशी आहोत". पं. शिवकुमार शर्मा आणि पं. हरिप्रसाद चौरसियांनी मला त्यांच्याबरोबर वादन करत असताना संपूर्ण स्वातंत्र्य तर दिलंच त्या जोडीला सतत प्रोत्साहनही दिलं. कुठलीही आडकाठी न ठेवता ते माझ्याबरोबर मुक्तपणे सांगितीक संवाद साधण्यासाठी पुढे आले. शिवजींच्या विलोभनीय स्मितहास्यातूनच आणि एखाद्या बोलक्या कटाक्षातूनच मला त्यांची संमती आणि आनंद स्पष्टपणे दिसून यायचा!

प्रश्नः हे तसं अद्भुतच आहे, कारण हे दोन्ही दिग्गज वादक तशी 'नाजूक' वाद्यं वाजवतात आणि आक्रमक तबलावादनामुळे त्यांच्या वादनात रसहानी होण्याचीच शक्यता जास्त असं वाटतं.

उ. झाकिर हुसेनः अगदी बरोबर! मला वाटतं असं काही झालं नसावं, कारण हे दोघे महान कलावंत आहेत (त्यांनी विचारपूर्वकच संमती दिली असणार). माझ्या मते एकांतात कलावंताची वाढ होत नाही, नव्हे ते अशक्यच आहे म्हणा ना! आपल्या सहकार्‍यांकडून मिळणारं प्रोत्साहन, त्यांच्याकडून मिळणारी प्रेरणा, त्यांनी पुढ्यात उभे केलेले आव्हान या सगळ्या गोष्टी आपली गुणवत्ता वाढण्यासाठी, परिपक्वता येण्यासाठी आणि समाधान मिळण्यासाठी अनिवार्यच आहेत. मला या सगळ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकारांकडून या गोष्टी अगदी भरभरून मिळत आलेल्या आहेत.

प्रश्नः तुमच्या अफाट लोकप्रियतेमुळे मुख्य कलाकारांना तुमचा (साथीदाराचा) हेवा तर वाटत नाही?

उ. झाकिर हुसेनः (स्मितहास्य करत) तसं असतं, तर मला इतकं वाजवताच आलं नसतं!

प्रश्नः आपल्या वादनावर बंधन पडू नये यासाठी तुम्ही गायकांची साथ करणं थांबवलं आहे का?

उ. झाकिर हुसेनः गेली १० वर्षे सोडली तर मी गायकांबरोबर भरपूर वाजवलं आहे. पं. ओंकारनाथ ठाकूर ते पं. जसराज या तीन पिढ्यांमधील जवळजवळ प्रत्येक विख्यात गायकाची मी साथ केलेली आहे. कंठसंगीत हाच आपल्या परंपरेचा गाभा आहे. तोच तर आपला खरा खजिना आहे. गायकीची साथ करताना येणार्‍या स्वाभाविक मर्यादांची मला जाण आहे, आणि संगीतातल्या माझ्या 'योगशिक्षणाचाच' तो एक महत्वाचा भाग आहे. संयम ठेउन, मोजकंच वाजवून मोठा परिणाम साधण्याची ती खुबी आहे. एक कलाकार म्हणून परिपूर्ण होण्यासाठी हा 'योग' साधणे आवश्यकच आहे.

स्वतंत्र तबलावादन करताना किंवा नृत्याची साथ करताना मला प्रत्येक मात्रा 'मोठी' (विस्तृत) दिसते. कंठसंगीतातही हेच होतं. तुम्ही वाजवलेलं प्रत्येक अक्षर शंभरपटीनी मोठं दिसतं (अधिक परिणामकारक ठरतं). मात्र यामुळे अजिबात कष्ट न पडता तुम्ही नेमके काय करत आहात ते तुमच्या सहज लक्षातही येतं. प्रत्येक अक्षरात, बोलात एक प्रकारची 'शान' असते, डौल असतो, श्रीमंती असते आणि 'मेलडी' या एकसंध कलाकृतीची खरी सम्राज्ञी असते. मला यातून वेगळाच आनंद मिळतो. मला अशी 'मेलडी' मनोमन आवडते. माझ्या वादनाविष्कारात जी सौंदर्यदृष्टी मला अभिप्रेत असते ती पुन्हा नव्याने उजळून निघते.

प्रश्नः या सौंदर्यदृष्टीविषयी थोडे विस्ताराने सांगाल?

उ. झाकिर हुसेनः कला मंचावर सादर करताना आपल्या तांत्रिक कौशल्याचा उपयोग करणे आणि तो देखील योग्य प्रमाणात आणि योग्य रीतीने करणे ही गोष्ट साधावी लागते. आपल्यापैकी बर्‍याचजणांकडे फार उच्च गुणवत्ता असते, पण एक संगतकार या दृष्टीने पाहता आपली 'तयारी' किती दाखवावी याची त्यांना पुरेशी जाणीव नसते. त्यासाठी थोडा विराम घेउन सगळ्या गोष्टींचा यथास्थित विचार करावा लागतो. आपण काय कमावलं आणि काय गमावलं याचा अंदाज घ्यावा लागतो.

आपल्याजवळ असलेल्या विद्वत्तेपैकी समोरच्या श्रोत्यांसमोर आजच किती प्रकट करावी? त्यांना नेमकं काय ऐकायचं आहे? या प्रश्नांची उत्तरं दरवेळी नव्यानं मिळवावी लागतात. तुम्ही वेगवेगळे प्रयोग करून पहा. त्यांचा परिणाम काय होतो, त्यावर प्रतिक्रिया कशा उमटतात हे जोखून पहा. त्यातून आपला अविष्कार घडवत रहा. आपण कुठपर्यंत जायचं, थांबायचं कुठं याचं भान ठेवा ही माझी विचारशैली आहे. फक्त 'हवा' व्हावी म्हणून मी कधीच वाजवत नाही. मला वाटतं कंठसंगीतातून ही दृष्टी सहज मिळते. वाद्यसंगीत समजावून घेतानाही तिचा हमखास उपयोग होतो.

प्रश्नः तुमच्या तबल्यामधे अमाप 'मेलडी' आहे. तुम्ही गायनही करता का?
उ. झाकिर हुसेनः (हसत) ते शक्य होईल असं वाटत नाही. माझी 'तालीम' विधीवत सुरू असल्याने मला गायन शिकवलं गेलं. त्यात रागविज्ञान आणि शेकडो बंदिशींचा समावेश होता. मला शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि लोकसंगीतातल्या गायनामधला भाव लक्षात घ्यावा लागतो. एखाद्या मृदंगवादकाला कृतींची माहिती असते तसंच हे आहे.

प्रश्नः तुम्ही प्रत्येक अक्षरातून एक 'किमया' साधता. प्रत्येक अक्षर स्पष्ट वाजतं, आणि दोन अक्षरांमधला विराम किंवा काही काळाकरताची स्तब्धता प्रभावी ठरते. अतिशय दृत लयीतदेखील तुम्ही गडबड केली किंवा घाईत आहात असं का दिसत नाही?

उ. झाकिर हुसेनः मी (मनातल्या मनात) एक तरल कॅनव्हास वापरतो. त्यामुळेच एखाद्या ठिकाणी एक 'ठिपका' जरी असेल, तरी त्याचा मोठा प्रभाव पडतो. स्तब्धतेत, शांततेत एक विलक्षण शक्ती दडलेली असते. याच विरामांमुळे कलेची अभिव्यक्ती संपन्न होते, परिपूर्ण होते. प्रत्येक आघाताला महत्व येतं. वेगानं धावणार्‍या गाडीत बसण्याइतकाच आनंद एखाद्या वटवृक्षाखाली स्तब्ध बसून राहण्यातही असतोच ना!

प्रश्नः तुम्हाला तबल्याव्यतिरिक्त इतर तालवाद्ये वाजवता येतात का?

उ. झाकिर हुसेनः माझ्या घरात जगभरातील जवळजवळ शंभरएक तालवाद्ये आहेत. ती वाजवण्याचा आनंद तर मी लुटतोच, त्यातूनच माझं कौशल्य वाढतं आणि त्या वादनशैलीची सांगड घालून मी तबल्यातून वेगवेगळ्या प्रकारची 'नादनिर्मीती' करण्याचा अथक प्रयत्न करत असतो. अर्थात यातून रसहानी होउ नये ही खबरदारी घ्यावी लागतेच. माझा तबला काही कोंगो बोंगो आणि ड्रम्ससारखा वाजत नाही.

प्रश्नः संगीतक्षेत्रातले तुमचे आदर्श कोण आहेत?

उ. झाकिर हुसेनः किती म्हणून सांगू! त्यातल्या बर्‍याचजणांची लोकांना फारशी माहिती नाही. काहींची नावं मलाही आठवत नाहीत, पण त्यांचं वादन आजही सहीसही लक्षात आहे! मी माझ्या वडिलांचा आदर्श सुरूवातीपासूनच समोर ठेवला होता. त्यांचे कित्येक अविस्मरणीय कार्यक्रम मी जिवाचे कान करून ऐकले आहेत, पाहिले आहेत. माझ्यावर पं. किशन महाराजजी, पं. सामता प्रसादजी आणि उ. निजामुद्दीन खाँ यांचा गहरा प्रभाव पडलेला आहे. त्यांच्या जमान्यात ते अतुलनीयच होते. मलाही तसं व्हावं असं वाटायचं.
कित्येकजणांना मी प्रत्यक्ष पाहिलेलं नाही, पण त्यांच्या ध्वनिफिती ऐकून मी मंत्रमुग्ध होतो. थिरकवा खाँसाहेबांचा तबला मी पुन्हा पुन्हा ऐकतो. वाटतं की या गोष्टी एखाद्या मर्त्य मानवाच्या हातातून इतक्या लाजबाब कशा निघत असतील? आपल्यालाही असं वाजवता यायला पाहिजे. कधी विलायत खाँसाहेबांना सतार वाजवताना पाहिलं की आपण अशीच सतार वाजवावी असंही वाटायचं.

प्रश्नः तुम्ही आपले वडिल आणि भाउ यांच्यासमवेत बरेच कार्यक्रम करता. उ. अल्लारखाँ अजूनही तुम्हाला शिष्यच मानतात का?

उ. झाकिर हुसेनः माझ्यासाठी ते सदैव गुरूच आहेत आणि असतील. मला वाटतं अलीकडे ते मला मित्र मानायला लागले आहेत. अलीकडे ते अगदी माझ्या हातावर टाळी देत देत मला विनोदही ऐकवतात. ते माझ्या चुका दुरूस्त करत नाहीत, पण पुढचा मार्ग दाखवतात. त्यांच्याजवळ देण्यासारखं नेहेमीच काहीतरी असतं. आपली परंपरा ही तशी मौखिक परंपरा आहे. कपाटातून एखाद्या ग्रंथाचा ५० वा खंड काढून ४१० वे पान पहा असला प्रकार यात नसतो. कधी कधी मी माझ्या खोलीत टीव्ही बघत असताना ते अचानक येतात, म्हणतात, "सहज म्हणून सांगतो, आत्ताच एक बोल आठवला" आणि लगेच त्यांची पढंत सुरू होते. मी आपला पटकन ते बोल लिहून घेतो आणि मग तबला घेउन रियाझ सुरू होतो.

प्रश्नः तुम्ही अपयशाला कसे सामोरे जाता?

उ. झाकिर हुसेनः आम्ही करतो त्या प्रत्येक गोष्टीत धोका पत्करावा लागतो. खास करून कलाकारांना या गोष्टीला सामोरे जावेच लागते, निव्वळ शास्त्रार्थ करणार्‍यांना नाही! कित्येक मैफिली नीरस होतात. त्यामुळे मी हताश मात्र होत नाही. एक माणूस म्हणून आपल्याला काही मर्यादा असतात. आपण प्रत्येक गोष्ट बिनचूक करू शकत नाही, किंवा दरवेळी त्याच उंचीवर पोचू अशी खात्री देउ शकत नाही. अपयशातून मी काहीतरी शिकतो. पुढे जातो. यशापेक्षा अपयशाचाच उपयोग जास्त. त्यातून मुर्दाडपणा येत नाही, तारतम्य येतं आणि पाय सतत जमिनीवर राहतात.

((गौरी रामनारायण यांनी घेतलेल्या उ. झाकिर हुसेन यांच्या मुलाखतीचा अनुवाद)

No comments:

Post a Comment