Saturday, 15 June 2013

खिडकी

माधवराव देवळे त्या 'बुद्रुक' खेडेगावात खास विश्रांती घेण्यासाठी गेले होते. त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनी किमान दोन महिने कामकाज बंद ठेउन पूर्णपणे विश्रांती घेण्याची त्यांच्यावर जवळजवळ सक्तीच केलेली होती. कुठलाही शारिरीक किंवा मानसिक ताण त्यांची तोळामासा झालेली प्रकृती लक्षात घेता कदाचित प्राणघातक ठरला असता. अनायासे त्यांच्या बहिणीच्या एका जीवश्चकंठश्च बालमैत्रिणीकडे त्यांची 'पेईग गेस्ट' पद्धतीने राहण्याची व्यवस्थाही झालेली होती. तशी तजवीज बहिणीने करून ठेवलेली होती. माधवरावांजवळ त्यांचा परिचय करून देणारी एक चिठ्ठीही दिली होती. पूर्णपणे अपरिचीत लोकात आणि फारशा सुखसुविधा नसलेल्या एका आडवळणी टिकाणच्या 'बुद्रुक' गावात राहून प्रकृती सुधारण्याच्या दृष्टीने कितपत फायदा होईल याबद्दल माधवराव साशंक होते.

बस थांब्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अनंतराव पाटलांच्या घरी माधवराव पोचले, तेव्हा त्यांना चांगलाच थकवा जाणवत होता. त्यांचं स्वागत स्वत:च्यात तंद्रीत हरवलेल्या एका शाळकरी मुलीनं केलं. त्या मुलीला आपल्याकडे हा आगंतुक पाहुणा येणं फारसं आवडलं नसावं. तिच्या चेहर्‍यावर नाराजीची छटा स्पष्टपणे दिसत होती. "माझी मामी थोड्या वेळात खाली येईल. तोवर मी आपलं सामान ठेवून घ्यायला मदत करते", ती मुलगी वरपांगी का असेना नम्रपणे बोलली. तंद्रीमधून बाहेर आल्यावर ती चांगलीच चुणचुणीत वाटत होती. तिच्या वागण्याबोलण्यात वयाशी विसंगत असा पोक्तपणाही दिसून येत होता. "या गावात आपण पहिल्यांदाच येताय ना?", तिचा अपेक्षित प्रश्न आला. "होय, आणि ते ही डॉक्टरांच्या सल्ल्यावरून, नव्हे हुकूमावरून!" माधवरावांनी कसंबसं कृत्रिम हसू चेहेर्‍यावर आणत उत्तर दिलं.

"मग आपण माझ्या मामीला ओळखत नसाल", तिचा दुसरा प्रश्न. "नाही, मला त्यांचं नाव आणि इथला पत्ता माझ्या बहिणीनी दिला आहे.", माधवरावांनी उत्तर दिलं. "हम्म. तीन महिन्यांपूर्वी माझ्या मामीच्या आयुष्यात ती दुर्दैवी घटना घडली, आणि तेव्हापासून ती भ्रमिष्टासारखी वागते. असंबद्ध वागते बोलते. बहुधा आपल्या बहिणीलाही घडल्या प्रकाराबद्दल काही माहिती नसावी." ती मुलगी म्हणाली. तिचं नाव अबोली होतं. त्या शांत आणि निवांत गावात अपघात किंवा दुर्घटना घडण्याची शक्यता खूपच कमी होती. घराच्या मागच्या बगिच्याकडे तोंड करून असलेली एक भलीमोठी फ्रेंच पद्धतीची खिडकी सताड उघडी होती. हवेत जाणवण्याइतका गारठा असूनही ती बंद केलेली नव्हती.

"काका, ही खिडकी इतका गारठा असूनही उघडी का आहे याचं तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, पण ती दुर्दैवी कहाणीच यामागं आहे. तीन महिन्यांपूर्वी माझे मामा, त्यांचा एक मित्र आणि त्यांचा लाडका शिकारी कुत्रा 'झुमरू' या खिडकीतून उडी मारून घरामागच्या पायवाटेनं नदीपलीकडच्या जंगलात शिकारीसाठी गेले. तो त्यांचा नेहेमीचा आणि सवयीचा रस्ता होता. दुर्दैवानं नदी पार करताना ते एका भोवर्‍यात सापडले. तिघांच्याही मृतदेहाचा शोध आजवर लागलेला नाही. गावात अधूनमधून त्यांच्या आकृती रात्रीच्या काळोखात अस्पष्टपणे दिसतात अशी वदंता आहे."

बोलता बोलता अबोलीचा स्वर थोडा हळवा झाला. आवंढा गिळत ती म्हणाली, "अजूनची माझ्या मामीचा ठाम विश्वास आहे की तिचे यजमान, त्यांचा मित्र आणि झुमरू कुत्रा याच खिडकीतून परत येतील. तिच्या हट्टाखातर ही खिडकी कायम उघडी ठेवावी लागते. मामी दिवसभर तिचे यजमान एका हातात रायफल आणि दुसर्‍या हातात पांढरा ओव्हरकोट घेउन ताडताड चालताना कसे रूबाबदार दिसतात, त्यांना कडक कॉफीच आवडते आणि थालिपीठ लोण्याशिवाय दिलेले चालत नाही असली कौतुकं करत बसते. खरं सांगायचं तर मलाही कधीकधी खिडकीतून पाहताना त्या तीन आकृती दूरवर दिसल्याचे भास होतात." इतकं बोलून अबोली वार्‍याच्या वेगाने बाहेर निघूनही गेली. माधवरावांना थोडं हायसं वाटलं, कारण अबोलीची बडबड ऐकून त्यांचं डोकं गरगरायला लागलं होतं. पोरींची नावं आणि त्यांचं रूप किंवा स्वभाव यात हमखास टोकाची विसंगती का असावी असा विचार करत त्यांनी डोळे मिटून घेतले.

त्यांना थोडी डुलकी लागते न लागते इतक्यात अबोलीची मामी त्यांच्या खोलीत आली. "मला थोडा उशीरच झाला, माफ करा" तिची बडबड सुरू झाली. "मला वाटतं की ही खिडकी उघडी ठेवल्यानं तुम्हाला फारसा त्रास होणार नाही. माझे यजमान शिकारीसाठी बाहेर गेलेले आहेत. ते इतक्यात परत येतील. ते नेहेमी बगिचातून जंगलाच्या दिशेने जाणार्‍या पायवाटेनेच परत येतात." त्यानंतर ओसंडून वाहणार्‍या उत्साहाच्या भरात आपल्या घरातली सजावट, यजमानांचा स्वभाव, त्यांच्या आवडीनिवडी यांच्याबद्दल ती जाडजूड बाई आपल्या नैसर्गिक तारस्वरात तासभर एकसुरी बडबड करत राहिली. या बाईची अखंड सुरू असलेली टकळी एकदाची थांबावी या हेतूने माधवराव थोडा आगाउपणा करत मधेच बोलले, "मी थोडी विश्रांती घेउ का? या गावात मी खरं तर पूर्ण विश्रांती मिळावी या एकमेव हेतूनेच आलो आहे. मला कुठलाही तणाव सहन होत नाही".

"असं काय" अबोलीची मामी शून्यात बघत म्हणाली. माधवरावांच्या बोलण्याकडे तिचं धड लक्ष नव्हतं. बोलताबोलता तिची नजर खिडकीकडे वळली आणि अचानक तिचे डोळे लकाकले, चेहर्‍यावर विलक्षण तजेला आला. खिडकीतून बाहेर बघत ती पुढे बोलायला लागली, "शेवटी एकदाचे हे परत येताना दिसताहेत. बरोब्बर कॉफी घ्यायच्या वेळेला ते इथं पोचतील". इतक्यात अबोली परत आली. ती भयचकीत होऊन खिडकीतून बाहेर बघायला लागली. माधवरावांनी नकळत आपली खुर्ची त्या दिशेला वळवली. घरामागच्या बगिच्यात तीन आकृती दिसत होत्या. त्यातली एक अक्राळविक्राळ शिकारी कुत्र्याची होती. त्यामागून येणार्‍या दोन धिप्पाड पुरूषांपैकी एकाच्या हातात रायफल होती आणि खांद्यावर पांढरा ओव्हरकोट झुलत होता. माधवरावांच्या अंगावर सरसरून काटा आला, पण स्वतःला सावरत एकही शब्द न बोलता ते घराच्या दर्शनी भागाकडे असलेल्या मुख्य दरवाजातून सुसाट पळत बाहेर पडले. अंगातलं उरलंसुरलं त्राण गोळा करून समोरचं पटांगण पार करून बस थांब्याकडे जाणार्‍या हमरस्त्याजवळ एका झाडाखाली ते डोकं धरून मटकन खाली परत बसले ते तिथून थेट बस थांब्यावर जाउन परतीची गाडी पकडायची हा निर्धार करूनच!

"ब्लॅक कॉफी तयार असेलच. आम्ही पहा कसे अगदी बरोब्बर वेळेत परत फिरलो", आपला ओव्हरकोट खुर्चीवर टाकत अबोलीच्या मामांनी त्यांची नेहेमीची फर्माईश केली. "आम्हाला पाहताक्षणी इथून पळून गेलेला तो किडकिडीत माणूस कोण होता?" त्यांनी थोडं आश्चर्यानीच विचारलं. "ते श्री. देवळे होते. बहुधा मनोरूग्ण असावेत. तुम्हाला येताना पाहून भूत पाहिल्यासारखे पळत सुटले. निदान मला तरी ते पाहताक्षणीच थोडे वेडसरच वाटले." पाटलीणबाईंनी उत्तर दिलं.

"मला वाटतं आपल्या झुमरूला पाहून त्यांची अशी गाळण उडाली असेल.", अबोली शांतपणे स्पष्टीकरण द्यायला लागली, "थोड्याच वेळापूर्वी आमच्या गप्पा झाल्या. एकदोन वर्षांपूर्वी त्यांच्या गावच्या कबरस्तानातून 'शॉर्टकट'ने जाताना काही भटकी कुत्री त्यांच्या मागं लागली होती. एका अर्धवट खणलेल्या कबरीमधे उडी मारून त्यांनी एक रात्र तिथेच काढली होती. या प्रसंगाचा त्यांच्या मनावर खोलवर आघात झाला, आणि आजतागायत ते पूर्णपणे बरे झालेले नाहीत." कसोटीच्या क्षणी अजिबात वेळ न दवडता एखाद्या निष्णात तबलजीने 'उपज' अंगाने तिहाई वाजवावी इतक्या सहजतेने लोणकढी थाप मारणं आणि ती लीलया पचवणं हीच तर अबोलीची खासियत होती. या बाबतीत तिचा हात धरू शकेल असा पंचक्रोशीत कुणीही नव्हता!

(एच. एच. मुनरो उर्फ 'साकी' यांच्या 'द ओपन विन्डो' या लघुकथेवर आधारित)

आगंतुक

नव्या वर्षाचा हा पहिला महिना. नेमके बोलायचे झाले तर आज एकतीस जानेवारी. गेले तीस दिवस मी प्रचंड दडपणाखाली आहे. केव्हाही काहीतरी अघटीत घडेल अशी भीती आम्हा तिघांनाही सतावते आहे. एकतीस डिसेंबरच्या रात्री 'ती' पार्टी झालीच नसती तर बरं असं आता आम्हा तिघांनाही राहून राहून वाटतं. आम्हा तिघांव्यतिरिक्त त्या पार्टीला हजर असणारा आमचा मित्र रिचर्ड कॅरेक त्यादिवसापासून बेपत्ता आहे आणि त्याचा शोध घेण्याची हिंमत आम्हा तिघांमधेही नाही. त्या दिवशी कॅरेकने सांगितलेली त्याची चित्तरकथा अशक्य कोटीतली वाटेल अशी असली तरी ती पूर्णपणे काल्पनिक आहे असं आम्हा तिघांनाही वाटत नाही.

आम्ही तिघांनीही विज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखेत 'डॉक्टरेट' मिळवलेली आहे. मी भौतिकशास्त्रात तर मेडिसननी 'अमूर्त' अंकगणितात आणि ब्रॅझेलनी संगणकप्रणालीशास्त्रात जागतिक पातळीवर आपापल्या संशोधनाचा ठसा उमटवलेला आहे. आम्हा तिघांना एकत्र आणणारा आणि आमचा याराना टिकवून ठेवणारा सगळ्यात महत्वाचा दुवा म्हणजे आमचा विज्ञान काल्पनिका लिहीण्याचा छंद. एकतीस डिसेंबरच्या रात्री ठरल्याप्रमाणे आम्ही तिघे मेडिसनच्या घरी एकत्र जमलेलो होतो. तिघांनीही उंची स्कॉचचे दोन दोन लार्ज पेग रिचवलेले होते. हॉलीवूडमधल्या नटनट्यांच्या भानगडींपासून ते राजकारणापर्यंत सगळ्या विषयांवर मनमुराद गप्पा सुरू होत्या. आमच्यासोबत रिचर्ड कॅरेकही त्याची लाडकी रेड वाईन घेत शांतपणे बसलेला होता. तो नेहेमीसारखाच शांत बसून आमची बकवास ऐकत होता.

रिचर्ड कॅरेक हा माणूसच थोडा रहस्यमय आणि आगळावेगळा वाटायचा. तीन वर्षांपूर्वी अचानकच हा आगंतुक आमच्या विद्यापीठात प्रकट झाला. आम्ही स्वत:ला फारफार बुद्धीमान, व्यासंगी, विद्वान वगैरे वगैरे समजत असलो, तरी रिचर्ड या बाबतीत आमच्याही खूपच पुढे होता. त्याची आकलनशक्ती, विद्वत्ता, धारणाशक्ती आणि प्रगल्भता आमच्यापेक्षा कित्येक पटींनी उजवी होती. त्यालाही विज्ञान काल्पनिका लिहीण्याचा नाद लागला आणि क्वचितप्रसंगी का होईना, तो आमच्यात मिसळायला लागला. त्याच्या विद्यापीठात येण्यापूर्वीच्या आयुष्याबद्दल तो एका चकार शब्दानेही कधीच बोलायचा नाही. जवळजवळ पूर्ण दिवस तो वेधशाळेतल्या दुर्बिणीला वाहिलेला असायचा. अपरात्रीसुद्धा तो आपल्या खोलीत भुतासारखा एकटाच बसून आकडेमोड करताना दिसायचा. 'वैश्विक किरण' या विषयात आपलं खूपच प्रगत आणि महत्वाचं संशोधन चालू आहे या व्यतिरिक्त तो आपल्या कामाविषयी काहीही बोलायचा नाही. मात्र बोलण्याच्या ओघात सहज लक्षात यायचं की पार पुरातत्व विद्येपासून ते मानसशास्त्र, तत्वज्ञान आणि खगोलशास्त्रापर्यंत सगळ्याच ज्ञानशाखांचा त्याचा गाढा व्यासंग होता.

सगळ्या फालतू गप्पा संपल्यावर बोलण्याच्या ओघातच आमचा परग्रहावरील जीवसृष्टीबद्दल उहापोह सुरू झाला. आमच्या काल्पनिकांमधून अशा जीवसृष्टीचा उल्लेख हमखास यायचा. माझी एक वाईट खोड आहे, दारू चढली की माझ्यातला सारासार, वस्तुनिष्ठ आणि व्यावहारिक विचार करणारा वैज्ञानीक अंतर्धान पावतो आणि माझा एकदम 'विश्वयोगी ओशो' होउन जातो. मला मनोविष्लेषणपर थापाबाजी करणे, 'जगाच्या कल्याणा संताच्या विभूती' असा मोठेपणा स्वत:वर ओढवून घेणे, जगाचे कल्याण करण्यासाठी काहीच्याकाही उपाययोजना सुचवणे, पांचट विनोद करणे, तर्कशास्त्राचा खिमा करत इतरांना निरूत्तर करणे, आपले विचार प्रत्येक बाबतीत किती जगावेगळे आहेत आणि 'सुलझे हुवे' आहेत याचे रूखवत मांडणे असले झटके यायला लागतात.

मी बरळायला लागलो, "ज्या समाजात आपण राहतो, तिथे बुद्धीवंतांची साली अजिबात कदर नाही. सगळ्याच क्षेत्रात सत्तांध राजकारणी आणि धर्मांध बुवा, बापूंच्या भ्रष्टाचाराचं थैमान सुरू आहे. जातीच्या, धर्माच्या नावाखाली चाललेला गुंडांचा नंगानाच निमूटपणे सहन करावा लागतो आहे. कधीही आण्विक युद्धाचा भडका उडेल आणि या ग्रहाची राखरांगोळी होईल. आपल्या विज्ञान काल्पनिका तरी काय आहेत? उद्विग्नतेतून बाहेर पडण्यासाठी आपण शोधलेली ती एक पळवाट आहे. काल्पनिक विश्वात गुंग झालो की या जगाचा विसर पडतो. सगळे साधूसंतही साले पळपुटेच आहेत. समाजापासून पळून हिमालयात जायचं, आणि मग गुहेत बसून अप्सरांची स्वप्ने पहायची. आपल्यात आणि या पळपुट्या अध्यात्मात काय फरक आहे? माझ्या अध्यात्मात आधी अप्सरा येतात आणि नंतर जमल्यास थोडेफार आत्मज्ञान येते. कवेत अप्सरा नसली तर करायचे काय त्या आत्मज्ञानाचे?" मी मोठ्या आशेने आपला हात टाळीसाठी पुढे केला, आणि बाकी तिघांच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसणारा वैताग पाहून तो निमूटपणे खाली घेतला.

इतक्यात कधी नव्हे ते रिचर्ड कॅरेक स्वत:हून बोलायला लागला, "मला एकदाच माझ्या कल्पनेतल्या परग्रहावर जायची संधी मिळाली आणि दुर्दैवाने तीच माझ्या आजवरच्या आयुष्यातली सर्वात दुर्दैवी घटना ठरू पाहते आहे. ती सगळी कहाणीच मी आता तुम्हाला सांगतो." कॅरेकनी घसा खाकरत त्याच्या नेहेमीच्या संथ लयीत पुढे बोलायला सुरूवात केली, "माझ्या पूर्वायुष्यात मी एक शास्त्रज्ञ होतो. मी बर्‍याच विज्ञान काल्पनिका लिहील्या. माझ्या कथांमधून मी नेहेमीच परग्रहावरच्या एका अर्ध-सुसंस्कृत समाजाचा उल्लेख करायचो. या ग्रहावरच्या लोकांची सरासरी बुद्धीमत्ता असामान्य असायची, पण वैचारिक पातळी अत्यंत खालची! यांचा सगळा काळ युद्ध करण्यात किंवा युद्धाची तयारी करण्यात जायचा. आपल्या कळप करण्याचा वृत्तीमुळे यांनी आपल्याच ग्रहाचे नव्हे तर अंतराळस्थानकांचेही वेगवेगळे झेंडे लावून स्वतंत्र इलाके केलेले असायचे.

एकेदिवशी मला माझ्या वरिष्ठांचा निरोप आला. माझ्या कथासृष्टीत वर्णन केल्याप्रमाणे एक ग्रह खरोखरच जी-आय-ए सूर्यमालेत अस्तित्वात होता. आमच्या मातृग्रहावरच्या प्रगत समाजात देव, देश, धर्म वगैरे खुळचट कल्पना कधीच्याच रद्दबातल झालेल्या होत्या. शिवाय निकृष्ट वैचारिक पातळी असलेल्या आणि मागास आयुष्य जगणार्‍या कित्येक समूहांचे शिरकाण करून माझ्या 'झिऑन' समाजाचे माझ्या संपूर्ण मातृग्रहावर एकछत्री साम्राज्यही स्थापन झालेले होते. आमच्या मातृग्रहावरचे इंधनस्त्रोत संपत आल्यामुळे 'पृथ्वी' नामक या ग्रहावरची निर्दयी संस्कृती नष्ट करून तिथे वस्ती करण्याचा आमचा इरादा होता. तशी योजना सुव्यवस्थितपणे तयार झाल्यावर तिच्या पहिल्या टप्प्यात पृथ्वीवर राहून हेरगिरी करण्यासाठी निवडलेल्या पाच जणात माझा समावेश झाला. माझ्या गुणसूत्रांमधे यथायोग्य बदल करून, आवश्यक ते प्रशिक्षण देउन माझी रवानगी करण्यात आली.

माझ्या मेंदूत बसवलेल्या एका जैविक उपकरणाद्वारे माझ्याशी सतत संपर्क साधला जात होता. माझ्या कल्पनेपेक्षाही पृथ्वीवरचं जग गलिच्छ, ओंगळवाणं, मागास आणि प्रतिगामी निघालं. माझा जीव घुसमटल्यासारखा व्हायला लागला. सुदैवानं मला काही सूज्ञ लोकही भेटले. मी त्यांच्यासारखाच माझ्या मातृग्रहावरच्या खरोखरच्या जीवनशैलीचे वर्णन करणार्‍या कथा विज्ञान काल्पनिका म्हणून लिहायला लागलो. त्यांना खूप प्रसिद्धीपण मिळाली. काही दिवसात अचानक माझा माझ्या मातृग्रहाशी संपर्क तुटला. माझ्या बुद्धीमत्तेच्या जोरावर पृथ्वीवर कोठेही आरामात राहण्याजोगी कमाई करणे मला सहज शक्य होते. माझी माणसं पुन्हा संपर्क साधतील ही वेडी आशाही होती." कॅरेक थोडावेळ बोलायचा थांबला.

"मग या ग्रहावरून तू परत कधी आलास?", कॅरेकनी नशेत बडबड केली असं समजून ब्रॅझेलनी थट्टेखोर स्वरात प्रश्न विचारला. "परत कुठला जातोय? इथेच अडकून पडलोय मी असहायपणे. साहित्यीक भाषेत जिला 'त्रिशंकू अवस्था' म्हणतात ती हीच!", कॅरेक हताशपणे म्हणाला आणि रडवेल्या चेहर्‍याने पार्टी अर्ध्यात सोडून लांबलांब ढांगा टाकत निघून गेला. नशेत असल्याने सगळ्या गोष्टींचा अन्वयार्थ लावायला आम्हाला थोडा विलंबच लागला, पण मग मात्र आमची नशा खाडकन उतरली. नीट विचार केला तेव्हा कॅरेक अजिबात नशेत नव्हता यावर माझं, ब्रॅझेलचं आणि चक्क मेडिसनचंही कधी नव्हे ते एकमत झालं. कशीही असली तरी मला प्रिय असलेली पृथ्वीवरची आमची 'महान मानवी संस्कृती' खरोखर धोक्यात होती?

(एडमंड हॅमिल्टन यांच्या 'एक्झाईल' या लघुकथेवर आधारित)

Saturday, 8 December 2012

'शुद्ध सात्विक' मोर आणि भगवान रमण महर्षी (भावानुवाद)

भगवान रमण महर्षी - संक्षिप्त परिचयः

"मी कोण आहे?" (तत्वार्थाने - माझे मूळ स्वरूप कसे आहे?) या सनातन प्रश्नाचे उत्तर वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी अचानक मृत्युसमान अनुभव येउन ज्यांना सहज गवसले असे एक लोकविलक्षण, आत्मसाक्षात्कारी आणि ज्ञानी सत्पुरूष अशी श्री. रमण महर्षींची आज जगभर ख्याती आहे. आत्मचिंतनाच्या धारदार तलवारीने सारे लौकिक पाश कापून काढत, त्या दृष्टीने सर्वसंगपरित्याग करून साक्षात शिवस्वरूप मानल्या गेलेल्या दक्षिण भारतातल्या परमपवित्र अरूणाचल पर्वताच्या आश्रयाला ते सोळा वर्षांचे असताना जे आले, ते शेवटच्या श्वासापर्यंत वास्तव्य करण्यासाठीच. अत्यंत साधे, शांत, सहज संयमी आणि अंतर्बाह्य निर्मळ जीवन या जीवन्मुक्त ज्ञान्याने तिथे व्यतित केले.

जगाच्या कानाकोपर्‍यातून साधक, उपासक, तत्वज्ञ वगैरे मंडळींचा एक अखंड प्रवाहच जणू भगवानांच्या हयातीत अरूणाचलाकडे वाहता झाला. बहुधा या अलौकिक सत्पुरूषाविषयीच्या आंतरिक ओढीमुळे, कुतुहलामुळे, प्रापंचिक प्रश्न सुटावेत यासाठी कृपायाचना करण्यासाठी तर क्वचित प्रसंगी त्यांची परीक्षा पाहणे ते त्यांना अपमानित करणे इतके वैविध्यपूर्ण हेतू मनात ठेउन लोक अरूणाचली पोचत असत. १९५० साली भगवानांनी महासमाधी घेतलेली असली, तरी आजतागायत हा जनप्रवाह आटलेला नाही. श्री. रमणाश्रमात परमपवित्र अरूणाचलाच्या कृपाछायेत चार क्षण घालवता यावेत यासाठी भेट देणार्‍या भक्तांची संख्या रोडावलेली नाही. अन्य सत्पुरूषांप्रमाणेच देहत्यागानंतरही श्री. भगवानांच्या तिथे असलेल्या चिरंतन, मौन आणि कृपापूर्ण वास्तव्याची प्रचिती आजही कित्येक भक्तांना प्रकर्षाने अनुभवता येते.

रमण महर्षींच्या जीवनात शब्दांचा भुलभुलैय्या, चमत्कारांचा झगमगाट, सोवळ्या-ओवळ्याचे अवडंबर, अतिरेकी व्रतवैकल्ये या काहीशी प्रचलित असलेल्या गोष्टी आणि अलीकडच्या काळात अद्वैत तत्त्वज्ञानाच्या नावाखाली बोकाळलेल्या मुक्तीच्या वल्गना, तार्किक कोलांट्याउड्या, बेगडी विश्वात्मकतेचा दांभिक देखावा, सवडीशास्त्राकडे झुकलेले गोलमाल तत्वज्ञान यांना कधीच स्थान नव्हते. रमणाश्रमाच्या कार्यात हे स्पष्टपणे दिसते. शिस्तबद्धता जाचक ठरू नयी आणि मोकळीक स्वैर मोकाटपणाकडे झुकू नये असे तिथे सहज घडते. कुठलाही सामाजिक अथवा राजकीय 'अजेंडा' नाममात्रही नसला तरी आजही हे कार्य आजही अव्याहतपणे सुरू आहे.

सफेद मोराची कथा:

सहज समाधीस्थ राहणारे भगवान रमण महर्षी आणि अरूणाचलाच्या परिसरातील पशुपक्षी यांचे एक अनोखे,मनोहारी आणि अत्यंत जिव्हा़ळ्याचे नाते होते. हा एक स्वतंत्र लेखाचाच काय तर लेखमालेचाही विषय होउ शकेल. याविषयी काही लिहीण्याचा मानस होता. अलीकडेच श्री.अ‍ॅलन जेकब्ज यांनी लिहीलेल्या'श्री रमण महर्षी - द सुप्रीम गुरू' या पुस्तकातल्या तिसर्या परिशिष्ठात दिलेली सफेद मोराची कथा वाचली. तिचाच हा स्वैर भावानुवादः

१९४७ साली एप्रिल महिन्यात एके दिवशी भगवानांना बडोद्याच्या राणीसाहेबांनी आदरपूर्वक भेट दिलेल्या सफेद मोराचे रमणाश्रमात आगमन झाले. सुरूवातीला या मोराला परत पाठवणेच श्रेयस्कर ठरेल असे महर्षींचे मत झाले. ते म्हणाले, "इथे जे दहाबारा रंगीत मोर आहेत, ते पुरे नाहीत का? हा त्यांच्यापेक्षा वेगळा दिसत असल्याने ते याच्याशी झगडा करण्याची शक्यता आहेच. याला त्याच्या मूळ गावी परत पाठवणेच बरे."

तरीही त्या सफेद मोराला घेउन आलेल्या व्यक्तीने का कुणास ठाउक, त्याला आश्रमातच सोडले, आणि परतीचा मार्ग धरला. त्याची काळजी वाहण्याची जबाबदारी कृष्णस्वामी या भक्ताने स्वीकारली. एकदा हा मोर कुठेतरी पळून गेला आणि कृष्णस्वामी मोठ्या सायासाने त्याला पकडून परत घेउन आले. तेव्हा मोराला पाहून रमण महर्षींनी आपला एक हात त्याच्या मानेवर ठेवला आणि दुसर्‍या हाताने त्याच्या काळजापर्यंतच्या भागात हळुवारपणे थोपटत त्याला सौम्यपणे ताकीद दिली, "खट्याळ पोरा, असा अचानक कुठे गायब होतोस रे तू? तू असा निघून जायला लागलास, तर तुझी देखभाल करण्याची व्यवस्था आम्ही लावयची तरी कशी? त्यापेक्षा इथेच कायमचा मुक्काम का करत नाहीस?"

त्या प्रसंगानंतर सफेद मोर आश्रमाच्या प्रांगणातच बागडायचा. क्वचितप्रसंगी आश्रमाच्या परिसरातल्या साधकांच्या झोपडीवजा घरातही तो जायचा. एके दिवशी दुपारी आश्रमवासियांनी त्याला एका झोपडीत रेडिओ ऐकत बसलेला पाहिला. ध्यानधारणेत मग्न झाल्यासारखी मुद्रा करत त्याने डोळे मिटून घेतलेले होते. कुणीतरी बोलूनही दाखवले की हा मोर पहा कसा नादब्रह्मात बुडून गेला आहे. महर्षी म्हणाले, "मोरांना उपजतच स्वरांचे आकर्षण असते. त्यातूनही ते स्वर जर बासरीतून उमटत असतील, तर मग विचारायची सोय नाही, इतके ते स्वरमुग्ध होतात!"

इतक्यात कुणीतरी म्हणाले की सफेद असल्याने हा मोर आगळावेगळा आणि उठून दिसत असला, तरी खरे सौंदर्य मात्र रंगीत मोरांमधेच अधिक प्रमाणात दिसते. यावर रमण महर्षी म्हणाले, "त्या मोरांचे रंग सुंदर आहेतच, पण या सफेद मोरात मात्र 'यासम हाच' असे एक वेगळेच सौंदर्य आहे. इतर रंगाचे मिश्रण मुळीच नसलेला याचा शुद्ध सफेद रंग आगळाच आहे. असे पहा, की जणू ते शुद्ध-सत्व आहे. हे विशुद्ध आत्मतत्व आहे ज्यात त्रिगुणांची किंवा उपाधींची सरमिसळ झालेली नाही. वेदांताच्या परिभाषेत या मोराचेही उदाहरण किती समर्पकपणे मांडता येते ते पहा! नुकताच जन्म झालेल्या इतर मोरांमध्येही इतके रंगसंगती नसते. ते एकाच रंगाचे असतात. जसजशी वाढ होते, तसे बाकी रंग प्रकट व्हायला लागतात. शेपटीची वाढ होते आणि शेपटीवर कित्येक 'डोळे' फुटतात. आणि शेवटी पहाल, तर केवढी ती रंगसंगती आणि किती ते डोळे! आपल्या मनाचेही तसेच आहे. जन्मत:च त्यात विकृतींचा लेशही नसतो. कालौघात मात्र कित्येक घडामोडी, संकल्पना आणि वासना त्यात मोराच्या पिसार्‍याप्रमाणेच भलेबुरे रंग भरतात."

भगवान श्री. रमण महर्षींची प्रदीर्घ काळ भक्तीभावाने देखभाल करणार्‍या श्री. माधव स्वामींना एका वर्षापूर्वीच १२ जुलै १९४६ रोजी देवाज्ञा झालेली होती. माधव स्वामीच या सफेद मोराच्या रूपात पुनर्जन्म घेउन परतले आहेत अशी कित्येक भक्तांची धारणा होती. सफेद मोर जेव्हाजेव्हा आश्रमातल्या सभागृहात यायचा, तेव्हा न चुकता तिथल्या लाकडी कप्प्यांमधे व्यवस्थित मांडणी केलेया ग्रंथांच्या रचनेचे जणू परीक्षणच करायचा. हयात असताना हे काम माधव स्वामी पार पाडत असत. माधव स्वामींनी डागडुजी केलेल्या, पुनर्बांधणी केलेल्या ग्रंथांना तो न चुकता चोचीने हळुवार स्पर्श करायचा, इतर पुस्तकांना मात्र तो शिवत नसे. हे काम संपले, की दरवाजाजवळच्या ज्या बाकावर बसून माधव स्वामी विश्रांती घेत, त्याच बाकावर त्याच जागी बसून मोरही विश्रांती घेत असे.

स्वत: रमण महर्षी क्वचितप्रसंगी या सफेद मोराला वात्सल्याने "माधवा" अशीच हाक मारायचे. जी. व्ही. सुब्बरामय्या यांनी त्यांच्या 'श्री. रमण स्मृती' या पुस्तकात नमूद केले आहे, "२० जून १९४७ या शुभदिनी मी सफेद मोरावर 'मयूर वृत्तात' तेलगू भाषेत आठ श्लोकांची काव्यरचना केली. 'ज्युबिली पेंडॉल' आहे त्या ठिकाणी भगवानांना ती रचना दाखवली. भगवान ते काव्य वाचून अत्यंत संतुष्ट झालेले दिसले, आणि श्रीमती ललिता वेंकटरामन यांच्याकडे ती सुपूर्त करत भगवानांनी सुचवले की आपल्या वीणावादनाच्या साथीने त्यांनी ती रचना गाण्याचा प्रयत्न अवश्य करावा. जेमेतेम अर्ध्या तासाच्या अवधीत श्रीमती वेंकटरामन यांनी आपली वीणा तिथे आणली आणि त्या गाण्यासाठी सज्जही झाल्या! सफेद मोर मात्र त्या क्षणी तिथे उपस्थित नव्हता. भगवान म्हणाले, "बाकी सारे तर यथायोग्य जुळून आलेले आहे, पण स्वतः कथानायकही आपली स्तुती गायली जात असताना इथे हजर असायला हवा. माधवा, तू आहेस तरी कुठे? लगेच इकडे ये"

अहो आश्चर्यम्! पुढच्याच क्षणी पेंडॉलच्या छपरावरून सफेद मोर डौलाने खाली झेपावला. ललिता वेंकटरामन यांच्या गायनाला आपला पिसारा पूर्णपणे फुलवून मोठ्या झोकात नृत्य करत त्याने दाद दिली. भगवान स्तब्धपणे बसून होते. मोरावर खिळलेल्या त्यांच्या तेजस्वी डोळ्यातून अविरतपणे झरणार्‍या कृपादृष्टीच्या झोतात मोराच्या 'शुद्ध-सत्व' सफेद रंगावरही त्यांच्या कृपेची एक प्रकारची विलक्षण झळाळी आलेली दिसत होती. गायन संपल्यावर मोर त्याच झोकात पदन्यास करत वीणेपर्यंत पोचला आणि तिला आपल्या चोचीने हळुवार स्पर्श करून तिथेच तिष्ठत राहिला.

हे पाहून भगवान श्रीमती वेंकटरामन यांना म्हणाले, "ही रचना आपण परत एकदा सादर करावी अशी माधवाची इच्छा दिसते आहे." श्रीमती वेंकटरामन यांनी आनंदाने ती रचना परत सादर केली. डौलदार पदन्यास करत मोरानेही त्यांना पुन्हा एकदा भरभरून दाद दिली. अत्यंत दुष्प्राप्य असे ते नितांतसुंदर दृष्य पाहणारे रमणभक्त इंद्रादिकांपेक्षाही भाग्यवान होत हे काय वेगळे सांगायला हवे?

 

अभिशाप जीवनाचा (भावानुवाद)

(गुलाम अली यांनी गायलेल्या 'जिंदगी को उदास कर भी गया' या गझलचा स्वैर भावानुवाद)

आला ॠतू अनामिक, अवचित निघून गेला
जगणे उदासवाणे, माझे करून गेला

नशिबी वियोग आला, सार्‍या सवंगड्यांचा
अश्रू उरात झरले, जडशीळ देह झाला

हुलकावूनीच गेले, दुष्प्राप्य ध्येय होते
चुकता दिशा जराशी, साथी विभक्त झाला

मृत्यू समोर अंती, सपशेल हार झाली
निर्जीव चेहरा ही, पुरता विदीर्ण झाला

दुवा: www.youtube.com/watch?v=uEai_rz4s84

Saturday, 3 March 2012

असा अविचार करू नको (स्वैर भावानुवाद)

[फरहाद शहजाद यांची मेहदी हसन यांनी गायलेली 'तनहा तनहा मत सोचा कर' ही गझल ऐकताना सुचलेले मुक्तक]
निर्जन एकांती असे रे, भलते विचार करू नको
जीवावर बेतेल मित्रा, असा अविचार करू नको

खूप झाले क्षणभरासाठी, लाभली मुग्ध प्रीती तुला रे
खोटी खरी याची आता, शहानिशा तू करू नको

डसणे जिचा 'धर्म' आहे, डंख ती मारून गेली
साहणे हे तुझेच प्राक्तन, भोगताना विव्हळू नको

एकाकी पाडते तुला ना, भरमध्यान्ही सावली
वर्म आकळले तुला रे, उगाच आता झुरू नको

हरलास जरी बाजी जराशी ,सर्वस्व पणाला लावूनी
कैफात धुन्द रहा जुगार्या, रूक्ष हिशेबी गुंतू नको

जळो वांझ पश्चातबुद्धी, ऐक माझे जरा 'मुक्या' तू
डाव नव्याने मांड आता, उगाच ते तू टाळू नको

(टीप: 'मुक्या' - 'मूकवाचक' या  टोपणनावाने केलेले लिखाण )

झेन काव्य - 2 (भावानुवाद)

[झेन काव्याचा भावानुवाद]

(साथीच्या आजारात दगावलेल्या मुलांना श्रद्धांजली)

जेव्हा वसंताचे आगमन होईल
वृक्षाच्या प्रत्येक फांदीच्या अग्रभागी
पुन्हा नव्याने फुले बहरतील,
पण ती कोवळी मुले
जी मागल्या ग्रीष्मातल्या पानगळीबरोबर निवर्तली
आता कधीच परतणार नाहीत.
---
वादळ शांतवले आहे, सारा बहर झडून गेला आहे;
पक्षी गात आहेत, पर्वतान्वरची काजळमाया गहिरी झाली आहे --
हेच तर खरे बुद्धत्वाचे अलौकिक सामर्थ्य आहे.
---
माझा वारसा --
काय बरे असेल तो?
वसंतातला फुलांचा बहर,
दग्ध उन्हाळ्यातले कोकिळेचे कूजन,
आणि पानगळीच्या काळातले उघडेबोडके लालजर्द मॅपल्स ...
---
मूळ काव्य -
When spring arrives
From every tree tip
Flowers will bloom,
But those children
Who fell with last autumn’s leaves
Will never return.
---
The wind has settled, the blossoms have fallen;
Birds sing, the mountains grow dark --
This is the wondrous power of Buddhism.
---
My legacy --
What will it be?
Flowers in spring,
The cuckoo in summer,
And the crimson maples
Of autumn...