Sunday, 16 June 2013

स्वरमग्न - उस्ताद अमजद अली खाँ

हिंदुस्थानी अभिजात संगीताची लोकांवर 'जादू' होते, याचं एक महत्वाचं कारण आहे - या संगीतात असणारी लोकसंगीताची झलक. एक परिष्कृत ('सॉफिस्टिकेटेड') तरीही सरळ, साधी, सच्ची स्वररचना. या संगीतात असे कित्येक 'शास्त्रीय' प्रकार आहेत ज्यात थक्क करून टाकणार्‍या चमत्कृती आणि अगाध सौंदर्य आहे. असं म्हणतात की या संगीतातले राग 'जिवंत' आहेत, आणि रागांच्या महत्तेपायी नव्हे तर आपली सांगितीक जाणीव शाबूत आहे हे समजण्यासाठी एखाद्या जिवंत व्यक्तीइतकाच मान रागस्वरूपालाही द्यावा लागतो.

पं. कुमार गंधर्व म्हणायचे, "तुम्ही ज्या प्रकारे गाता, त्यात रागाच्या मूळ वृत्तीचा उपमर्द होऊ नये हे भान राखा. प्रत्येक रागाच्या अंतरंगात जिवंतपणा आहे, त्याच्या हृद्याचे स्पंदन ऐका. त्याचा मान राखा". संगीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी नीट स्वरात मिळवलेल्या तानपुर्‍याच्यातून सभोवती निर्मीत होणारा गूढरम्य नाद हा त्यांच्या वाटचालीतला महत्वाचा सवंगडी ठरतो. त्यामुळेच वरपांगी साध्या वाटणार्‍या या वाद्याकडेही लोक कुतूहलाने बघतात.

नंतर वारंवार एक गोष्ट जाणवायला लागते की राग म्हणजे फक्त एखाद्या थाटातला किंवा तालात बांधलेला निर्जीव नियमबद्ध स्वरसमूह नाही. तो कुठल्या प्रहरी कुठल्या ऋतूत सादर करावा याचं एक रहस्य आहे. कोणता राग कधी सादर करावा याचे नियम काटेकोरपणे पाळले जातात. या शतकाच्या सुरूवातीस कित्येक संगीतकारांनी आपल्या ध्वनिफिती प्रकाशित करायला नकार दिला. ते म्हणत, लोक ज्या रितीने जगतात त्याला अनुसरून ते या ध्वनिफिती कधीही आणि कुठेही बिनडोकपणे लावतील आणि त्यातून आमच्या राग-रागिणींचा अपमान होईल. तुम्ही उस्ताद अमजद अली खाँसाहेबांना भेटलात, तर असे संगीतविषयक असे अनेक किस्से आणि पैलू तुमच्या पुढे येत राहतात.

आपल्या आयुष्यातला एक किस्सा ते न कंटाळता पुनःपुन्हा सांगतात. राष्ट्रपती भवनात अमजद अलींच्या तीर्थरूपांचा (उ. हाफिज अली खाँ) सत्कार होता. समारंभानंतर राष्ट्रपती महोदयांनी त्यांना आदराने विचारलं, "मी आपल्यासाठी काय करू शकतो?" तेव्हा उस्तादजींनी उत्तर दिलं, "राष्ट्रपती हे पद म्हणजेच आपण हिंदुस्थानचे सम्राट आहात. आपल्याला अशक्य असं काहीच नाही. ऑल इंडिया रेडिओवरून राग दरबारी प्रसारित होताना कित्येकदा त्याचा 'खून' पडतो. शक्य असेल तर हे त्वरीत बंद करा!" राष्ट्रपती स्मितीत झाले. त्यांनी स्वतःला सावरत परत प्रश्न विचारला, "आपली काही वैयक्तिक मागणी असेल तर ती सांगा. मी रेडिओला आवश्यक त्या सूचना देईनच". यावर उस्तादजींनी फक्त नमाज पढण्यासाठी घरी रवाना होण्याची परवानगी मागितली!

तसं पाहिलं तर उ. अमजद अलींना संगीताचं शिक्षण मिळणं अशक्य कोटीतलंच होतं. उ. हफीज अली ६५ वर्षांचे असताना त्यांना हा मुलगा झाला! त्यामुळे त्यांना असं वाटायचं की सगळ्यांच्या सदिच्छा पाठीशी असल्या तरी या मुलाला शिकवण्यासाठी पुरेसा अवधी मात्र आपल्याजवळ नाही. आपल्या परंपरेशी नातं जोडण्यासाठी राग, थाट किंवा ताल 'ओळखणं' किंवा बंदिशी पाठ करणं पुरेसं नाही. एवढ्या तुटपुंज्या भांडवलावर घराण्याची परंपरा टिकवणारे संगीतकार होता येत नाही.

ज्या सांगितीक 'करामती' करून लहान वयात मुलं आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवून नावारूपाला येतात, त्या अमजद अली लीलया करून दाखवायचे. तरीही त्यांची रवानगी 'औपचारिक' शिक्षणासाठी मॉडर्न स्कूलमधे होणे टळले नाही. तसे घडूनही या मुलाच्या मनात खोलवर सतत एक जाणीव होती, जी त्याला कधीच दृष्टीआड करता आली नाही. ज्याला आपण शिक्षण समजतो आहोत, ते एका मर्यादेपर्यंत अपरिहार्यच आहे, पण ते निव्वळ 'ठोकळेबाज' आहे. ज्याच्यापुढे आपले आयुष्य 'घडवण्याची', खर्‍या अर्थाने जगण्याची संधी हात जोडून उभी आहे, त्याच्या दृष्टीने असली पोपटपंची कुचकामी आहे.

हा मुलगा भर दुपारी रियाझ करण्यासाठी नित्यनेमाने चक्क घरी पळून जायचा. सुदैवाने त्यावेळी प्रसिद्ध शिक्षणतज्ञ एम. एन. कपूर दिल्लीच्या या मॉडर्न स्कूलच्या प्राचार्यपदी होते. त्यांनी हेरलं की निव्वळ परीक्षेत चांगले गुण मिळवण्याच्या हेतूने शाळेत येणार्‍या मुलांपैकी हा विद्यार्थी नाही. त्यांनी शाळेच्या कार्यालयीन वेळेत घरी जाण्याची खास सवलत अमजद अलींना दिली. शेवटी अमजद अलींनी शालेय शिक्षणातली अंतिम परीक्षाही व्यवस्थित पार पाडली. शालेय अभ्यासक्रमाला पुरेसा 'न्याय' देत फार थोडा वेळ झोप घेऊन ते रोज बारा ते चौदा तास न चुकता रियाझ करायचे.

सरोद हे हिंदुस्थानी अभिजात संगीताची परंपरा लक्षात घेता तुलनेने एक नवं वाद्य आहे. मध्य अशियातल्या गुराख्यांकडून 'स्थलांतरित' होत होत हे वाद्य अमजद अलींच्या 'बंगश' घराण्यातल्या पूर्वजांकडून भारतात आलं. (जंजीर मधल्या प्राणनी आपल्या अदाकारीने अजरामर केलेल्या 'यारी है इमान मेरा' गाण्यात पार्श्वसंगीतात वापरले आहे ते 'रबाब' हे अफगाणी वाद्य आणि सरोदची जातकुळी एकच आहे). काळाच्या ओघात बरेच रचनात्मक बदल होत सरोदनी आजचं स्वरूप घेतलं आहे.

अत्यंत प्रभावशाली, पुरूषी, खर्जातला आवाज ही या वाद्याची खासियत. या वाद्याला 'पडदे' नाहीत. वादकाचे कान विलक्षण 'तयार' नसतील आणि तो स्वराला पक्का नसेल तर सरोद त्याला क्षणार्धात 'बेपरदा' करते असे अमजद अली नेहेमी म्हणतात. वाद्याच्या ध्वनीची गुणवत्ता मु़ळातच इतकी अप्रतिम आहे, की फारशी धडपड न करताही दोन चार स्वरावली वाजवताच नाणावलेल्या सरोद वादकाला मैफिल ताब्यात घेता येते. आपल्या मनात उमटेल त्या प्रमाणे वाद्य 'गायला' लागावं यासाठी स्वतः अमजद अलींनीही या वाद्यात बरेच तांत्रिक बदल केलेले आहेत.

वडिलांकडून मिळालेल्या पक्क्या तालिमीला डोळस रियाझाची जोड दिल्यानेच आत्ममग्न, स्वतःशीच संवाद साधणारं असं अमजद अलींचं आगळंवेगळं सांगीतिक व्यक्तिमत्व घडत गेलं आहे. सरोद वादनातल्या तांत्रिक गोष्टींबरोबर आपल्या वडिलांकडूनच कलेतली 'अंतर्मुखता' त्यांना परंपरेनेच मिळालेली आहे. सरोद हातात घेतल्यावर ते फार कमी वेळा आपल्या श्रोतृवर्गाकडे आवर्जुन लक्ष देताना दिसतात. आपल्या वादनात ते इतके तल्लीन होउन जातात, की एकदा डोळे मिटून घेतल्यावर भर मैफिलीत सभागृहाच्या आत-बाहेर करणार्‍या 'असुरांची' चाहूलही त्यांना सहजी अस्वस्थ करू शकत नाही. श्रोत्यांकडे वारंवार बघून मैफिल रंगते आहे की नाही अशी 'चाचपणी' करतानाही ते फारसे दिसत नाहीत. एखाद्या सृजनशील व्यक्तीला आपल्याच कलाकृतीकडे तिची निर्मीती सुरू असताना तटस्थपणे पाहता येण्यासाठी लागतो तो 'स्थितप्रज्ञ' भाव त्यांच्याकडे सहजच आला आहे हे लक्षात येते.

अमजद अलींच्या पत्नी सौ. शुभलक्ष्मी यांचे साहचर्य लाभणे ही त्यांच्या सांगितीक जीवनातली एक खूप मोठी जमेची बाजू आहे. उस्तादजींचे ते एक सुप्त बलस्थानच आहे. सौ. शुभलक्ष्मी या मूळच्या आसामच्या, पण वृत्तीने मात्र पूर्णपणे दक्षिण भारतीय! कै. रूक्मिणीदेवींच्या ऐन उमेदीच्या काळात चेन्नईच्या विख्यात 'कलाक्षेत्रात' तब्बल दहा वर्षे शुभलक्ष्मींना भरतनाट्यमचं शिक्षण त्यांच्याकडून मिळालं. दाक्षिणात्य संस्कृतीतही त्या पूर्णपणे रममाण झाल्या. त्यांचं तमिळ भाषेवर असाधारण प्रभुत्व आहे. अमजद अलींच्या घरातच हिंदुस्थानी आणि कर्नाटकी संगीताचा असा सुरेख मिलाफ झालेला आहे. एक कलाकार या दृष्टीने पाहता शुभलक्ष्मी याच अमजद अलींच्या आद्य समीक्षकाचे काम चोखपणे करतात, त्यांना मोलाच्या सूचनाही देतात.

आपल्या दोन मुलांचं यथास्थित संगोपन करण्यासाठी शुभलक्ष्मीजींनी आपल्या यशस्वी कारकिर्दीवर भर उमेदीच्या काळात पाणी सोडलं. आज ही दोन्ही मुलं यशस्वीरीत्या आपली उज्वल परंपरा पुढे नेताना दिसतात. अमान अली आणि अयान अली 'बंगश' जगभर आपल्या वडिलांच्या जोडीने तसेच आपसातल्या जुगलबंदीच्या सरोद वादनाच्या मैफिली अक्षरशः गाजवतात. या त्रयीने सरोदच्या तारा छेडताच त्या वाद्यातून उमटणारा वेगळाच गाज, सुरांचे माधुर्य आणि 'बंगश' घराण्याची राजमुद्रा भाळी घेउन आलेला शैलीदार नाद चटकन ओळखता येतो. श्रोत्यांच्या मनावर तो कायमची छापही सोडून जातो. या मुलांच्या वादनातून हे सहज सिद्ध होतं की उ. हफीज अलींचं घराणं काळाच्या कसोटीवर निर्विवादपणे उतरलेलं आहे.

सच्चं, सुरेल आणि पराकोटीचं सृजनशील जीवन जगण्यासाठी लागणारी आई सरस्वतीच्या कृपेची शिदोरी अमजद अलींनी आपल्या मुलांना दिलेली आहे. हाडाचे कलावंत असलेले वडिल आपल्या मुलांना यापेक्षा वेगळे आणखी काय देउ शकतात? आपली विद्या अमान आणि अयानच्या हाती सुपूर्त करून, घराण्याची परंपरा अखंड ठेउन अमजद अलींनी आपलं गीत, संगीत 'अमर' केलेलं आहे. सरोद वादनाच्या क्षेत्रात आणि एकंदरच हिंदुस्थानी अभिजात संगीतातल्या वाद्यसंगीताच्या महान परंपरेत त्यांचं स्वत:चं अढळ असं ध्रुवपदच त्यामुळे निर्माण झालं आहे.

[श्री. राघव मेनन यांच्या 'द साँग ऑफ अमजद अली खाँ या लेखावर आधारित]

No comments:

Post a Comment