Thursday, 26 December 2019

निष्काम कर्म

श्री. रंगाचारी हे वेल्लोरच्या एका महाविद्यालयात प्राध्यापक होते. तेलगू भाषेचे ते गाढे पंडितही होते. त्यांनी एकदा रमण महर्षींना 'निष्काम कर्म' या संकल्पनेचा अर्थ विचारला. महर्षींनी लगेच कुठलेही उत्तर न देता फक्त स्मितहास्य केले.  थोड्या वेळाने महर्षी अरूणाचल पर्वतावर रोजच्या परिक्रमेसाठी निघाले. त्यांच्या समवेत शिष्यवर्गही निघाला, पंडितजीही त्यात सामील झाले. पायवाटेवर एक काट्याकुट्यांनी भरलेली लाकडी काठी पडलेली होती. महर्षींनी ती उचलली आणि अगदी सहजतेने तिच्यावर काम करायला सुरूवात केली. काटेकुटे कापून काढत, वेड्यावाकड्या गाठी तासून काढत त्यांनी त्या काठीचे एका एकसंध मुलायम छडीत रूपांतर केले. झाडाच्या एका खरबरीत पानाने घासून तिला अगदी लख्ख उजळवले. हे सगळे काम एकीकडे अव्याहतपणे जवळजवळ ६ तास सुरू होते. बघणारे आश्चर्यचकित होऊन म्हणत होते की ही छडी तर आता एखाद्या चकचकीत धातूने बनवावी इतकी सुबक दिसते आहे.

थोडे पुढे जाताच एक धनगर मुलगा परिक्रमेच्या पायवाटेनजिक उभा असलेला दिसला. त्याची गुरे हाकण्याची छडी निसटून खोल दरीत पडून गायब झालेली होती.  तो मुलगा चांगलाच कावराबावरा झालेला होता. काय करावे हे त्याला सुचत नव्हते. महर्षींनी आपल्या हातात असलेली छडी त्याच्याकडे सोपवली आणि अवाक्षरही न उच्चारता ते पुढे निघाले. तो मुलगा हरखून गेलेला दिसला. पंडितजी नकळत बोलून गेले, की एकही शब्द न उच्चारता महर्षींनी त्यांच्या निष्काम कर्मविषयक प्रश्नाचे अगदी मार्मिक आणि सोदाहरण उत्तर दिले होते.


No comments:

Post a Comment