विभाग १ - स्वरूपबोध - प्रकरण १ - 'स्व' चे मूळ स्वरूप
'द सेल्फ' किंवा स्व-स्वरूप ही संकल्पना भगवान रमण महर्षींच्या बोलण्यात वारंवार येत असे. पावसच्या स्वामी स्वरूपानंदांच्या लेखनातही 'स्वामी म्हणे लागे अवीट आनंद, लागलासे छंद स्वरूपाचा' या सारखे उल्लेख ठिकठिकाणी आहेत. रमण महर्षींनी उल्लेख केलेल्या स्वरूपाच्या बाबतीत पुढील गोष्टी लक्षात घेण्याजोग्या आहेतः
'स्वरूपाचा' अर्थ आपले व्यक्तिमत्व असा नसून ती संकल्पना एका निर्वैयक्तिक आणि सर्वसमावेशक अशा विशुद्ध चैतन्याच्या अखंड अनुभूतीकडे इशारा करते. अहंकार, अस्मिता इत्यादिंच्या परिघात इंद्रियांच्या संयोगाने आलेल्या अनुभवांमुळे जन्माला आलेला, तसेच संस्कारांनी आणि वासनांनी बद्ध असलेला व्यक्तिमत्वदर्शक 'मी' आणि स्व-स्वरूप यात गल्लत होता कामा नये. खरे स्व-स्वरूप निरंतर अस्तित्वात असल्याने ते अनुभवता येणे सहज शक्य आहे. मात्र तसे घडताना दिसत नाही. या बाबतीत महर्षी असे प्रतिपादन करत असत की मुळात अमर्याद असलेल्या चैतन्याभोवती काल्पनिक मर्यादा निर्माण करून बंधनात जखडलेली स्थिती अनुभवण्याची मनाची जन्मोजन्मी जोपासली गेलेली प्रवृत्ती नष्ट झाल्याखेरीज खर्या 'स्व' विषयीची सजग जाणीव होणे संभवत नाही. एकसंध आणि निरंतर अशा स्वरूपाच्या सजग जाणीवेसच आत्मसाक्षात्कार म्हणता येईल.
सच्चिदानंद, देव, ज्ञान, ह्रदय, तुरिय/ तुर्यातीत, 'आत्मन' तसेच 'सहज स्थिती' अशा अनेकविध संकल्पनांचा उल्लेख रमण महर्षी स्व-स्वरूपाचे किंवा आत्मसाक्षात्कारी स्थितीचे समानार्थी किंवा पर्यायवाचक शब्द या स्वरूपात करत असत. रमण महर्षींचा देव सगुण साकार स्वरूपात नसून या जगाचे रहाटगाडगे चालवणारी एक निराकार शक्ती असे त्याचे स्वरूप आहे. हा देव विश्वाची उत्पत्ती करणारा नसून दृश्य जगाशी त्या शक्तीचा स्वरूप संबंध आहे. ईश्वराच्या अमर्याद चैतन्याच्या एका यःकिंचीत अंशाचे मूळ शक्तीपासून कधीच विभक्त न होणारे प्रकट स्वरूपच आपल्याला ब्रह्मांडाच्या स्वरूपात अनुभवता येते असा या स्वरूप संबंधाचा अर्थ होतो. ब्रह्मांडाच्या अस्तित्वाचा किंवा नास्तित्वाचा मूळ ईश्वरी शक्तीवर काहीच परिणाम होत नाही, तसेच व्यक्त स्वरूपातल्या ब्रह्मांडातल्या कार्यकलापांच्या कर्तृत्वाचा आरोपही ईश्वरावर करता येत नाही.
प्रश्नः (या जगातली) वास्तविकता (सत्य) नेमकी काय आहे?
रमण महर्षी: सत्य (किंवा वास्तविकता) हे निरंतर सत्यच असले पाहिजे. नाम आणि रूपाने बनलेल्या जगताबद्दल तसे म्हणता येत नाही. ज्या आधारशक्तीच्या बळावर नामरूपात्मक जगत अस्तित्वात येते ती खरी चिरंतन वास्तविकता आहे. ती स्वभावानेच बंधनरहित आणि अनंत आहे. स्वतः सत्यस्वरूप असूनही ही वास्तविकताच आभासी मृगजळासारख्या वस्तुमात्रांचा आधारवड बनून राहते. शाश्वत सत्यस्वरूप जे काही आहे आणि जसे काही आहे ते नेहेमी तसेच राहते. त्याचे वर्णन करू पाहता वाचा खुंटते. अस्तित्व किंवा नास्तित्व या सारख्या संकल्पनांच्या पलीकडची ती चिरंतन आणि स्वयंसिद्ध स्थिती आहे. जेव्हा भौतिक वस्तुंविषयीच्या भ्रामक ज्ञानाचा अज्ञानासमवेत पूर्णपणे निरास होतो, तेव्हा विशुद्ध चैतन्यस्वरूप असलेली वास्तविकता आपोआप प्रकट होते. हेच खरे स्व-स्वरूप आहे किंवा आत्मज्ञान आहे. या ब्रह्मस्वरूपात स्वसंवेद्य अशी शुद्ध जाणीव प्रकर्षाने असते, तसेच अज्ञानाचा लेशमात्रही तिथे शिल्लक नसतो.
बाह्य जगताची जाणीव असलेली स्थिती (उदा. जागृती) तसेच जाणीव नसलेली स्थिती (उदा. निद्रा) या दोन्हींना व्यापून उरणारी, तसेच पाप, ताप आणि दैन्यापासून मुक्त असलेली स्वयंप्रकाशी अशी विदेही स्थिती हे तुमचे खरे निजस्वरूप आहे. ही स्थिती अंतर्बाह्य मौनानेच अभिव्यक्त होते. सगळे ज्ञानीजन असा निर्वाळा देतात की कुठल्याही स्थळ, काळ आणि परिस्थितीत अबाधित राहणारी अशी ही अंतिम ज्ञानावस्था आहे. विशुद्ध ज्ञान हेच वैराग्य आहे, तेच खरेखुरे सोवळे आहे आणि तेच ईश्वरी साक्षात्कारही आहे. ज्यात क्षणभराचेही आत्मविस्मरण संभवत नाही असे ज्ञान हेच अमरत्व आहे, त्यातच सर्वज्ञता आहे. कैवल्य ज्ञान हेच खरे तर साधकासाठी सारसर्वस्व आहे.
प्रश्नः आत्मस्वरूप जर स्वयंप्रकाशी, नित्य, स्वयंसिद्ध आणि स्वसंवेद्य असेल तर आत्ता या क्षणी मला त्याची जाणीव का होत नाही?
रमण महर्षी: द्वैत वास्तविक पाहता अस्तित्वातच नाही, मात्र तुम्ही आत्ता ज्याला ज्ञान समजता आहात ते अहंभावातून निपजलेले आहे. असे ज्ञान हे साहजिकच स्थळ काळ आणि परिस्थिती सापेक्ष असते. सापेक्ष ज्ञानासाठी दृष्य वस्तु आणि द्रष्टा दोन्ही अनिवार्य आहेत, मात्र स्वसंवेद्यता ही परिपूर्ण स्थिती असल्याने तिला दृष्य वस्तु आणि द्रष्टा अशा द्वैताची गरज नसते.
स्मरण ही अशीच एक सापेक्ष गोष्ट आहे, जिथे स्मरणात ठेवायची वस्तु आणि स्मरण करणारा दोहोंची अनिवार्यता आहे. जिथे द्वैतच अस्तित्वात नाही, तिथे कोण कोणाचे स्मरण करेल? तुमचे खरे स्वरूप हे शाश्वत आणि चिरंतन आहे. प्रत्येकालाच आपल्या मूळ स्वरूपाची ओळख करून घ्यायची आहे. मात्र मला हे व्यवस्थित समजावून सांगा, की 'पहावे आपणासी आपण' अशी प्रचिती मिळवण्यासाठी तुम्हाला नेमकी कुठल्या स्वरूपात मदत अपेक्षीत आहे?
लोकांना एखादी नाविन्यपूर्ण घटना घडावी अशा प्रकारे आत्मसाक्षात्कार अपेक्षित असतो. असा भ्रामक समज करून घेण्यात मुळातच आंतरिक विसंगती आहे, कारण आत्मस्वरूप चिरंतन आणि अखंड असल्याने त्यात कुठलेच परिवर्तन संभवत नाही. साधकांना दिव्य प्रकाश, नाद वगैरे अनुभवांची लालसा असते. आत्मस्वरूप तसे कसे असू शकेल? ते प्रकाश आणि अंधार या सारख्या द्वैताच्या पल्याड असते. (प्रचिती घेता आली तरी) आत्मस्वरूपाची व्याख्या करता येणे शक्य होत नाही. ते जसे असते तसेच सत्य सनातन असते.
'मी आहे', अहंस्फुरणाची ही उपाधीरहित विशुद्ध जाणीवच आत्मस्वरूपाची त्यातल्या त्यात चांगली व्याख्या आहे असे म्हणावे लागेल. श्रुतिवचनांमधे आत्म्याचे वर्णन अंगुष्ठमात्रा एवढा, केशाग्रासारखा, विजेच्या ठिणगीसारखा, अमर्याद, सूक्ष्माहूनही सूक्ष्म असे नानाविध प्रकारे केलेले दिसते. वास्तविक पाहता हा सगळा पूर्णपणे निराधार असा कल्पनाविलास आहे. (व्यावहारिक दृष्ट्या) आपण ज्याला ज्ञान आणि अज्ञान असे म्हणतो, त्या पेक्षा वेगळे असे हे आत्मस्वरूपाचे ज्ञान आहे. (व्यावहारिक दृष्ट्या) आपण ज्याला तथ्यपूर्ण आणि तथ्यहीन म्हणतो, त्या दोन्हीपेक्षा वेगळे असे हे शाश्वत सत्य आहे. त्याची व्याख्या करायची तरी कशी? हे सत्य जाणता येत नाही, ते जाणण्यासाठी स्वतःच सत्यस्वरूप होउन जावे लागते!

No comments:
Post a Comment