Saturday, 15 June 2013

खिडकी

माधवराव देवळे त्या 'बुद्रुक' खेडेगावात खास विश्रांती घेण्यासाठी गेले होते. त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनी किमान दोन महिने कामकाज बंद ठेउन पूर्णपणे विश्रांती घेण्याची त्यांच्यावर जवळजवळ सक्तीच केलेली होती. कुठलाही शारिरीक किंवा मानसिक ताण त्यांची तोळामासा झालेली प्रकृती लक्षात घेता कदाचित प्राणघातक ठरला असता. अनायासे त्यांच्या बहिणीच्या एका जीवश्चकंठश्च बालमैत्रिणीकडे त्यांची 'पेईग गेस्ट' पद्धतीने राहण्याची व्यवस्थाही झालेली होती. तशी तजवीज बहिणीने करून ठेवलेली होती. माधवरावांजवळ त्यांचा परिचय करून देणारी एक चिठ्ठीही दिली होती. पूर्णपणे अपरिचीत लोकात आणि फारशा सुखसुविधा नसलेल्या एका आडवळणी टिकाणच्या 'बुद्रुक' गावात राहून प्रकृती सुधारण्याच्या दृष्टीने कितपत फायदा होईल याबद्दल माधवराव साशंक होते.

बस थांब्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अनंतराव पाटलांच्या घरी माधवराव पोचले, तेव्हा त्यांना चांगलाच थकवा जाणवत होता. त्यांचं स्वागत स्वत:च्यात तंद्रीत हरवलेल्या एका शाळकरी मुलीनं केलं. त्या मुलीला आपल्याकडे हा आगंतुक पाहुणा येणं फारसं आवडलं नसावं. तिच्या चेहर्‍यावर नाराजीची छटा स्पष्टपणे दिसत होती. "माझी मामी थोड्या वेळात खाली येईल. तोवर मी आपलं सामान ठेवून घ्यायला मदत करते", ती मुलगी वरपांगी का असेना नम्रपणे बोलली. तंद्रीमधून बाहेर आल्यावर ती चांगलीच चुणचुणीत वाटत होती. तिच्या वागण्याबोलण्यात वयाशी विसंगत असा पोक्तपणाही दिसून येत होता. "या गावात आपण पहिल्यांदाच येताय ना?", तिचा अपेक्षित प्रश्न आला. "होय, आणि ते ही डॉक्टरांच्या सल्ल्यावरून, नव्हे हुकूमावरून!" माधवरावांनी कसंबसं कृत्रिम हसू चेहेर्‍यावर आणत उत्तर दिलं.

"मग आपण माझ्या मामीला ओळखत नसाल", तिचा दुसरा प्रश्न. "नाही, मला त्यांचं नाव आणि इथला पत्ता माझ्या बहिणीनी दिला आहे.", माधवरावांनी उत्तर दिलं. "हम्म. तीन महिन्यांपूर्वी माझ्या मामीच्या आयुष्यात ती दुर्दैवी घटना घडली, आणि तेव्हापासून ती भ्रमिष्टासारखी वागते. असंबद्ध वागते बोलते. बहुधा आपल्या बहिणीलाही घडल्या प्रकाराबद्दल काही माहिती नसावी." ती मुलगी म्हणाली. तिचं नाव अबोली होतं. त्या शांत आणि निवांत गावात अपघात किंवा दुर्घटना घडण्याची शक्यता खूपच कमी होती. घराच्या मागच्या बगिच्याकडे तोंड करून असलेली एक भलीमोठी फ्रेंच पद्धतीची खिडकी सताड उघडी होती. हवेत जाणवण्याइतका गारठा असूनही ती बंद केलेली नव्हती.

"काका, ही खिडकी इतका गारठा असूनही उघडी का आहे याचं तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, पण ती दुर्दैवी कहाणीच यामागं आहे. तीन महिन्यांपूर्वी माझे मामा, त्यांचा एक मित्र आणि त्यांचा लाडका शिकारी कुत्रा 'झुमरू' या खिडकीतून उडी मारून घरामागच्या पायवाटेनं नदीपलीकडच्या जंगलात शिकारीसाठी गेले. तो त्यांचा नेहेमीचा आणि सवयीचा रस्ता होता. दुर्दैवानं नदी पार करताना ते एका भोवर्‍यात सापडले. तिघांच्याही मृतदेहाचा शोध आजवर लागलेला नाही. गावात अधूनमधून त्यांच्या आकृती रात्रीच्या काळोखात अस्पष्टपणे दिसतात अशी वदंता आहे."

बोलता बोलता अबोलीचा स्वर थोडा हळवा झाला. आवंढा गिळत ती म्हणाली, "अजूनची माझ्या मामीचा ठाम विश्वास आहे की तिचे यजमान, त्यांचा मित्र आणि झुमरू कुत्रा याच खिडकीतून परत येतील. तिच्या हट्टाखातर ही खिडकी कायम उघडी ठेवावी लागते. मामी दिवसभर तिचे यजमान एका हातात रायफल आणि दुसर्‍या हातात पांढरा ओव्हरकोट घेउन ताडताड चालताना कसे रूबाबदार दिसतात, त्यांना कडक कॉफीच आवडते आणि थालिपीठ लोण्याशिवाय दिलेले चालत नाही असली कौतुकं करत बसते. खरं सांगायचं तर मलाही कधीकधी खिडकीतून पाहताना त्या तीन आकृती दूरवर दिसल्याचे भास होतात." इतकं बोलून अबोली वार्‍याच्या वेगाने बाहेर निघूनही गेली. माधवरावांना थोडं हायसं वाटलं, कारण अबोलीची बडबड ऐकून त्यांचं डोकं गरगरायला लागलं होतं. पोरींची नावं आणि त्यांचं रूप किंवा स्वभाव यात हमखास टोकाची विसंगती का असावी असा विचार करत त्यांनी डोळे मिटून घेतले.

त्यांना थोडी डुलकी लागते न लागते इतक्यात अबोलीची मामी त्यांच्या खोलीत आली. "मला थोडा उशीरच झाला, माफ करा" तिची बडबड सुरू झाली. "मला वाटतं की ही खिडकी उघडी ठेवल्यानं तुम्हाला फारसा त्रास होणार नाही. माझे यजमान शिकारीसाठी बाहेर गेलेले आहेत. ते इतक्यात परत येतील. ते नेहेमी बगिचातून जंगलाच्या दिशेने जाणार्‍या पायवाटेनेच परत येतात." त्यानंतर ओसंडून वाहणार्‍या उत्साहाच्या भरात आपल्या घरातली सजावट, यजमानांचा स्वभाव, त्यांच्या आवडीनिवडी यांच्याबद्दल ती जाडजूड बाई आपल्या नैसर्गिक तारस्वरात तासभर एकसुरी बडबड करत राहिली. या बाईची अखंड सुरू असलेली टकळी एकदाची थांबावी या हेतूने माधवराव थोडा आगाउपणा करत मधेच बोलले, "मी थोडी विश्रांती घेउ का? या गावात मी खरं तर पूर्ण विश्रांती मिळावी या एकमेव हेतूनेच आलो आहे. मला कुठलाही तणाव सहन होत नाही".

"असं काय" अबोलीची मामी शून्यात बघत म्हणाली. माधवरावांच्या बोलण्याकडे तिचं धड लक्ष नव्हतं. बोलताबोलता तिची नजर खिडकीकडे वळली आणि अचानक तिचे डोळे लकाकले, चेहर्‍यावर विलक्षण तजेला आला. खिडकीतून बाहेर बघत ती पुढे बोलायला लागली, "शेवटी एकदाचे हे परत येताना दिसताहेत. बरोब्बर कॉफी घ्यायच्या वेळेला ते इथं पोचतील". इतक्यात अबोली परत आली. ती भयचकीत होऊन खिडकीतून बाहेर बघायला लागली. माधवरावांनी नकळत आपली खुर्ची त्या दिशेला वळवली. घरामागच्या बगिच्यात तीन आकृती दिसत होत्या. त्यातली एक अक्राळविक्राळ शिकारी कुत्र्याची होती. त्यामागून येणार्‍या दोन धिप्पाड पुरूषांपैकी एकाच्या हातात रायफल होती आणि खांद्यावर पांढरा ओव्हरकोट झुलत होता. माधवरावांच्या अंगावर सरसरून काटा आला, पण स्वतःला सावरत एकही शब्द न बोलता ते घराच्या दर्शनी भागाकडे असलेल्या मुख्य दरवाजातून सुसाट पळत बाहेर पडले. अंगातलं उरलंसुरलं त्राण गोळा करून समोरचं पटांगण पार करून बस थांब्याकडे जाणार्‍या हमरस्त्याजवळ एका झाडाखाली ते डोकं धरून मटकन खाली परत बसले ते तिथून थेट बस थांब्यावर जाउन परतीची गाडी पकडायची हा निर्धार करूनच!

"ब्लॅक कॉफी तयार असेलच. आम्ही पहा कसे अगदी बरोब्बर वेळेत परत फिरलो", आपला ओव्हरकोट खुर्चीवर टाकत अबोलीच्या मामांनी त्यांची नेहेमीची फर्माईश केली. "आम्हाला पाहताक्षणी इथून पळून गेलेला तो किडकिडीत माणूस कोण होता?" त्यांनी थोडं आश्चर्यानीच विचारलं. "ते श्री. देवळे होते. बहुधा मनोरूग्ण असावेत. तुम्हाला येताना पाहून भूत पाहिल्यासारखे पळत सुटले. निदान मला तरी ते पाहताक्षणीच थोडे वेडसरच वाटले." पाटलीणबाईंनी उत्तर दिलं.

"मला वाटतं आपल्या झुमरूला पाहून त्यांची अशी गाळण उडाली असेल.", अबोली शांतपणे स्पष्टीकरण द्यायला लागली, "थोड्याच वेळापूर्वी आमच्या गप्पा झाल्या. एकदोन वर्षांपूर्वी त्यांच्या गावच्या कबरस्तानातून 'शॉर्टकट'ने जाताना काही भटकी कुत्री त्यांच्या मागं लागली होती. एका अर्धवट खणलेल्या कबरीमधे उडी मारून त्यांनी एक रात्र तिथेच काढली होती. या प्रसंगाचा त्यांच्या मनावर खोलवर आघात झाला, आणि आजतागायत ते पूर्णपणे बरे झालेले नाहीत." कसोटीच्या क्षणी अजिबात वेळ न दवडता एखाद्या निष्णात तबलजीने 'उपज' अंगाने तिहाई वाजवावी इतक्या सहजतेने लोणकढी थाप मारणं आणि ती लीलया पचवणं हीच तर अबोलीची खासियत होती. या बाबतीत तिचा हात धरू शकेल असा पंचक्रोशीत कुणीही नव्हता!

(एच. एच. मुनरो उर्फ 'साकी' यांच्या 'द ओपन विन्डो' या लघुकथेवर आधारित)

No comments:

Post a Comment