Monday, 27 April 2020

विभाग ४ - ध्यान आणि योग - प्रकरण १3 - योगिक प्रक्रिया

या प्रकरणात भगवान रमण महर्षींचे योगिक प्रक्रियेविषयीचे मार्गदर्शन आपण जाणून घेणार आहोत.
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:
ढोबळमानाने पाहता आत्मा किंवा ईश्वरी सत्तेपासून आपण विभक्त झाल्याचे (वियोग) जाणवत असल्यामुळे देह आणि मनाला वळण लावण्यासाठी नानाविध पद्धतींचा अवलंब करून आत्मतत्वाशी किंवा ईश्वरी सत्तेशी पुन्हा एकदा संलग्न होणे किंवा 'योग' साधणे हे योगमार्गी साधकांचे ध्येय असते. अंदाजे २००० वर्षांपूर्वी महर्षी पतंजलींनी रचलेल्या योगसूत्रांवर आधारित योगपद्धती 'राजयोग' या नावाने प्रसिद्ध आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे आठ टप्पे असलेला अष्टांगयोग तसा सर्वज्ञातच आहे. या पैकी कित्येक टप्प्यांचा इतर साधनपद्धतींमधेही अंतर्भाव होत असला, तरी हठयोग आणि प्राणायामामुळे राजयोगाला त्याची वेगळी ओळख प्राप्त झालेली आहे. हठयोग साधत असताना देहशुद्धीविषयक अतिरंजित कल्पना साधकाला पछाडून टाकत असल्याने योगविषयक प्रश्नांची उत्तरे देताना भगवान श्री रमण महर्षी हठयोगाविषयी नापसंती व्यक्त करत असत. अध्यात्मिक प्रश्नांचा उलगडा होण्यासाठी मनावर ताबा मिळवणे ही एकमेव गोष्ट अत्यंत आवश्यक आहे हे महर्षींंच्या उपदेशामागचे मुख्य सूत्र होते. शारिरीक आरोग्य प्राप्ती किंवा देहशुद्धीवर फाजील भर देत असलेल्या साधनपद्धतींचा अवलंब करण्यासाठी ते आपल्या अनुयायांना कधीच प्रोत्साहन देत नसत. प्राणायामाबद्दल मात्र त्यांचे मत अनुकूल होते. महर्षी सांगत असत की इतर पद्धतींनी मनःसंयम साधता येणे ज्यांना अवघड वाटते, अशा साधकांसाठी प्राणायामाची मदत घेणे उपयुक्त ठरू शकते. मात्र एकंदर पाहता प्राणायाम ही साधनेच्या अगदी प्रारंभिक टप्प्यातली, मर्यादित उपयुक्तता असलेली तसेच अनिवार्य नसलेली साधनपद्धती आहे असेच महर्षींचे मत होते.
(नैतिकता, ध्यान तसेच समाधीबद्दलची महर्षींची मते पारंपारिक राजयोग्यांपेक्षा वेगळी होती, त्यांचा उहापोह या प्रकरणात केलेला नाही.)
राजयोगाव्यतिरिक्त कुंडलिनी योग ही आणखी एक साधनपद्धती प्रसिद्ध आहे. शरीरात असलेल्या वेगवेगळ्या चक्रांवर ध्यान करून कुंडलिनी शक्तीला चेतवण्याचा प्रयत्न करणे हा कुंडलिनी योगाच्या साधकांचा मार्ग आहे. मूलाधार चक्रापासून सुरूवात करत मणक्यात असलेल्या सुषुम्ना नाडीतून कुंडलिनी शक्तीला उर्ध्वगामी करत मस्तकात स्थित असलेल्या सहस्त्रार चक्रापर्यंत नेणे हे साधकाचे ईप्सित असते. कुंडलिनी शक्ती सहस्त्रार चक्रापर्यंत पोचली की साधकाला आत्मसाक्षात्कार घडतो अशी कुंडलिनी योगाची धारणा आहे. महर्षींना कुंडलिनी शक्ती तसेच चक्रे अस्तित्वात आहेत हे मान्य होते. महर्षी मात्र असे प्रतिपादन करत असत की सहस्त्रार चक्रापर्यंत कुंडलिनी शक्ती पोचल्याने आत्मसाक्षात्कार घडत नाही. सहस्त्रार चक्राला ओलांडून अमृतनाडीमधून (अमृत नाडीलाच परा नाडी किंवा जीवन नाडी ही नावे दिलेली आहेत) कुंडलिनी शक्ती छातीत उजव्या हाताच्या बाजूला असलेल्या हृदयचक्रापर्यंत पोचली की आत्मसाक्षात्कार घडतो असे महर्षींचे मत होते.
(टीपः हृदय या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. इथे उल्लेख केलेले चक्र हा शारिरीक अवयव नाही. शारिरीक अवयव डाव्या बाजूला असतो. हृदयचक्र हा एक चैतन्य स्त्रोत आहे. महर्षी या चक्राविषयी अगदी सुलभ असे स्पष्टीकरण देत असत. कुठल्याही व्यक्तीला आपण अंतःकरणापासून अभिव्यक्त होतो आहोत असे दर्शवायचे असेल, किंवा एखादी गोष्ट आपल्या अंतःकरणात खोलवर परिणाम करून गेलेली आहे असे दर्शवायचे असेल, तर नकळत तिचा हात छातीच्या उजव्या बाजूकडे जातो. एखादी गोष्ट छातीठोकपणे सांगतो असे म्हणताना आपली मूठ छातीवर उजव्या बाजूलाच आपटली जाते. आत्मतत्व जरी स्थानबद्ध किंवा कालबद्ध नसले, तरी त्या तत्वाचे प्रत्येक व्यक्तीला जन्मजात जाणवत असलेले किंवा सहजस्फूर्तिने कळणारे अधिष्ठान हृदयचक्रच आहे. असो.)
कुंडलिनी योग अनावश्यक तसेच संभाव्यतः धोकादायक असल्याने आपल्या अनुयायांना या मार्गाचा अवलंब करण्याचा उपदेश महर्षी कधीच देत नसत. आत्मविचाराने तसेच भक्ती आणि समर्पणभावाने कुंडलिनी शक्ती साधकाच्या नकळत अंतिम टप्प्यापर्यंत पोचत असल्याने त्या दृष्टीने अन्य साधनपद्धतींचा अवलंब करणे अनावश्यक आहे या मतावर महर्षी ठाम होते.
कर्मयोग ही आणखी एक साधनपद्धती हिंदू जनमानसात प्रचलित आहे. निस्वार्थ भावनेने गरजूंची सेवा करून तसेच कर्मफलावर आपला अधिकार नाही हे माहित असल्याने पूर्वनिर्धारित फलाकांक्षेचा अट्टाहास न धरता (फळाची अपेक्षाच न धरता नव्हे!) आपल्याच चित्तशुद्धीसाठी परोपकार करून आपली अध्यात्मिक उन्नती साधणे असे या योगाचे स्वरूप आहे. भगवद्वीतेत देखील या योगाची महती सांगितलेली आहे. महर्षी मात्र शक्यतो आपल्या भक्तांना या मार्गाचा अवलंब करण्यापासून परावृत्त करत असत. सत्कृत्ये करू पाहणारा 'मी' तसेच माझ्या मदतीची गरज असलेले असहाय्य 'इतरेजन' निरंतर अस्तित्वात आहेत या गृहीतकावर हा मार्ग आधारलेला असल्याने तथाकथित 'मी' बलवान होण्याची तसेच साधक द्वैतभावात कायमचा अडकून पडण्याची शक्यता या मार्गाचा अवलंब करत असताना बळावते. ज्ञान, भक्ती किंवा राजयोग या तिन्हीपैकी कुठल्याही मार्गाचा अवलंब करण्यासाठी एखादा साधक असमर्थ आहे असे दिसले, तर महर्षी त्याला/ तिला चित्तशुद्धी साधण्यासाठी कर्मयोगाची उपासना करण्यासाठी प्रोत्साहन देत असत. एखाद्या व्यक्तीचा पिंड ज्ञानमार्ग किंवा भक्ती/ समर्पणभावासाठी अनुकूल नाही, तसेच वृद्धत्व किंवा शारिरिक दुर्बलतेमुळे राजयोगाचा अवलंब करण्यासाठी देखील ती सक्षम नाही असे महर्षींच्या ध्यानात आले, तर अशा एखाद्या विरळ्या साधकासाठीच त्यांनी कर्मयोग राखून ठेवलेला होता. 'प्रयत्नांती परमेश्वर' या न्यायाने कर्ममार्गाचा अवलंब करताना चित्तशुद्धी होत जाते. त्या योगे हळूहळू अहंता आणि वासना रहित निर्भेळ आनंदाचा अनुभव मिळायला सुरूवात होते. असे घडले की साधक आपोआप आत्मविचार किंवा भक्ती/ समर्पणासाठी पात्र होत जातो.
कर्मयोग यथास्थितपणे साधायचा असेल तर 'मी' इतरेजनांवर उपकार करतो आहे अशी भावना लेशमात्रही न ठेवता आपण करत असलेल्या सत्कृत्यांचे आपल्या अधिकारक्षेत्राबाहेर असलेले अवांछित परिणाम तसेच सत्कृत्यांमधून होणारी अपेक्षित/ अनपेक्षित फलप्राप्ती याविषयी तटस्थ राहून कर्ममार्गाचे आचरण करावे लागते असे महर्षी ठामपणे सांगत असत. 'मी कर्ता आहे' ही भावना हळूहळू लोप पावल्याने उपरनिर्दिष्ट दोन्ही गोष्टी साध्य होतील हे महर्षींना मान्य असले तरी एकंदर पाहता कर्मयोग या विचारसरणीला ते मनःपूर्वक पाठिंबा देत नसत असेच दिसून येते.
प्रश्नः योग या शब्दाचा अर्थ होतो 'जोडले जाणे'. मला नेहेमी प्रश्न पडतो की काय जोडले जाते आणि ते कशाशी जोडले जाते?
रमण महर्षी: अगदी बरोबर. योगात आधी विभक्तपणा असणे आणि नंतर एखादी गोष्ट (उदा. जीव) आधी पृथकतेने नांदत असलेल्या अन्य गोष्टीशी संलग्न होणे (उदा. शिव) या धारणेचा अंतर्भाव असतो. तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे. तो असा की साधकाने नेमक्या कोणत्या दोन विभक्त गोष्टींचा 'योग' साधण्यासाठी साधना करावी? तुम्ही साधक आहात आणि कुठल्यातरी वेगळ्या गोष्टीशी तुम्हाला संलग्न व्हायचे आहे; हे गृहीतक मानून तुम्ही पुढे जात असाल तर तुमच्यापेक्षा वेगळी, विभक्त आणि पृथकतेने नांदणारी अशी एखादी गोष्ट अस्तित्वात असायला हवी. तुमचे स्वरूप मात्र तुमच्या अगदी निकट असते आणि तुम्हाला सतत त्याची सजग नसली तरी कळात नकळत जाणीवही असते. त्याचा अंतर्यामी शोध घ्या आणि त्यात विलीन होऊन जा. तुमचे स्वरूपच अनंताला व्यापून टाकणारे आहे अशी प्रचिती तुम्हाला येईल, मग विभक्त असण्याची जाणीव असेलच कुणाला? त्यामुळे योग साधण्याचा प्रश्नच उरणार नाही.
प्रश्नः प्राणायामाचे तीन टप्पे असतात - श्वास घेणे, श्वास सोडणे आणि श्वास रोखून धरणे. श्वासाचे या प्रकारे नियमन कसे करावे?
रमण महर्षी: देहतादात्म्याचा पूर्णपणे त्याग करणे हेच खरे श्वास बाहेर सोडणे (रेचक), "मी कोण आहे" या सनातन प्रश्नाचे उत्तर शोधत अंतर्यामी लीन होऊन जाणे हेच खरे श्वास घेणे (पूरक) तसेच 'तत्वमसि' भावाने आपल्या सच्चिदानंद स्वरूपात स्थिर होऊन जाणे हेच श्वास रोधून धरणे (कुंभक) आहे. हाच खरा प्राणायाम आहे.
प्रश्नः शक्ती जागृत करण्यासाठी योगमार्गाने प्रयत्न करत असलेल्या साधकांमधेच कुंडलिनी शक्तीची जागृती घडून येते, की (नवविधा) भक्ती आणि प्रेमाच्या मार्गाचा अवलंब करत असलेल्या साधकांना देखील ते साध्य करता येते?
रमण महर्षी: कुंडलिनी शक्ती कोणाकडे नसते? तिचे खरे स्वरूप लक्षात आल्यावर तिलाच 'अखंडाकार वृत्ती' किंवा 'अहं स्फुरणा' असे म्हणतात. तुम्ही कुठल्याही मार्गाचा अवलंब केला तरी कुंडलिनी शक्ती किंवा जगदंबा सतत तुमच्या सोबत असते. फरक असेलच तर तो तुम्ही तिला कुठले नाव देता यात असतो.
प्रश्न: ज्ञानी व्यक्ती फक्त तिच्याच मार्गाचे अनुसरण करत असलेल्या साधकांना मदत करू शकते की योगासारख्या अन्य मार्गांचा अवलंब करत असलेल्या साधकांनाही ती मदत करू शकते?
रमण महर्षी: 'पिंडे पिंडे मतिर्भिन्नः' या न्यायाने अध्यात्मिक साधकांनी कुठल्याही मार्गाचा अवलंब करायचे ठरवले तरी ज्ञानसिद्ध व्यक्ती सगळ्यांनाच मदत करू शकते. या बाबतीत शंकेला जागाच नाही! एक दाखला दिल्याने हे स्पष्ट होईल. समजा एखादा पर्वत आहे. त्या पर्वताच्या शिखरावर चढाई करण्याचे अनेक मार्ग आहेत. ज्ञानी ज्या मार्गाने शिखरावर पोचला त्याच मार्गाने लोकांनी यावे असे तो सांगेल, तर काहींना ते रूचेल. काही जणांना ते अवघड वाटेल तर काहींना ते मुळीच रूचणार नाही. ज्ञानी स्वतः ज्या मार्गाने गेला त्या आणि त्याच एकमेव मार्गाने मार्गक्रमण करायचा आग्रह ज्यांना तो मार्ग रूचत नाही अशा साधकांपाशी धरला, तर त्यांना पर्वतारोहण करणे अशक्यप्राय होऊन जाईल. साहजिकच नानाविध मार्गांनी मार्गक्रमण करत असलेल्या साधकांना, मग तो मार्ग कुठलाही असो, ज्ञानी मात्र नक्की मदत करू शकतो. त्याचे कारण असे की अर्धा रस्ता पार करून आलेल्या वाटसरूंना इतर मार्गातल्या गुणदोषांची आणि खाचखळग्यांची इत्यंभूत माहिती नसली, तरी शिखरावर आसनस्थ झालेल्या ज्ञान्याच्या नजरेच्या टप्प्यात चहूबाजूंनी मार्गस्थ झालेले साधक सहजगत्या येत राहतात. त्यामुळे वाटेत फसगत होऊ नये या दृष्टीने चकवे चुकवण्यासाठी किंवा दुखापत होऊ नये या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्यासाठी यथायोग्य मार्गदर्शन करण्याची क्षमता ज्ञानी व्यक्तीमधे असते. पर्वताचे शिखर किंवा सगळ्या साधकांचे ध्येयदेखील 'एकच' तर असते!
प्रश्नः भगवान नेहेमी कुठल्या आसनात बसलेले असतात?
रमण महर्षी: कुठल्या आसनात? (स्मितहास्य करून) हृदयात स्थित असणे या आसनात. ज्या आसनात चित्तवृत्ती प्रफुल्लित राहिल आणि जे सुखावह वाटेल असेच माझे आसन आहे. यालाच सुखासन असे म्हणतात. हृदयस्थ आणि सहजसिद्ध असलेले हे आसन शांतीस्वरूप आहे. ते मन सतत प्रसन्न ठेवते. (मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण). या आसनात स्थित झालेल्या व्यक्तीला अन्य कुठल्याही आसनाची गरज पडत नाही.
प्रश्नः अर्जुनाला युद्धाला सामोरे जाण्यासाठी प्रवृत्त केलेले असल्याने भगवद्वीतेत कर्मयोगावर भर दिलेला दिसतो. सतत कर्तव्यतत्पर राहून तसेच्ग कित्येक आव्हाने परतवून लावत अत्यंत अवघड गोष्टी साध्य करून श्रीकृष्णाने स्वत:च कर्मयोगाचा एक जिवंत आदर्श सगळ्यांपुढे उभा केलेला दिसतो.
रमण महर्षी: भगवंताच्या उपदेशाची सुरूवातच देह हे तुमचे खरे स्वरूप नाही आणि त्यामुळेच कुठल्याही कर्माचे कर्तृत्व तुमच्याकडे येत नाही असे सांगून होते हे अवश्य लक्षात घ्यायला हवे.
प्रश्नः या उपदेशाचा अर्थ काय होतो?
रमण महर्षी: याचा असा अर्थ होतो की मी कर्ता आहे हा भाव न ठेवताच प्रत्येकाने आपले विहित कर्म केले पाहिजे. अहंता शून्यवत असलेल्या अवस्थेतही कर्म सहजतेने घडतच राहते. विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठीच प्रत्येक व्यक्तीचे देहस्वरूपात प्राकट्य झालेले असते; आणि ती व्यक्ती स्वत:ला कर्ता मानत असो अथवा नसो तिच्या जीवनामागचा मूळ उद्देश प्रारब्धवशात साध्य करून घेतला जातो.
प्रश्नः मग कर्मयोगाचा अर्थ काय आहे? कर्मफलाचा त्याग करणे की कर्ताभावाचा त्याग करणे?
रमण महर्षी: कर्मयोगाचा खरा अर्थ असा आहे की हा योग साधत असताना साधक आपल्या हातून घडत असलेल्या कर्माचे कर्तृत्व स्वतःवर ओढवून घेत नाही. सगळी कृत्ये (त्याच्या स्वधर्मानुसार) आपोआप घडत जातात.
प्रश्नः कर्म करताना फलप्राप्तीविषयी उदासीन असणे असा त्याचा अर्थ होतो का?
रमण महर्षी: कर्म करत असताना कर्ताभाव जागृत असेल तरच कर्मफळाविषयीचा प्रश्न उपस्थित होतो. सगळे अध्यात्मिक ग्रंथ एकमुखाने सांगतात की मी कर्ता आहे या भावनेचाच तुम्ही समूळ त्याग करायला हवा.
प्रश्नः मग कर्मयोगाचा अर्थ 'कर्तृत्व बुद्धी रहित कर्म' असा होतो का?
रमण महर्षी: होय. अगदी बरोबर आहे.
प्रश्नः गीता शिकवते की साधकाने अथ ते इति सक्रिय आणि कर्तव्यतत्पर जीवन जगायला हवे.
रमण महर्षी: होय, बरोबर आहे. मात्र ते कर्म कर्तृत्वभावना रहित असेल तरच तो कर्मयोग ठरतो.
प्रश्नः मला कर्मयोग साधायचा आहे. मी इतरेजनांना मदत कशी करू शकेन?
रमण महर्षी: तुम्ही ज्यांना मदत करावी असे 'इतरेजन' कोण आहेत? मुळातच हा 'मी' कोण आहे जो इतरेजनांना मदत करणार आहे? आधी 'मी' कोण आहे या गोष्टीचा नीट उलगडा करून घ्या. मी खात्रीने सांगतो की त्याने बाकी सगळ्या समस्यांचे निराकरण होऊन जाईल.
प्रश्नः दीर्घकाळ संघर्ष केल्यानंतर तसेच खूप मोठे बलिदान दिल्यानंतर स्वराज्य मिळाले तर स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या व्यक्तीला हर्ष वाटला किंवा ती बाब अभिमानास्पद वाटली तर ते (पारमार्थिक दृष्ट्या) योग्यच ठरणार नाही का.
रमण महर्षी: कुठलेही काम करत असताना त्या ओघात ईश्वरी शक्तीला स्वतं:ला समर्पित करता येणे साधकासाठी क्रमप्राप्त आहे. ईश्वरी सत्तेचा क्षणभरही विसर पडू न देता तिच्या सामर्थ्याची जाणीव साधकाने मनात सतत जपली पाहिजे. ही भूमिका असेल तर हर्षित होण्याचा प्रश्न येतोच कुठे? साधकाने तर त्याच्या हातून घडत असलेल्या कर्माच्या परिणामांविषयी देखील मुळीच क्षिती बाळगू नये. असे असेल तरच त्याच्या हातून घडलेले कर्म नि:संगपणे आणि निस्वार्थ भावनेने घडले आहे असे म्हणता येईल.
पुरवणी:
भगवान श्री रमण महर्षीं प्रामुख्याने आत्मविचार आणि भक्तीभावपूर्ण समर्पण या दोन गोष्टींवर भर देत असत. ते नेहेमी 'भक्ती ही ज्ञानमाता आहे' असे सांगत असत. भक्ती आणि ज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे स्पष्टपणे दाखवून देणारे स्वामी स्वरूपानंद यांचे एक कवनः
वेदांती तो बोले सृष्टि मिथ्या ऐसे
भक्ता ती चि दिसे हरि-रूप
वेदांती ओळखे मिथ्या मायाभास
हरिचा विलास भक्त म्हणे
दोहींचा भावार्थ सारखा तत्वता
एक चि हरि-सत्ता सर्वा ठायी
भक्त तो चि ज्ञानी ज्ञानी तो चि भक्त
जाणावा सिद्धांत स्वामी म्हणे

- प. पू. स्वामी स्वरूपानंद (पावस)

Sunday, 19 April 2020

विभाग ४ - ध्यान आणि योग - प्रकरण १२ - दैनंदिन व्यावहारिक जीवन

विभाग ४ - ध्यान आणि योग - प्रकरण १२ - दैनंदिन व्यावहारिक जीवन

या प्रकरणात अध्यात्मिक साधकांच्या दैनंदिन व्यावहारिक जीवनाविषयीचे भगवान रमण महर्षींचे मार्गदर्शन आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:

हिंदू परंपरेत अध्यात्मिक साधकांसाठी आश्रम व्यवस्थेची महती सांगितली गेलेली आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास या चार आश्रमांवर आधारित असलेल्या आश्रम व्यवस्थेतून जनमानसात एक समज रूढ होत गेला; की अध्यात्मिक साधक/ साधिका गांभिर्याने आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्याला/ तिला प्रापंचिक जीवनाचा त्याग करून ध्यानधारणेकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी कठोर ब्रह्मचर्याचे पालन करावे लागणारे, विरक्त, खडतर आणि तप:पूत जीवनच व्यतित करावे लागेल. रमणाश्रमाला भेट देणारे अभ्यागत महर्षींना नेहेमी या अनुषंगाने प्रश्न विचारत असत. महर्षीं त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना आश्रम व्यवस्थेचे समर्थन करण्यासाठी ठामपणे नकारच देत असत.

आपल्या भक्तांना व्यावहारिक जीवनशैलीचा त्याग करून किंवा प्रापंचिक जबाबदार्‍यांना तिलांजली देत व्रतस्थ जीवन व्यतित करण्याची परवानगी महर्षींकडून कधीच मिळत नसे. लौकिक दृष्ट्या कुठल्याही परिस्थितीत असलेल्या साधकांसाठी आत्मसाक्षात्कार तितक्याच सुलभतेने साध्य होण्याजोगा आहे असे ते ठामपणे आणि सातत्याने साधकांच्या मनावर बिंबवत असत. महर्षी त्यांच्या अनुयायांना नेहेमी असा उपदेश देत असत की आपले कर्तव्य तत्परतेने पार पाडत असताना किंवा नित्य नैमित्तिक कर्मे करताना प्रारब्धानुसार देहाद्वारे ती घडत आहेत; मात्र त्यांचे कर्तृत्व ओढवून घेणारा किंवा त्यांची जबाबदारी स्वीकारणारा व्यक्तिगत 'मी' अस्तित्वात नाही असे सजग भान जागृत ठेवण्याने जो अध्यात्मिक लाभ होईल, तो प्रापंचिक जीवनाचा त्याग केल्याने किंवा नाहक देह कष्टवण्याने कधीच मिळणार नाही.

अध्यात्मिक प्रगती साधण्याच्या दृष्टीने मनाची प्रवृत्ती सर्वाधिक महत्वाची असून  स्थळ, काळ किंवा परिस्थिती या तुलनेने गौण गोष्टी आहेत असे महर्षी ठामपणे सांगत असत. नोकरी व्यवसायात किंवा स्थळ, काळ आणि परिस्थितीत बदल केल्याने आपली अध्यात्मिक प्रगती होईल असे कुणी सुचवले तर महर्षींना ते मान्य होत नसे. या बाबतीत किरकोळ बदल करण्यासाठी परवानगी देताना देखील ते सहजासहजी  राजी होत नसत. दैनंदिन आचरणाचा विचार केला तर आहाराविषयक सवयीत सुधारणा करणे या एकमेव बदलाला मात्र महर्षी नेहेमी अनुमोदन देत असत. आपण ग्रहण केलेल्या अन्नाचा मनात उद्भवणार्‍या विचारांवर गुणात्मक तसेच संख्यात्मक परिणाम परिणाम होतो हा हिंदू धर्मात महत्वाचा मानला गेलेला सिद्धांत महर्षींना मान्य होता. (सात्विक अन्नग्रहण केल्याने चित्तशुद्धी होते. मन आणि बुद्धी सुसंवादी झाल्याने स्थैर्य, समाधान आणि आनंद अनुभवता येतो. राजस अन्नग्रहण केल्याने चंचलपणा वाढतो. मन अति सक्रिय झाल्याने तसेच मनाची सतत चलबिचल झाल्याने चित्ताचा क्षोभ होतो. तामसिक अन्नग्रहण केल्याने चित्ताचे मालिन्य, बेदरकारपणा तसेच अमानुष वृत्ती अशा दुर्गुणांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळॅ सारासार विचार करण्याची तसेच योग्य निर्णय घेण्याची क्षमता कमी होते). कुठलीही अध्यात्मिक साधना करताना शाकाहारी अन्नाचे संयत प्रमाणात सेवन करणे अत्यंत लाभदायक आहे असे महर्षी सुचवत असत.

प्रश्नः नोकरीचा राजीनामा द्यावा आणि सतत श्री भगवानांच्या सान्निध्यात रहावे अशी  प्रबळ ईच्छा मला नेहेमी होत असते.
रमण महर्षी: भगवान सतत तुमच्या सोबतच आहेत. ते तुमच्या अंतर्यामीच आहेत. खरे सांगायचे तर तुम्ही स्वत:च भगवान आहात. हा साक्षात्कार होण्यासाठी नोकरीचा राजीनामा देण्याची किंवा घरदार सोडून पळून जाण्याची मुळीच गरज नाही. वैराग्य या संकल्पनेचा अर्थ घर सोडणे, प्रापंचिक नात्यांना तिलांजली देणे किंवा वरपांगी वस्त्रप्रावरणांमधे बदल करणे असा होत नाही. माया, ममत्व आणि वासनांचा त्याग केल्यानेच अंगी खरेखुरे वैराग्य बाणवता येते. जी ईश्वरी सत्ता सगळ्या जगाचा भार वाहते, तुम्ही स्वतःला तिच्या स्वाधीन केलेत, तर नोकरीचा राजीनामा देण्याची तुम्हाला गरजच वाटणार नाही. वासनांचा त्याग केलेली व्यक्ती खरोखरच विश्वात्मक देवाशी इतकी समरस होऊन जाते, की सगळ्या अस्तित्वाला आपल्या कवेत घेईल इतका तिच्या प्रेमाचा परिघ व्यापक होतो. देवाच्या निस्सीम भक्ताचे वर्णन करताना तो विरक्त, त्यागी किंवा साक्षीभावाने राहणारा आहे या सारख्या रूक्ष संकल्पना थिट्या पडतात. ज्याच्या/ जिच्या प्रेमभावनेचा आणि करूणेचा जगाला व्यापून दशांगुळे उरेल इतका विस्तार झालेला असतो तोच खरा ईश्वर भक्त ही संकल्पनाच अधिक संयुक्तिक आहे. अशी व्यक्ती प्रापंचिक नात्यांमधे गुंतून पडलेली नाही असे भासत असले; तरी वास्तविक पाहता जात, पंथ, धर्म, वंश या सारख्या सीमांना ओलांडून "जीवो ब्रह्मैव नापरः" या न्यायाने अशा व्यक्तीने फक्त मानव समाजच नव्हे तर सगळ्या पशुपक्ष्यांनाही आपले सगेसोयरे मानलेले असते. आपल्या घरादाराचा आणि वस्त्रप्रावरणांचा त्याग करून एखादी व्यक्ती जर खर्‍या अर्थाने संन्यस्त झालेली असेल, तर आपल्या प्रेमाचा आणि करूणेचा परिघ व्यापक झाल्यानेच ती संन्यस्त झालेली असते . प्रापंचिक नातेसंबंधांमधील ताणतणावांचा किंवा कर्मकटकटींचा उबग आल्याने नव्हे!  चित्ताची अशी उन्नत अवस्था साधलेल्या कित्येक भक्तांना आपल्या प्रापंचिक जीवनापासून पलायन करावे असे देखील वाटत नाही. असा भक्त वरपांगी प्रपंचातच रमलेला दिसला, तरी पिकलेले फळ झाडावरून अलगद खाली पडावे तशी त्याची प्रापंचिक वृत्ती मात्र अलगद गळून पडलेली असते. जोवर हे घडत नाही तोवर आपल्या प्रपंचाचा किंवा नोकरी व्यवसायाचा त्याग करणे ही एक प्रकारची आत्मवंचनाच ठरेल.

प्रश्नः आपले व्यावहारिक कर्तव्य पार पाडण्यात व्यग्र असताना समाधी अवस्थेचा आनंद लुटणे शक्य असते का?
रमण महर्षी: 'मी कर्म करतो' हा कर्ताभावच त्यात सगळ्यात मोठा अडथळा आहे. स्वत:ला प्रश्न विचारा, "कर्म कोण करतो आहे?" आपल्या सच्चिदानंद स्वरूपाचे स्मरण करा. इतकेच साध्य करता आले तरी तुमचे काम आपोआप आणि सुरळित सुरू राहूनही त्यातून कर्मबंध निर्माण होणार नाही. संकल्प आणि विकल्प या दोन्हीं गोष्टींना थारा देऊ नका, कारण संकल्पविकल्पात्मक प्रयत्नच कर्मबंध निर्माण होण्याचे मूळ कारण असतात. तुमच्या प्रारब्धात जे असेल ते घडत राहील. तुमच्या प्रारब्धात काम करणे नसेल, तर तुम्ही कितीही शोधाशोध केली तरी तुम्हाला काम मिळणार नाही. प्रारब्धवशात तुमच्याकडून एखादे काम व्हायचे असेल, तर तुम्ही ते टाळण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी तुम्हाला तेच काम हाती घेण्यासाठी बाध्य केले जाईल. ते काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न तुमच्या हातून करवून घेतले जातील. काय करावे आणि करू नये हे तुमच्या मर्जीने घडत नसल्याने तो भार ईश्वरावर सोडून तुम्ही स्वस्थचित्त राहिलात तर तुमच्या हातून कित्येक कृत्ये घडताना दिसली तरी तुमची सहज स्थिती (सहज समाधी) भंग होणार नाही.

प्रश्नः एखाद्याने निरंतर आपल्या स्वरूपाचे स्मरण ठेवणे साध्य केले, तर अशा व्यक्तीकडून घडलेले प्रत्येक कृत्य योग्यच असते का?
रमण महर्षी: खचितच तसे असते. मात्र अशा व्यक्तीला आपण केलेले कृत्य बरोबर आहे की चूक याची फिकीर नसते. अशा व्यक्तीने केलेले प्रत्येक कृत्य हे (तिच्या माध्यमातून) परमेश्वरानेच केलेले असते आणि त्यामुळे ते योग्यच असते.

प्रश्नः आत्मविचार करण्यासाठी एकांताची आवश्यकता असते का?
रमण महर्षी: एकांत सगळीकडेच आहे. एकांत सतत तुमच्या सोबत असतो. मी उल्लेख करत असलेल्या एकांताचा शोध बाह्य जगतात न घेता तो अंतर्यामी घेण्याचे काम मात्र प्रत्येकाला स्वतःच करावे लागते. एकांत माणसाच्या मनातच दडलेला आहे. बाहेरच्या जगात कितीही कोलाहल सुरू असला तरी एखाद्याने चित्ताची प्रसन्नता भंग होऊ दिली नाही, तर अशी व्यक्ती एकांतातच असते. उलटपक्षी सर्वसंगपरित्याग करून जंगलात जाऊन बसलेल्या एखाद्या व्यक्तीचा आपल्या विचारांवर ताबा नसल्याने तिचे चित्त अस्थिर असेल, तर ती व्यक्ती एकांतात आहे असे म्हणता येत नाही. एकांत ही मनाचीच एक प्रवृत्ती आहे. विकार आणि वासनांनी लडबडलेली व्यक्ती कुठेही असली तरी तिला एकांत मिळवता येत नाही. अंगी वैराग्य बांणवलेला साधक जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी तो कायम एकांतातच असतो.

प्रश्नः सतत या ना त्या कामात गुंतवून ठेवत असलेली प्रापंचिक कर्तव्ये निभावून नेत असतानाच आम्हाला नैष्कर्म्य स्थिती आणि मानसिक शांती कशी मिळवता येईल?
रमण महर्षी: (पारमार्थिक) शहाणपण मिळवलेली व्यक्ती काम करते आहे असे फक्त इतरांना दिसत असते, त्या व्यक्तीला मात्र तशी जाणीव नसते. असे असल्याने इतरेजनांना ज्ञानी व्यक्ती कधी कष्टाचे डोंगर उपसताना किंवा कधी अवघड गोष्टी साध्य करताना दिसत असली, तरी प्रत्यक्षात ती काहीच करत नसते. अशा व्यक्तीच्या हातून घडणारे कार्यकलाप तिच्या नैष्कर्म्य स्थिती किंवा मन:शांतीमधे अडसर निर्माण करू शकत नाहीत. ज्ञान्याला हे माहित असते की कर्ता करविता तो नसून त्याच्या निव्वळ उपस्थितीत सगळे कार्य घडून येते आहे, तो मात्र सदैव पूर्णपणे निर्लेप आणि निश्चळ अवस्थेतच आहे. अवतीभोवती घडत असलेल्या घडामोडींबद्दलची ज्ञान्याची भूमिका किंवा आंतरिक स्थिती मौन आणि साक्षीभावाचीच असते.

प्रश्नः पाश्चात्य जीवनशैलीचा अवलंब करत असलेल्या साधकांना वृत्ती अंतर्मुख करणे अधिक कष्टप्रद असते का?
रमण महर्षी: होय, तसे आहे खरे.  पाश्चात्य जीवनशैलीचा अवलंब करत असलेली व्यक्ती रजोगुणी असते. अशा व्यक्तीचा स्वभाव बहुधा बहिर्मुखी असतो. आपण आपल्या स्वरूपाचे सतत स्मरण ठेवले, अंतर्यामी शांत राहिलो, तर मग बाहेरच्या जगात आपण हवे तितके कार्यरत राहू शकतो. रंगमंचावर स्त्री पात्र साकार करत असलेला अभिनेता आपण पुरूष आहोत हे विसरून जातो का? तद्वतच जगाच्या या रंगमंचावर आपल्याला स्थळ, काळ आणि परिस्थितीनुसार आपापली भूमिका वठवावी लागते. आपापल्या भूमिका वठवत असताना आपली मूळ ओळख विसरून त्या भूमिकांशी तादात्म्य न पावणे हाच अध्यात्मिक प्रगतीचा राजमार्ग आहे.

प्रश्नः  पारमार्थिक प्रगती साधण्यातील चालढकल दूर करण्यात इतरेजनांना आपल्याला मदत कशी करता येईल ?
रमण महर्षी: तुम्ही स्वत: हे साध्य केलेले आहे का? तुमच्या सगळा प्रश्नांना आणि उर्जेला स्वरूपबोधाकडे वळवा. तुमच्या अंतर्यामी शक्ती जागृत झाली, तर तिचा परिणाम तुम्ही म्हणता त्या इतरेजनांवर आपोआप होतो.

प्रश्नः आपण ब्रह्मचर्य पालनाला मान्यता देता का?
रमण महर्षी: खरा ब्रह्मचारी तोच असतो ज्याची ब्राह्मी स्थिती कधीच भंग होत नाही. अशा व्यक्तीच्या बाबतीत विकार आणि वासनांचा पगडा असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

प्रश्नः योगी अरविंदांच्या आश्रमात विवाहीत जोडप्यांना आश्रमात वास्तव्य करायचे असेल तर ब्रह्मचर्याचे पालन केलेच पाहिजे असा कडक नियम आहे.
रमण महर्षी: त्याचा काय उपयोग आहे? ज्या वासना मनात जागृत आहेत, त्यांचे लोकांना सक्तीने दमन करायला भाग पाडण्याने काय साध्य होणार आहे?

प्रश्नः मी क्षणिक वासनांना बळी पडून बरीच पापकर्मे केली आहेत.
रमण महर्षी: आपण असे गृहीत धरू या की हे खरे आहे. तुम्ही जर सतत मनातल्या मनात त्याच त्या गोष्टींची उजळणी करत बसणे थांबवले, तर त्यांचे उपद्रव मूल्य आपोआप शून्य होऊन जाईल. आत्मस्वरूपामधे कुठल्याही पापकर्माची जाणीव नसते. लक्षात घ्या की वासनांचा त्याग हा आतून करावा लागतो. आपल्या वर्तनात वरपांगी बदल करण्याने फारसा लाभ होत नाही.

प्रश्नः आहाराविषयी आपले काय मत आहे?
रमण महर्षी: अन्नाचा मनावर परिणाम होतो. कुठल्याही प्रकारची योगसाधना करायची असेल तर शाकाहाराचा स्वीकार करणे अतिशय हितकारक आहे. सात्विक शाकाहारी अन्नग्रहण केल्याने चित्तशुद्धी होण्यात आणि मन स्थिर होण्यात मदत होते.

प्रश्नः आहारात मांसाहाराचा समावेश करणारी व्यक्ती आत्मसाक्षात्कारी होऊ शकते का?
रमण महर्षी: होय, ते अशक्य नाही. तुम्ही स्वतः मात्र हळूहळू मांसाहाराचा त्याग करत सात्विक शाकाहारी अन्नग्रहण करण्याची सवय करून घ्या. या बाबतीत मला एक महत्वाची बाब अवश्य नमूद करायची आहे, ती अशी की एकदा ज्ञानप्राप्ती झाली की मग तुम्ही काय खाता याने फारसा फरक पडत नाही. ज्ञानाग्निचा वणवा इतका प्रदिप्त असतो की तुम्ही त्यात कुठलेही इंधन घातले तरी त्याने तिळमात्रही फरक पडत नाही.

प्रश्नः (साधकांनी) मद्यपान आणि मांसाशनाचा पूर्णपणे त्याग करण्याची शिफारस आपण करता का?
रमण महर्षी: साधनेच्या प्रारंभिक अवस्थेत या गोष्टींचा पूर्णपणे त्याग करणेच साधकांच्या हिताचे आहे. गतानुगतिकपणे काही सवयी आपल्या अंगी अगदी हाडीमाशी मुरलेल्या असतात. जिभेचे चोचले पुरवण्याची चटक लागल्यानेच त्या सवयी सोडताना त्रास होतो, त्यांची आपल्या देहाला खरोखरची आवश्यकता असल्याने नव्हे!

प्रश्नः ढोबळमानाने पाहता अध्यात्मिक साधकांनी सरसकट पाळावेत असे आचरणविषयक नियम काय आहेत?
रमण महर्षी: संयत आहार, संयत निद्रा आणि संयत संभाषण.

नको निराहार नको सेवू फार
सदा मिताहार असो द्यावा
नको अति झोप नको जागरण
असावे प्रमाण निद्रेमाजी
नको बोलू फार नको धरू मौन
करावे भाषण परिमित
संयमी जीवन बाणता सहज
स्वामी म्हणे तुज योग-सिद्धी

- प. पू. स्वामी स्वरूपानंद (पावस)

Friday, 10 April 2020

विभाग ४ - ध्यान आणि योग - प्रकरण ११ - मंत्र, जप आणि नामस्मरण

या प्रकरणात मंत्र, जप तसेच नामस्मरणाविषयीचे भगवान श्री रमण महर्षींचे मनोगत आपण जाणून घेणार आहोत.

डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा गोषवारा असा आहे:

दीक्षा देत असताना सद्गुरूंनी शिष्याला प्रदान केलेल्या एखादा शब्दाला किंवा श्लोकालाच मंत्राचे स्वरूप प्राप्त होते. सद्गुरूंना घडलेल्या साक्षात्कारातून किंवा त्यांनी केलेल्या ध्यानधारणेतून त्यांच्याजवळ अध्यात्मिक शक्तीचा जो संचय झालेला असतो, त्यापैकी काही भाग मंत्रस्वरूपात शिष्याकडे संक्रमित केला जातो. शिष्याने सातत्याने त्या मंत्राचा जप करण्याकडे लक्ष दिले, तर सद्गुरूंची शक्ती अशा प्रकारे कार्यरत होते; जेणेकरून शिष्याला आत्मसाक्षात्काराचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रगती करताना ती सातत्याने मदत करत राहते. रमण महर्षींना या मार्गाची वैधता मान्य असली तरी त्यांनी स्वत: औपचारिक पद्धतीने दीक्षा देण्याची उदाहरणे अपवादात्मकच आहेत. महर्षींनी दीक्षा देताना मंत्रोपदेश केल्याचेही दिसून येत नाही. त्याचवेळी एक गोष्ट लक्षात घ्यावीच लागेल की नामस्मरणाचा उल्लेख मात्र महर्षी अत्यंत आदरपूर्वक करत असत. भक्ती आणि समर्पणाचा मार्ग स्वीकारलेल्या साधकांसाठी नामस्मरण हे अत्यंत उपकारक असे साधन आहे असे आग्रही प्रतिपादन महर्षी करत असत.

समर्पणाच्या मार्गावर या विश्वाचे संचालन करणारी सगळी जबाबदारी वाहणारी एक अव्याख्य अशी उच्चतर शक्ती आहे, तसेच व्यक्तिगत 'मी' ला जगाच्या व्यापारात नगण्य स्थान आहे हे भान निरंतर ठेवावे लागते. साधकांच्या जीवनात अशा वृत्तीची जोपासना व्हावी या दृष्टीने जप अत्यंत परिणामकारक ठरतो असे प्रतिपादन महर्षी करत असत. व्यक्तिगत 'मी' चे तसेच इंद्रियगोचर बाह्य जगताविषयीचे भान हरपून त्या ऐवजी ईश्वरी शक्तीचे अनुसंधान घडत रहावे या दृष्टीने जप आणि नामस्मरणाचे महत्व अनन्यसाधारणच आहे.

सुरूवातीच्या काळात नामस्मरणाचे स्वरूप ध्यानस्थ होण्यासाठी किंवा एकाग्रता साधण्यासाठी प्रयत्नपूर्वक चालवलेला अभ्यास असे असते. नामस्मरणाचा सातत्याने सराव केल्याने कालांतराने साधकाला कळत नकळात अशी एक स्थिती प्राप्त होते जिथे प्रयत्न न करताच नामस्मरण सतत आणि आपोआप होत राहते. ही स्थिती प्राप्त करण्यासाठी ज्या दैवताचे नामस्मरण सुरू असते त्या इष्टदैवताला सर्वभावे शरण जावे लागते. निव्वळ एकाग्रतेने ती साध्य करता येत नाही. महर्षींचे असे मत होते की परिणामकारक पद्धतीने नामस्मरण करायचे असेल तर आपल्या दैवताला मनोभावे आणि आंतरिक तळमळीने साद घालणे तसेच अनन्य भावाने त्या दैवताच्या पायी शरणागत होणे अनिवार्य आहे. अनन्य भावाने शरणागती साधली की मग इष्टदेवतेचे नाम त्या साधकाची साथ कधीच सोडत नाही.

नामस्मरणाच्या प्रगत अवस्थांबद्दल बोलत असताना महर्षींनी वर्णन केलेल्या संकल्पनांमधे गूढरम्यतेचे वलय स्पष्टपणे दिसून येत असे. ईश्वराचे नाम आणि साधकाचे आत्मस्वरूप एकच गोष्ट आहेत असे महर्षी सांगत असत; तसेच त्या पुढे जात आत्मसाक्षात्कार घडल्यानंतर साधकाच्या हृदयात (अंतर्यामी) साधकाचे इष्टदैवतच स्वत:चा जप करत राहते आणि साधकाला कुठलेही सायास पडत नाहीत असेही महर्षी सांगत असत (उदा. राम हमारा जप करे, हम बैठे आराम - संत कबीर दासजी). जपाचे साधन 'स्व' विषयीच्या जागृतीत (स्वसंवेद्यता) विलीन होईल तेव्हाच ही स्थिती प्रात होते असा निर्वाळा महर्षी देत असत. नामस्मरण ते स्वसंवेज्ञता असे अवस्थांतर घडणे किती आवश्यक आहे हे सांगताना चौदाव्या शतकातला कार्यकाल असलेल्या महाराष्ट्रातल्या संत नामदेवांच्या एका वचनाचा ते आदराने उल्लेख करत असत. त्या वचनाचा असा अर्थ होतो - "'मी' च्या सत्य स्वरूपाची ओळख पटली तरच नामाच्या सर्वव्यापकतेचा बोध होणे संभवते. जोवर 'मी' विषयीचा यथार्थ बोध होत नाही, तोवर नामाच्या सर्वव्यापी सत्तेची अनुभूती यावी हे संभवतच नाही". संत नामदेवांचे नामस्मरणाची महती सांगणारे एक पुस्तक १९३७ साली महर्षींच्या वाचनात आले. महर्षींच्या पलंगाजवळ असलेल्या पुस्तकांच्या छोट्या कपाटावर सहज हाती येईल अशा जागी त्या पुस्तकाची एक प्रत महर्षींनी ठेवली. ही प्रत आयुष्याच्या शेवटच्या १३ वर्षांच्या कालखंडात महर्षींनी तिथून कधीच हलवली नाही. जप किंवा नामस्मरणाविषयी आश्रमात आलेल्या अभ्यागतांनी प्रश्न विचारले, तर महर्षी नेहेमी त्या पुस्तकातली वचने वाचून दाखवत असत. महर्षींनी कित्येक वेळा या पुस्तकाचे मुक्तकंठाने गुणगान केल्याने तसेच या पुस्तकातले सातत्याने दाखले दिल्याने महर्षी त्यातल्या आशयाशी पूर्णपणे सहमत होते असे म्हणावे तर ते वास्तवाला धरूनच होईल.

प्रश्नः लोक (निर्गुण निराकार) देवाला नानाविध नावे देतात आणि असे सांगतात की अमुक एक नाम अत्यंत पवित्र आहे. ते असे म्हणतात की नामाची पुनरूक्ती केल्याने साधकाला दैवी वरदान मिळून त्याची अध्यात्मिक प्रगती होते. हे खरे कसे असू शकेल?
रमण महर्षी: यात शंका घेण्याजोगे काय आहे? तुमचेही एक नाव आहे, ज्याला तुम्ही प्रतिसाद देता. मात्र हे अवश्य लक्षात घ्या की जन्माला येताना हे नाव तुमच्या देहावर लिहीलेले नव्हते. तुमच्या देहाने आजवर कुणालाही असे सांगितलेले नाही की अमुक तमुक हे माझे नाव आहे. तरीही तुमचे नामकरण झालेले आहे. त्या नावाशी तुमची ओळख जोडली गेलेली असल्याने तुम्ही त्याला प्रतिसाद देखील देता आहात. याचाच अर्थ असा होतो की त्या नावाचे असे काही ना काही महत्व खचितच आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता तुमचे नाव हा निव्वळ कल्पनाविलास आहे असे म्हणता येणार नाही. तद्वतच देवाच्या नावात सामर्थ्य आहे आणि नामस्मरणही परिणामकारक आहे. नामाची पुनरूक्ती केल्याने नाम ज्या गोष्टीचे (इष्टदैवत) महात्म्य दर्शवते तिचे स्मरण साधले जाते. त्यामुळे अध्यात्मिक लाभ होतो हे वेगळे सांगायला नको.

प्रश्नः (अल्पशिक्षीत असल्याने) मला अध्यात्मशास्त्राची फारशी माहिती नाही. आत्मविचाराची साधनपद्धती मला खूप कठिण वाटते. स्त्री असल्याने आणि त्यातून सात मुलांची आई असल्याने माझ्यावर घरकामाचे मोठे ओझे आहे. प्रपंचातच सगळा वेळ जात असल्याने मला ध्यानधारणेसाठी उसंत मिळत नाही. माझी भगवानांना विनंती आहे की त्यांनी मला साधी सुलभ अशी एखादी साधना सुचवावी.
रमण महर्षी: आत्मसाक्षात्कार घडावा या साठी कुठल्याही शास्त्राचा अभ्यास करणे किंवा शास्त्रवचनांचे ज्ञान असण्याची गरज नाही. आपले रूप न्याहाळण्यासाठी आपल्याला फक्त एक आरसा पुरेसा असतो, तसेच आत्मसाक्षात्काराचे देखील आहे. विद्वानांना देखील शेवटी जन्मभर गोळा केलेल्या सगळ्या पुस्तकी ज्ञानाचे गाठोडे ते 'अनात्मस्वरूप' आहे हा बोध झाल्यावर अडगळीत टाकून द्यावे लागते. प्रापंचिक कामे करण्याने किंवा मुलाबाळांची काळजी वाहण्याने अध्यात्मिक प्रगतीत विघ्नच यावे असा कुठलाही नियम नाही. "मी कोण आहे" ही साधना शिकवत असताना मी सल्ला देतो त्याप्रमाणे तुम्ही इतर कुठलीही साधना न करता फक्त (जाणीवेच्या उगमस्थानाकडे जमेल तेव्हा जमेल तितके अवधान देत) 'मी आहे' 'मी आहे' असे सतत पुटपुटत राहिलात तरी ते पुरेसे आहे. तेलाची अखंड धार पडावी तसे सातत्याने हे स्मरण करत राहिलात तर तुम्ही आपोआप साक्षात्कारी स्थितीपर्यंत पोचाल. प्रपंचातले कुठलेही काम हातावेगळे करत असताना, अगदी उठता बसता प्रत्येक क्षणी हे स्मरण सतत होत राहिले पाहिजे. 'मी आहे' ही जाणीव (अहंस्फुरणा किंवा शुद्ध चैतन्य) हेच देवाचे खरे नाव आहे. सगळ्या मंत्रांपैकी हा प्रथम क्रमांकाचा आणि सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. प्रणवाची महती देखील या मंत्रापुढे दुय्यम स्वरूपाची आहे.

प्रश्नः वाचेने स्पष्ट उच्चार करत (प्रणवाचा किंवा एखाद्या मंत्राचा) जप केल्याने काहीच लाभ मिळत नाही का?
रमण महर्षी: स्पष्ट उच्चार करत केलेल्या जपाने काहीच लाभ होणार नाही असे कोण म्हणेल? असा जप खात्रीपूर्वक चित्तशुद्धी करण्याच्या कामी येईल. सातत्याने जप साधना करत राहिल्यास तो प्रयत्न एका प्रगल्भ अवस्थेपर्यंत पोचतो आणि कमी अधिक काळाने का होईना साधकाला योग्य मार्गावर आणून सोडतो. अशी पक्की खात्री बाळगा की भले असो की बुरे, तुम्ही जे काही करता ते वाया कधीच जात नाही. मात्र प्रत्येक साधकाचा पिंड तसेच तो परिपक्वतेच्या कुठल्या अवस्थेत आहे हे लक्षात घेत त्याला कर्म, अकर्म इत्यादिंचे भेद तसेच तो करत असलेल्या साधनपद्धतीमधले गुण आणि दोष सद्गुरूंना त्याला स्पष्ट शब्दात सांगावे लागतात.

प्रश्नः कुठल्याही व्यक्तीने सहजच जाता येता एखादा पवित्र मंत्र निवडला आणि त्याचा जप सुरू केला तर त्याचा काही फायदा होतो का?
रमण महर्षी: नाही. एक तर त्या व्यक्तीची तशी पात्रता असायला हवी आणि तिला सुपात्र सद्गुरूंकडून मंत्रदीक्षा मिळायला हवी.

राजा आणि प्रधानाच्या एका गोष्टीमधून हा मुद्दा स्पष्ट होईल. एकदा एक राजा अचानक आधी न कळवता त्याच्या प्रधानाच्या घरी सदिच्छा भेटीसाठी गेला. तिथे गेल्यावर त्याला असे सांगण्यात आले की प्रधान जप करण्यात व्यग्र असल्याने राजाला थोडा वेळ प्रतिक्षा करावी लागेल. थोड्या वेळाने प्रधानाची भेट झाल्यावर राजाने कुतुहलाने प्रधानाला विचारले की तो नेमक्या कुठल्या मंत्राचा जप करत होता. प्रधानाने उत्तर दिले, की तो सगळ्यात पवित्र अशा गायत्री मंत्राचा जप करत होता. ते ऐकून गायत्री मंत्राची दीक्षा द्यावी अशी राजाने प्रधानाला गळ घातली. प्रधानाने मात्र विनम्रपणे नकार देत असे सुचवले की मंत्र दीक्षा देण्याची पात्रता प्रधानाच्या अंगी नव्हती. राजाने ते मान्य केले. तो विचार मनात सतत घोळत राहिल्याने राजाने एका विद्वान व्यक्तीकडून गायत्री मंत्राचे उच्चारण शिकून घेतले. प्रधानासोबतच्या पुढच्या भेटीतच राजाने गायत्री मंत्राचे पठण करून दाखवत प्रधानाला विचारले की एखादी चूक होत असेल तर प्रधानाने ती नि:संकोचपणे दाखवून द्यावी. प्रधानाने उत्तर दिले की मंत्रोच्चारण तर अगदी बिनचूक आहे, मात्र राजाने आपल्या मनाने मंत्र जप आरंभणे उचित नाही. राजाला ते पटले नाही. त्याने खोदून खोदून विचारले तरीही प्रधानाने उत्तर देताना टाळाटाळ केली.

उतावीळ झालेल्या राजाने उत्तर मिळायलाच हवे असा दबाव टाकल्यावर प्रधानाने एक युक्ती केली. त्याने जवळ उभ्या असलेल्या शिपायाला आज्ञा दिली, की शिपायाने राजाच्या मुसक्या आवळाव्या आणि त्याची रवानगी तुरूंगात करावी. शिपाई जागचा हलला नाही. शिपायाचे ते वर्तन पाहून प्रधान पुनःपुन्हा अधिकाधिक जोराने तीच आज्ञा देत राहिला, मात्र शिपायाने तिकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. हा प्रकार असह्य झाल्याने राजाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. संतापाच्या भरात राजाने शिपायाला आज्ञा दिली की प्रधानाच्या मुसक्या आवळाव्या आणि त्याची रवानगी तुरूंगात करावी. शिपायाने तत्क्षणी प्रधानाला जेरबंद केले.

प्रधान जोरजोरात हसायला लागला. त्याने राजाला विचारले की तुम्हाला हवे ते स्पष्टीकरण मिळाले का? राजा बुचकळ्यात पडला. त्याने विचारले की प्रधांनजींना नेमके काय सांगायचे आहे. प्रधानाने उत्तर दिले, "आज्ञा तंतोतंत तीच होती आणि आज्ञेचे पालन करणारी व्यक्तीदेखील तीच होती. मात्र आज्ञा देत असलेल्या व्यक्तीच्या अधिकारात फरक होता. हे राजन, मी आज्ञा दिली, तेव्हा ती पूर्णपणे निष्फळ ठरली. मात्र तीच आज्ञा आपण दिलीत, तेव्हा तत्क्षणी तिचे पालन केले गेले. मंत्रदीक्षेच्या बाबतीत देखील हाच नियम लागू होतो."

पुरवणी:
भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात भगवंतांच्या विभूतींविषयीचे विवेचन आहे. भगवद्गीता १०.२५ या श्लोकात 'यज्ञानां जपयज्ञोSस्मि' - सर्व प्रकारच्या यज्ञांमधे जपयज्ञ ही माझी विभूती आहे असा स्पष्ट उल्लेख आहे.

नाथपंथी ध्यानयोग (लेखक:- प. पू. श्री. दादा आंबेकर - नाशिकचे नाथपंथी गुरूदेव श्री गजानन महाराज यांचे शिष्य, प्रकाशकः सोहम प्रकाशन, सातारा) या पुस्तकात सोहम साधनेतील मंत्रजप तसेच नामस्मरणाची महती सांगणारी तसेच सविस्तर माहिती देणारी पाच प्रकरणे आहेत. जिज्ञासूंसाठी हा सगळा भाग मुळातून वाचण्यासारखा आहे. विस्तारभयास्तव पुस्तकातला नाममहात्म्याविषयीचा संतजनांनी मोजक्याच शब्दात दिलेला अभिप्राय नमूद करून लेखाची सांगता करतो.

सद्गुरूंना साक्षात्कार झाल्यावर ते ब्रह्मरूप होतात. त्यामुळे त्यांनी दिलेल्या नामात अगाध शक्ती असते. त्यांना संकल्पशक्तीने शिष्याला जे सामर्थ्य द्यायचे असते ते देता येण्यासाठी आधार किंवा वाहक या स्वरूपात ते नामाचा उपयोग करतात. अशा नामाला 'सबीज' नाम असे म्हणतात (उदा. जपे हरिनाम बीज। तोचि वर्णामाजी द्विज॥ तुका म्हणे वर्णधर्म। अवघे आहे सम ब्रह्म ॥ - संत तुकाराम)

नामेचि सिद्धि, नामेची सिद्धी|
व्यभिचार बुद्धि, न पावता ||
- संत तुकाराम

अठरा पुराणांच्या पोटी |
नामावीण नाही गोष्टी ||
- संत नामदेव

सार सार सार, विठोबा, नाम तुझे सार|
म्हणोनि शूळपाणि जपताहे निरंतर ||
- संत ज्ञानदेव

विभाग ४ - ध्यान आणि योग - प्रकरण १० - ध्यान आणि एकाग्रता

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ४ - ध्यान आणि योग: प्रकरण १० - ध्यान आणि एकाग्रता

या प्रकरणात ध्यान आणि ध्यानधारणेसाठी आवश्यक असणारी एकाग्रता या दोन गोष्टींविषयीचा भगवान श्री रमण महर्षींचा उपदेश आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:

रमण महर्षींचे असे मत होते, की जागृती, निद्रा आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमधे ज्यात सातत्य राखता येते तेच ध्यान सर्वश्रेष्ठ असते. असे सातत्य येण्यासाठी  'मी ध्यान करतो आहे' असा विचारतरंगदेखील मनात उमटू नये इतकी उत्कटता ध्यानधारणेत असावी लागते.

योगाविषयी महर्षींचे मत थोडक्यात असे सांगता येईल - नानाविध विभ्रमांच मूळ कारण असलेल्या इंद्रियगोचर ज्ञानाचा पगडा क्षीण होत गेला, त्या पलीकडच्या अनुभूतीची गोडी लागली, आणि त्या योगे सतत उसळून येत असलेली अहंता आणि विषयांचा लळा लागलेल्या मनावर पूर्ण ताबा मिळाला, की साधकाच्या अंतःकरणात 'शब्देविण संवादु' अशा अनाहत नादाची आणि दिव्य अशा तापहीन प्रकाशाची अनुभूती येते. योगाची खरी शक्ती हीच आहे.

द्वैताचा अंतर्भाव असलेल्या एखाद्या ध्यान किंवा उपासनापद्धतीकडे कल असलेल्या आणि आत्मविचाराकडे ओढा नसलेल्या साधकांची श्रद्धा डळमळू नये, त्यांचा बुद्धिभेद होऊ नये या दृष्टीने रमण महर्षी अशा साधकांना त्यांनी निवडलेल्या मार्गावरून पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देत असत. ते साधकांना आश्वस्त करत असत की त्यांनी निवडलेला मार्ग देखील त्यांना आत्मसाक्षात्कारापर्यंत घेउन जाईल. दिशाहीन असण्यापेक्षा कुठलीही ध्यान/ उपासना पद्धती स्वीकारणे श्रेयस्कर असते, कारण ती शेवटी आत्मविचारापर्यंतच पोचते असे महर्षींचे ठाम मत होते.

प्रश्नः वैषयिक सुखांपेक्षा ध्यानात अधिक सुख मिळते. असे असूनही मन ध्यानाकडे आकृष्ट न होता विषयांकडेच ओढले जाते. असे का घडते?
रमण महर्षी: सुखसंवेदना आणि वेदना या मनाच्याच दोन अवस्था आहेत. आपला मूळ स्वभाव मात्र सच्चिदानंद स्वरूप आहे. देह आणि मनाशी तादात्म्य साधल्याने तेच आपले खरे स्वरूप आहे असा भ्रम झाल्याने आपल्याला मूळ स्वरूपाचा विसर पडलेला आहे. ही हरवलेली ओळखच सगळ्या हालअपेष्टांना जन्म देते. स्वतःचीच ओळख हरवलेल्या या परिस्थितीत ती परत मिळवण्यासाठी आपल्याला काय करता येईल? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे.  मनाची ही प्रवृत्ती खूप पुरातन असते. कित्येक जन्म लोटले तरी विचारांच्या तंद्रीत हरवलेल्या माणसाने हातात धरलेल्या पुस्तकाची पाने एक एक करून उलटावी तशी ती मागील पानावरून पुढे सुरू राहते. काळ लोटेल तशी ही प्रवृत्ती अधिकाधिक खोलवर रूजत जाते आणि मजबूत होत जाते. मूळ स्वरूपाने स्पष्टपणे प्रकट व्हावे, त्याची प्रचिती यावी या दृष्टीने मनाच्या या प्रवृत्तीचा येनकेनप्रकारेण अंत करावा लागतो.

प्रश्नः भगवान, मी जेव्हा जेव्हा ध्यान करतो तेव्हा मला मस्तकात आगीचे लोळ उठल्यासारखे वाटते. तिकडे दुर्लक्ष करून अट्टाहासाने तसेच ध्यान करत राहिले, तर माझ्या सगळ्या शरीराची लाहीलाही होते. यावर काय उपाय आहे?
रमण महर्षी: मेंदूचा वापर करून एकाग्रता साधली तर जळजळ होण्याची अनुभूती येते आणि पुढे असह्य डोकेदुखी मागे लागते. अंतःकरणापासून (उपास्य देवतेशी) साधलेली एकतानताच शीतलता प्रदान करणारी आणि उत्साहवर्धक असते. गात्रे शिथील केलीत तर तुमच्या ध्यानात सहजता येईल. सौम्यपणे तसेच कुठलाही तणाव न घेता सतत घुसखोरी करणारे विचारतरंग हळुवारपणे दूर सारत मनाला स्थिर करत रहा. तुम्ही लवकरच त्यात यशस्वी व्हाल.

प्रश्नः ध्यान करत असताना झोप लागू नये या साठी मी काय करायला हवे?
रमण महर्षी: तुम्ही झोप येऊ नहे असा प्रयत्न करत असाल तर ध्यान साधताना तुम्ही बौद्धिक विचार करत आहात असा त्याचा अर्थ होतो. ध्यान करताना बौद्धिक विचार करणे थांबवता येणे महत्वाचे आहे. ध्यान करत असताना तुम्ही नकळत निद्रादेवीच्या आधीन झालात तर तुमचे ध्यान निद्रावस्थेत असताना तसेच जागे होत असतानाही सुरूच राहील. तरीही, अखंड सुरू राहिलेला तो एक प्रकारचा विचारच असल्याने जागृत आणि सजग अवस्थेत विचाराचा गोंगाट मागे पडून अंतिम सहजस्थिती प्राप्त करता यावी या दृष्टीने शेवटी अशा योगनिद्रेपासूनही मुक्ती मिळवावी लागते. निद्रा आणि जागृती ही निव्वळ तुमच्या विचारांच्या गोंगाटापासून मुक्त असलेल्या स्वरूपाच्या शुभ्र पडद्यावर उमटणारी चित्रे आहेत. तुम्ही दखल घेतली नाहीत तरी ती तशीच ये जा करत राहतील.

प्रश्नः मी कशावर ध्यान करावे?
रमण महर्षी: अशी कुठलीही गोष्ट जी तुम्हाला भावते आणि तुम्ही अन्य गोष्टींपेक्षा तिला सहजतेने प्राधान्य देऊ शकाल.

प्रश्नः शिव, विष्णु आणि गायत्री हे तितकेच प्रभावी आहेत असे म्हणतात. मी कशावर ध्यान करावे?
रमण महर्षी: कुणीही एक ज्यावर तुमचे सर्वाधिक प्रेम आहे. या सगळ्यांचा प्रभाव समतुल्यच आहे. मात्र एकाच इष्टदैवताशी एकनिष्ठ रहाणे तुमच्या हिताचे ठरेल.

पुरवणी:
ध्यान कसे करावे तसेच ध्यानधारणेसाठी आवश्यक असलेली एकाग्रता कशी साधावी या दृष्टीने भगवद्गीतेतील सहाव्या अध्यायातील ६.१० ते ६.३२ हे श्लोक तसेच या श्लोकांवरचे संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत केलेले विस्तृत भाष्य अत्यंत मोलाचे आहे. हे भाष्य शब्दशः न घेता त्यातील भावार्थ समजावून घेणे देखील पुरेसे ठरते. भगवद्गीता तसेच ज्ञानेश्वरी आंतरजालावर सहज उपलब्ध असल्याने तसेच ज्ञानेश्वरीचा सहावा अध्याय यूट्यूबवर श्री. राजेंद्र वैशंपायान यांच्या स्वरात असलेल्या ऑडिओ बुकच्या स्वरूपात सहजगत्या उपलब्ध असल्याने त्याचा इथे समावेश केलेला नाही.